Tuesday, September 27, 2011

एक असाही "बायोडेटा"..!!

नाव :-हर्षल [परंतु सामान्यतः त्यास जनावरांच्या नावाने सुद्धा हाक मारली जाते ] 

वय:-[मेंदूचे]--बालवाडीतल्या पोराएवढे ..५ वर्षे.

जात:-तो वाट्टेल तिथे जात असल्याने ...जात माहित नाही.

धर्म:-फालतू पणा व टवाळ पणा करणे 

उंची:-उंच वाढला एरंड ..शरीराची लांबी ५ फूट १०"..बुद्धीची उंची   -वीतभर  

रंग:-सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी..[जाणकारांच्या  मते  काळपट डांबरी] 

विशेष खूण:- अंधारात पांढरया शुभ्र दातांमुळेच दिसू शकतो ..अन्यथा अजिबात दिसत नाही [जन्मजात रंगाची किमया]..!!

आवड:-टिंगल टवाळी करणे ..व  उनाडटप्पू पणा करणे .

शिक्षण:- [ह्यावर जाणकार व्यक्तींचे मत असे कि हा मनुष्य अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला आहे..अर्थात अशिक्षित व गावठी].त्याचे  शिक्षण हा वादाचा मुद्दा असल्याने तसाच राहू द्या..
छंद:-नादिष्टपणा करणे  व गावभर उंडारून लोकांना मौलिक [=फुकटचे] सल्ले देणे..

उल्लेखनीय कार्य :-गणपतीच्या पहिल्या दिवशी २१ उकडीचे मोदक [पाव किलो साजूक तुपासह] फस्त करून दोन अडीच तास ताणून झोपा काढणे ..

समाज कार्य :- दुसर्या मजल्यावर कुंडीत अडकलेला क्रिकेटचा चेंडू 
काठीने ढकलून काढून; गल्लीतल्या खेळकर [उनाड] कार्ट्यांना देणे..व त्यांनी  कुणाच्या काचा फोडल्यावर त्याच पोरांना लपायच्या नवीन जागा शोधून देणे..!!

विशेष योग्यता:-१.चक्कीतून दळणाचा डबा आणून देणे ; 
२.मध्य रात्रीपर्यंत मोठ्या आवाजात टीव्ही बघत बसणे;
३.लहान मुलांना बाल्कॅनीत उभे राहून चिडवणे 
४.हॉटेलात अर्धा एक तास बसून टाईम पास करून नुसतेच पाणी पिऊन सटकणे..व दुसर्याने ठेवलेली वेटर ची टीप पळवणे[व जमल्यास त्याच वेटर ला सौजन्याने वागण्याचे मोलाचे {व फुकटचे} उपदेश करणे] ..
५.छत्रीच्या काड्या वाकवणे व त्याबद्दल घरातील माणसे ओरड्ल्यास ; तीच छत्री स्वस्तात दुरुस्त करून आणून घरच्यांना दाखवणे.[व परत काड्या वाकवणे]
६. फुटपाथ वरून शर्ट विकत घेणे व दोन तीनदा धुतल्यावर त्याचाच हातरुमाल म्हणून वापर करणे..
७.टीव्ही चालू होत नसल्यास त्यावर घणाघाती बुक्के मारून चालू करून दाखवणे [व नंतर तो कायमचा बंद पडल्यावर "आजकालचे  टीव्ही पूर्वीसारखे मजबूत नाहीत"अशी कुरकुर करणे.]
८.सकाळी उशीरा उठणे व अत्यंत मंदगतीने(आईचा ओरडा खाल्ल्यावर)कासवासारखे एकेक कार्यक्रम आटोपणे .. {इतरांस मात्र  पहाटे उठण्याचे फायदे व कार्यतत्परता समजावून सांगणे} .  
ईत्यादी..!! असे अनेक गुण आहेत पण जागेअभावी थोडेच दिलेत!
[जाणकारांच्या मते असे वागणे हा टारगट पणा असून ह्या व्यक्तीत काडीची योग्यता नाही ..असो]..

इतर पात्रता :-१.फुलपाखरे ;खेकडे व चतुर पकडणे ;[व बोटाला चावल्यावर सोडून देणे.] 
२.शेजार्यांची रद्दी विकून देणे.व पोकेट मनी
जमा करणे
३.विनाकारण रस्त्यावर उभ्या सायकलची घंटी वाजवणे 
४.दुपारी लोकांच्या घराची बेल वाजवून पळून जाणे 
५.हिवाळ्यात पंखा फुल वर ठेऊन झोपणे 
६.दिवाळीत इतरांचे महागडे फटाके [त्यांना इजा होईल या सामाजिक भावनेतून ]त्यांचेकडून हिसकावून घेऊन स्वताच पेटवणे ;व त्याना दुर्घटनेपासून वाचवणे. 
७.गाढव नक्की मागून लाथ  मारते का ह्यावर मौलिक [अनेकदा लाथा खाऊन]शोध निबंध लिहिणे....ईत्यादी..




 

No comments:

Post a Comment