Thursday, November 17, 2011

एक रात्र ..!!



धो धो पावसात एका चहाच्या टपरीवर मी कसातरी उभा आहे...

मध्य रात्र जेमतेम सुरु होईल आता..पण अंधार बराच झालाय...घराघरात खिडक्यांच्या काचा उजळून जातील असे प्रकाश उमटलेत...पावसाची रिपरिप वाढत चाललीये ....रहदारी संपून जाईल आणि लोक घरांत शांत झोपतील आता....
चहाचा कडक सुगंध थंड वातावरणात उब निर्माण करत पसरतोय आजूबाजूला...स्टोव चा फरफर करणारा आवाज आणि कानावर टोपी चढवून लगबगीने कुटलेले आले चहा मध्ये घालणारा मध्यम वयीन चहावाला ...आजूबाजूला गर्दी नाहीच...एक वॉचमन चहा प्यायला आलेला आणि एक मी ..असे दोनच गिर्हाईक..!!..

थंड सर्द वातावरणात हातात मोठी bag घेऊन आणि सोबत दोन दिवसाचा शीण मनात ठेवून मी बससाठी उभा होतो...  इतक्यात पाउस लागला ..नाशिकपासून पुढे आडभागातले एक लहान गाव ..दहानंतर सगळेच बंद होते बहुदा इथे !!.माझाच हट्ट लवकर घरी जाण्याचा !! म्हणून लगेच निघालो रात्री, मनात म्हंटले पहाटेपर्यंत पोहचू घरी !!..पण बस स्थानक रिकामे ..आठ दहा उतरणारे प्रवासी आणि तितकेच चढणारे !!..शिवाय त्यात हा पाउस कोसळतोय
!!
...."रात्री बस नसते रे !सकाळी जा "हे सरांचे उद्गार आठवले.. तसा उशीरच झाला पोहचायला ..आणि शेवटची बस निघून गेली होती आधीच १०.४५ वाजता !!
"आता पहाटे ६ वाजता बस येईल मुंबईकडची" तंबाखू चोळत "चौकशी खिडकीतला "माणूस म्हणाला .......!!
""रात्र भर बस आता भूतासारखा" स्वतःला असे म्हणत उगाचच त्या निर्जन बस स्थानकावरून इकडे तिकडे पाहिले तो एक चहावाला दिसला ...पोटात भूक होतीच! जेवण करून अडीच तास गेले होते..जेवण सुद्धा पोटभर नव्हतेच ..मग काय आधीच पाउस;त्यात निर्जन भकास एकटेपणा ;त्यात थंडी वाजतेय...सरळ चहाची टपरी गाठली..!!

हातातले सामान ठेवत ओलाचिंब होऊन टपरीच्या आडोशाला एका बाकड्यावर बसलोय ..टपरी सुद्धा नशीबाने चालू आहे .नाहीतर नेहेमी  दहा वाजता बंद होते!!..

पार्लेजी चा एकुलता एक पुडा बरणीत दिसला..तो लगेच घेतला विकत..तोवर चहा तयारच झालाय!!..
गरम  चहा आणि बिस्कीटे पावसात मस्त लागतात...झाली सुद्धा खाउन..दोन कप वाफाळता चहा आणि समोर तुफान पाउस..आणि कंदील लावून उजळलेली ती टपरी ...चित्रकाराला आव्हान देईल असे वास्तविक portrait उभे होते ..!! 

जरा उब आलीये शरीरात ..
पाकिटातून पैसे काढतोय इतक्यात प्रश्न आला ..चहावाल्याकडून...

"म्हमईच हाय जणू  दादा तुमी ?"

"हो"

"अन इतक्या रातीला का वो निगाला.यष्टी चुकली असल न्हायी ??"

"बस चुकली मामा ;काय करावं तेच विचार करतोय "

"हिथं आडगावात दिवसा सुदिक यष्ट्या कमी येत्यात ..अन रातच्या टायमाला तर धा नंतर येताच न्हाईत .."

"आता कळलं ते मला मामा ..अहो मी पहिल्यांदाच आलोय ..ठाउक नव्हते "

"सामान बी लय हाय दादा तुमच्याकड!!..कंच्या कामावर हाये तुमी ?"

"परीक्षेच्या कामासाठी आलो होतो नाशिकला .तिथून काम झाल्यावर या गावात आलो पाच वाजता संध्याकाळी ;ते श्रीपती बुवा आहेत न त्यांना भेटायला..पण ते आता गाव सोडून गेलेत हे नन्तर कळले ..इथे ओळखत नाही कुणाला म्हणून घरी निघालो होतो .."


"मास्तर हाय जणू तुमी ..!!..शिरपती तात्या कोण हो तुमचे?? ..मागल्या महिन्यातच गेले गाव सोडून ."


"अहो ते नात्यातले नव्हेत ..गोंधळी आहेत ना ते !! ठाण्याला एकदा
 भेटले होते तेंव्हा ओळख झाली ..पत्ता दिला होता ..म्हणाले घरी येऊन जा कधी त्या बाजूला आलात तर ..फोन नंबर नव्हता म्हणून थेट असाच आलो .." 

"मंग आता कुठशी जाणार ?..सकालपातूर तर यष्टी न्हाय तुमची ..!!"


"बघू थांबेन इथे ..नाहीतर बस स्थानकावर जाईन परत..सहा सात तास काय कसेही निघतील "


"आमच्या घरला येताय ?..मास्तर हाय तुमी आन दमलेले बी दिसताय ..पडा तिथ बिनघोर ..आन सकाली यावात हिथं ""

"अहो मास्तर म्हणजे मी काय फार मोठ्ठा माणूस नाहीये हो मामा ;तुमच्या मुलापेक्षा थोडासा मोठा असेन वयाने .आणि उगाच तुम्हाला कशाला त्रास ?..इतके बोललात हेच पुष्कळ आहे "



"अवो दादा ;हिथं पावसात भिजत राहाल आन थंडी पकडेल तुमाला ..अन चांगले तालेवार वाटताय म्हणून तर बोलवतोय घरला ..माजी पोर हायेत ना त्यांस्नी काय सांगा वाईच ..!!आमी काय शिकलो न्हायी ..तुमच तरी ऐक्त्याल !"

रात्री बाराच्या सुमारास चहावाल्या मामांच्या घरी गेलो...मामांचे नाव महादेव असल्याचे समजले.रात्री त्यांच्या त्या लहान वीट बांधणीच्या 
घरात निवारा मिळाला.त्यांची दोन मुले सरिता आणि वैभव अनुक्रमे ८वी आणि ५वीत होती.ती आगी झाली आणि त्यांच्याशी गप्पा मारत तासभर सहज निघून गेला..मामांची पत्नी अगदी साधी आणि प्रेमळ गृहिणी होती.झोपायला रात्री दीड वाजला..एक जाड गोधडी आणि हाताने शिवलेली जाड उशी घेऊन मी मातीच्या थंड जमिनीवर पाठ टेकवली.डोळा लागला तो एकदम सकाळी साडेपाच ला जाग आली.

स्नान शक्य नव्हते आणि म्हणून नुसते हातपाय धुतले..चहा घेतला ..[ह्याचे पैसे मात्र मामांनी घेतले नाहीत ]..सगळे आवरले आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन निघालो .....

इतक्यात मामा म्हणाले 
"मास्तर ;ऐकलंच हाय का अजून ;लगीन न्हाय केलंत?"

"नाही हो मामा ;एकटाच आहे अजून "

"करून टाका लवकर ;निस्त शिक्शान बी जल्माला सोबत न्हाय देत;बायको हवीच .बगा कुनीतरी कलेक्टर;डाक्तर नायतर हापिसर बाई ..तुमाला शोभल ती !! "

"[हसून]नक्की बघेन !! बर येऊ आता?"


त्यांची पोरे पाया पडली तेंव्हा प्रत्येकाच्या हातावर १००-१०० रुपये ठेवले ...मामा नको नको म्हणत होते पण त्यांचे काही ऐकले नाही मी....जाताना मामांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या पाया पडलो .फार साधी आणि छान माणसे होती ती !!


मला बसमध्ये बसवायला आलेल्या मामांना मी सहज हसून विचारले, "का हो मामा ;असे रात्री तर बरेच प्रवासी भेटत असतील सगळ्यांनाच घरी नेता कि काय ?..कि माझ्यावरच काही खास कृपादृष्टी ??"

मामा एकदम गप्प झाले ...
त्यांची कुठलीतरी दुखरी आठवण नकळत जागवली असेल मी ..

ते मला म्हणाले..
"माझा धाकला भाऊ होता ;एकलाच शिकला अख्या घराण्यात ;मुंबईला होता कालिजात अन पैका नसायचा हातात तरीबी शिकत व्हता !!..अन एक दिस थंडीतापाने मेला ..नन्तर कळलं कि रात्रभर पावसात बसला होता फलाटावर ..पैसे नव्हते जवळ आन घरमालकांनी भाडं भरायचा तगादा लावला आन घराबाहेर काढला रातीच्या टायमाला ...गावाकडे यायला निगाला व्हता पैशे मागायला ..पण ट्रेन चुकली नाशकाची ..अन तसाच कुडकुडत बसून राह्यला सकालपातूर..!! अन हिथ आल्यावर जो तापला तो त्यातच गेला !!
आज तुमी हाय ना तेच वय होतं त्याच !!..तुमी काल दिसले तवा वाटलं त्योच हाय .माझा धाकला कैलास !!"


मामांचे डोळे पाण्यानी भरून आले होते ..मी निःशब्द झालो होतो..

.....बस सुटली..मी मागे वळून पाहिले ..आपल्या अंगरख्याच्या बाहीने महादेव मामा डोळे पुसत होते..त्यांच्या लहान भावाला नुकतेच बस मध्ये बसवून दिले होते त्यांनी..!!

..मी खिडकीतून पाहत राहिलो ..शेवटी मामा अगदी दिसेनासे झाले...धुरळा खूप उडत होता ..मी मान आत घेतली..शेजारचे कुणी म्हणाले "अहो धूळ लई उडतीये पाणी आलंय तुमच्या डोळ्यात "

...खरच माझ्या डोळ्यांत पाणी जमा झाले होते ....पण डोळ्यांत धूळ गेल्याने हे पाणी आलेले नाही एव्हढे मात्र मला नक्कीच माहीत होते...!! स्वच्छ आणि निर्मळ माणसांची अचानक भेट झाली कि असेच माझे डोळे आपोआप स्वच्छ होत असतात ..!!



------------------------==========लेखन --- हर्षल----------




No comments:

Post a Comment