Saturday, November 12, 2011

.....शाळा आणि शिक्षा ..!!




"गाढवा ,निबंध लिहिलास का?"
"नाही बाई;विसरलो !"
"जेवायला विसरतोस का ?"
"नाही बाई;आई न विसरता जेवायला वाढते "
"उलट बोलतोस ?.लाज वाटते कि नाही ?"
"सॉरी बाई! "
"अंगठे धरून उभा रहा "
"उद्या लिहून आणतो न बाई ,न विसरता !!"
"अंगठे धरून उभा रहा !..फाजील कुठचा !!चल लवकर!!"
"हाताचे कि पायाचे ; बाई?"
"मुस्काड फोडू ??"
"नको.. धरतोय मी अंगठे .किती वेळ उभा राहू ;बाई?"
"तास संपेपर्यंत "


भर वर्गात एका मुलाचा पंचनामा झाला होता ..आणि समस्त वर्गासमोर अंगठे धरून,ते सुद्धा विशेषतः खिदळणार्या आणि गृहपाठ वेळेवर करून आणणार्या मुलींसमोर ;उभे राहायची वाईट वेळ एका हुशार मुलावर आली...

अंगठे धरून उभे करणे ;केराची बादली डोक्यावर घेऊन सगळ्या वर्गात फिरणे आणि "कचरा आहे का वर्गात ?"असे भिकार्यासारखे ओरडत त्या त्या वर्गातला केर गोळा करणे ;तोंडात हाताचा अंगठा  धरून प्रार्थनेच्या वेळी जमलेल्या अख्या शाळेसमोर स्टेजवर उभे करणे ;पार्श्वभागावर लाकडी फुटपट्ट्या बडवून चार पाच दिवस "बसण्याचे "
वांदे करणे ;तळहात त्याच लाकडी पट्ट्यांनी लाल करून सुजवणे;
अभ्यास केला नसेल तर सगळ्यात मोठ्ठा धडा{ शक्यतोवर मराठी विषयातला } दहा किंवा वीस वेळा लिहून आणायला लावणे ;पालक सभेला आई-वडीलांसमोर त्यांच्या दिव्य मुलाच्या "शालेय उनाडकीबाज कर्तृत्वान्चा" संपूर्ण पाढा वाचणे......या आणि अशा अनेक शिक्षा शाळेमध्ये मोठ्या सन्मानाने दिल्या जातात .आणि टवाळ विद्यार्थी मोठ्या समाधानाने आणि निधड्या छातीने त्यांना सामोरे जातात .

माझ्या शालेय आयुष्यात मला स्वताला फार कमी शिक्षा भोगाव्या लागल्या .
तीन वेळा मला अंगठे धरून उभे केले होते ;
दोन वेळा माझे हात सुजवले गेले होते;
तीन वेळा वर्गाबाहेर काढले होते.. [ आणि परत आमच्या बाइन्नाच वर्गाबाहेर काढलेल्या आणि गायब झालेल्या आम्हाला शोधायला अख्खी शाळा शोधावी लागली होती !!]  ;
चार वेळा आमच्या पार्श्वभागावर आमच्याच लाकडी फूटपट्ट्या अत्यंत तुफानी वेगाने आणि अगदी मनापासून झोडपण्यात आल्या होत्या {आणि मारून मारून पट्ट्या तुटल्यावर मगच आमची सुटका झाली होती };
तीन वेळा {आमचे कल्याण व्हावे ह्या शुद्ध हेतूने }पाठीत अतिशय शक्तीशाली व जबरदस्त बुक्के आणी दणदणीत रट्टे बसले होते ;
दोनवेळा ;कान वेडेवाकडे पिळले तर कसे दुखतात  ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले होते ;
एक वेळा कानाखाली वेगवान प्रहार झाल्यावर गाल आणी कान कसे  सुन्न होऊन सुजतात हे सुद्धा दाखवून दिले होते;
शिवाय  चौथी-पाचवीत असताना दोन वेळा मी शिक्षकांना चुकवून पळत असताना ;त्याच वेगाने पळत आमच्या मागे येऊन  हातातल्या पट्टीने आमच्या अर्ध्या-चड्डीवर मागच्या बाजूने जीवघेणा हल्ला झालेला होता ;
दोन वेळा मराठीचे सगळ्यात मोट्ठे धडे १० वेळा लिहून आणायला सांगितले होते ;
आणि नक्की आठवत नाही इतके वेळा ,टपल्या किंवा चिमटे काढणे किंवा हाताचे दंड पट्टीचा घणाघाती वापर करून  कलिंगडासारखे सुजवणे असे प्रबोधनात्मक प्रकार घडले होते;
आणि या शिवाय मग बडबड करताना दिसले तर लाकडी डसटर फेकून मारणे किंवा नेम धरून खडू फेकून डोक्यावर पांढरी नक्षी निर्माण करणे वगैरे इतर सौम्य शिक्षा तर होत्याच !!
   
तर एकंदर वरचे वाचून आपल्याला कळले असेलच कि मी किती निरुपद्रवी विद्यार्थी होतो!!
..शाळेत इतक्या कमी प्रमाणात शिक्षा मला झालेल्या असल्याने मी कदाचित ८वी ;९वी आणि दहावीत आदर्श विद्यार्थी म्हणून निवडला गेलो असेन...!!
..गमतीची गोष्ट अशी कि मी आठवीत असताना ज्या दिवशी आमचा बक्षीस समारंभ होता आणि मला आदर्श विद्यार्थी म्हणून बक्षीस मिळणार होते आणि त्याच्याच आदल्या दिवशी रंगीत तालमीला उशीरा पोहोचल्याबद्दल  व तालीम करण्याच्या नावाखाली तासभर मित्रांबरोबर  रिकाम्या वर्गात कबड्डी 
खेळण्याच्या महान पराक्रमाबद्दल मी अर्धा तास अंगठे धरून उभा होतो व तत्पूर्वी पार्श्वभागावर आनंदाने केली जाणारी 'अत्यंत तुफानी'  अशी खास "फुटपट्टी treatment" सुद्धा व्यवस्थित पार पडलेली होती....

मजा असते नाही शाळेत आणि त्यातल्या शिक्षांमध्ये ??!!!


--------------------------------लेखन - हर्षल !!

No comments:

Post a Comment