Thursday, October 20, 2011

निरुत्तरित प्रश्न.....!!!

असेच प्रश्न उठतात ;अस्वस्थ करणारे ;नकळत ;अचानक!!
आणि गोठून जाते काळीज;त्यांचे आकार पाहून;

ते प्रश्न असतात वेगवान ;प्रभंजनांसारखे ;
अथांग मनाच्या महासागरावर उठलेले; 

अकस्मात वेढून घेतात सगळा प्राण ;
आणि विमनस्क यातनांचे देतात दान..

रडू लागतात जेंव्हा भयंकर वेदनांनी आपले डोळे;
तेंव्हा पिशाच्चे होतात ह्या प्रश्नांची ;
आणि अधिकच भेसूर होतात त्यांचे उग्र आवेश..
द्खाश्रूंची नसते तमा त्यांना ;आणि नसते आक्रोशांचे मूल्य !!

त्यांना हवी असतात उत्तरे ..फक्त उत्तरे..
आणि तीच नसतात आपल्याजवळ...!!

हे प्रश्न जाळत जातात चिंतांचे अग्नी घालत ..
उन्मादांचे निर्भान विष ओतत ;प्रत्येक क्षणी ;मस्तकामध्ये ..!!
आणि उद्ध्वस्त करतात निर्व्याज जगण्याचे संकेत..
नष्ट करतात निर्मळ मनाचे लालित्य ;..फक्त उत्तरांसाठी .!!.
अशी उत्तरे ;जी बहुदा मिळतच नाहीत..,कधीही !!

प्रश्नांची पिशाच्चे तशीच उरतात ;खिदळत ;उधाणत.
आणि माणसे मात्र नाहक मरतात;ह्या निरुत्तरित प्रश्नांसाठी.... 
-------------------------------लेखन - हर्षल

No comments:

Post a Comment