![]() |
रसमलाई!! |
"जास्त खाल्लस ना तर नरकात जाशील ;रेड्या.."..माझा मित्र मला म्हणत होता...पण त्याकडे दुर्लक्ष करून मी दहावा रसगुल्ला मक्ख्खपणे तोंडात सारला..!!..आणि वर "आईस्क्रीम ;कुठे दिसतंय का बघ रे"अशी एक सहज उपसूचना करून अकराव्या रस्गुल्ल्याकडे मोर्चा वळवला ...!!..एका मित्राच्या लग्नातली हे सत्यकथा..!!
जास्त खाल्ल्याने माणसे नरकात जातात का ह्यावर मौलिक विचार करून मी अशा निष्कर्षाला पोहोचलो कि कदाचित नरकात खूप विविध पदार्थांन्ची रेलचेल असेल आणि यम व त्याचा रेडा आणि इतर सेवक वगैरे यांना ते अन्न संपवायला खादाड आणि बुभुक्षित [काही जण मला ह्याच नावानी बोलवत असतात]. माणसांची गरज असेल..म्हणून त्यांना खास बोलावून घेत असावेत....!!..काहीही असो..सध्या जिवंत असेपर्यंत असल्या मरणोत्तर गोष्टींत उगाच नाक खुपसल्याने काही फायदा नसतो..त्यापेक्षा तेच नाक उत्तमोत्तम पदार्थांचा सुवास घेण्यात कामी येते...!!
..मी रूढ अर्थाने खादाड नाही...[काही लोक वाट्टेल ते वाट्टेल तसे खात असतात...आमी तसे नाय!!]
परंतु "जे जे उत्तम ते ते हादडावे ;नंतर खावे चूर्ण वगैरे !!"..असा माझा निखळ दृष्टीकोन आहे..!!
इतके असून मी पूर्ण शाकाहारी आहे...अगदी कट्टर...!!..मुळात चव हि मसाल्यांस असते मासांस नव्हे...मग उगाच प्राणी का मारा?..असे मला वाटते ..!!..असो..आणि शाकाहारात काही कमी वैविध्य आहे का?...
एकट्या पोळीचेच कितीतरी प्रकार मीच चापले आहेत...साधी पोळी ;खव्याची पोळी;तेल पोळी;पुरण पोळी;शिर्याची पोळी;रोट्या;फुलके;नान;पराठे...अनेक!!...भाकरी हे आद्य रूप..त्यात ज्वारीची;बाजरीची ;नाचणीची;तांदुळाची ;कळणीची..असे कितीतरी सशक्त प्रकार..!!..पुन्हा थालीपीठे आहेतच..म्हणजे भाजणीची;ज्वारी आणि भाजणी घालून केलेली;वेगवेगळी पीठे एकत्र करून कांदा घालून अथवा न घालता केलेली;कणिक आणि भाजणी;किंवा नुसत्या कणिक अन ज्वारीची.....!!...यावर भरीस भर म्हणून पोळी किंवा भाकरीचे एक चुलत घराणे आहे...ते म्हणजे डोसे किंवा घावनाचे..आम्बोल्या वेगळ्या ;डोसे वेगळे;..त्यात परत पिठान्प्रमाणे आणि मसाल्यांप्रमाणे अनेक प्रकार ...असे नाना तर्हेचे जिन्नस बनवले का गेलेत ??..खाण्यासाठी !!
..पण इथे एक गोष्ट नमूद केलीच पाहिजे.. कि खाणारा माणूस चोखंदळ असायला हवा..उगाच "मी पाच किलो भेंडीची भाजी खाल्ली ;चहाबरोबर टोप भर भात खाल्ला किंवा कालचा भात सकाळी फोडणीचा करून संपवला "वगैरे फालतू गोष्टी ह्या खाणे ह्या सदराखाली मोडत नाहीत...त्याला पाहिजे तर उदरभरण म्हणता येईल..!!
...मी खूप खातो असा आरोप करणारे लोक जेंव्हा माझ्या आसपास असतात तेंव्हा तर मी जास्तच आचरटासारखा हादडत असतो...व त्यांची जिरवतो..[व नंतर त्याचे परिणाम निधड्या छातीने भोगतो]...तिखट आणि गोड असा भेदभाव मी करत नाही...फक्त ते योग्य मौसम बघून खातो..!!
आईला आपली सगळी मुले सारखीच तसे मला गोड आणि तिखट सारखेच..!!पण म्हणून ते वाट्टेल तेंव्हा नाही..!!...गणपतीच्या पहिल्या दिवशी सुग्रास मोदक [न मोजता][उकडीचे]..[साजूक तुपाचे थरच्या थर घालून ]...दसर्याला पुरणपोळी [पुन्हा प्रचंड प्रमाणात साजूक तूप ओतून]..किंवा आम्रखंड किंवा श्रीखंड ;होळीला पुन्हा पुरणपोळी;नारळी पौर्णिमेला सुग्रास केशर घातलेला साखर भात [तूपाचे डाव वर ओतून]...दिवाळीत रव्याचे किंवा बेसनाचे गरगरीत लाडू;अनारसे;शंकरपाळ्या ;लग्नसमारंभात गुलाबजाम्बू[काही मूर्ख लोक याला गुलाबजाम असे म्हणतात..पण त्यात मजा नाही];रसमलाई;रसगुल्ले;अंगूर मलई;विविध मिठाई;काजू कतल्या ईत्यादी...हे सगळे त्या त्या वेळीच शोभा देते...!!..आणि मी त्यावर त्या त्या वेळी तुफान ताव मारत असताना विविध लोकांनी पाहिलेले सुद्द्धा आहे..!!...
तिखट खाण्याचे प्रकार अनेक आहेत...अगदी वांग्याच्या झणझणीत रस्श्यापासून ते नाशिकच्या मसालेदार चीव्ड्यापर्यंत...जिभेला सुरसुरी आणणार्या चटकदार भेळेपासून ते अगदी ठाण्याच्या मामलेदाराच्या लालभडक मिसळी पर्यंत ....पुन्हा त्यात काही घरगुती प्रकार येतात..म्हणजे नुसते मोड आलेल्या मटकी किंवा मूगामध्ये तिखट ;मीठ टाका मस्त डिश तयार...किंवा कच्च्या पातळ पोह्यामध्ये तेल [कच्चे];तिखट ;मीठ ;गरम मसाला आणि किंचित साखर व दाण्याचा कूट टाका ..फुल टाईमपास तयार..!!....परत चटकदार कांदाभजी ;मिर्चीभजी;बटाटाभजी...मिर्च्यांसोबत आहेतच..!!..वडे आहेत;सामोसे आहेत ;रगडा-पाव असतो;वडाउसळ असते...सगळे आहे!!..पण खाणार्याला अक्कल पाहिजे कि कुठे आणि कसे खावे....उदाहरण देतो :..थंड निस्तेज वडे आणि उगाच कोणी खात नाहीये म्हणून मरगळून पडलेले पाव मी खात नाही...वडा मसालेदार ;गरम आणि कुर्कुर्रीत असावा..[हीच अट साध्या डोश्यालाही लागू पडते ]..पाव नरम ताजा हवा..शिवाय योग्य पद्धतीने तळलेल्या तरीही हिरव्या दिसणार्या मिरच्या ;लाल तिखट चटणी ;ठेचा ;आंबट गोड चटणी हे सगळे अनलिमिटेड व उत्तम प्रकारे उपलब्ध असावे....मग वडापाव खायला मजा येते..ती खरी...!!..तर असे विविध तिखट पदार्थ आधी परीक्शावेत आणि मग वाट्टेल तसे खावेत..!!
तिखटामध्ये जसे अनेक नियम आहेत..तसेच ते गोडालाही आहेत...!!
जसे पुरणपोळी दुधाबरोबर चांगली लागते ..पण एकवेळ दूध नसेल तर क्षम्य आहे..पण साजूक तूप नसेल तर त्या पोळीला शून्य किंमत आहे....साजूक तुपाशिवाय पुरणपोळी म्हणजे आईबापाशिवाय मुलगा..किंवा
ढगांशिवाय पाउस..!!..साजूक तूप ईज मस्ट..!!..आणि यातही एक सूचना अशी कि साजूक तूप नुसते आहे असे भासायला नको...तर अक्ख्खी पुरणपोळी त्यात मस्त भिजून गेली पाहिजे..उगीच चमचाभर तूप टाकणार्या अर्धवट माणसांनी जेवायला बोलावले तर खुशाल जाऊ नये..!!पुरणपोळ्यानबरोबर मी तुपाचा डब्बा फस्त केल्याचा इतिहास आहे..उगीच पुराव्यांशिवाय आपण बोलत नसतो!!
तीच गत गुलाब्जांबू किंवा रसगुल्ले किंवा मिल्क शेक किंवा मिठायांची.....असले अमोल पदार्थ खाताना [पहिल्यांदा दर्जा चेक करून]..मी इकडे तिकडे पाहत सुद्धा नाही...उगाच दृष्ट लागायची!!..लग्नात सोन्यासारखे महागडे गोड व मलईदार पदार्थ असताना ..काकड्या नाहीतर पापड किंवा नुसताच पुरी भाजी आणि भात खाणार्या मानावान्बद्दल मला अपार करुणा आहे...असे दिव्य गोड व उत्तम पदार्थ असताना मी बाकीचे सगळे वजा करून फक्त मिठाया आणि रसमलाई वगैरे तगड्या पदार्थांना पानात ठेवतो आणि पुरी ;भात;चटण्या ;पापड वगैरे फालतू सुकड्या मंडळींना एका फटक्यात [पोटात]हद्दपार करतो...!!..
..खूप लिहिता येईल...पण जागा आणि वेळ कमी आहे...!!..जास्त वेळ लिहिण्यात दवडण्यापेक्षा खाण्यात सत्कारणी लावला तर जास्त कल्याण होते ..असे माझे ठाम मत आहे..!!.असो .कळावे ...लोभ असावा...व छान जेवण केलेले असल्यास अवश्य बोलवावे..नुसता मेसेज पाठवलात तरी केंव्हाही जेवायला हजर होईन..पण मी भरपूर [आचरटासारखे] जेवल्यानंतर कृपा करून पैसे मागू नयेत..[मी अन्न फुकट खाण्यात PhD केलीये .सो बी अवेअर!!..असो कळावे व ईतके उर्मट बोलणे ऐकून सुद्धा लोभ असावा !! .]..आपला खादाड हितचिंतक ...!!
---------------------------------------------------------------- लेखन -हर्षल...!!
आईगं इतका भारी ब्लॉग नजरेतून कसा सुटला ?? जरा पब्लिसिटी करा राव. लै लै भारी लीव्ह्ताय.
ReplyDeleteधन्यवाद ..नीलकंठ !!........पण प्रसिद्धी नक्की कशी करायची ...आणि शिवाय ...मी लिहितो ते माझ्या आनंदासाठी ..आणि जे वाचतील त्यांना बरे वाटावे म्हणून ...!!
Delete