Thursday, October 20, 2011

माझे आजोबा...........!!!!

माझे आजोबा आणि मी आणि सोबत छोटी बकरी
आजी आजोबा कद्धीच नातवांना मारत नसतात;ते  पहिल्यापासूनच  म्हातारे असतात ...आणि ते स्वत कधी मरत सुद्धा नसतात..अशा दोन-चार गोष्टी बालपणी पूर्ण सत्य मानणारे माझे मन अचानक मोट्ठे झाले...बोथट झाले म्हणूयात!!..आणि आजी आजोबा नातवांना मारत नाहीत हे सत्य तेवढं सोडले तर उरलेले एक आभासचित्र मात्र फाटून गेले.आणि नवे सत्य समजले ते म्हणजे आजी आजोबा अमर मुळीच नसतात तर ते एकदिवस अचानक मरून जातात..कायमचे सोडून जातात.माझ्या मनाने हे नवे वास्तव अवघडून का होईन पण स्वीकारले !!
.......गेले काही दिवस वयाच्या ७९ व्या वर्षी अशक्त होऊन आजारी पडलेले आजोबा त्याही दिवशी काही बोलत नव्हते ;अगदीच गलितगात्र होऊन निजले  होते..आई त्यांची शुश्रुषा करत होती;आजी पायाजवळ  बसली होती...वडील कामावर निघाले ;काका सुद्धा कामावर गेला होता..आणि मी परीक्षेला निघालो होतो....२५ मे २००५ ची सकाळ अशी माझ्या अजून स्मरणात आहे...आई म्हणाली त्यांना ..[आजोबांना सगळे "दादा"म्हणून बोलवायचे ..]."अहो दादा; हर्षल परीक्षेला चाललाय ;जाऊ देत का त्याला ;?"..आणि आजोबांनी डोळे थोडे मोट्ठे करून मानेनेच हो म्हंटले..माझ्याकडे वळून एकदाच पाहिले ..आणि पुन्हा नजरेनेच होकार दिला ..... माझा पाय बाहेर पडला...आणि शेवटचे जिवंत आजोबा माझ्या स्मृतीत कोरले गेले...
.....संध्याकाळी पेपर संपवून जरा अस्वस्थ पणेच घराजवळ पोहोचलो..आणि घराबाहेर परिचितांची गर्दी!!...एक ओळखीचे काका जवळ येऊन थांबवत म्हणाले "लालू दादा गेले;दुपारीच ;सांभाळ!!"
....घरात उद्ध्वस्त मनाने शिरलो ..मनावर काळी छाया सकाळपासून होती तिचा असा निकाल यायचा होता..माझे अंग उगाच तापले होते..आणि निष्कारण घोडचूक घडल्यावर वाटते तशी भयंकर तळमळ काळजात दाटून आली...बाहेरच्या खोलीत मधोमध आजोबा शांत झोपले होते..कायमचे..!!.कृश झालेले शरीर ;सरळ नाक ;खोल आत गेले गाल;आणि आता कायमचं शांत झालेले आयुष्य घेऊन ..!!...घरात नातेवाइकान्ची गर्दी...सगळ्यांचेच डोळे रडून सुकले ;सुजले होते....इतक्यात कुणीतरी म्हणाले"हर्षल आलाय.."
.......मी एकदम घुसमटून गेलो;ते शब्द ऐकून ."मी आजी आजोबांकडे नेहेमीच दुपारी जेवायच्या वेळी जायचो आणि दाराची कडी वाजवायचो तेंव्हा आजोबा असेच दार उघडताना आत आजीला मोठयाने म्हणायचे "अग;हर्षल आलाय..".आणि मग मला म्हणायचे "थांम्ब हां..आलोच "!!"..आज आजोबांना कळलेच नाही.."हर्षल आलाय.."!!
.....मी आतून विलक्षण जड झालो होतो..खांद्यावर दप्तर आणि पायात अजून न काढलेले बूट ..असा उभा होतो दारातच आणि पाहत होतो ..माझे आजोबा..शांत..पांढर्या चादरीत गुरफटून झोपलेले..मेलेले..!!..
........इतक्यात बाबा जवळ आले..खांद्यावर हात ठेऊन म्हणाले.."दुपारीच गेले..मी अर्ध्या रस्त्यातून परत आलो.!बऱ आता  ,शांत हो..जा आत जाऊन पाणी पी..!!..मी निर्जीव झालो होतो ..काय करावे कळत नव्हते..आत स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिऊ कि इथेच थांबू..??..आजोबा गेले म्हणजे ??..आणि हे काय चालू आहे..?.नाही.. आजोबा गेलेत..त्यांना बघत बसू?..कि इतरांसारखा रडू?...मी वेड्यासारखा दारात उभा राहून पुतळ्यासारखा निर्विकार झालो होतो..आणि अचानक मी दप्तर उतरवले..बूट काढले..हात पाय धुवायला मोरीत शिरलो..बाहेर येऊन बाटलीभर पाणी ढसाढसा घशात ओतले..आणि आतल्या खोलीत दिवाणावर सुन्नपणे बसून राहिलो..मला बघून सत्तरी पार केलेली माझी आजी धडपडत उभी राहिली ..आणि रडत रडत मला बिलगली ..आजीला मी काय सांत्वन देऊ.?.मीच बंद;बधीर झालो  होतो..आजी रडत होती आणि तिचे अश्रू माझ्या शर्टावर ओघळत होते..सत्तर वर्ष वयाच्या  आणि पन्नास वर्षे संसार केलेल्या माझ्या आजीला ..विशीतला मी एक आधार वाटत होतो ..तिचे सुरकुतलेले हात धरून तिला आधार देत दिवाणावर बसवले..पण ती शांत होत नव्हती ..दुखाचे आवेग तिला या वयात सहन होत नसावेत...!!ती पार कोसळून गेली होती!!
........मी आजूबाजूला पाहत होतो तर सगळे नातेवाईक एकेक जमा होत होते..पण मला काहीच भान नव्हते ..मी अस्वस्थपणे घरात फिरत होतो..मधेच आजोबांना बघून येत होतो..त्यांचे ते निश्चल शरीर डोक्यात घट्ट  साठवून घेत  होतो....
...वेळ कापरासारखा उडत गेला..आणि आई हळू आवाजात म्हणाली," सगळ्यांनी शेवटचे पाया पडून घ्या".....शेवटचे पाया पडून घ्या?..शेवटचे ??..माझ्या मनातल्या या प्रश्नानेच मी भानावर आलो..खरंच !!..माझे आजोबा...प्रत्यक्ष माझे आजोबा ..आज वारले होते..आता दहन विधी साठी बांधले जाणार होते..आणि मग परत कधी म्हणजे कधीही दिसणार नव्हते ...मी अक्षरश हादरून गेलो..हा मृत्यू इतका झपाट्याने घाव घालून गेला होता ,..कि आत्ता कुठे मी सावरलो इतक्या वेळाने..आणि काळजात विचित्र कळ उठली...!!
.......आपले आजोबा गेले??नुसते गेले नाहीत तर थेट मेले??!! !!..माझे ज्योतिषी आजोबा;माझे पेंशनर आजोबा;माझे रागीट आजोबा;माझे हुशार आजोबा;यंत्रांची आणि दुरुस्ती कामाचीआवड असणारे ;वेगवेगळ्या जुन्या वस्तूंचा संग्रह करून ठेवणारे ;लहान सहान गोष्टींवरून चिडणारे ;गणपतीला ;नवरात्राला सोवळे नेसून आरती करणारे ;सगळ्या घराला धाकात ठेवणारे;कौन बनेगा करोडपती, श्रीयुत गंगाधर टिपरे आणि शिवाय बातम्या न चुकता बघणारे,स्वतःचे अंगरखे स्वतः शिवणारे आणि कपड्यांवर विशेष खर्च न करणारे ;  म्हातारपणी सुद्धा रिक्षा न करणारे;असे माझे आजोबा....
......मी दुपारी घरी गेलो कि अल्फा टीव्ही मराठी बघत..खुर्चीवर बसून जेवताना दिसणारे आणि "बस रे जेवायला,झालं का कॉलेज?यंदा बारावी न रे?",इतकच बोलणारे आणि माझे पान स्वतः वाढून देणारे माझे आजोबा;मी इंजिनीयरिंगला गेलोय हे कळल्यावर "उगाच कशाला इतका खर्च?"असे माझ्या आईला म्हणणारे ;ठराविक वेळी नियमाने बाहेर जाणारे;वेळ काटेकोर पाळणारे ;एकच जुनी छत्री व्यवस्थित वर्षानुवर्षे वापरणारे ;दिवसभर भेटायला येणार्या वेगवेगळ्या लोकांना काहीना काही सांगत बसणारे;घरी आलेल्यांना चहा आणि खायला काहीतरी करायला लावणारे ;शेकडो लोकांना ज्योतिष सांगत असले तरी कुठलीही पाटी किंवा जाहिरात न करणारे ;वर्षानुवर्ष लोकांच्या घरी जाऊन नवीन वर्षाचे पंचांग स्वतः देऊन येणारे;ढवळे पंचांग चांगले कि दाते पंचांग चांगले यावर वाद घालणारे ;"देवबांध"च्या आदिवासी केंद्राला मदत पाठवणारे;दिवाळीत फटाक्यांचे कर्कश्य आवाज न आवडणारे;दारावर येणारे कुत्रे ;चिमण्या;मांजरी यांना पोळी खायला घालणारे;पंखा लावला कि चिडणारे ;कुणाची पत्रिका बघून सांगून झाली कि "देवाच्या पुढे ;काय ठेवायचे ते ठेवा"असे म्हणत कित्येक वेळा तर फुकटच पत्रिका सांगणारे.;इतरांच्या व फुकटच्या धनाचा काडीमात्र हव्यास वा लोभ न ठेवणारे ;स्वतःचे पेन्शनचे पैसे अगदी जपून वापरणारे;"इडली सांबार ;मिसळ आवडीने खाणारे;स्वच्छता ;व्यवस्थितपणा आणि जेवणाचे नियम अगदी  काटेकोर पाळणारे;कुठलेही व्यसन नसणारे ;कधीही आजारी न पडणारे ;बारीक काटक आणि मेहनती असणारे ...................
......................असे माझे आजोबा...त्यांच्यात बरेच गुण होते,काही दोष सुद्धा होते ,,अर्थात दोष कुणात नसतात? मी मात्र उत्तम गुण जे त्यांकडे भरपूर होते तेच शिकत आलोय..अजूनही शिकतोय !!म्हणून त्यांच्यात जर काही दोष असतील तरीही त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही.. त्रिवार नाही..!!.आणि शिवाय वडीलधार्यांच्या दोषांवर लहानांनी बोलू नये;निदान प्रकटपणे तर नाहीच!!अशा ठाम मताचा मी आहे...तर एकूण असे माझे आजोबा..!! आता ते कायमचेच निघून गेलेत.!! मला नीट समजले शेवटच्या पाया पडण्याच्या वेळी ..आणि उगाच भयंकर हुरहूर दाटली  कि; सकाळी परीक्षेला जाताना जिवंत आजोबांच्या पाया पडलो नाही;आणि आता असा प्रसंग?..असो..!!.उशीरा का होईना..पण पटले मनाला कि, वारलेत ते..!!! ते खूप म्हणजे खूपच दूर गेलेत हे कळले मला.!!मी हुंदका आवरला नाही...आवरलाही नसता माझ्याच्याने..अश्रू डोळ्यांतून वाहू दिले..त्यांच्या थंड पडलेल्या  वृद्ध पायांवर डोके ठेवले...दोन चार अश्रू पावलांवर ओघळू दिले....तसं म्हणायला गेलं तर मी काहीच देऊ शकलो नव्हतो त्यांना आजवर..हे अश्रू तरी किमान त्यांच्याबरोबर जाऊ देत.."कदाचित दुसर्या जगात ते जिथे जातील तिथे म्हणतील तरी कि ,"माझ्या नातवाने बाकी काही नसेल दिलं;पण प्रेमाचे ;आदराचे दोन अश्रू तरी दिलेत"..आठवण ठेवली त्याने.!!""..पितरांना अजून काय हवे असते वंशजांकडून ??
.........विनायक गोपाळ देशपांडे या नावापेक्षा "लालू दादा" ह्याच  नावाने '[ते लाल गोरे असे होते म्हणून] नाहीतर "देशपांडेकाका" ";किंवा नुसतेच "गुरुजी";किंवा क्वचित "आबा" अशीच त्यांची ओळख जास्त..!! !!..ते  गेलेत हे कळल्यावर आजोबांचे  कित्येक परिचित लोक शेकड्यांनी जमले..कित्येकांना तर आम्ही ओळखतसुद्धा नव्हतो..अंत्यसंस्काराला इतका समुदाय बघून कुणाला वाटावे कि कोणी फार मोठी व्यक्ती गेलीये .एका अर्थाने खरं होतं ते!! ..माझे आजोबा प्रसिद्ध होते पण कागदोपत्री नाही ..तर त्यांचा जनसंपर्क बराच होता..पण कुठल्याही सभा किंवा संस्थांमध्ये कुठलेही पद समाजात नसतानाही  फक्त त्यांच्या लोकांमध्ये मिसळण्याच्या वृत्तीमुळे झालेला..आणि तो किती होता त्याची झलक तेंव्हा दिसली..!!
......एकूणच ती विचित्र ,जड आणि अशांत संध्याकाळ हळू हळू सरली ..त्यांच्या पार्थीवाच दहन झालं..आणि आजोबा देहरुपाने सुद्धा उरले नाहीत ..!!.मनातल्या स्मृती आणि थोडेसे फोटो याशिवाय त्याचं दर्शन आता कुठेही आणि कधीही;कुणालाही होऊ शकणार नव्हत..जीवन आणि मृत्यू यांमध्ये एक भयंकर राकट आणि दुर्लंघ्य पडदा आहे..कुणालाही त्या पलीकडे बघता येत नाही!!..तिथे  माझे आजोबा पोहोचले होते...आम्हाला सोडून !!.माझ्या आजोबांच्या शरीराची राख झाली ..आत्मा देहमुक्त झाला..आजोबा गेले..!!आता त्यांच्या आठवणीन शिवाय काही म्हणजे काही उरलं नाही..!!..    
.........आज आजोबा नाहीत ..पाठोपाठ आजी सुद्धा गेली ...तिच्या आठवणी लिहायला तर वेळ पुरणार नाही..आणि म्हणून त्या आत्ता लिहित नाहीये !!आणि शेवटी सगळेच अनुभव शब्दांत बांधता येत नाहीत ..शिवाय ते बांधले तरी तसेच्या तसे इतरांना कळतीलच असे नाही ..पण मला त्यांच्या जाण्याचे दुख झाले तरी एक समाधान असेही आहे कि,माझ्या बालवयापासून आजतागायत वीस बावीस वर्षे मी माझ्या आजी आजोबांना प्रत्यक्ष पाहू शकलो,त्यांची माया अनुभवली ;ओरडासुद्धा क्वचित खाल्ला; त्यांना मदत केली;त्यांनी केलेले लाड अनुभवले;त्यांची थोडी फार सेवा केली आणि त्यांच्या अंत:काळी त्यांना समाधान दिले..त्यांचा मान जसा त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी राखला तसाच नातवांनी सुद्धा राखला   हे काय कमी आहे..??!!..हे माझे स्मृती धन अमुल्य आहे..हे माझे पुण्य आहे..माझे भाग्य आहे.!!
........सध्याच्या काळात म्हातार्या लोकांचे दोष कुणीही सांगतील;त्यांना वृद्धाश्रमात घालतील;स्वतः आनंदात मश्गुल होऊन त्यांचा अपमान करतील ;स्वतच्या देह्सुखासाठी त्या वृद्ध व्यक्तींना नरक यातना देतील ;आणि वर आपणच किती व्यवहारी आणि धोरणी आहोत हे तोंड वर करून बोलतील ;तेंव्हा अशा लोकांना मी ईतकच सांगतो कि ,जरा घमेंड कमी करा ;नाहीतर नियती असा माज उतरवेल तुमचा कि तोंड दाखवायला जागा उरणार नाही...शेवटी तुम्हालाही म्हातारं व्हायचंच आहे;मुले बाळे तुम्हालाही आहेत हे विसरू नका..!..आपले आई वडील काय किंवा सासू सासरे काय किंवा आजी आजोबा काय!हे सगळेच आपले ज्येष्ठ ;आपलेच वडीलधारे ..त्यांसाठी थोडा त्याग केला तर उन्नत व्हाल..प्रेमळ व्हाल !.त्यागात जेवढे समाधान आहे तेव्हढे भोगात अजिबात नाही..हे विसरू नका..परमेश्वरापाशी माणसाची किंमत त्याच्या त्यागावर आणि 
पुण्य् कर्मांवर होते ..त्याने केलेल्या उपभोगांच्या संख्येवरून नव्हे.!! !!.आपल्या वृद्ध पूर्वजांना आधार देणे;त्यांची सेवा करणे;त्यांवर प्रेम करणे यासारखे पुण्य दुसरे नाही..हे ध्यानात ठेवले पाहिजे.. !!  परमेश्वराने ते पुण्य आजतागायत माझ्या  आईवडीलांच्या आणि माझ्या हातून घडवले आणि म्हणून मी भाग्यवान आहे;इतके तरी समाधान मला आहे..!!..असो!!
...मी माझे लहानपण आजी आजोबांसोबत घालवले असल्याने त्याचे किस्से खूप आहेत ..उदाहरणार्थ : आजोबा कुणाला पत्रिका सांगायचे तर मी माझ्या त्या चिमुरड्या वयात त्यांच्या बाजूला बसायचो..आणि "हा मंगळ ;हा शनी"असे काहीतरी मोठ्य्याने बोलायचो वा वाचायचो,,!!..त्यांना चहा नेऊन द्यायचो;आजीला वाचनालयात घेऊन जायचो;येताना रिक्षाने आलो तर आजोबांना ते सांगायचो नाही ..कारण ते ओरडायचे रिक्षा केली तर!! मी अगदी लहान बहुदा पहिलीत असताना एकदा त्यांनी मला रिक्षात बसवून कुठेतरी लांब लग्नाला कि कशालातरी नेल्याचे आठवते..त्यांच्या सायकलवर बसून कितीवेळ मी हिंडलो असेन   ..!.......आणि अखेरीस मी आज मोठा झाल्यावर एक दिवस त्यांनाच त्यांच्या शेवटच्या आजारपणात लहान मुलासारखे उचलून रिक्षात माझ्याच हाताने चढवले आणि उतरवले...त्यांनी केलेली शेवटची रिक्षा!!..काळ कुणासाठीही थांबत नाही..आजी आजोबांसाठी नाही थांबला..आम्च्यासाठीसुद्धा थांबणार नाही..!! ..पण आठवण ह्या काळाला थांबवते..मनात जुना काळ उभा करते ..तात्पुरते त्या स्थिर न बदलणार्या स्मृतीचीत्रांमध्ये घेउन् जाते..!!..तिथे आपले पूर्वज  दिसतात ..माझ्या आजी आजोबांसारखे..आणि मन त्यांना नमस्कार करते ..मी यालाच श्राद्ध मानतो..खरेखुरे!!.. 
.
असे कितीतरी प्रसंग आहेत पण सगळे कसे लिहिणार ,मुळात मी इतके आज लिहिले हेच आश्चर्य वाटते ;त्याचे कारण वेगळे आहे...!!.तसं म्हंटल तर खूप लिहू शकलो असतो..लिहू शकेन सुद्धा  ..आजीबद्दल ;आजोबांबद्दल !!..पण खर सांगायचं तर मला मनमोकळ  असा लिहिताच येणार नाही ह्या विषयावर; कारण लिहिता लिहिता आपोआप डोळे झरू लागतात.जास्त शहाणे आहेत ते!या माझ्या डोळ्यांना आणि मनाला हे सांगावे लागत नाही कि,ही मर्मबंधातली ठेव आहे.अशा वेळी डोळे आपसूकच ओलेचिंब होतात..मन भरून येते आणि हात थरथरू लागतात .विचार स्वैर होतात ..आणि लिखाण करणं अवघड होऊन बसतं...अवघड म्हणजे अगदीच अवघड..पार अशक्य.!!खरंच सांगतोय  !! ..अगदी आत्ता हे सगळं लिहिताना भरून आलेल्या डोळ्यांची आणि मनाची शप्पथ!!
..................................लेखन:हर्षल !!

6 comments:

  1. kharay agadi. halva kopra surekh mandlayas :)

    ReplyDelete
  2. मित्रा खुप चांगल लिहल आहेस खरच आपली पिढी खुप भाग्यवान आहे आपल्याला जुन्या काळातले आजी आजोबा मिळाले माझे आजोबा 21 फेब्रूवारी 2018 ला गेले 80 वर्ष जगले खुप प्रेम देऊन
    गेले

    ReplyDelete