माझा आवडता प्राणी - बैल .
मी सकाळी शाळेत आलो तर गुरुजी बोलले कि आज निबंध तपासणार आहे..पण मी तर नाही लिहिला म्हणून गुरुजींनी मला अंगठे धरून उभे केल व बोलले कि 'काय रे गाढवा ;लगावू का दोन लाफा"..असे ते बोलले व मला लाफा लगावल्या व अंगठे धरून उभे केले.
नंतर मला निबंध लिहायला सांगितला व म्हणून मी आता लिहित आहे.निबंदाचे नाव आहे माझा आवडता प्राणी.पण मला एकच प्राणी नाही आवडत खूप आवडतात पण मी गुरुजीना तसे बोललो तर ते बोलले "जास्त अक्कल चालवू नकोस एकाच प्राण्यावर लिही'नाहीतर तुडवीन ".म्हणून मी घाबरलो व एकाच प्राण्यावर लिहित आहे..
मला खूप प्राणी आवडतात म्हणजे सिंव ;वाघ ;कुत्रा ;गेंडा ;हत्ती ;म्हैस [आमच्यकडे ३ म्हशी आहेत व त्या खूप काळ्या आहेत .]गाय ;उंट;मुंगी ;घोडा [मी सर्कशीत घोड्यावर बसलेला विदुषक बघितला होता]..आणि मला पक्शीपण आवडतात ..पण विनूने बैलावर निबंद लिहिला व गुर्जी बोलले कि त्याचा निबंध छान आहे म्हणून मी पण बैलावर निबंध लिहित आहे.
खरं म्हणजे मला बैल जास्त आवडत नाही ..पण निबंधापुर्ता तोच माझा आवडता प्राणी आहे.
आमच्या गावात खूप बैल आहेत ..आमच्या घरी २ बैल ,३ गायी व ३ म्हशी आहेत...बैल शेतावर काम करतात .व शेतात काम झाल्यावर झोप काढतात..तसेच बैल इकडे तिकडे खूप चरतात व बैलांना आम्ही वैरण घालतो ते पण खातात .आमचे बैल काळू व साळू अशा नावाचे आहेत .ते दोघे पण खूप माजलेत असे आमची आक्का म्हणते.आमचे बैल शिंगवाले आहेत.व पोळ्याच्या दिवशी त्यांना आम्ही खूप खायला देतो व सजवतो.व ते पण त्या दिवशी खूप खातात व अजिबात काम करत नाहीत.
बैल हा खूप उंच असतो व रागीट पण असतो.आमचा बैल काळू कधी कधी शिंग पण मारतो .गावातल्या वाण्याच्या बागेत आमच्या बैलाने घुसून बागेची दैना उडवली होती.मला काळू आवडतो.पण जास्त नाही.
शेतकर्याचा मित्र म्हणजे बैल असतो असे गुरुजी म्हणतात म्हणून आमच्या वडिलांचे दोस्त घरी आलेले असताना तुमी पण बैल आहे का ?असे मी त्यांना विचारले ..व मला घरात जाम रट्टे पडले .पण आमचे बाबा शेतकरी आहेत म्हणजे त्यांचे मित्र बैल असणार ..हो कि नाही??..आमची शेजारची भीमाबाई तिच्या नवर्याला सारखी बैल म्हणते व बोलते कि "पडून रहावा बैलावानी ;निस्त खायचा नि पियाच ..अन कामाचा तर नाव न्हायी "..
मी बैल हाकायला काकासंगे रानात जातो तेंव्हा काका गावच्या पोरींना हाका मारत मारत बैल हाकत नेतो..मी त्याला विचारले तर बोलतो "तुला नाही कळणार तू लई लहान आहेस मी पोरींना लाईन देत असतो..बैल हाकायचे नुसते निमित्त. "..पोरींना लाईन देतात म्हणजे काय हे माला माहित नाही..पण त्याचा बैलाशी कायतरी संबंध असेल का ?
आमची आय बोलते कि "तुझा काका लय वांड हाय,न लगीन ,न धंदा ,निस्ता उंडारतोय गावभर ,त्याच्या नादी लागू
नगस."..ती पण कधी कधी काकाला तो जेवायला आल्यावर "आला बैल गाव हुंदडून;भाकर्या खायाला "..असे बोलते.
पण बैल हा चार पायाचा प्राणी असतो व माणसाला दोन पाय असतात ..म्हणून माझा काका बैल नाही.तसेच बैल गोठ्यात राहतो.व त्याला वेसन लावतात.व बैल गाडी ओढतो .पण काही बैल जाम मरतुकडे असतात .आमच्या शिर्प्याचा बैल तर जाम काटकुळा आहे..पण बैल इमानदार असतो.पण गावातील कुत्रे रात्री बैलांवर भुंकतात .
बैल हा खूप मोठा असतो म्हणून लहान मुलांनी बैलाशी मस्ती करू नये कारण त्याला शिंगे पण असतात.एकदा गण्याने आमच्या बैलाला चिडवले होते व बैल त्याच्या घरापर्यंत पाठलाग करत गेला होता.व गण्या लपून बसला म्हणून वाचला.गण्या जाम चालू पोरगा आहे..तो पाचवीत आहे अन स्वताला जादा शाना समजतो.आमच्या बैलाने त्याला जाम टरकावले म्हणून आमचा बैल मला थोडा तरी आवडतो.गाय दूध देते पण बैल देत नाही व म्हणून त्याला शेतावर कामाला पाठवतात ..नाहीतर त्याला फुकट खायला कोण घालणार.आमचे गुरुजी मला खूप वेगवेगळ्या नावाने हाक मारतात ,कधी कधी बैल नायतर वळू पण बोलतात.आमचे गुरुजी खूप म्हणजे खूपच हुशार आहेत व ते महान पण आहेत असे ते स्वताच आम्हाला नेहेमी सांगत असतात...पण "तुमचे गुरुजी पक्के डांबरट;आतल्या गाठीचे ;बेरकी आणि वाह्यात आहेत"असे मराठीच्या पुष्पा बाई बोलत होत्या ."पुष्पा बाई आल्या का रे शाळेत ?"असे आमचे गुरुजी रोज आम्हाला विचारतात व बाई दिसल्या कि भांग वगैरे पाडून त्यांच्याशी गप्पा मारायला जातात.
"तुमच्या बायकोच्या मागे एक बैल लागलाय पण त्याला आम्ही वठणीवर आणू तुम्ही काळजी करू नका "असे आमचे हेडमास्तर पुष्पा बाईंच्या रागावलेल्या नवर्याला बोलत होते . व या सर्व कारणांमुळे बैल हा माझा आवडता प्राणी आहे.
....................लेखन === हर्षल
No comments:
Post a Comment