Friday, September 30, 2011

.........आता कुठे.......??

त्या सुरांचे गाव माझे ;ते सुखांचे ठाव माझे
हरवले आता कुठे..
पाहिले जे स्वप्न तेंव्हा  ..
हरवले आता कुठे?
भोवताली माणसांच्या उग्र जत्रा रंगल्या ;
शांततांचे भान त्यातून ..
निसटले आता कुठे?...

एकटे चालावयाचे ;
ठरवले नव्हते कधी..
सोडूनी सारेच गेले;
शोधुनी आणू कुठे..??

कल्पनांचे विश्व सारे 
मस्तकातच राहिले..
वास्तवाचा स्पर्श देऊन;
उतरवू आता कुठे..??

ध्यास होते अल्प काही ;
विरून तेही पार गेले;
स्वप्न सुंदर जीवनाचे ;
उमटवू  आता कुठे..?

जन्म काही मानवांचा ;
दुःख वाहत चालतो..!!
आपुल्या डोळ्यांसमोरी ..
हाल अपुले पाहतो..!!

कारणे त्याची मनाला ;
समजवू आता कुठे.......??
.......................................लेखन -हर्षल.

Wednesday, September 28, 2011

तेंव्हा !!!

उरी श्वास तेंव्हा किती धुंद होते;
किती मोह हृदयात उमलायचे..
जरी पाहिले रोज आकाश तरीही;
नवे होऊनी रोज भेटायचे..


किती शांत आयुष्य होते मनाला..
सुखांचे किती शोध लागायचे;
जरासे बदलता मनाचे किनारे  ;
नवे स्वप्न क्षितीजास उगवायचे..

परार्थास तेंव्हा खरा अर्थ होता.
मना स्वार्थ जेंव्हा न उमगायचे
जरा दुःख होता कुणाला कसेही;
तरी लोचनी नीर दाटायचे..!!!

किती स्वस्थ तेंव्हा ..किती शांत तेंव्हा ..
दिनांमागूनी दिन लोटायचे..!! 
सूखे नेत्र मिटता..निशेच्या प्रवाही..
किती स्वप्न-संभार दाटायचे...!! 
किती मुक्त होते ..मनांचे पिसारे..
जणू मोर होउन नाचायचे..!
सुखांच्या उमलत्या प्रदेशांत तेंव्हा;अविश्रांत स्वानंद लाभायचे..!!..लेखन :--- हर्षल

Tuesday, September 27, 2011

एक असाही "बायोडेटा"..!!

नाव :-हर्षल [परंतु सामान्यतः त्यास जनावरांच्या नावाने सुद्धा हाक मारली जाते ] 

वय:-[मेंदूचे]--बालवाडीतल्या पोराएवढे ..५ वर्षे.

जात:-तो वाट्टेल तिथे जात असल्याने ...जात माहित नाही.

धर्म:-फालतू पणा व टवाळ पणा करणे 

उंची:-उंच वाढला एरंड ..शरीराची लांबी ५ फूट १०"..बुद्धीची उंची   -वीतभर  

रंग:-सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी..[जाणकारांच्या  मते  काळपट डांबरी] 

विशेष खूण:- अंधारात पांढरया शुभ्र दातांमुळेच दिसू शकतो ..अन्यथा अजिबात दिसत नाही [जन्मजात रंगाची किमया]..!!

आवड:-टिंगल टवाळी करणे ..व  उनाडटप्पू पणा करणे .

शिक्षण:- [ह्यावर जाणकार व्यक्तींचे मत असे कि हा मनुष्य अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला आहे..अर्थात अशिक्षित व गावठी].त्याचे  शिक्षण हा वादाचा मुद्दा असल्याने तसाच राहू द्या..
छंद:-नादिष्टपणा करणे  व गावभर उंडारून लोकांना मौलिक [=फुकटचे] सल्ले देणे..

उल्लेखनीय कार्य :-गणपतीच्या पहिल्या दिवशी २१ उकडीचे मोदक [पाव किलो साजूक तुपासह] फस्त करून दोन अडीच तास ताणून झोपा काढणे ..

समाज कार्य :- दुसर्या मजल्यावर कुंडीत अडकलेला क्रिकेटचा चेंडू 
काठीने ढकलून काढून; गल्लीतल्या खेळकर [उनाड] कार्ट्यांना देणे..व त्यांनी  कुणाच्या काचा फोडल्यावर त्याच पोरांना लपायच्या नवीन जागा शोधून देणे..!!

विशेष योग्यता:-१.चक्कीतून दळणाचा डबा आणून देणे ; 
२.मध्य रात्रीपर्यंत मोठ्या आवाजात टीव्ही बघत बसणे;
३.लहान मुलांना बाल्कॅनीत उभे राहून चिडवणे 
४.हॉटेलात अर्धा एक तास बसून टाईम पास करून नुसतेच पाणी पिऊन सटकणे..व दुसर्याने ठेवलेली वेटर ची टीप पळवणे[व जमल्यास त्याच वेटर ला सौजन्याने वागण्याचे मोलाचे {व फुकटचे} उपदेश करणे] ..
५.छत्रीच्या काड्या वाकवणे व त्याबद्दल घरातील माणसे ओरड्ल्यास ; तीच छत्री स्वस्तात दुरुस्त करून आणून घरच्यांना दाखवणे.[व परत काड्या वाकवणे]
६. फुटपाथ वरून शर्ट विकत घेणे व दोन तीनदा धुतल्यावर त्याचाच हातरुमाल म्हणून वापर करणे..
७.टीव्ही चालू होत नसल्यास त्यावर घणाघाती बुक्के मारून चालू करून दाखवणे [व नंतर तो कायमचा बंद पडल्यावर "आजकालचे  टीव्ही पूर्वीसारखे मजबूत नाहीत"अशी कुरकुर करणे.]
८.सकाळी उशीरा उठणे व अत्यंत मंदगतीने(आईचा ओरडा खाल्ल्यावर)कासवासारखे एकेक कार्यक्रम आटोपणे .. {इतरांस मात्र  पहाटे उठण्याचे फायदे व कार्यतत्परता समजावून सांगणे} .  
ईत्यादी..!! असे अनेक गुण आहेत पण जागेअभावी थोडेच दिलेत!
[जाणकारांच्या मते असे वागणे हा टारगट पणा असून ह्या व्यक्तीत काडीची योग्यता नाही ..असो]..

इतर पात्रता :-१.फुलपाखरे ;खेकडे व चतुर पकडणे ;[व बोटाला चावल्यावर सोडून देणे.] 
२.शेजार्यांची रद्दी विकून देणे.व पोकेट मनी
जमा करणे
३.विनाकारण रस्त्यावर उभ्या सायकलची घंटी वाजवणे 
४.दुपारी लोकांच्या घराची बेल वाजवून पळून जाणे 
५.हिवाळ्यात पंखा फुल वर ठेऊन झोपणे 
६.दिवाळीत इतरांचे महागडे फटाके [त्यांना इजा होईल या सामाजिक भावनेतून ]त्यांचेकडून हिसकावून घेऊन स्वताच पेटवणे ;व त्याना दुर्घटनेपासून वाचवणे. 
७.गाढव नक्की मागून लाथ  मारते का ह्यावर मौलिक [अनेकदा लाथा खाऊन]शोध निबंध लिहिणे....ईत्यादी..




 

तुझे नाम ते अंतरी राहिले...!!

किती काळ गेले असे हे सरूनी...      
कितीदा  तुला पाहिले ;विस्मरूनी..
तरीही पुन्हा ;काळजाला छळूनी ;तुझे नाम ते अंतरी राहिले ....

तुझे भास होता; मनाला म्हणावे ;
"विसरूनी जा रे ;नसे सत्य काही "
तरीही मनाला कळेना कळेना ;
तुझे गीत त्याने कसे विस्मरावे ?...


किती यत्न केला ;तरीही विरेना;
असा शोक आता ;उरांतून वाहे;
उगा श्वास येती ;शरीरांत आता;
परी प्राण अस्वस्थ तेथे रमेना..!


तुला आज  माझी नसे आस  काही ;
तरीही भासते पाश काही अजुनी;
उरे दोन जीवांत अपुल्या तरीही ;
कुठेना कुठे भेट होईल अजुनी ;
असे स्वप्न नेत्रांमध्ये राखले...
तुझे नाम ते अंतरी राहिले.....
................................लेखन -हर्षल,,

Saturday, September 24, 2011

परीचे चित्र !!

एका प्रतिभावान; एकाकी चित्रकाराने;स्वप्नात एक परी पहिली ..
तिचे माधुर्य ;तिचे लाघव ;अगदी तिची न्याहाळली त्याने सावली;

तिचे रूप उतरवले त्याने हृदयात ;
आणि चालू लागले  त्याचे दैवी हात.. 

त्याने उतरवले तिला ;कौशल्याने शुभ्र कागदांवरती ..
काळजातले सगळे प्रेम रिकामे केले त्याने ;तिच्या चित्रा-वरती ..

स्वताच्या रक्ताचेच जणू लाल रंग भरले तिच्या आरक्त मुद्रेवर..
सूर्यासारखे तेज ओतले तिच्या प्रकाशमान तलम कायेवर ...

तिच्या मधुर हास्यासाठी ;मोत्याचे वर्ण निर्माण केले त्याने रंगांतून;
आणि फुलवल्या तिच्या आसपास रम्य फळांच्या रसाळ बागा ..चित्रांतूनच ..!!

स्वर्गालाही  लाजवेल असा रंग-साज चढविला तिला..
संन्य्स्तासही मोहवेल असा आवेश चढविला तिला..

तिचे हास्य ;तिचे प्रेम आपल्या हृदयाजवळ राहावे ; 
आपल्यासाठीच तिचे अलौकिक लावण्य असावे ..

म्हणून एकांतात तिचेच ध्यान केले त्याने..
तिचे मनोहारी चित्र लक्षावधी वेळा कवटाळले त्याने..
ती जिवंत व्हावी ;म्हणून व्रते केली ;उपास केले ;
पण ती चीत्रांतूनच हसत राहिली;दिवस असेच उलटून गेले..

आणि एके दिवशी पहाटे ;त्याने डोळे उघडले ;;
चित्र रिकामे होते..शुभ्र कागदाचे निर्विकार पान फडफडले.;

चित्रकार वेडा-पिसा झाला ;त्याने तिला सर्वत्र शोधले;
आकाशाकडे ;नदीकडे;झर्यांमध्ये;रानांमध्ये ;अस्वस्थ होऊन पाहिले ;

अश्रूंचे बांध फुटून वाहताना ;काळीज सारे तुटून जाताना;कुणीतरी बोलावले त्याला 
एक पक्षी उंच झाडावरचा;त्याच्याजवळ विहरत आला ;गंभीर स्वरात म्हणाला त्याला ;;

""" काल रात्री विजा पडल्या ;देवदूत कोणी आला खाली..
चित्रांमधली तुझी परी ;त्याला पाहताच जिवंत झाली.

परी म्हणाली ;तुझ्याचसाठी इतके दिवस झुरत होते..
चित्रकाराला मूर्ख करून ,रंग भरून घेत होते..

त्याने त्याचे सगळे प्रेम ओतून मला जन्म दिला
माझा खेळ बिचार्याला अजून सुद्धा नाही कळला

त्याचे दैवी हात वापरून ;पहा परत जगात आले..
त्याला वाटेल वाईट नंतर;आपले मात्र काम झाले;

तुझी परी त्याच्यासंगे ;माझ्यासमोर निघून गेली..
चित्रकारा;तुझेच प्रेम जीवन म्हणून  घेऊन गेली.

तुज्यासार्खेच कित्येक असे प्रेम म्हणून फसून जातात
अरे वेड्या ;परीवर का इतके कोणी विश्वास करतात??""


....................................................लेखन -हर्षल

मला सर्दी होते......!!


कफ ;पित्त आणि वात हे त्रिदोष मानवी शरीरात आहेत...असे वैद्य लोक सांगत असतात ..पैकी पित्त आणि वात नक्की कसे आहेत ते मला ठाऊक नाही..म्हणजे मला जसे ते होतात तसेच आयुर्वेदात त्यांचे उल्लेख आहेत का ;हे मला माहित नाही...तेंडूलकर उगाच आउट झाला..किंवा सुंदर मुलींनी आमच्याकडे  बघून न बघितल्यासारखे  केले किंवा शेजारच्या काकू नको तेंव्हा घरी येऊन आमचे प्रताप आईला सांगू लागल्या ..अशा काही घटनांनंतर जे उसळते त्याला मी "पित्त"उसळले असे म्हणत असतो...

           बाकी वात तर मला बर्याचदा येत असतो..पण तो रोग म्हणून असतो का हे मला माहित नाही..पकावूचंद मास्तर रटाळ पणे शिकवू लागल्यावर;अत्यंत माठ माणसाने मला अक्कल शिकवायला सुरुवात केल्यावर ;विनाकारण लाईट गेल्यामुळे फेसबुक वर बसता न आल्याने...मला जे काही होते त्याला मी "वात" आला जाम ..असे साध्या भाषेत म्हणतो....
          अर्थात ह्या तीन दोषांपैकी पित्त आणि वात माझ्या प्रत्यक्ष भानगडीत फारसे पडत नाहीत ....पण जो उरलेला तिसरा आहे...तो मात्र माझा १ नम्बरचा शत्रू आहे..हलकट रोगांचा राजा..कफ !!

मला खरोखरच भयानक सर्दी होते..म्हणजे लोकांना सर्दी झाली आणि गेली हे कळत पण नसेल..किंवा असेलच तर थोडा काळ ..पण माझी केस विचित्र आहे लोकहो..!!..मला सर्दी एखाद्या मदोन्मत्त तरुणीसारखी येऊन बिलगते..माझे लाड करते..आपल्या प्रियकरावर जीव ओवाळून टाकणार्या प्रीयांगनेसारखे
माझ्यावर तुफान प्रेम करते ..शेवटी मी बेजार झालो ..कि तिला मजा येते..आणि प्रेमाचे नवीन नवीन फोर्मुले ती माझ्यावर वापरते...!!..
             मला सर्दी कधीच एकदम होत नाही..आणि म्हणूनच ती एकदम जात सुद्धा नाही..सर्दी हा अत्यंत नालायक रोग आहे..आणि जगातील कुठल्याही रोगापेक्षा तो माणसाला बेदम करू शकतो..याबद्दल मला तीळमात्र शंका नाही..याचे कारण म्हणजे..निदान माझ्या बाबतीत तरी सर्दी जे जे उद्योग करून ठेवते ते अगम्य असतात....मुळात सर्दी कडे काही पोझीटीव मुद्दे असतात..म्हणजे कोणालाच सर्दीची भीती वाटत नाही..त्यामुळे आपण कोणाला सांगितले कि "अरे .फार सर्दी झालीये रे.जरा मदत करशील का"..तर ती व्यक्ती आपल्याकडे तुच्छतापूर्वक पाहते..""काय रे ;पोरीन्सारखा.सर्दी सर्दी काय करतोयस?..देऊ का दोन लगावून?..म्हणजे उतरेल चांगली..बेअक्कल कुठचा!!..काम करायला नको डुकराला !!..म्हणून सगळी नाटक सुचतायेत..!!अरे मला गोवर होता गोवर ..आहेस कुठे!!..तरी पाणी भरत होतो..ऑफिस ला जात होतो..असली नाटके नाही केलीत कधी..मेंगळट कुठचा..चल काम कर नाटक्या .."""!असे प्रेमळ उद्गार ऐकू येतात...डॉक्टरांपासून दुकानदारांपर्यंत ..मास्तरांपासून आई-वडिलांपर्यंत सगळ्यांना सर्दी म्हणजे "मामुली", वाटत असते ..हेच माझ्या दुखाचे मूळ आहे लोकहो..आणि म्हणूनच मला जी सर्दी होते तिलाही हे माहित असल्याने ती मला भंडावून सोडते..आणि मी तिला गुप चूप शरण जातो.... 
         आता सरावाने मला सर्दीची लक्षणे चांगलीच माहित झालीयेत..म्हणजे ८० टक्के तरी...पण ही लक्षणे निष्णात डॉक्टर ला सुद्धा कळणार नाहीत ..आता माझा सर्दिशी जुनाच प्रेमळ संबंध असल्याने मला तिची सगळी कला कौशल्ये माहित आहेत..सर्दी मला तरी एकदम होत नाही...फैशन शो मध्ये अलगद अलगद अंग वेडावीत चालणार्या सुकडबम्बू [त्यांना लोक का सुंदर म्हणतात हे आपल्याला कळलेले नाहीये बुवा अजून!]मोडेल बायांसार्खी ती हळू हळू माझ्या जवळ येते....एक आठवडाभर नुसतेच अस्वस्थ वाटले..नाक विनाकारण पकडावेसे वाटले कि मला कळते "बाईसाहेब "निघ्ल्यात ..आता पुढच्या आठवड्यात गाठणार आपल्याला !!...कोणालाच कळत नाही कि हा काहींही झाले नसताना विकस ;निलगिरी वगैरे फालतू गोष्टी का शोधतोय?..पण अज्ञ जनांना तसेच भ्रमात ठेऊन मी मोर्चा बंदी करून ठेवत असतो..शत्रू येण्या अगोदरच मी मोर्चे लावतो..निलगिरीचे रुमाल ;कफाची औशधे ..नीर निराळ्या गोळ्या .;धने जिरे यांच्या पुड्या ;आले लिंबू इत्यादी महत्वाच्या वस्तू ..हे सगळे जमवून मी निधड्या छातीने आणि वीर पुरुषाच्या आविर्भावात ..[उदासवाणा] असा उभा राहतो..तिची वाट पाहत!!.. 













!!मन !! ...

........
जसा वाहतो पक्षी वेडा कुठेही...नभांच्या अतिभव्य अंगांवरूनी..!!

मनाचा तसा मुक्त संचार माझ्या;कितीदा घड़े भावनांच्यामधूनी ...!!
मनाला कुठे वाट माहीत काही..बिचारे फिरे विभ्रमान्तून सारे..!!
 
कधी सूर्य साहे अतितप्त ;पाहे सुखाचे कधी चन्द्र-सौजन्य न्यारे..!!

कधी स्वप्न सृष्टीत अडकून पड़ते ;कधी धुंद रात्रीत मोहून फसते ...

कधी दुःख पाहून निशब्द होते..;कधी सौख्य मिळता स्वताशीच हसते..!

......written by--हर्षल

****** मराठी *****

सामर्थ्य पाहता फार ;नाही त्या पार देश सीमांचा..
झळकते उग्र तरवार;मराठी वार; सत्य-धर्माचा 1]              

साहते किती अपराध ;सोसते पाप;भार यवनांचा..
शेवटी द्रोह अंगार ;उसळतो ज्वार संगरांचा ..2]

एकेक पुत्र चेतवी;ओतुनी प्रेम ;ओढ़ ;मायेची
जन्मती धुरंदर किती हाक ऐकता एक मातेची ..3]

शोभले किती नर मणी ;हिच्या मस्तकी रूढ़ जाहले;
ही माय मराठी ;हीनेच अवघे वीर-शूर प्रसवीले !4]

पाहतो आजही तिला;मानतो तिला ;तिला वंदितो..
आयुष्य सर्व हे ;सदा तिच्या उद्धारास्तव वाहितो..5]

येऊ दे, घोर संकटे ;मराठ्यां पुढती ;
हे सोसून अवघे हाल ;तरी त्यावरती
उन्मत्त हरवूनी गनीम ;विजयी ठरती
मृत्युस देउनी; जरब ;नमवीतो त्याला..!!
हे शौर्य शिकवीते;माय मराठी माती!!
.............written by .[me]-हर्षल

Monday, September 12, 2011

एस्ट्रोजेन आणी टेस्टोस्टेरोन..[estrogen and testosterone]

समस्त विश्वात पुरुष आणी प्रकृति ...निवास करतात ...पुरुष आपल्या भोवती प्रकृति चे आवरण घालून सतत कार्यमान राहतो...!!..इति वेद..!!


"पुरुष"आणि"प्रकृति"...म्हणजे इश्वर आणि माया...!!..पण आपण मानवान्बद्दल बोलतोय..!!
..मानवी जीवनात "पुरुष"म्हणजे "नर"...आणि प्रकृति म्हणजे "नारी".......आणि एस्ट्रोजेन आणी टेस्टोस्टेरोन ..ही त्यांची विशेष संप्रेरके ..[hormones]....!!..एस्ट्रोजेन स्त्रित्वाचे तर टेस्टोस्टेरोन पौरुषाचे...!!..
.
....एक तरुण ;सुंदर मुलगी कॉलेजात जाते....बऱ्याच तरुण पोरांच्या चर्चेचा विषय होते...तिला वाटते आपले सौन्दर्य पाहतात ..ती मनात खुश असतेच..पण त्याच बरोबर सावध सुद्धा....एखादा आवडतो सुद्धा ..ती त्याला नीट पाहते...शरिरापेक्षा मन..आणी मनापेक्षा स्वभाव...मनात तो जरी भरला..तरी ओठांवर यायला वेळ लावते...स्वताशी त्याची तुलना करते..........एस्ट्रोजेनचा प्रभाव..!!




तेच,..एखादा वयात आलेला मुलगा तिला पाहतो.. ..तिचे सौंदर्य..तिची मोहकता ..यांतच रमतो...आणी नेमके तिचे मन तेवढे विसरतो...पण तो म्हणतो "मला ती आवडते".....अगदीच आकर्षण असेल तर तिला वाटेल ते करून आपलेसे करण्याचा प्रयत्न करतो............ टेस्टोस्टेरोनचा प्रभाव..


स्त्री पुरुषापेक्षा अधिक भावनाशील असते ...स्वताच्या भावनान्मधे इतकी रमते..की त्यालाच सर्वस्व मानते..........एस्ट्रोजेन


पुरुष विचार करतो..समजून घेतो..भावना समजल्या तरी त्यांची मोहिनी सहसा पडत नाही...विचारान्पेक्षा विकार प्रबळ ठरतात..बरेचदा ....!!टेस्टोस्टेरोन.!!


एक लहान गोंडस मुलगी ;तीला टेडी बीअर शिवाय झोप येत नाही...त्याचे निर्जीव कापसाचे शरीर जीवंत भासते तीला..ती त्याला जमेल तितके प्रेम करते ..अगदी वयात आली तरीही हे प्रेम आटत नाही ..बरेच लोक तीची चेष्टा करतात .....मी मात्र स्वतशीच म्हणतो "एस्ट्रोजेनचा सुंदर प्रभाव"..!!


आणी कधी दिसते की एखादी सोशिक मुलगी ..तरुण वयात वैधव्य प्राप्त झाले तरीही निर्विकार जगत राहते..तिच्या पोटच्या पोरासाठी...शारीरिक मोह नीकराने पार करून.....मी म्हणतो मनात ..एस्ट्रोजेनचा अजुन एक सत्वशील पुरावा..!!


आपल्या पत्नीवर समर्थ तेने प्रेम करणारे ..धैर्यवान पुरुष ..तिच्यासाठी रात्रंदिवस कष्ट सोसून तिच्या मुखावर हास्य निर्माण करणारे ..ते लोक पाहून...मला मिळतो.." टेस्टोस्टेरोनचा एक प्रभावी तेजस्वी संकेत"...


आणी कधी ऐकतो आपण ...भर रस्त्यात केलेले स्त्रियांचे विनयभंग ..;नीराश्रीत महिलान्वरचे भीषण बलात्कार....उन्मत्त पुरुषांच्या अनावर वासनान्नी केलेले....स्त्रीच्या मनाची ;सत्वाची वासलात लावणारे घोर पुरुषी अत्याचार...एका क्षणिक पिसाट सुखासाठी केलेले.......मी तेंव्हा समजतो.. टेस्टोस्टेरोनचे महा भयाण स्वभाव..!!
,,,,,,,,,,
.......इतक्यात एखादी माता दिसते मला ..शांत ..शीतल ;प्रेमार्द्र ..आपल्या मुलाला प्रेमाने घास भरवणारी...गरीब घरात राहून सुखात दिसणारी ...सर्वांची सेवा करत मूकपणे दुःख प्राशन करणारी ..........
आणी एखादा बाप दिसतो...कठोर पण प्रेमळ; अगदी मुलींची वेणी घालून देणारा ..त्यांना जीव लावणारा..पत्नी आजारी असताना अख्खे घर सांभाळणारा..रक्षण करणारा ...सासरी निघालेल्या पोरीला बघून लहान मुला सारखा रडणारा................


मी विचार करतो..ह्या आई बापान्मधे ही "एस्ट्रोजेन आणी टेस्टोस्टेरोन. " असतातच...नव्हे आहेतच.......पण खर सांगू का; नुसत्या होर्मोन्स चा प्रभाव इथे मानायला मन तयार नाही होत......वाटत अजुन काहीतरी नक्कीच असले पाहिजे ...बहुतेक "संस्कार" "संस्कार " म्हणतात तेच आकार देत असावेत या होर्मोन्स ना...........नाहीतर इतका त्याग अवघड आहे..नाही का?.....!!........लेखन --हर्षल