कसे देवराया..कसे सावरावे ?
कसे दीर्घ मायेस या आवरावे?........
कुठे घात होतो मुळी आकळेना..
कसा शोक येतो मनाला कळेना.
कसे अंतराला तुझे नाम द्यावे..!!.१
किती भोग भोगून सरता सरेना ..
असे योग; हा देह सोडू शकेना
कसे विषयाला स्वताच्या प्रतापे..
मनाच्या तळी पार गाडून द्यावे?.....२
उभा जन्म येथे असा शाप वाहे...
किती वंचना व्यर्थ घेउनी पाहे..
तरी दृढ माया तयाची सुटेना.
कसे त्यास देवा तुझे भान यावे?..३
समोरी सुखांचे..पसरले पसारे
तिथे चित्त अस्वस्थ होते विकारे..
किती हीन आम्ही तमोबद्ध सारे ..
तुझे सत्य आम्हास कैसे कळावे??
असा आर्त होतो कधी जीव सारा
उरी क्रोध येतो स्वताचाच न्यारा.
परी वृत्ती विरक्त होऊ पहाता ;
पुन्हा जागतो षडरीपुंचा पहारा
विवेकी सदाचार जातो बुडोनी ;
कसे ईश्वरा चक्र हे पालटावे???.
तुझ्यावीण रे व्यर्थ कैसे जगावे?..४
तुझी थोर माया कृपाळू कराने..
आम्हा दान द्यावी अनादी कृपेने ..
तुझे नाम घेता सुखे जन्म जावो.
सदा त्वत्पदी चित्त अमुचे विसावो..!!
तुझे ध्यान ते दान आम्हास द्यावे.........!!५ .........हर्षल
No comments:
Post a Comment