Tuesday, December 4, 2012

मुक्तचिंतन ..3

आयुष्य एखाद्या उन्मत्त जनावरासारखे ...भीती आणि चिंतांची राक्षसी शिंगे उगारत चाललय ...

एकेक क्षण तुफान वेगाने आपल्याला भेटतो  आणि आपल्या आतून आरपार निघून जातो भूतकाळाच्या अजस्त्र असंबद्ध जाणीवेत .....

कालचे आज नाही आणि आजचे उद्या नाही.....

तरीही भविष्याची चिंताक्रांत ओझी  वाहतोय आम्ही...!!

आनंद आणि उल्हास  खरच आपण अनुभवतो का..??....फक्त त्याची वर्णने वाचतो आपण...कल्पनेतच सगळे जगतोय..!!

स्वप्नांसारखे चांगले आणि वाईट दुसरे काही नाही.......

कारण हीच स्वप्ने भयंकर आशा आणि अशक्यप्राय गोष्टी दाखवतात ......मनाला भुरळ पाडतात ....आणि नन्तर स्वप्नांची नशा चढलेल्या मनाला पुन्हा वास्तवाच्या भूमीवर उतरणे ;चालणे अवघड करून टाकतात..........

जगण्याची एक स्तिमित करणारी गोष्ट   म्हणजे ते माणसाला जिवंत ठेवते.....अगदी किमान तशी आशा मात्र नेहेमीच राखून ठेवते..."
"कितीएक ते ते जन्मले आणि मेले "....असे जरी प्रत्येकाला समजत असते तरी तो स्वतः मात्र "घातला अमरत्वाचा पट्टा "..अशा थाटात हिंडत असतो....पाप पुण्याचे हिशेब लावत जगत असतो..!!.........

आसक्ती आणि अभिलाषा ह्या दोन जुळ्या भगिनी ...माणसाला किती फिरवतील ते काही सांगता यायच नाही.......

ही अफाट माया ..सर्वत्र वेटोळे घालून बसलेली ...तिला पार नाही ..आदि नाही ....अंत नाही.....वर्तुळाला  अंत असतो का कधी..!!

तेच आयुष्य ...ह्या महामायेने उत्पन्न केलेले !!......

जेंव्हा ह्या "मायेच्या ",,पार बघण्याची दृष्टी येते ..तेंव्हा जाग येते......आणि कळतो हा भीषण पण अजाण खेळ...!!

परमेश्वर ह्या सगळ्यांना सोडून पार दूर उभा आहे.....

ही मुक्तता केवळ त्याचीच आणि हे जीवन बंध सुद्धा त्याचेच,......

भेद  इतकाच कि;  मायेच्या तावडीत असताना तुम्ही परमेश्वराला जाणू शकत नाही.....

आणि मायेच्या विळख्यातून मोकळे झालात कि "परमेश्वराशिवाय " अन्य काहीच पाहण्यासारखे उरत नाही..!!!!

पण हे सगळे  समजणे आणि तसे घडणे ..हे फार अवघड आहे....अत्यंत अत्यंत अवघड.....!!!

------------======================================= लेखन - हर्षल ................. { मुक्तचिंतन ३]

Saturday, November 17, 2012


तो आणि ती ...अंतिम चरण भाग १ !!



..संध्याकाळची शांत वेळ ....सूर्य  जवळपास विझलेलाच  असावा......कारण आकाश ;भगव्या रंगाचे धूसर पटटे उगाच काळपट अंगावर रंगवीत ढगांना इकडे तिकडे फिरवत आरामात पहुडले होते..........मधूनच पक्षांचे थवेच्या थवे क्षणभरासाठी आकाशाच्या शांततेचा भंग करत एक पल्लेदार रांगोळी ढगांवर चितारत वेगाने आसमंत  ओलांडून लांबवर पळत होते...............
............ही कातर वेळ ............हा एक विनाकारण मनाचे ताल बिघडवणारा अशांत शांतपणा ......................!!.
...............गर्दीपासून दूर " तो " आडवाटेवर ...शहराच्या बाहेर हिंडतोय..................
 निष्कारण हिंडताना वाटणारी मजा ..आज मात्र नाहीये.....!!.......शहराबाहेरच्या बकाल वस्त्या कधीच मागे गेल्यात ....हायवे वरून पुढे येत उजवीकडे सरळ आत जाणारी त्याची परिचित लांब आणि निर्मनुष्य वाट त्याने निवड्लीये .........आजूबाजूला फक्त चमकणारे तुरळक दिवे..त्याच्या बाईक चा धडधडणारा आवाज ...एवढीच साथ पुरेशी आहे त्याला ..................!!...........
............................गाडीचे गिअर न्यूट्रल वर येतात ....ब्रेक करकचून दाबला जातो.....बाईक थांबते.....!!................समोर त्याचे आवडते ठिकाण आलेले आहे......भयंकर दुखाच्या वेळी ;संताप किंवा शोक अनावर होण्याच्या वेळी "तो " इथेच येतो...नेहेमी...!!....समोर एक साधा लहान ओढा आहे .....दोन काठ असलेला ....उथळ परंतु  वळणा -वळणाने वाहणारा....आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे निर्मनुष्य ...!!...लांबवरचे प्रकाश तिथल्या हवेत सूक्ष्मपणे तरळत असतात...चंद्राचे शांत चांदणे कधी वाहत्या पाण्यावर अलगद वाहत उभे असते....आजूबाजूला थंड..शांत मोकळेपणा ....डोक्यावर अंतरिक्षाचा नक्षत्र नकाशा ..आणि दहा दिशांना घट्ट  अंधारातून उगवलेला थंड प्रकाश ...जुनी झाडे आणि बारीक झुडुपे ... ..बास्स ...अजून काहीही नाही.....!!!...........आणि हो.. एक गोष्ट अजून तिथे अगदी उघड होते..स्वच्छपणे .ते म्हणजे .." त्या "चे स्वत:चे मन ......!!....बाकीची सृष्टी ;त्यातले कोलाहल सारे काही  त्या वातावरणात जेंव्हा  मिटून जाते ...तेंव्हा  त्याचे मन आतल्या आतून ज्वालेसारखे  फुलून येते...उमलते....स्वतःबरोबर सगळी दु:खे घेऊन...मनाच्या तळातला सगळा सगळा विखार घेत........जगताना दडवून  ठेवलेला समस्त अंगार घेत.......!!.............पण आज परिस्थिती निराळी आहे.....आवाक्याबाहेर गेलेली आहे....!!..........
              आज ...मनाचे भान अदृश्य झालेय....नेहेमी इथे आल्यावर वाटते तशी आग आज वाटतच नाहीये... !!....." तो " एखाद्या सुन्न वठलेल्या वृक्षासारखा निश्चल झालाय.............यंत्रासारखा .....!!...यंत्र..??..हो .यंत्रच..!!..दुसर्यानी कऴ दाबली कि सुरु होणारे ;दुसर्या कुणाच्या तरी मेहेरबानीवर धडधडणारे...आणि बंद देखील दुसर्यामुळे होणारे...  !!..त्याला वाटले "सगळे असेच चालले आहे....आपण वापरले गेलो...गुंतलो आणि फसलो..काळजा वरचे हे डाग धुवून टाकणे काही जमले नाही..जमणार ही नाही...!!".......आता थंड हृदयात जाळ  पेटू  लागला होता .......
....................................अलगद उतरत जाणारी संध्याकाळ आता भेसूर रात्रीचा गडद अंधार घेऊन एखाद्या राक्षसी सारखी विक्राळ बनू लागली होती...आजूबाजूचे प्रकाश तिच्या मगरमिठीतून सुटलेच तर थोडेफार वातावरणात चमकत होते...अंधकार चांगलाच वयात आलेला होता..!!..ओढ्याची तिरपी वळणे आकाशाचा फिकट हलता नकाशा स्वतावर खेळवत मिस्कील आवाज करत सळसळत होती......आणि " तो " ..या सगळ्या अमानवी दृश्यांमध्ये कैद झालेला एक अतृप्त मानव.....स्थिर ..निश्चल ..अस्वस्थ ..!!!
 ..............................ईतक्यात लांबून कुठूनसा आवाज उमटला ..."  झाडाच्या फांद्यांवर कुणी पक्षी ओरडला असेल ...""  त्याला वाटले...!!.....आणि त्याची तंद्री मोडली...सगळे दुखाचे कढ एकदम उचंबळून आले...अंधारात जीव घेऊन ओरडावेसे वाटले..काळजाची एकेक तार खेचून त्यावर सर्वात उग्र दु:खाचे संगीत झन्कारावेसे वाटले....वाटले..सगळे पुन्हा सुधारता येईल...सगळे पुन्हा दुरुस्त होईल..!...........हे आजूबाजूचे रान माझी साथ देईल...हा निसर्ग माझा आहे...ही रात्र मला उद्या सुखाची पहाट दाखवेल ....!!........या भयंकर एकांताला ..माझे अश्रू ;माझे 
जळणारे अंतकरण समजेल...........बधीर करणारे सत्य बदलून जाईल................"ती" माझी होईल.........!!
 ....................................."ती "...तिला माहितसुद्धा नसेल मी असा हिंडतोय......फिकीर नाहीये तिला...जमदग्नी सारखा तप्त झालेला माझा अंतरात्मा तिला साधा जाणवत देखील नसेल.......... फिरत असेल ती तिच्या स्वप्नाच्या तृप्त प्रदेशात ;तिच्या उज्ज्वल भविष्याच्या रंजक जगात ..
...........................उगाच तिच्यावर जीव लावला......कापरासारखा काळ उडवला तिच्यासाठी .........शेवटी तिचा एक प्रेमळ शब्द देखील ऐकला नाही.....आणि पदरात पडली ती घोर उपेक्षा आणि धिक्कार..!!..............."".
.......................... "आता ती निघून जाईल नवीन संसार सुरु करायला तिच्या आवडत्या जोडीदाराबरोबर ..कायमची...आणि मी सगळ्या स्वप्नांचे धुळीला मिळालेले लक्तर नशिबात  घेऊन बसेन भूतासारखा.............भूते फार विचित्र असतात ..ती स्वताला जन्मोजन्मीची शिक्षा करतात .....""
...................................तो पाठीत वाकला होता ...दु:खाने  थरथरत होता ....सगळे शांत ;नीरव ..मस्तकातून कळ उठत होती...मुठी आवळल्या  होत्या ..श्वास घेण्याचे सुद्धा भान नव्हते ...शांत ओढ्याजवळ क्षणाक्षणाला  असह्य वेदनांचे भयंकर ओझे मनात भरत होते....त्या ताणाखाली तो पार खचत होता ..अगदी मोडून पडेल इतका झुकून गेला होता..........थकून गेला होता ....!!
......................जवळच्याच एका झाडावर पारध्याने लावलेल्या फासात दिवसभर तडफडत  बसलेला कोणी पक्षी अखेरची अस्फुट किंकाळी देत मरणपंथाला लागलेला होता............
..........................रात्र  सगळ्या बाजूंनी  अस्वस्थ अंधार ओतत होती......खूप उशीर झालेला होता..................................!!!




                                                                  ========= ====     तो आणि ती  या माझ्या लेखसंग्रहातून .................... हर्षल.....................


विशेष सूचना :...लेख काल्पनिक असल्याने उगाच लेखकास नसते प्रश्न विचारू नयेत व आकांड -तांडव करू नये.....लेखक मजेत आहे...!!!.................

 











Monday, October 29, 2012

हसीनाओं ने हमें दीवाना कहा
हमारी दीवानगी देखकर !!

जमाने ने हमें पागल कहा
हमारी सरफरोशी देखकर 

वे क्या जाने !!.
खुदा ने हमें जन्नत है बक्षी
हमारी आशिकी देखकर।।
-------------------------------हर्षल -----

Wednesday, October 24, 2012


ये अन्नेषु विविध्यन्ति पात्रेषु
पिबतो जनानाम ।
ये पथां पथी  रक्षय ऐलबृधा यव्युधा ।

ये तीर्थानी प्रचरन्ति सृकावन्तो निशान्गीणl: ।
 य ऐतावन्ताश्च भूयानोसश्च  दिशो रुद्रावितास्थीरे


यो  अस्मान द्वेष्टि च यं वयं  द्विष्म: ।

[ रुद्रा] तं वो ज्रम्भे ददामि ....।।
------------------------------------------- रुद्र संहिता ..यजुर्वेद  yajurved...

he who hates us extremely [unnecessarily ] 
And [hence] to whom we hate ..

we throw him [o powerful RUDRA] into your deadly jaws ...[destruct them by ur force]...

---------------------------------------------------- translation.... by harshal ...!!


Monday, September 24, 2012

रुद्रचेतस ...

संगरोमे जन्म लेता तप्त  अग्निश्वास हूँ !
रुद्रयागो मे उभरता उग्रतम निर्यास हूँ !!

कृद्ध से तूफ़ान तनु का शांत अन्तर्भाग हूँ।
दहकते ज्वालामुखी का दीर्घ जलता राग हूँ !

सर्व भंजक शिवप्रभु के सत्पदोंका दास हूँ।
नित्य विष्णु लीन रहता ; वैष्णवों का ध्यास हूँ।।

दुखितोंके ह्रदय तल में नित्य जागृत शोक जो;
सज्जनोंके मर्मस्थल में नित निवासित हर्ष जो ;

मैं उन्ही के सत्य् संगम दृश्य का अवतार हूँ।।
जानता हूँ ,एक मैं भी, ईश्वरी हूंकार हूँ।।

-----------------------लेखन - रचना - हर्षल------------

Thursday, September 20, 2012

हमसे काबील नही


वो ,जो चांद से इश्क़ करते हैं झूठ के ;
और अपने वजूद को जगमगाते हैं !!
उधार-ए- " नूर-जमाई" से..!
हमसे काबील नही नजरे मिलानेको वो ;
हम तो रोशन हैं सच्चाईयोंके सूरज से  !   

Saturday, September 8, 2012

!! .. महापुरुष ..!!

धावती लोभावूनी जे, व्यर्थ त्यांची साधना 
उन्मनांना सापडे का ईश्वराची भावना ?    

मोह, ज्यांचे अंतराला दंश करता संपले 
तम विकारी पाश, ज्यांना बांधताना भंगले
विश्वमाया थोरली ती, त्यागली ज्यांनी सुखे 
सत्य दैवी उमलते प्रज्ञानमय ,ज्यांचे मुखे !!

तेच "युग -निर्माण कर्ते" सत्यदर्शक ज्ञानमूर्ती  
  ईश्वराची जाणती जे, शांत निश्चल आत्मस्फूर्ती !!

पूर्ण  ज्यांनी  शुद्ध मानस ईश्वराला वाहिले  
संकटांचे भार भीषण स्मित राखून साहिले 
ते सुभागी,  पंथ त्यांचे देव रक्षित राहिले 
वंदिती विश्वात साऱ्या  स्तुत्य  त्यांची पाउले  !!


-------------------------------------------------------रचना :- हर्षल ---------------------------------------------------------------

Wednesday, August 1, 2012

शिवथर घळ वर्णन


श्री  समर्थ रामदास स्वामीकृत  शिवथर घळ वर्णन  :::::


गीरीचे मस्तकी गंगा ।
तेथुनि चालिली बळे ।
धबाबा लोटती धारा ।
धबाबा तोय आदळे ॥ १॥


गर्जतो मेघ तो सिंधु ।
ध्वनि कल्लोळ उठीला ।
कड्यासी आदळे धारा ।
वात आवर्त होतसे ॥ २॥


तुशार उठती रेणु ।

दुसरे रज मातले ।
वात मिश्रीत ते रेणु ।
                                    सीत मिश्रीत धुकटे ॥ ३॥                                  

दराच तुटला मोठा ।
झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटली छाया ।
त्यामधे वोघ वाहाती ॥ ४॥
 
गर्जती स्वापदे पक्षी ।
नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री ।
ध्वनीकल्लोळ उठती ॥ ५॥

कर्दमु निवदेना तो ।
मनासी साकडे पडे ।
विशाळ लोटली धारा ।
ती खाली रम्य विवरे ॥ ६॥

कपाटे नेटक्या गुंफा ।
तापसी राहती सदा ।
नेमस्त बांधली नाना ।
उत्तमे निर्गळे स्थळे ॥ ७॥

विश्रांती वाटते तेथे ।
जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा ।
सार्थके काळ जातसे ॥ ८॥

Monday, July 23, 2012

!!....स्मृतीशिल्पे ...!!

स्मृतींना संसर्गाचा दोष लागत नाही।..
त्या तशाच निर्व्याज...सतेज आणि स्पष्ट राहतात......

माणसाला वर्तमानाचे जगणे जगावे लागते ..पण स्मृतीन्मधले  जीवन भोगावेसे वाटते ..!!
आशा आणि निराशा या दोन भगिनींनी विणलेल्या अस्पष्ट भविष्या पेक्षा जुने स्मृतीचीत्रांचे निश्चित आणि स्थिर दर्शन म्हणूनच आनंददायी असते ..!!

माणसे म्हणजे कधीकधी भूतकाळावर जगणारी श्वापदे वाटतात तर कधी भविष्याच्या अदृश्य आसक्तीने पिसाटलेली जनावरे.....पण या दोन्ही विश्वांचा दुवा म्हणजे वर्तमान ;तो मात्र माणसाला जगता येत नाही...!!...असो।.

स्मृतींचा आणि माझा संबंध अगदी दृढ आहे।....काही गोष्टी मला मुळीच आठवत नाहीत तर काही मात्र काळजावर कोरून ठेवल्यासारख्या ....अगदी जशाच्या तशा... 
काही स्मृतींनी वेदना होतात ..तर काहींनी आनंद ....काही अशा अबोध आणि मूक आहेत कि त्यांना काही रूप ;भाव नाहीच...!!..नुसत्याच निर्जीव चित्रांसारख्या .....स्पष्ट !!....पण अर्थहीन.!!

लहानपणी शाळेत बसने जाताना अगदी सकाळचा चंद्र धावत्या खिडकीतून वळून वळून बघ्तानाच्या आठवणी.....
नवीन पुस्तके आणि वह्या हातात घेतल्यावर होणारी अस्पष्ट कोवळी भावना ...
शाळेतल्या प्रांगणात पावसाळ्यात साचणारे पाणी ...शाळेतल्या प्रार्थना ...बाईंची होणारी धावपळ ...शाळेत केलेली मस्ती आणि आपोआप झालेला अभ्यास ...............!! आईला घरी यायला उशीर झाला कि मनाची होणारी तगमग. 
आईला आज शाळेत घडलेल्या गोष्टी सांगण्याची झालेली घाई .....दररोज लागणारी क्रिकेटची आंतरिक ओढ .....मैदानावर घालवलेले अंग घामेजून टाकणारे ते उन्हाळे आणि त्यातले क्रिकेटचे सामने।...

थोडे वय वाढल्यावर तारुण्याची होणारी जाणीव आणि धर्माची वाढलेली आस........!..अनेकानेक पुस्तकांच्या सहवासात घालवलेले सोनेरी दिवस।....तासंतास केलेले विचारमंथन।.......
एकांतात घालवलेले उपासनांचे अस्वस्थ् दिवस....परमेश्वराची अदृश्य ओळख .....!!

आणि मग झालेले स्थित्यंतर ...आणि समाजात जगण्याची आलेली एक दृष्टी.....असत्य आणि सत्यांचे मिश्रण दूर करण्याची धडपड...आणि एक किमान एक तरी मिळालेले निसंदिग्ध आश्वासन आणि भगवंताचे प्रेम..!!

अभियांत्रिकीच्या अभ्यासात झालेले त्रास आणि आनंद  आणि त्यावर झालेली यशस्वी पूर्तता ...!! आणि शिक्षक म्हणून झालेली अनुभवप्राप्ती.....मिळालेले प्रेम ..समजलेले अनुभव।..आणि बरेच काही ...............

प्रेम ..आयुष्यात समजलेले सर्वात सुंदर सत्य...आणि त्याची सामान्य ओळख ...!!...आणि समजलेले प्रेमाचे सुंदर रूप....  प्रेमाची जाणवलेली भावना....!!
 .......आठवणी खूप सांगून जातात ....आणि कित्येकदा निशब्द करतात......पण म्हणून  त्यांच्यावरचे प्रेम सरत नाही आणि त्यांच्याशिवाय कधी कधी करमत  देखील नाही ..!!

शेवटी आसपासचे माणसांचे व्यवहार जनावरी आणि अनावर झाले;आनंद किंवा दुख असह्य झाले;कि स्मृतींची सुंदर शिल्पे डोकावून बघायला अंतकरणात खोल सूर मारायला मी सदैव तयार असतो।...........ही स्मृतीशिल्पे काळाने घडविली असली  तरी आता त्यांवर माझी मालकी आहे..कायमची ..अगदी अंतापर्यंत.!!!  
-----------------------------------------------------------लेखन --हर्षल ------------------------------

Wednesday, May 23, 2012

अजुनी.........!!!

अजुनी तुझ्या स्मृतींचा संदर्भ तीव्र आहे  
अजुनी तुझ्या स्वरांचा संसर्ग उग्र आहे.

संत्रस्त जीवनाचे आभाळ तापलेले 
तुजवीण एकट्याने आयुष्य वाहिलेले 

आशा निरर्थकाच्या का वाटती अजुनी ?
बहुदा तुझ्या स्मिताचा नयनात शेष आहे.

अंधार सावल्यांचा हा खेळ वेदनांचा 
कित्येक माह सरले अजुनी सुरूच आहे 

आनंद सर्व सरले विरहार्त शोक उरले.
अजुनी तरी मनाला तव प्रीतीसंग आहे.!!
  






----------------------------लेखन-हर्षल ==============================

Wednesday, April 18, 2012

..!! मित्र आणि अटेस्टेशन [सत्यकथा ]....!!

"बोकड आला का रे ?"
"नाही रे;कधीपासून वाट बघतोय; गेला असेल चरायला कुठेतरी "
"अरे मग त्या डुकराला फोन नाही करता येत?"
"नाहीतर काय..पाच वाजता ठरल होत ना यायचं ?"
"अरे तुम्ही दोघे महा मट्ठ आहात..त्या गाढवाला काय महत्वाची कामे देता रे?"
"हो रे;...हा ..हा विन्या ह्यालाच जाम मस्ती अंगात ;त्या माकडाला नको ते कोलीत देऊन ठेवतो हा"
"ए ;माझ्यावर काय घसरतोस ?..मी एवढंच बोललो..त्याच्या ऑफिसजवळ दुकान आहे तो घेऊन येईल ..त्यात माझं काय चुकले?"
"नाही बाबा ..तुझ काय पण नाय चुकले..अरे तो जंगली प्राणी  का नाही आलाय मग अजून?? ते तरी सांग?"...
..
................[एवढ्यात मी येतो.]..[आता तुम्हाला वाटेल कि मला आधीचा संवाद कसा कळला ?..तर त्याचे उत्तर असे कि मी माझ्या मित्रांना फार चांगला ओळखतो..वाक्य बदलणार नाहीत फार तर ती बोलणारी तोंडे थोडी बदलतील..!!असो..]

मी: काय रे माझ्या नावाने काय शिमगा चालला होता?
चम्प्या: हा बघ आला हुंदडून ...कुठे गेला होतास बोकडा??..दाढी करायला का?
मी: बोकड दाढी करायला बसलेला कुठे बघितलास सलून मध्ये?
चम्प्या: तुला बघितलाय न किती तरी वेळा..!!उशीर का झाला ते सांग..!!
मी: अरे मीटिंग होती रे..!!वेळ लागला !!
मंग्या: अरे ते मरू देत ..काम झाल का?
विन्या: हो रे ..झाल का?
मी: थांब जरा ..!!..काय उलट तपासणी घेताय कि काय अगदी?
नान्या: ए मठ्ठा ..काम झालाय का ?
मी: अर्ध झालंय..उद्या अर्ध होईल..!!
नान्या: [डोके धरून]..अरे बेअक्कल माणसा तुला जनाची नाही तर मनाची तरी ??
मंग्या: तरी मी सांगत होतो "डुक्कर ते डुक्कर"....पण तुम्हालाच जाम विश्वास..!!
चम्प्या: अरे वाट लागेल आता..काय रे साल्या ..तुला इतका बेफिकीर कोणी बनवला रे..अरे इकडे आम्ही जीव टांगणीला लावून बसलोय...आणि आता हे असे सांगतोस?"..तुला खरच सोलला पाहिजे.."
विन्या: अरे थांबा..काय रे असं कसं झालं?..आज लास्ट डे होता यार..!!
काल नोटीस वाचलीस ना...२९ मार्च शेवटचा दिवस,...!!
मंग्या: अरे विन्या खरं म्हणजे तुलाच कुटला पाहिजे...खरा मद्दड तू आहेस...!!
मंग्या: अरे आता ते जाऊ देत यार...उद्याच काय करायचं?...सगळे प्लान फेल गेले..काय यार तू??
मी: अरे सॉरी....पण
चम्प्या:  सॉरी ??..तुज्या लग्नाची लॉरी!!...नीच माणसा लाज नाही वाटत सॉरी म्हणायला..??
मी: अरे त्यात काय उद्या करूयात ना....एका दिवसाने काय होणारे?..
मंग्या: विन्या ह्याला इथेच गाडू का??..एका दिवसाने ??..अरे मतिमंदा ;एका दिवसाने लास्ट डेट सुद्धा संपून जाणारे...!!..फॉर्म काय पर्वा भरणार का?
चम्प्या: म्हणून म्हणत होतो अटेसस्टेशन इथेच करून घेऊयात ...ह्याच्या ऑफिस जवळ नको...आज मी काहीतरी करून आणले असते ना...!!पण नाही  सगळे फॉर्म घेऊन हा बोकड दादरला मिटींगमध्ये बसला होता..!!आणि आम्ही इथे सडतोय वाट बघत..!!
मी: अरे पण सगळ्यांचीच चूक आहे..एकतर फॉर्म लवकर भरायला आपण चुकलो..आता मला का शिव्या देताय??
विन्या: हो रे आपण उगाच वेळ काढला रे,..!!
मंग्या: अरे ;पण आपल्याला उशीरा कळलं तर आपण काय करणार?.दोन दिवसापूर्वी कळलं ना,,हां.. आता दोन दिवस आपण वाया घालवले ..पण ठीक आहे ..कितीवेळ चुका उगाळणार...??आणि आज काम झालं असत तरी उद्या भरू शकत होतो... !
मी: [चेहरा पाडून]..सॉरी रे..खरच ..मी आत्ताच्या आत्ता जाऊन बघतो काही होतंय का?माझा नाही झाला तरी चालेल पण तुमचा तरी आटेस्ट करून आणतो..माझ्यामुळे उगाच त्रास..!!
मंग्या:  ए ;एवढा काय चेहरा पडतो रे?...आणि तू काय परत जाणार इतक्या लांब..मरू दे रे..बघू दुसरा काही जमतंय का?
चम्प्या: बरोबर रे..जाऊ दे रे ..बघू काहीतरी..
[बाकीचे सुद्धा तेच म्हणतात]
 नान्या: चल काहीतरी खावूयात ..मग एक कटिंग मारू...फोर्मच काम होईल रे...फार काय दोन महिन्यांनी परत जाऊ स्पर्धेला..शेवटी कॅरम हा गेम आहे..यावेळी दुसरा कोणीतरी खेळेल आपल्याऐवजी..!
मी: अरे पण मीच कारणीभूत आहे यार..मी जरा लवकर निघालो असतो तर काम झाल असत यार..!!
मंग्या:. .आता बास रे तो विषय ..या वेळी स्पर्धा सोडली असं समजा ..त्यात काय रडायचं??
फालतू स्पर्धेसाठी दोस्ती जाळू काय रे..??
मी: पण स्पर्धा खेळाय्चीच...आणि दोस्ती पण तोडायची नाही ..!!
सगळे: म्हणजे??
मी: फॉर्मच काम झालाय रे........जरा खेचत होतो....खीखीखीखी ..!!
मंग्या: [आनंदात गुद्दा हाणत]:साल्या बोकडा ..मग मीटिंग च काय केलंस..??
मी: अर्ध्यात सोडली..आपल्या ग्रुपच काम आहे रे...येडा आहे का मी मीटिंग करायला?
नान्या:  [मला मिठी मारून...स्वताचे  डोळे पुसतो]
चम्प्या : बोलां....रानडुकराचा.......
सगळे[माझ्यासकट ].....विजय असो........!!

Tuesday, March 27, 2012

!!.........कल्याण करी रामराया ......!!

कल्याण करी रामराया ..
जनहित विवरी !!जनहित विवरी..!! कल्याण करी रामराया ..


तळमळ तळमळ होतची आहे ...
तुझा तूच सावरी ..दयाळा ...!! कल्याण करी रामराया ..


अपराधी जन चुकतची गेले ..
हे जन हाती धरी ..दयाळा ..!! कल्याण करी रामराया ..
   

कठीण त्यावरी कठीणचि जाले..
आता न दिसे उरी दयाळा.....कल्याण करी रामराया !!

कोठे जावे काय करावे ;
आरंभिली बोहरी ;दयाळा ....कल्याण करी रामराया !!

दास म्हणे आम्ही केले पावलो ..
दयेस नाही सरि...दयाळा ...कल्याण करी रामराया !!
----------------------------------समर्थ रामदास स्वामी !!
   
 

Thursday, March 8, 2012

!!!!! गदिमा आणि मी ..!!


गदिमा हे नाव मी अगदी लहान  म्हणजे सुमारे सात आठ वर्षाचा असताना प्रथम ऐकले असेल..नावाचा अर्थ तेंव्हा कळला नाही.नन्तर कळले कि ते एका माणसाचे नाव आहे.हळू हळू कळले कि ते एक फार मोठे कवी होते...

आणि साधारण सोळाव्या वर्षी समजू लागले कि अर्वाचीन युगातील मराठी काव्यप्रतिभेचा तो सर्वोच्च मेरुशीर्ष आहे....विसाव्या वर्षी खात्री पटली कि वेदकाळात लुप्त झालेली प्राचीन सरस्वती 
ग. दि. माडगुळकर या नावाच्या महाराष्ट्राच्या एका साध्या देशस्थ ब्राह्मण कुलोत्पन्न भाषाप्रभूच्या हृदयात आपली शब्दसंपदा घेऊन पुन्हा प्रकट झालेली आहे. 
 मी गीतरामायण ऐकले ते तुकड्या तुकड्याने..मला ते आवडले देखील ...पण नन्तर मी जेंव्हा ते वाचले अगदी एकटेपणाने मनस्वीतेने तेंव्हा प्राकृत मराठमोळी भाषा "अमृतातेही पैजा "कशा जिंकते ;इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष देववाणी सुद्धा इतकी सहज पणे प्राकृतातून कशी उर्जस्वला होऊन भावदायिनी होते;या आश्चर्यमग्न करणार्या वस्तुस्थितीचे मला जिवंत दर्शन झाले.
गदिमांच्या लेखनाइतके नितांतसुंदर ;भावपूर्ण आणि लयात्मक काव्यलेखन अत्यंत दुर्मिळ आहे.काव्य मोजण्याच्या अनेक मोजपट्ट्या असतील ,आणि म्हणून अनेक कवींना काव्यलेखनात उत्तम मूल्य प्राप्त करून दिलेले आहे .परंतु या सर्व उत्तमोत्तम कवींमध्ये गदिमांच्या काव्यलेखनाचे मूल्य प्रथम स्थानावर "स्वयमेव मृगेन्द्रता"या न्यायाने सुप्रतिष्ठीत झालेले आहे.
गदिमांचे काव्य वाचणे म्हणजे मनाला प्रत्यक्ष शारदेच्या महान शब्द-भवनातून विहार घडवून आणणे.इतके सुंदर;इतके प्रभावी ;इतके नेमके आणि इतके उच्चार-सहजतेने नटलेले शब्दशिल्प पाहणे;वाचणे आणि अनुभवणे हीच एक अपूर्वोत्तम गोष्ट आहे........!!
गदिमांचे काव्यलेखन म्हणजे "इथे थांबती तर्क वेदमय "असे ज्या पर-ब्रह्माबद्दल म्हंटले जाते तसेच अलौकिक आणि अद्वितीय असे आहे.


गदिमांचे काव्य शब्द;स्वर आणि भाव याबरोबरच एक संतत्वाचा स्पर्श घेऊन आलेली तरलता दर्शवते...

"ज्ञानियाचा व तुक्याचा 
तोच माझा वंश आहे..
माझिया रक्तात थोडा 
ईश्वराचा अंश आहे.!!".....असे त्यांचे स्वताचे उद्गार असत्य नव्हेत..!!
साधे शब्दच पण त्यांची अशी बेजोड आणि अपूर्व रचना मी अद्याप पहिली नाही..
गीत रामायणात सुग्रीव रामाला म्हणतो कि आजपासून मी तुझा मित्र झालो तेंव्हा गदिमा लिहून जातात 
"दुखीच साह्य होतो दुःखात दुःखीताच्या ".केवळ अपूर्व !!

किंवा राम रावण वधानंतर सीतेस म्हणतो :
"किती यत्ने मी पुन्हा पाहिली तूते लीनते चारुते सीते "
किंवा त्याच काव्यात प्रभू श्रीरामाचा पराक्रम किती जाज्वल्य होता हे गदिमा एका ओळीत लिहितात ;"
श्रीराम म्हणतात सीतेला..
"शब्द्दांची झाली पूर्ती 
 निष्कलंक झाली कीर्ती 
पाहिली प्रियेची मूर्ती 
मी शौर्याने वाकविले दैवांते"  ....
 मी शौर्याने प्रत्यक्ष दैव वाकवले ह्या एका वाक्यात तो राम पराक्रम नजरेपुढे साकार होतो...

गदिमांचे लेखन आणि शब्दकळा ;भाषेवर प्रभुत्व केवळ अप्रतीम आहे ईतकेच नव्हे तर त्यांचे तत्त्वचिंतन आणि उत्तम प्रतिभा केवळ अजोड आहे...!! गदिमा आणि मी       

Tuesday, March 6, 2012

गदिमांच्या गीतरामायणातील एक कडवे..!!

:माझे आवडते वाक्य :----
गदिमांच्या गीतरामायणातील एक कडवे..!!
राम सीतेला म्हणतो :

संपले भयानक युद्ध 
दंडीला पुरा अपराध 
मावळला आता क्रोध 
मी केले जे ;उचित नृपांते होते..!!

 शब्दांची झाली पूर्ती 
निष्कलंक झाली कीर्ती 
पाहिली प्रियेची मूर्ती 
मी शौर्याने वाकवीले दैवांते..!!!



Thursday, February 23, 2012

......!!...सामर्थ्य ........!!


सामर्थ्य असो उत्तुंग 
विश्व जे तारी..
सुर-नरवीर ज्याची
नित्य गात ललकारी..!!

ध्वज विजयांचे जे 
उंच उभारत जाते ..
सामान्यही ते सन्मान्य
जयाने होते..!! 

 
जे मुक्त उसळता 
शौर्यबीज झळझळते ..
जे प्रमत्त होता..
धैर्यवीज सळसळते ..!!
   
सामर्थ्य शुद्ध ते 
धर्म जयातून स्फुरतो..
प्रत्यक्ष शिवाचा 
नेत्र जयातून जळतो..   

सामर्थ्य ईश्वरा असे 
दान दे आता...
जे दैवाचा शौर्याने 
नमवील माथा...!!!

-------------------------------हर्षल-----------------



 

 

Friday, February 3, 2012

शालिवाहन ...............!!!


विक्रमादित्य पौत्रश्च [ =शालिवाहन ] पितृराज्यं गृहीत्वान !!

जित्वा शकान दुराधार्षचान तैत्तरी देशजान...!!
बल्हीकान कामारूपाश्च रोमजान खुरजान छटान
तेषां कोशान गृहीत्वा च दंड योग्यान कारयत..!!

स्थापिता तेन मर्यादा मलेछ-आर्यानाम पृथक पृथक !!
सिंधुस्थानाम इति दनेयं राष्ट्रम आर्यस्यचोत्तमम !!
म्लेन्च्ह स्थानं परं सिंधो कृतं तेन महात्मना ...!!
------------------------------------भविष्य पुराण---------------------

Tuesday, January 31, 2012

मग माझा जीव ..........!!

दुखाच्या वाटेवर गाव तुझे लागले 
    थबकले न पाय तरी ;हृदय मात्र थांबले ....!!

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली..
     अन माझी पायपीट डोळ्यांतून सांडली....

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल..!!
        अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल...!!

सहज कधी तू घरात लावशील सांजवात ..
           माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल .....!!
=================================================सुरेश भट.........

Monday, January 30, 2012

अग्निपथ ..!!!!

तू  न  थकेगा  कभी ...
तू  न  मुड़ेगा  कभी....
तू  न  थमेगा  कभी.....
कर  शपथ !.. कर शपथ !...अग्निपथ !!


ये  महान  दृश्य  है ..
चल  रहा  मनुष्य  है...
अश्रु , स्वेद , रक्त से ..
लथपथ .. लथपथ ...!!

....अग्निपथ !!अग्निपथ !!अग्निपथ !!

--------------------------हरिवंश राय बच्चन ..[अग्निपथ]

Tuesday, January 3, 2012

अंतिम चरण लेखमालेतील उतारा !!...from my writings ..



अंतिम चरण ::लेखमालेतील उतारा 
            from my writings
                 
              स्वप्न-भंग

तो:--- [स्वतःच्या हातातील 'ती'चे छायाचित्र खिन्नपणे वाहत्या पाण्यात सोडून देतो..चित्र सावकाश नजरेआड होते.. आणि तो किनार्याजवळ  एका पाषाणावर बसून बोलत आहे !!]

"" एक अलिखित करार तुटला...

एक बंध कायमचा तुटला.......

एक नाद कायमचा सुटला.....
एक आशावाद कायमचा फुटला...

एक घाव कायमचा बसला ...
एक व्रण कायमचा उठला ....
अशा जखमा ;असे आघात ....
अशी वळणे ;असे अपघात ....
तसे कमी येतात जगताना...हीच देवाची दया...
नाहीतर ...माणसे कधीच हसू शकली नसती...


जाऊ देत ........
तुला काय कळणार म्हणा...!!
आघात करणारे बहिरे असतात ...
अन सोसणारे नेहेमी मुके ...
माझ्या आयुष्याची होळी झाली तरी....
त्या धुराचा गंध देखील येणार नाही अशा दूरच्या सुखतृप्त
प्रदेशांत तुझा निवास आहे .......... ....


आपण अपरिचित होतो.....
आणि तसेच राहणार...परिचय असून सदैव अपरिचित राहिलेले आपण .......


असेच राहू .....दिगन्तापर्यंत.....किमान आपले आयुष्य संपेपर्यंत...


अर्थात हे सुद्धा माझे मत आहे.......


मला येईल सदोदित तुझी आठवण..
मला वाटेल अस्वस्थ हुरहूर तुझ्या नावाने...
आणि व्याकूळ होतील माझे प्राण ....
उधळून जातील माझे प्रत्येक क्षण भविष्यातले ;जेंव्हा जागी होईल तुझी स्मृती माझ्या मनांतून.........

पण हे फक्त माझे आणि माझेच मत आहे..........



तुला कल्पनाही नसेल...तुझ्या स्वर्गामध्ये ;तुझ्या अपार सुखांमध्ये ...रममाण असशील तू...!!

पण जर कधी बघशील चुकून ..तुझ्या स्वर्गातून डोकावून खाली ..!!

तर जळलेली वैराण अस्वस्थ धरणी दिसेल एका आयुष्याची....


मी तिथेच असेन...एकटा..जळणार्या दुःखांना मस्तकावर घेत धडाडून जळणारा ..शांत ..निराश्रित !!......  





........................संदर्भ :-"तो आणि ती "

या माझ्या लेखमालेतील अंतिम भागातील एक उतारा....
======================================लेखन - हर्षल!!
शोकरस हा नवरसांमध्ये अति महत्वाचा आहे..त्यावर आधारीत हे लेखन आहे...






विशेष सूचना...""..वाचून झाल्यावर आकांड-तांडव करून रडू नये!!...लेखाचा लेखकाच्या जीवनाशी संबंध लेखानापुर्ताच आहे...लेखक सुस्थितीत आहे...प्रसंग काल्पनिक आहे..कळावे..