संध्याकाळ होते.........आणि शांत आकाशात उगाच काहूर उठल्या सारखे पक्षी पसरतात..
गर्दिंचे पूर वाहतात रेल्वे स्थानकांवरून....
सूर्य पार बुडालेला असतो...आणि त्याचे भगवे उत्तरीय मेघांच्या दाटीत अलगद अडकून पडते..ते सोडवताच अंधाराचे निळेशार पडदे
झाकून घेतात आकाश अगदी घट्ट............
मी शांतपणे चालत असतो ..गर्दीमधून एकटेपणाने ....कर्कश्श आवाजात बहिरेपणाने;अफाट बोलणार्या माणसांमधून मुकेपणाने ...
बाजार तुडुंब भरलेले असतात ...विजांच्या दिव्यांनी चकाकत असतात ...लोक खरेदी करत असतात; घरी पळत असतात ;जागोजागी चहा पीत असतात ;खात असतात ....अगडबंब जत्रा नुसती सगळीकडे ..आणि हे रोजचेच आहे...प्रत्येक संध्याकाळ गर्दीची;माणसांची आणि चीत्त्यासारखी वेगवान ..!!!
मी गर्दीत बोलत नाही....पाहत जातो..!!...एकट्याने चालत जातो..!!
मनात प्रश्न येतात अनेक त्यांना उगाच टाळत जातो....
अनेक न सुटलेली गणिते नेमकी संध्याकाळीच का आठवतात कुणास ठाऊक??
मी असाच संध्याकाळ बघायला सरावलोय..!!..तिला अर्थ नाही आणि स्वार्थ सुद्धा नाही...किमान माझ्यासाठी तरी..!!
आणि अवचित कुणी भेटते ओळखीतले..किंवा असेच कधी छेडले जातात हृदयाचे झंकार...आणि माझा अबोलपणा मोडून पडतो एखाद्या संध्याकाळी..अगदी वादळाने उखडलेल्या वृक्षासारखा ;माझ्यापाशीच !!
उगाच वाटून जाते की,बरेच हरवून गेले...बरेच काही मिळाले ...पण नक्की हिशेब लागतच नाहीये ...!!
बराच काळ सरला पण निरुत्तरित प्रश्न अजून तसेच...काही बंध निर्माण होण्या आधीच तुटून गेले कि काय ,काही अगदी अबोध पण निस्सीम प्रेमाचे नाते हरवून गेले कि काय..!!
काही गोष्टी जमल्याच नाहीत ...काही तारा जुळल्याच नाहीत ...अगदी आपल्यासाठी हवी होती अशी एक प्रेमळ हाक अजूनसुद्धा परकीच राहिली....आणि आपण वाट बघतोय त्या आवाजाची ...त्या होकाराची ..त्या कधीच न जुळलेल्या नात्याची ....
........!!
.......मग मी स्वतालाच सांगतो...त्याच अशांत संध्याकाळी, घरी परत जाताना... गच्च गर्दीत घुसमटलेल्या रेल्वेतल्या माझ्या अवघडलेल्या देहातील खिन्न मनाला ..मी म्हणतो
"जाऊ देत मित्रा;
सगळीच कोडी सुटत नसतात;सगळेच बंध जुळत नसतात ;मनाला जसे हवे तसे सगळेच फासे पडत नसतात....""
.....गर्दीबरोबर मी स्वतःला शांत करत रेल्वेतून उतरतो..घर गाठायला परत रस्त्यावरच्या गर्दीत मिसळतो..चालत जातो.....!!
..संध्याकाळ बाहेर आजूबाजूला पसरलेली असते..आणि मनात विनाकारण अंधार दाटून आलेला असतो..त्यात माझे मन मलाच दिसत नाही;ईतके बुडून गेलेले असते..!!.......उगाचच!!
-----------------==लेखन -- हर्षल...........
[काल्पनिक ]