Wednesday, November 16, 2011

नॉट आउट पंच्याहत्तर !!...


"पन्नाशी झाली ;साठी समारंभ झाला ;सत्तरी ओलांडली आणि आता पंचाहत्तरी गाठ्लीये ....कठीण आहे रे !!.."

काल संध्याकाळी मीच माझ्या मनाला विचारत होतो वरचा प्रश्न !!

झालंय काय कि माझा ब्लॉग मला ७५ पोस्ट पूर्ण झाल्याचे दाखवत होता.....आणि मला अजून काय आणि किती लिहावे हा प्रश्न ते वाचून पडत होता...

लिहिलेले सगळेच मला अतिउत्तम दर्जाचे वाटत नाही.तरीही काही लेख मी असेच खरडून ठेवलेत.काही लेख मला अगदीच जिव्हाळ्याचे असल्याने ते मात्र मी आवडीने लिहिलेत......


लिहून मी थकलेलो नाही...कदाचित वाचून काही जण थकले असण्याची शक्यता आहे....काहींना आवडले असेल..काहींना अजिबात आवडले नसेल...पण तरीही मी लिहितोय ..आणि पुढेही लिहीन ..!!


लेखन ही मन मोकळे करण्याची सुंदर प्रक्रिया आहे...आपले शब्द आपल्याला पुनर्जन्म देतात आणि नवा उत्साह अंगात भरून जातात हे माझे स्वानुभवाने झालेले मत आहे...!!


असो...मी लिहितोय कारण लिहिताना होणारा आणि लेखन वाचताना होणारा आनंद मला अजून गमवायचा नाहीये ....आयुष्य जगताना जे समृद्ध आणि सुंदर स्वरूप मी मनात ठेवतो ..अपेक्षा करतो ..आणि प्रत्यक्षात जे विचित्र तरीही वास्तव असलेले आयुष्य पाहतो..त्यातून जी गम्मत घडते तेच "हर्षायन"...!

हल्ली जगताना ..कधी डोळे आश्चर्याने विस्फारतात ;कधी डोळे भरून येतात ;कधी जुन्या आठवणी दाटून उगाच पापण्या ओलसर होतात ;कधी क्रोधाने मुठी आवळतात;तर कधी प्रेमाचा स्पर्श लाभता हृदय शांत होते;कधी हास्य खुलते तर कधी दुःख फुलते ...असे अनेकानेक अनुभव जे पटकन शब्दांत पकडता येत नाहीत ..तेच अचानक हातांतून ब्लॉगवर अवचितपणे उतरून जातात...आणि ब्लॉगवरची "पोस्ट"संख्या वाढत जाते ....!!!भारताची वाढती लोकसंख्या जशी "आपोआप"वाढत जातेय तसाच माझा ब्लॉग सुद्धा लेखांच्या आणि कवितांच्या  संख्येने फुगत चाललाय..!!...ईलाज नाही त्याला ..!!..देवाची इच्छा!!.. 

असो....माझ्याच आवडत्या कवितेच्या चार ओळी लिहून लेखन थांबवतो..


"" पाहिले डोळे भरुनी वेदनांचे सोहळे 
   सुख आता पाहू दे..!!
   
   रात्र या नेत्रांत होती;
   बैसली कित्येक वर्षे 
   उदय सूर्याचा सुमंगल लोचनांना पाहू दे !!
   जाऊ दे तम घोर सारा ; 
   तेज आता लाभू दे ..!!




================================लेखन - हर्षल !!

No comments:

Post a Comment