Thursday, November 4, 2021

टवक्या !!

 "चौथ्या रांगेतली ती कोपऱ्यातली गोरीपान बुटकबैंगण गोडुली दिसतेय का?"

कोण आहे रे ती?...

"माझी होणारी बायको ! "..

स्वतःच्या होणाऱ्या बायकोची ओळख ज्याने (त्याच्या लग्नाच्या 1 वर्ष आधी,अनाहुतपणे माझी आणि त्याची सिनेमा थिएटरात इंटरवल मध्ये भेट झाल्यावर)अशा पद्धतीने करून दिली होती,त्या परमेश्वराच्या अप्रतिम निर्मितीचे (त्याच्या )आई वडिलांनी ठेवलेले नाव "शैलेश" असे असले तरी ते केवळ कागदोपत्री आहे....! त्याचे जनसमुदायातील सर्वमान्य नाव हे,एका तडकलेल्या वडापाववाल्याने चार चौघात आम्हा मित्र मंडळींसमोर त्याची वयाच्या 16व्या वर्षी लाज काढत "ऐ,टवक्या,रोजचे चार वडापाव उधारिवर खाऊन वर टेस्ट नाय म्हणून नावं ठेवतोस काय रे सुकड्या?"....या सुख- संवादानंतर "टवक्या" असे पडलेले आहे ते यावदचंद्रदिवाकरो असेच असेल !

टवक्या अत्यंत अभ्यासू होता व अजून आहे! आमच्या मित्रमंडळीत (किंवा जगातही) अशी व्यक्ती एकमेवाद्वितीयच आहे!माधुरी दीक्षित नुसतीच हसली तरिही जीवघेणी कशी दिसत होती त्यामागचे नक्की कारण काय ? किंवा रविना (तंदन) जुही आणि श्रीदेवी पेक्षा नक्की कोणत्या अंगभूत गुणांमुळे जास्त 'कातिल' दिसते?, तेंडुलकर ला फोर्थ डाउन किंवा डायरेक्ट लास्टलाच ब्याटिंग ला पाठवणे कसे हितकारक ठरेल?,गांगुली ला मी स्वतः (म्हणजे 'टवक्या') एकाच बॉल मध्ये कधीपण कसापण कसा आऊट करू शकतो? इत्यादी विषयावर तर त्याने ग्रंथ लिहिले पाहिजेत असे आमचे स्पष्ट मत आहे !

टवक्या अभ्यासात मध्यम दर्जाचा आहे.55 ते 65 % यामध्ये त्याने 8वी पासून 12वी पर्यंत सगळे वर्ग पसार केले आहेत.( नुसते पांडासारखे 85/90% मिळवून काय होणारे..अक्कल कुठे टक्क्यावर अवलंबून असते का?- इति टवक्या ( यातले पांडा हे त्याने मला दिलेले उपनाम आहे )!असो!)

टवक्या तीन गोष्टीत मास्टर आहे..

1.दुसऱ्याला विनाकारण अक्कल शिकवणे

2.आचरटासारखे वडापाव खाणे तसेच रस्त्याच्या कडेच्या स्नॅक्स च्या टपऱ्या हुंगत रमतगमत हिंडणे (व वाटेल तसे खात राहणे)

3.जगाबद्दल आणि विशेषतः सुंदर मुलींबद्दल भलत्याच कल्पना असणे व त्या इमाने इतबारे दुसऱ्याच्या गळी उतरवणे!







Tuesday, October 12, 2021

*मुलीचा बाप*

 माझ्या लेखनातील एक छोटा उतारा ( -- *HARSHAL*)


*मुलीचा बाप*--


घरातले सगळे आवरत असतात...मुलीचे लग्न ठरलेय!

मग आवरआवरी हवीच!...

तो पण झीजत असतो... लग्न तारीख...खरेदी...सामान..मुहूर्त...काळजी...सगळे वाहत असते त्याच्या मनातून!

वर वर कडक दिसतोय.  पण आत कुठेतरी धक्का बसलाय!..

दोन चार वेळा दिवसातून पोरीला हळूच बघून येतोय!

ती हसतेय ते बघून आतूनच खुश होतोय...आणि काळजाला घरे पाडून घेतोय!!

पाहुणे रावळे येतील आणि पोरीला बघतील...मग काय म्हणतील या विचाराने बाजारात फिरताना सुद्धा त्याचा पिच्छा पुरवलाय!...

चिमणी आपली...जन्मली तेंव्हा कशी होती...मग शाळा कॉलेजात गेली.....अक्खा जीवनपट उलगडतो त्याच्या डोळ्यांपुढे!!...

परत जीव कासावीस होतो!...


आता चिमणी जाणार बापाला सोडून.... कशी राहील? किती सुख दुःख पाहिल? कशी हसेल?कधी भेटेल?...असले सगळे प्रश्न उरात...अश्रू लपवत... साखरपुड्यापासून ते लग्नाच्या मांडवद्वारापर्यंत असंख्य कामे करतो हा माणूस!....

शेवटी ती सासरी जायला निघते...ती चिमणी..तो काळजाचा तुकडा...जिच्यासाठी अक्खे आयुष्य ओवाळून टाकले ती पोर..सासरी निघते!...चालली आता!!..एक वर्तुळ संपले! मुलगी फार फार दूर चालली!!..आता हक्क बदलले!...काळीज शरीरातून दूर दूर जाऊ लागले जणू!!..



आणि मग मात्र तो पार कोसळतो!..

...तो मुलीचा बाप...जन्मदाता! मुलीला सगळ्यांत मोठा आधार वाटणारा तिचा बाप !...


त्याचे डोळे भरून पूर येतात त्यांना !.पण ..तो अडवत नाही ते पाणी!.....

माया...ममता...प्रेम..सगळे शब्द वितळून गळ्याशी येतात!

"बाबा निघते हो...काळजी घ्या "म्हणून रडणारी ती त्याची पोर...त्याला सहन होत नाही!..काय बोलावे तिला हे सुचत नाही! आणि मग त्याचे अश्रूच बोलू लागतात!...

तिच्या सासरी तिला आश्वासन मिळेल का...तिला त्रास होईल का...तिचे सगळे लाड कोणी पुरवतील का?..तिला न सांगताच कोणी समजून घेईल का?..आपल्या मुलीला आपल्याऐवढी माया कोणी देईल का? आपल्यावर तिला जों निर्धास्त विश्वास वाटतो तसा सासरी कोणावर वाटेल का?...

हजारो प्रश्न!!...बापाला एकाचेही उत्तर मिळत नाही!..

मुलीला घट्ट मिठी मारून रडताना त्याचे एकही दुःख कमी होत नाही!...

सासरी चाललीये म्हणून आनंद...आणि कायमची अंतरली म्हणून आकाशभर दुःख!!....


असाच असतो मुलीचा बाप....!!.


त्याची तुलना कोणाशीही करता येत नाही!!..


---- लेखन -*- हर्षल! ( 2008)

Sunday, September 26, 2021

ऋग्वेद - वेदमंत्रभाष्यदर्शन - आधार भूमिका!!

 ऋग्वेदआदी चार श्रुती संहितांच्या भाषांतर आणि अर्थ पद अन्वय आदी विषयावर मूलभूत भूमिका काय असावी यावर आमचे भाष्यदर्शन आणि आधार किंवा न्यासरूप भूमिका लिहिण्याचा मानस येथे आहे!

ईश्वराचे ऐश्वर्य आणि सतचिदानंद सनातन स्वरूप व्यक्त करण्याची परा विद्या आणि वस्तुजातादी प्रपंचमूलक अपरा विद्या हे प्रधान स्वरूपाने व्यक्त करणारे वेद -श्रुतिसारमूलक उपनिषदे आणि तदनुषंगाने येणाऱ्या समस्त दर्शन /स्मृती /पुराणे आणि इतिहासादी या सर्व सनातन धर्माच्या शास्त्रजनीत अपौरुषेय आणि मनुर्भव अशा एकूण एक साहित्याचा परामर्ष कसा आणि कोणत्या उपाय वा भूमिकेने घ्यावा याचा विचार प्रथम वा प्रधान असेल!

वेदादि शास्त्र मंत्रबद्ध आहेत...! त्यांचे भाषांतर आणि भाष्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत!

भाषांतरा मध्ये : पद संबंध,संस्कृतजन्य वा छंद जन्य शब्दार्थ,पदावली,काळ कर्म आदी क्रियान्वय यांचा समावेश होतो!

भाष्यामध्ये : स्वरदर्शन / मंत्र पदार्थ / देवता /मंत्र विनियोग /शब्द वा वाक्य पदक्रम आणि मंत्राचा प्रस्फुरीत अर्थ आणि त्याचे सामर्थ्य आणि क्रिया किंवा मंत्रतथ्य-दर्शक परंपराप्राप्त सत्यानवेषक भौतिक वा अभौतिक ज्ञान यांचा समावेश होईल!

भाषांतर हे सामान्य पदान्वयाने आधी करावे लागते तदनंतर धातू -पद -छंद -देवता -योगिक अनुमान इत्यादी आधारावर भाष्य केले जाते.  

वेदांची महती : निःसंशय वेद हे स्वयंप्रमाण आहेत . सनातन धर्म ज्यातून उद्गमित होतो त्या मंत्र-शब्दबद्ध -अनश्वर आनुपूर्वी घटीत -अपौरूषेय -ईश्वरी सहजसंभवनिश्वासवत- सूत्रबद्ध मूलज्ञान राशीला वेद असे म्हंटले जाते. 

वेदांची उत्पत्ती वा नाश होत नाही . ते सनातन असतात. (अर्थातच सध्याच्या संशोधकांच्या वेदोत्पत्ती च्या कुठल्याही कालनिर्देशक तारखा निःसंशय अवैध आणि असत्य आहेत. वेदांची  उत्पत्ती अमुक काळी अमुक ऋषींच्या वा माणसांच्या मुळे झाली असे कोणतेही विधान सनातन वेद /पुराणादी परंपरेत किंचित मात्र ही नाही ) सनातन भारतीय परंपरेतील एकूण एक दर्शने , ब्रह्मसूत्रे ,यच्चयावत स्मृतीग्रंथ  ,व्याकरणादि वा रामायण महाभारतादि ग्रंथ आणि समस्त अपरा विद्यांचे ग्रंथ (आर्ष वा अनार्ष ) एकमुखाने वेदांचे प्रामाण्य आणि अधिकार हा सर्वोपरी आणि ईश्वरीयच मानतात.कुठल्याही भारतीय परंपरेच्या सनातन साहित्यात वेदांची अमुक काळात क्रमश: केलेली निर्मिती अथवा मनुष्यकृत वेदरचना असा एकही उल्लेख नाही आणि असणे संभव देखिल नाही. 

वेदांचे दोहन वा सर्ग प्रारंभी प्रकटन कसे होते त्यावर स्पष्ट उल्लेख :

अग्नेर्वा ऋग्वेदो .. सूर्यात सामवेदो ... वायोर्यजुर्वेदो ! (अग्नीपासून  ऋग ... सूर्यापासून साम ... वायूपासून यजु:)

मनुस्मृती :(अध्याय १)

१) अग्निवायुरविभ्यस्तु  त्रयं  ब्रह्म सनातनं !

दुदोह यज्ञ सिद्ध्यर्थं ऋग्यजुसामलक्षणं !

अर्थ: ब्रह्माने अग्नी ,वायू ,रवि  यांपासून (तिघांपासून) सनातनअशा ऋग -यजु -साम लक्षण (छंदोबद्ध रचना ) यांचे दोहन केले. (त्यांतून प्राप्त केले = extraction )

२) तेने ब्रह्म हृदाय आदि कवये मुहयंती यत् सुरयः !-- श्रीमतभागवत (१:१) 

अर्थ : त्याने (ईश्वराने )आदीकाळी मनीषी असलेल्यांच्या (ऋषींच्या वा कवींच्या ) हृदयात वेद रूप ब्रह्माची स्थापना केली 

३) ऋषयो मंत्र दृष्टारः ! मंत्रान सम्प्रादू ! ( निरुक्त -यास्काचार्य ) 

(अर्थातच ऋषींना मंत्रद्रष्टा म्हंटले जाते ... मंत्रकर्ता नव्हे !) 

वेद मंत्रांचा कर्ता कोणीही मानव नाही - हाच सनातन स्पष्ट सिद्धांत आहे )

* वानगीदाखल एवढीच उदाहरणे दिली आहेत ...विस्तार पूर्वक अनेक ग्रंथांतरीचे विवेचन मूळ ग्रंथात करण्यात येईलच 


मंत्रभाष्यम -उदाहरण मंत्र :

ऋग्वेद मंडल 1 सूक्त 1 मंत्र 1  /

 अष्टक -अध्याय-वर्ग -संहिता  वर्गीकरण (१:१:०१:०१)

 ०१:००१:०१ (मंडल :अनुवाक :ऋ.संहीता )

वेद – ऋग्वेद

ऋषी – मधुच्छंदा- वैश्वामित्र  (  हि गोत्रवर्ग नामे मंत्र कर्ता म्हणून नसून - मंत्रद्रष्टा म्हणून आहेत आणि  हिरण्यगर्भ असा जो ब्रह्मदेव त्या ब्रह्माच्या पुढील मानवोत्पत्तीतील ऋषीकुळाची आहेत -- परंपरेने ती सनातन आहेत - अन्य काही ठिकाणी त्यांचे विलग योगिक अर्थ देखिल दर्शवले जातील )

देवता –अग्नि ---( मंत्राचे स्वरूप ज्या देवतेच्या नामाचा आणि स्वरूपाचा निर्देश करते त्यास "मंत्र देवता" म्हणतात . ( जसे  : अग्नी- इंद्र  आदी )

छंद – गायत्री (२४ वर्ण  -प्रतिमंत्र )   {- वर्ण : ब्राह्मण - आद्य सृष्टी उत्पती छंद }

मंत्र :

 अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विजं॑ ।

 होता॑रं रत्न॒धात॑मं ॥

(दीर्घ / उदात्त  आणि अनुदात्त /लघु /ऱ्हस्व स्वर दर्शन  )

 मंत्र पद : - (ओम् ) १. अग्निमीळे २. पुरोहितं ३. यज्ञस्य ४. देव ५. ऋत्विजं |

६. होतारं ७. रत्नधातमम् ||

पद पाठ : अ॒ग्निम्। ई॒ळे॒। पु॒रःऽहि॑तम्। य॒ज्ञस्य॑। दे॒वम्। ऋ॒त्विज॑म्। होता॑रम्। र॒त्न॒ऽधात॑मम् I 

 पदरचना  : अग्निम इडे -पुरोहितम- यज्ञस्य-देवं -ऋत्विजम

होतारं -रत्नधातमम्!

अक्षरबोध/वैयकरणम : (तम) अग्निम (अहं =कर्ता भाव लुप्त) इडे, (यं) यज्ञस्य पुरोहितम् (च ) देवऋत्विजम (ऋत्विजम देवानाम)(च )हॊतारम (देवार्थे यज्ञस्य च )रत्न धातमम (इति )

भाषांतर पदअन्वय : य: देवानाम ऋत्विजो तथा च यज्ञस्य पुरोहित: तथाच हो्ता: (यज्ञस्य) च रत्नधातम: च ! स : अग्नि:! तम् अग्निम इडे!

शब्दार्थ भाष्यम :

अग्निम्  अग्रणिम्  अग्निः कस्मात्  अग्रणीर् भवती  अग्रं यज्ञेषु प्रणीयते  अङं नयति संनममानः ॥ :-  निरुक्त  ७:१४

अर्थं : अग्रणी इति अग्नि ! प्रथमो देवो य : तदग्नीम  ! यज्ञस्य होता इति अग्निम !यो प्रथमो यज्ञस्य स :! देवांनां पुरोहितो ! पुरे यस्य आसनं  वा अग्रे  (देवांनां ) पुरस्य  प्रथमं ! रत्नम तेजसं तथा भेषजम (इति  प्रकाशकं ! ) .. (अग्रे प्रथमं -हिरण्यगर्भदेवस्य  प्रथमो देवता इति अग्निम )

प्राकृत भाष्यम : (त्या)  अग्नीची  स्तुत्यगान पूर्वक उपासना (जी हवनीय= पदार्थकामिच्छस्व असेल ) जो पुरोहित आहे ,यज्ञाचा देव आणि यज्ञ  आणि   देवांचा ऋत्विज आहे ,यज्ञाचा होता आहे आणि स्वप्रकाशमय स्वधायुक्त सुप्रसिद्ध तेजस तत्त्वांचा अधिपती (रत्न = रतयंति उज्ज्वलस्य यस्य इति ) असा (जो त्यासाठी )

मंत्र भाष्यम  : {अध्वरो (अहिंसात्मकं ) इति यज्ञम ! सृजनो इति यज्ञम ! निर्मिको इति यज्ञम ! प्रजापति: प्रथमम् कार्यं इति यज्ञम ,देवार्थे संगतीम यदर्थे तद्यज्ञम , विश्वनिर्मिकम इति यज्ञम }

(त्या आहवनीय) अग्नि प्रित्यर्थ (आत्म्याची सकाम ) (इडे = संपूर्ण अंगप्रत्यंगसहितउपासना ) उपासना ,जो यज्ञाचा पुरोहित (आदी पुरुषईव व अग्रणी असा ) आहे ,देवांचा आणि यज्ञाचा ऋत्विज (सुखादी /धर्मप्रदायक दाता ) आहे ,(स्वप्रकाशयुक्तम  )रत्न धातं  आहे  {अर्थात अत्यंत तेजस्वी व समस्त तेजादी तत्त्वांची प्राप्ती करून देणारा असा आहे  तो } ( रत्नम  = भौतिक -पृथ्वीतत्त्व- तेजस रूपं  इति ) 

भावार्थान्वय :  
 ब्रह्मविद्या , त्याचा परमार्थ व पंच भौतिक व्यवहार  विद्येची सिद्धी यासाठी अग्नी या शब्दाचे परमेश्वरउत्पन्न अग्रणी  व  त्याचे दृष्य स्वरूप असलेला भौतिक अग्नी असे दोन अर्थ आहेत. अधिभौतिक व आधिदैविक तत्त्वाने अग्नि हा "संधान -सुव्यवस्था- निर्गमन " या  तीन प्रमुख तत्त्वांचा अधिपति होय !! स्वयंप्रकाशित, सर्वांचा प्रकाशक व अनंत ज्ञानवान इत्यादी हेतूंनी अग्नी शब्दाचा अर्थ ब्राह्मण (ब्रह्माच्या अत्यंत निकट देवता )आणि रूप, दाह, प्रकाश, वेग, छेद इत्यादी गुण व अन्य भौतिक तत्त्वनिष्ठ शक्तींनी अग्नि  हा विशेष देव आहे ! अन्य  देवतांचे आवाहन  करणारा , विश्वात सूर्यरूपी प्रकाश करणारा ,तेजसादी सर्व शक्तींना ज्याचे उत्पत्ती पश्चात केवळ अर्थ प्राप्त झाला  ,असा विश्वातील यच्चयावत प्रकाशमान दृष्यमान वस्तूंचा आदिस्त्रोत  , देवतांचा होता  , सत्य  आणि  परमेश्वराचा  आदी  आणि सनातन उद्भव इत्यादी हेतूंनी या मंत्रात भौतिक अग्नीच्या अर्थाचा स्वीकार केलेला आहे. ॥ १ ॥

प्रत्यक्ष स्वरूप : अग्नि  ही विश्वातली अग्रीम  देवता ! ( दिव्य  गुणांनी मंडित  अशी जी -ती  देवता ) सूर्य हे अग्निचे आकाशस्थ रूप आहे ! गायत्री हा अग्निचा मूळ स्वर आणि  ब्राह्मण  हा  अग्निचा  वर्ण ! 
पदार्थ सचेतन वा नि:चेतन करणे , आहवनीय पदार्थ वा  द्रव्य देवता ,पितर ,स्वर्गादि योनींना पाठवणे ,इंद्रादी कार्यात व पृथ्वी आणि उर्वरित ब्रह्माण्डाचे तेज संधारण करणे  ही अग्निदेवाची कार्ये होत !
त्या अग्नीचे (इडं) उपासनारूप सानिध्य आणि आत्मसंधारणरूप अर्चन हे अग्निसूक्ताचे प्रत्यक्ष उद्दिष्ठ होय !!

* हे  भाष्य वानगीदाखल  मात्र आहे  .. अनेक संदर्भ  आणि   विश्लेषण काल आणि विस्तार मर्यादेस्तव  येथे नाही ... मूळ  ग्रंथात  मात्र  ते  असेल  *

 -----**- हर्षल 

Tuesday, September 7, 2021

मनमुक्ती

 सनातनावर उभे दूरवर देऊळ साजिरवाणे!

विकल सुखाच्या विजनामधले स्वतंत्र गाऊन गाणे!!

Sunday, August 22, 2021

मनमौक्तीके!!

मी ओलांडून चाललो कैक ती विश्रब्ध सिंहासने!

दुःखांच्या गर्दीत शांत निजली,अश्राप ती कानने ! 

मोहाचे घन दाटता,जड नभी,संचित की कोसळे!

त्यालाही हळुवार देत वळसे,केले जरा मोकळे!!


त्यागाचा विजनी सुपंथ मिळता,दैवीय आशा उरे!

देवाचा सद्धर्म,आशीर्वचे,अंतर्मनासी स्फुरे!


*-*-- हर्षल 

Saturday, December 26, 2020

* स्मरणिका * कै.श्री.परांजपे सर ! 

यांच्या स्मृतीस ,


स्मरणांचा अनुपम उत्सव हा तुमच्या आमुच्या स्वर्ण दीनांचा ! 

बाल्य आमुचे बहरत गेले आठवते तव निर्मळ माया !

जीवन तुमचे आदर्शांचे ,सन्मार्गांचे ,सौहार्दाचे ...

तुमच्या पासून शिकलो सुंदर पाठ नीतीचे ,मांगल्याचे !

तुमची शिकवण अजून जागी ,अजून तुमचा त्याग आठवे !

स्मरणांचे अद्याप आपुल्या ,सुंदर गंधित मुग्ध ताटवे !!

अवखळ अमुचे बाल्य जाहले सुंदर ,शालीन तुमच्या पायी !सादर वंदन अर्पण करितो लीन होऊनी तुमच्या ठायी !! 

Monday, November 16, 2020

अंधारमाया !!

ओलेत्या ओंजळ भरल्या निष्पाप अनामिक धारा !

संदर्भ तयांवर झुरतो वेदनातळीचा सारा !

एकांतांच्या घनरानी अलवार पंख सोनेरी !

मिटवून निमाली स्वप्ने निद्रिस्त कड्यांवर सारी !


पाऊल उठे मग कोठे, विश्रांत तमावर माझे !

माथ्यावर आसुसलेले नशिबाचे निर्दय ओझे !

श्वासांना चाहूल वेडी ,अद्याप मुग्ध वाऱ्याची !

काळजात मिणमिण आशा ,सोनेरी सूर्यशरांची !


अर्थावर अर्थ उमटती ,गात्रांवर चढतो साज !

बुडलेल्या संध्येमधूनी ,ये रात्रसुरांची गाज !!

गंभीर समुद्रांवरती ,वायूंचे घोर विहरती !

अंधारामधूनी येते का अंधाराला भरती !!


------&-*-*लेखन - हर्षल 


Monday, July 20, 2020

मुंबई आणि मी

खरे सांगायचे तर हे असे शीर्षक देण्यासाठी मी अमेरिकेत जाऊन आलेला कोणी NRI नाहीये !
!...आम्ही डोंबिवलीकर ! अमेरिका सोडाच proper मुंबई ला सुद्धा आढेवेढे घेत जाणारे आम्ही !
काही गोष्टींशी बंध जुळत नाहीत म्हणतात ना !तसेच !
ठाण्याच्या पुढे क्वचित आणि दादरच्या पुढे तर हाताच्या (ते सुद्धा एकाच ) मोजता येईल एवढ्या वेळा जाणारे आम्ही ! आमच्या चरणांचा स्पर्श CST ला मोजून मापूनच झालाय ! (मुंबईचे भाग्य चांगलेय बहुदा ) .
2015 साली आमच्या काही गणेशभक्त प्रोफेसर सहाध्यायी juniors ने लालबागच्या राजाला जायचा प्लॅन केला होता ! मी तिथे आजवर एकदाही गेलो नाहीये हे त्यांना कळल्यावर मी किती अजाण आणि पापी आहे या विचाराने त्या माझ्याकडे पाहत होत्या ... निदान तसे दाखवत तरी होत्या ! "हर्षल sir ,तुम्ही नक्की अजून गेला नाहीयेत लालबागला ? आम्ही दर वर्षी एक एक दिवस लाईन लावून का होईना पण जातोच जातोच ! " यासारखी टकळी चालवत मला लालबागला घेऊन जाताना ...देवाने या मनुष्याला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना ही त्या बायांनी केली असावी ! असो अर्थात तिथला बाप्पा फारच मनोरम असला तरी एकंदर गर्दी आणि घामाघूम अवस्था अनुभवल्यावर ती पहिली आणि शेवटची वारी असेच मी ठरवले !

     मुंबई मला का कोण जाणे नेहमीच दुरून चांगली वाटत आलेली आहे ! एखाद्या क्षितिजापल्याडच्या अप्राप्य  सुंदरीने लांबून सस्मित वदनाने पहावे तशी मुंबई मला लांबून पाहत हसत असते ! का कोण जाणे पण तिच्या आत फिरताना कुठलेतरी वेगळेच स्वर आणि काळ आतून उभे राहतात ! ब्रिटिशांची देखणी बांधकामे ..
पारशांची हॉटेले ,मराठी जुन्या खानावळी आणि वेगळेच architecture .... स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा सगळा गोतावळा आणि हजारो रंग या मुंबईने अंगावर बसवले आहेत ! श्रीमंतीची मिजास आणि गरिबीतली भीषणता एकत्र हिंडते इथे ! त्यात बोरीबंदर वेगळे ...पार्ले वेगळे ...वांद्रे (सॉरी bandra) वेगळे ...nariman वेगळे ,चर्चगेट वेगळे ,झावबाची वाडी वेगळी आणि 7 बंगला वेगळे ...किती काय आणि किती काय ! पण शेवटी ती मुंबईच !!
माटुंग्याला मुंबई चालू होते रे  असे प्रॉपर मुंबईकर म्हणतात ....पण यात सुद्धा विभागवार यादी आहे ! मुलुंड पासून बृहन्मुंबई सुरु असे BMC म्हणते !
"Lower परळ गेला की म्हमई स्टार्ट "  असे गुज्जू भाऊ म्हणतात ! 'गोरेगाव पासून अंधेरी ला मुंबईच समजतात बरं का '.... असे तिथले प्रेमळ लोक बोलताना मी ऐकलेत !
मुंबई मुंबई काय  रे ...कर्जत संपले कि पुढे तुमची मुंबई, असे पुणेकर म्हणतात !
"खरी मुंबई शिवाजी पार्क ते नरिमन आणि दुसरीकडे हिंदू कॉलनी पासून गेट वे " एवढीच असे एका चहा टपरीवर एका विद्वानांचे ऐकलेले विधान !!
 
  अर्थात मी सेंट्रल रेल्वे च्या नकाशाला प्रमाण मानून दादर च्या पुढे अस्सल मुंबई लागते एवढे काय ते ज्ञानामृत प्राशन करून मोकळा झालेलो आहे !
VJTI मुळे माटुंगा पाहिले आणि तेवढ्यासाठीच माटुंगा slow ट्रेन ने बरे कि फास्ट या अभ्यासापायी दादर वगैरे वाऱ्या केल्या तेवढ्याच !
IIT मुळे पवई दर्शन झाले आणि कांजूरमार्ग नामक वरून वरून अतिसामान्य वाटणाऱ्या station ला पण IIT मुळे glamour आलय ते मान्य करावे लागले !

कुर्ला.. सायन ...यांच्या फक्त पाट्या बाहेरून बघितल्या ! आत काय असेल ते बघायचा योग आला नाहीये ! सॅण्डहर्स्ट रोड नामक station ही राहण्याची किंवा उतरण्याची जागा असेल असे अद्याप नक्की खात्रीने सांगता येत नाही !
मस्जिद, भायखळा बाजारासाठी आणि आता CSMT येणार या खुणेसाठी माहितीयेत !
मुंबई बद्दल भरभरून बोलणारे लोक मला आवडतात !
विशेषतः सफाईदार पणे जेंव्हा ते मुंबईतले पत्ते आणि रस्ते मला सांगत असतात तेंव्हा " अजि म्यां ब्रह्म पाहिले " अशी माझी अवस्था होते !
    " ऎक ना , DN road वरून चालत पोचशील रे "
"Xaviers वरून तीन सिग्नल सोडले कि आलेच आपले destination "
"माऊंट mary ला  जायचा सोपा रस्ता सांगू ?"
" fountain आले कि उतर आणि मग सरळ चालत जा "
"Dockyard road आणि highway junction ला गेलास तर जवळ पडेल "
"क्रॉफर्ड ला पोचलास कि कॉल कर "
"बेस्ट पकड आणि nehru science ला उतर "
" BKC ला भेटणार का ?"

असे अनेक प्रश्न विचारणारे मला भेटतात ! तेंव्हा काहीही कळत नसले तरी माझा उर भरून येतो !
....मुंबईच्या दोन गोष्टी तरी मला आवडल्यात ...तिथली माणसे ! आणि कीर्ती कॉलेजवाला आणि "आराम"चा
वडापाव !!

अस्तु लेखनसीमा !!


------------ लेखन -- हर्षल !!

Monday, November 18, 2019

*** माकड आणि माणूस ***


डार्विन चा मनुष्य उत्पत्तिचा सिद्धांत अर्धवट आहे किंवा अपूर्ण आहे असे मान्य करूनही काही प्रश्न उरतातच !! त्यामुळे डार्विनच्या सिद्धांतालाच बळकटी येते की काय अशी शंका आम्हास वाटते !!

काही माणसे माकडापेक्षाही विचित्र वागतात .... आणि काही माकडछापच असतात !! काही माणसांना माकडासारखी वागणारी माणसे(?)आवडतात ..तर काही माणसे माकडछाप माणसांवर नुसता विश्वासच नव्हे तर जीव सुद्धा लावतात !! माकडालाही लाज वाटेल इतक्या मूर्खपणे काही माणसे (?)स्वतःचे आयुष्य कुठल्यातरी मूर्ख आवडीपायी वाया घालवतात ... आणि कुणी स्वत: सुज्ञ आणि शहाणे असूनही एखाद्या माकडाहून माकड असणाऱ्या वेडपटावर विश्वास टाकून स्वत:ची धूळधाण उडवून घेतात !! .....

या सगळ्यावरून ... माणसाचा पूर्वज माकड नव्हताच असे नक्की म्हणता येइल काय ? किंबहुना असे म्हणता येईल की ,काही माणसांचा पूर्वज नक्की डार्विनने म्हण्टल्या प्रमाणे खरोखरच "माकड" असावा !!

माणसाला एखादे उत्तम रत्न सापडले तर त्याची किम्मत त्याला समजते ....तो त्यास जपून ठेवतो ! तेच रत्न  जर माकडाला सापडले तर तो त्या रत्नाला चावून ..वास घेउन आणि अखेर फोडूनही पाहतो आणि काहीच सापडत नाही म्हणून शेवटी मातीत फेकून देतो !! .....फरक इथेच आहे ... माणसात आणि माकडात !!

" देवाने उत्तम बुद्धी व निर्णय घेण्याची शक्ती दिलेली असूनही .... माकडापेक्षा किंचीतही अधिक बुद्धी न वापरणारे  "दुर्दैवी" लोक पाहिले की ,कीव येते आणि वाईटही वाटते !! आणि " डार्विनचा"  सिद्धांत अगदीच खोटा नसावा असे वाटू लागते ! "

अर्थात काही गोष्टींना ईलाज नसतो आणि उत्तरही नसते !! ...... फक्त माणसाने आपण "माकड" तर होत नाहीयोत ना , याची काळजी घ्यावी हीच सदिच्छा !!

--्---्---्--=--्---्-== ( हर्षल ) (2016)
****जुने मित्र ****

अनेक (१२ /१५) वर्षानंतर भेटणारे जुने "सहकारी" ( मित्र हा शब्द आजकाल फारच जपून वापरतो मी .. म्हणून " सहकारी" ..!! ) ... जरा अजबच असतात !! ते भेटले की आनंदही होतो ..अन क्वचित जराशी उदासीही येते !! ....

जुन्या स्मृतींचे एक कोडे आहे .... त्या सहज म्हंटले तर विसरल्याही जातात आणि विनाकारण आठवतातही !! ....पेटलेल्या आगीसारख्या अंगावर येतील किंवा जाणीव नसलेल्या प्रेतासारख्या नुसत्या अडगळ होऊन मनाच्या कोपऱ्यात निपचित पडून राहतील !!

जुने लोक भेटले की सगळे सगळे ढवळून निघते !! आयुष्यावर पुन्हा जुनी आश्वस्त ओढ वेटोळे घालू बघते !! ..... जुने पूर पुन्हा येतात !!
नवीन वसवलेले किनारे पुन्हा बुडून जातात !!

..... पुन्हा जुन्या संचिताचे आणि आकांक्षांचे भान जागते !! आणि पुन्हा एकदा मन आत्ममग्न होऊ पहाते !! स्वतःहून ...स्वत:साठीच !!"

--्---्---्---
**** एक संवाद  *****( सत्य आणि जसाच्या तसा  )

खुप जुना मित्र भेटल्यावर माझ्याशी बोलताना .......

 मित्र : आहेस कुठे ? अजून समाजसेवा चालू आहे का ? स्मृति विचारत असते नेहेमी !! पत्ता काय तुमचा गुरुजी ??

मी : असतो इथेच ! तुम्ही दोघे कसे आहात ? समाज सेवा कसली ??

मित्र : ( तोंड भोपळ्याईतके मोठे करून )कसली समाजसेवा काय  ?? ..इतके वर्ष काय करत होतात गुरुजी... तीच!! आजकाल बदललायस तू !! आधी असा नव्ह्तास !! You were just an Extra Ordinarily Inspirational then  !! Srry to say..  but Now you are just like a casual person !! काय झाले साहेब ?? ...such a big transformation ???

मी : not at all ! वयोमानानुसार जरा शहाणा आणि शांत झालोय !! Nothing else !! btw ..तुम्ही दोघे कुठे असता सध्या ?? sorry fr not keeping contact ! तसा मी अलिप्तच असतो ! you know it !!

मित्र : we were in Australia !! कडक लाईफ !! enjoyed a lot ..!! marriage plus honeymoon !! all the way for 3 years !! No obstacle ....just fun !!! Just returned to india !! smruti too got job here !  .... and I have also got a better project  !! So... गुरुजी ! We are back !! ...7 years later ....back to india ! I have got 17 lkh package and smruti has got 11 lakhs !!  आहेस कुठे !!

मी : तुमचे तात्या आणि आई आता खुश असतील !! बिचारे एकटे होते इथे !! आता सांभाळा दोघाना !!

मित्र : तात्या गेले मागच्या वर्षी !तेंव्हापासून माई खुप वेड्यासारखे वागते ! सतत रडारड !!  ....So ...no option ....tila old care center मधे ठेवलेय !!.... करणार कोण तिचे सगळे घरी ??  ...ofcourse we both go and meet our mom once a week !! कितिही बिझी असलो तरी !! शेवटी आपणच बघणार ना तिच्याकडे !!! ...तरी रडत असते... आम्ही वेळ देत नाही म्हणून !! i tell you ...old people are just like that !! We pay 20000 per month for mom ....and she just cant understand !!

मी :  I don't think you can ever understand !! हे सगळे समजायला वेगळे शिक्षण आणि पॅकेज लागते ! दुर्दैवाने ते तुम्हाला मिळाले नसावे !! whtaspp वर माईंचा पत्ता पाठव !! भेटून येइन !! जमले तर तुम्ही सुद्धा या !! बाकी सगळे मजेत आहे !! .... समाजसेवा आणि मी सुद्धा !!

--्---्--- या पुढे बोलावे असे काही  उरत नाही !! संवाद संपलेला असतो .... किमान माझ्यासाठी तरी !!

--्---्----्--- हर्षल !! ( २०१७ )