Friday, November 11, 2011

.........सागराच्या तीरावर ........!!

सागर-शिंपला
उंच माडांच्या वनांमधून ;वाळूच्या बेटांवर समुद्राच्या साक्षीने एकेक 
 पाउल पुढे चाललोय मी..बाहेर डोळ्यांत न मावणारा अथांग 
 महासागर आणि मनात तसाच अथांग प्रश्नांचा अमर्याद समुद्र !! ...

चालता चालता पाय अचानक थांबतात ....
एक कळ मस्तकात जाते ..आणि एक मोठ्ठासा तुटलेला टोकदार कठीण शिंपला तळ-पावलात गेलेला दिसतो ..
फारच  कठीण आणि धारदार आहे तो शिंपला...पाउलच  कापलं जायचं एखादवेळ पण नुसत्या बारीक जखमेवर निभावलं! नशीब !!

....तो जखम देणारा शिंपला मी उचलून बघतोय ..अर्धा तुटलेला आणि तरीही सुंदर दिसणारा ... राज-हंसाचा शुभ्र रंग सकाळच्या पिवळसर केशरी किरणांच्या कुंचल्याने परमेश्वराने त्यावर जणू उतरवला होता..आणि बारीक बारीक वळणे घेत जाणारे विवरासारखे नक्षीकाम करून पाठवले होते त्याला या जगात ....

तो शिंपला फारच सुंदर असेल कधीतरी ...कुणीतरी लहानसा जीव राहत असेल त्यात ;त्याला घर समजून .कदाचित या समोर पसरलेल्या  प्रचंड समुद्राच्या अतिगहन विस्तीर्ण तळामध्ये कित्येक काळ पहुडला असेल हा !!..कदाचित स्वातीचे नक्षत्र देऊन गेलेही  असेल त्याला एखादा अमूल्य मोती !! मला मनातच ईतिहास दिसू लागला त्या शिंपल्याचा...!!...हा सुंदर मोठ्ठा शिंपला किती दिमाखदार असेल नाही त्यावेळी !...आज अर्धा मुर्धा उरलाय तरी ईतका सुंदर दिसतोय ..!!

तो शिंपला रिकामा आहे..अर्धाच उरलाय ..एकटा जगतोय !!
..आता परत त्याला कोणाचे घर होता येणार नाहीये ..!
..आता परत हस्तापासून स्वातीपर्यंत कुठलेच नक्षत्र आपले मौक्तीकांचे दान त्याला देणार नाहीये!
..आता परत कुणी त्याला हौसेने हातात घेऊन बघणार सुद्धा नाहीये!
..समुद्र सुद्धा आता त्याला पोटात ठेवायला तयार नाहीये..! 

.........तो शिंपला समुद्राच्या किनार्यावर असाच तुटलेल्या अवस्थेत पडून राहील कदाचित ..अजून पार तुटून जाईपर्यंत..एकाकी !!..त्याला बिचार्याला बोलता येत नाही ना;म्हणून मला टोचून खुणावत असेल बिचारा !!..सगळीच दुःखे सगळ्यांनाच बोलून नाही सांगता येत ..आपणच समजून घ्यायला हवीत ..नाही का ?


मी तो अर्धा शिंपला हातात घेतलाय ; अर्धा असून सुद्धा माझ्या  हाताच्या तळव्यावर जेमतेम मावतोय तो...मी त्याला असाच एकटा किनार्यावर सोडणार नाहीये ..स्वातीचा थेंब पडणार नसला म्हणून काय झाले !! ..पण माझ्या अश्रुंचा थेंब नक्कीच त्यात पडलाय!!
अर्थात त्यातून एखाद्या सुंदर मोत्याचा जन्म नाही होणार हे नक्की!  ..पण त्या शिम्पल्याला समाधान तरी मिळेल;कळेल त्याला कि अजून तो अगदीच एकटा आणि मित्रहीन झालेला नाहीये ;उलट मोत्याची भेट न देऊन सुद्धा आपल्यावर प्रेम करणारा एक खरा मित्र मिळालाय !!

.......एक मनस्वी मित्र त्याला मिळेल आणि एक प्रामाणिक मित्र मलाही !!




-----------------------------------लेखन ---हर्षल
                                     दि-११\८\२०००

2 comments: