"वेदानाम साम वेदोस्मि "….
वेदांमध्ये
मी सामवेद आहे… असे भगवंत सांगून गेलेत हे मला संशोधनाशिवाय जाणवलेले सत्य
आहे… आध्यात्मिक अनुभूतींचा भाग सोडला तर , प्रत्यक्ष व्यवहारात गायन आणि
संगीत ह्या दोन कलांचा मी एक सरळ मार्गी उपासक आहे असे म्हंटले तरी चालेल.
संगीताकडे आणि गायनाकडे मी स्वतः ज्या दृष्टीने पाहतो ती दृष्टी ,अनेक
वर्षांच्या संगीत अध्ययनाचे फळ आहे. अर्थात मी स्वतः गायक किंवा वादक नाही .
माझा आवाज तसा चांगला आहे पण मुद्दामहून शिक्षण घेतले नाही . आणि पेटी
पूर्वी बरी वाजवत असे .परन्तु सराव आणि उपासना काही घडत नसल्याने पेटी ची
"साथ" सुटून गेली. असो. संगीत समजणे आणि संगीत वाजवता येणे व निर्माण करता
येणे ह्या भिन्न असल्या तरी परस्पर संबद्ध गोष्टी आहेत . अर्थात संगीत
अंगात उतरणे मात्र अंतिम पायरी असते . मी संगीत आणि जीवन एकाच
स्वरावटीतल्या दोन ताना मानतो . एक दुसर्यास पूरक असते . शुद्ध गंधार आणि
शुद्ध मध्यम जसे मिसळतात आणि तरीही त्यांची स्वतंत्र ओढाताण चालू राहते
कानामध्ये , अगदी तसेच जगणे आणि संगीत ;परस्पर संलग्न आणि तरीही स्वभावाने
निराळे म्हणून माझ्या हृदयात स्थिर आहेत. अर्थात माझा संगीताशी जो काही
अनुबंध आहे तो केवळ देव आणि भक्त असा नसून शास्त्र आणि शास्त्रार्थी किंवा
विद्यार्थी असाही आलेला आहे. म्हणून काही सिद्धांत मी समजू शकलो आणि नाद;
स्वर आणि ताल यांच्या ठेक्यावर स्वताला अधिक उमजू शकलो .
मी संगीत शिकलो ते कुठल्याही संगीत विद्यालयाची पायरी न चढता ; आणि कोणत्याही मानवी गुरु शिवाय!!
अर्थात
हि काही अभिमानाने किंवा गर्वाने सांगण्याची गोष्ट नव्हे. परंतु सत्य
सांगितले कि बरे असते ! शिवाय कधी कधी असेही वाटते कि स्वतंत्र विचार हा
स्वतंत्र रस्ते स्वतःहून चालण्यातून जितका उत्पन्न होतो तितका सरळसोट
चाकोरीबद्ध ज्ञानातून नाही !!…… अर्थात जे लोक वर्षानुवर्षे संगीत साधना
करतात त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. ते प्रथितयश असतीलच असे नाही
;परंतु त्यांची निष्ठा आणि उपासना मी श्रेष्ठ समजतो . उत्तम गायक आणि
संगीतकार किंवा उत्तम वादक यांच्याशिवाय तसेही संगीत प्रत्यक्ष जन्मणार कसे
?…. अर्थात त्यांचेच संगीत ऐकून मी संगीत या विषयावर इतके बोलू शकतो .
फक्त एकाच गोष्टीचे सखेद आश्चर्य वाटते कि संगीत हा फक्त गाणे बजावणे किंवा
आळवणे इतकाच खेळ बहुतेकदा मानला जातो …संगीतावर लेखन घडले आहे नाही असे
नाही …. आजकाल वैद्यकीय किंवा वैज्ञानिक क्षेत्रांत देखील संगीताचे संशोधन
होत आहे ;जेणेकरून मानवी जीवनमानाची अधिक उच्च सुधारणा शक्य व्हावी …. ,
तरीही संगीत हा केवळ एक लहानसा कलाप्रकार नसून विश्वातल्या अत्यंत मूलभूत
प्रेरणेतली ती एक उच्चतम आणि केंद्रीय प्रेरणा आहे ही जाणीव मानवाला हवी
तितकी झाली आहे असे वाटत नाहि.
मी संगीत ही एक कला ;इतकेच समजत नाही तर, तो एक स्वतंत्र
प्रज्ञा स्त्रोत मानतो . सगळ्या मानवी आणि अमानवी स्पंदनांचे ते उगमस्थान
आहे. आणि म्हणूनच संगीत सर्वत्र आहे ;हा सरळ सिद्द्धांत निर्माण
होतो.अर्थात प्रस्तुत लेख संगीताचे शुद्ध शास्त्रीय स्वरूप विशद करण्याचा
नसून ;मुख्यत्वे जे ध्वनी संगीत मानवीय आहे त्या भारतीय शास्त्रीय संगीताचा
आढावा घेण्यासाठी आहे. मानवीय संगीत ही संज्ञा मी सामान्यतः आपण जे संगीत
;स्वर ; आलाप आणि इतर जे जे काही गीत व वाद्य रूपाने ऐकतो त्यास वापरली
आहे .
माझे तात्विक समीक्षण तीन निराळ्या विचारांतून घडत जाते …१.
एखाद्या वस्तूचा किंवा घटनेचा अर्थ काय? २. घटना अथवा वस्तू मागे प्रेरणा
कोणती आहे? आणि ३.घडलेल्या घटनेतून वा निर्मित वस्तूतून काळरेषा पुढे
उत्क्रमण कशी करेल ?
संगीताबद्दल
ह्या तीनही प्रश्नाची मीमांसा मी करू शकत नाही …. कारण संगीत स्वयंभू
उत्पन्न आहे ;त्याचा प्रेरणास्त्रोत प्रत्यक्ष ईश्वरच मानला जातो आणि
संगीताने पुढे काय होते हे सामुदायिक आणि वैयक्तिक पातळीवर वेगवेगळे समजावे
लागते . अर्थात संगीताची जे जनमान्य धारणा आहे त्यापलीकडे संगीताचे अधिक
खोलवर विश्लेषण करण्यासाठी जातिवंत आणि स्पष्ट अनुभव आणि प्रज्ञामती धारणा
यांचीच निर्विवाद आवश्यकता आहे हे स्पष्ट होइल. परंतु या लेखात सदरहू
कोणतेच तात्विक उहापोह होणार नाहीत हे मी अगोदरच सांगितले आहे . केवळ राग
आलाप आणि ताल युक्त संगीत जे माणसाला आवडते आणि परंपरा आणि प्रतिष्ठा यांनी
जे समस्त पृथ्वीवर अधिराज्य अनिर्बंधपणे गाजवते आहे त्या भारतीय संगीताचा
एक व्यक्तीनिष्ठ मागोवा घेतला जाणार आहे. ज्याला मी सर्वंकष अर्थात
संपूर्ण संगीत म्हणतो त्या जगड्व्याळ विश्वव्यापी संकल्पनेतून जर व्यक्त
काही भाग असेल तर तो सामान्यतः आपण ज्याला " श्रवणीय " संगीत म्हणतो तो
आहे. ही कल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण देतो . "मूलभूत
सर्वव्यापी संगीत " आणि " मानवीय श्रवणीय " किंवा " आहत संगीत " यांची
तुलना करायची तर " अथांग परब्रह्म " आणि त्याचे " सगुण अवतार " अशीच
अनुक्रमे करावी लागेल .
अर्थात
निर्गुणाची ओळख सगुणाशिवाय अशक्य ;तद्वतच ,साधे सोपे श्रवणीय संगीत
आपल्याला त्या आद्यंत सर्वव्यापी संगीताकडे घेऊन जाण्याचा एक रस्ता आहे .
जो ह्या मार्गावर अखंड चालत राहील तो अनाहत सौंदर्याचा एक्मेंव साक्षात्कार
पाहिल यात संशय नाही ;परंतु आपल्यासारखे सामान्य केवळ या श्रवणीय
संगीतातून सुद्धा जे अमृत पान करतील ;जो सुंदर मनोहारी अनुभव घेतील ;तो हि ;
लहान नव्हे. आणि अर्थात आपण सगळे तेच करीत असतो । म्हणूनच तर संगीत
आपल्याला आवडते ; गाणी आवडतात ; राग ; ताल ; स्वर ; गायन ; वादन सारे काही
आवडते . कारण आपला प्रवास सुरु झालेला असतो …श्रवणातून ते अशरीरी श्रवणातीत
सौन्दर्यमय सत्याकडे !!!……… अर्थात आपण किंवा अगदी ९९% लोक हा प्रवास
पूर्ण करू शकत नसल्याने संगीताचा मर्यादित अनुभव घेतो…… पण तो सुद्धा मानवी
समाजामध्ये फार महत्वाचा ठरतो . आणि त्या अनुभवावर सुद्धा महान गायक आणि
संगीतद्न्य आयुष्य धन्य पावतात …।
संगीत हे एका शब्दात सांगायचे तर जीवमात्राशी आणि त्याच्या आयुष्याशी कसे एकाकार आहे ते संगीताच्याच " रागजन्य " भाषेतून सांगतो .-
आरंभ किंवा जन्म हा प्रत्येकाचा वेगळा ,पण समान सुखकर, एखाद्या " अहिर भैरव " किंवा "तोडी" सारखा किंवा क्वचित जर अजून दिलखुलास म्हणजे आसावरी थाटातल्या " जोन्पुरी " सारखा ….!
आरंभ किंवा जन्म हा प्रत्येकाचा वेगळा ,पण समान सुखकर, एखाद्या " अहिर भैरव " किंवा "तोडी" सारखा किंवा क्वचित जर अजून दिलखुलास म्हणजे आसावरी थाटातल्या " जोन्पुरी " सारखा ….!
तारुण्य म्हणजे तोडी मधल्या मधुवंती सारखे किंवा " खमाजातून " जयजयवंती " ची रसिकता घेतलेले ; किंवा क्वचित "बिलावल" थाटाने " मंद" रागाने चढणारे ,किंवा " काफिने" भरलेले आणि " बागेश्री " तून झुलणारे ……….!!
मध्यम वय म्हणजे " भीमपलास " आणि " वृन्दावनी सारंगाने " अलगद उघडणारे आणि क्वचीत " चारुकेशी" चा अनवट वेष घेणारे ;
काहीचे मध्यम वय मात्र " मारवा " आणि मारू बिहाग " सारखे अपार फुलून येते आणि काहींची मध्यान्ह विनाकारण काफ़ितल्या " शिवरंजनी " त शिरते किंवा मग " कल्याणातून " उगवणार्या " यमना"चा हात धरून संथ वाहत बसते ……….!!
आरंभ जसा निराळा तसा अंत सुद्धा निराळा …. कोणी " काफितल्या " मल्हारा "सारखा अकस्मात निघतो तर कोणी अंतसमयी अबोध "अभोगी " सारखा पंच्ररंगात रंगतो …. कुणाचा भैरवीतून " मालकंस" लागतो तर कुणाचा खमाजातून " रागेश्री" जुळतो ……। कुणाचा अंत "हंसध्वनी " सारखा अश्राप तर कुणाचा " कल्याणातल्या " "चंदनी केदार " सारखा मखमली …!!।एखादाच कुणी " काफी " नाहीतर " भैरवी" सारखा सर्वकाळ एकाच नादाने जगणारा आणि चालणारा …आणि अगदी क्वचित कुणी " शुद्ध कल्याण " जैसा एकाच लयीत जगणारा आणि मरणारा …!!
आमच्यासारखे मानव मात्र जगताना " विभासातून " " यमनाकडे " आणि नंतर " खमाजातून " हमिराकडे " जातात …. मध्येच कधी " मल्हारासारखे" उसळतात आणि " अभोगी"च्या गुंगीसारखे " हंसध्वनी"त शिरून " तिलक कामोदासारखे" अलगद निजून जातात ………। कायमचे ….!!
-----------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------- हर्षल ----- २०/०९/२००९
----------------------------------------------------------------- ( मी आणि संगीत -भाग १)
No comments:
Post a Comment