Friday, October 25, 2013

**** आभाळ भरून आलय..!!***********

"आकाश दाटून आलय ,लगेच निघायला हवय " विक्रम सांगत होता .

" निघुयात ,काय घाई आहे ?"… मी

" तसे नाही ,पण छत्री नाही शिवाय असती तरी तिचा उपयोग नाहीये ,इतका भयंकर पाउस कोसळणारे असे दिसतंय "--- विक्रम

" कोसळू देत "… मी

" वैजू  मला ओरडेल ,कि तुला भिजून दिले आणि वर इतक्या लांब फिरायला नेलं म्हणून… "-- विक्रम

" अरे बंधू ; तिला काय होतंय सांगायला !!…. बहिणी अशाच असतात ;नवर्यापेक्षा भावाची काळजी जास्त ! तू तिचा प्रियकर आणि होणारा नवरा …. तेंव्हा तुझ्यापेक्षा जास्त काळजी ती माझी करणारच …. असो पण फार चांगली आहे रे … काळजी घे तिची जन्मभर "…!!----- मी

" दादा ,तुला खरच वाटत माझी निवड योग्य होती ?… म्हणजे तु म्हणालास म्हणून मी तिला विचारल , आणि ती सुद्धा हो म्हंटली "…

" अरे विक्रम , जगात फार कमी लोक असतात ज्यांची मने इतकी शुद्ध आणि स्वछ असतात ….एखाद्या झर्यासारखी ! वैजयंती अशीच आहे , निर्मल आणि पवित्र…. !! ती अनाथ होती हा तिचा दोष नाहीये …. शिवाय तुला ती आणि तिला तू आवडलेला असल्याने हरकत काय होती ? म्हणून मी म्हणालो तुला , जमवून टाक …!! ती खरोखर देवी आहे मित्रा !!…. स्त्री म्हणजेच देवी हे लक्षात असू देत …. !! " ---- मी

" खरय दादा … पण लग्नाला तु येणार नाही म्हणतोस  …. तुझी  जागा वेगळी आहे आमच्या दोघांसाठी …. आमच्या मनात ….तु आला नाहीस  तर उगाच हुरहूर लागेल …। वैजू तर परवा इतकी हळवी झाली होती ,कि सांगता येत नाहि…!!---- विक्रम

" आपले बोलणे झालेय यावर …। जुने पाश जुन्या आठवणी जागवतात …… मी तुम्हाला दोघांना सोडून कुणालाच भेटत नाही याचे कारण तेच आहे…. शिवाय जास्त भेट ठेवली कि जुने व्रण ओलेच राहतात …. आणि मला ते भरायचेत !!"

" कल्पना आहे दादा , पण तरी लग्नाला तर ये … "

" नाही विक्रम , मी बदललोय ,पार बदललोय पण माझा निश्चय आणि आत्मभान तसेच आहेत पूर्वीसारखे ! मी नाही येऊ शकत !! आणि तुम्ही माझ्या नेहेमीच स्मरणात असाल ,ह्या औपचारिकतेची गरज काय आहे ?… माझा उत्कर्ष आणि अपकर्ष तुमच्या समोर झालाय ,तुम्ही साक्षीदार आहात …इतकाच नाही तर जे तुम्ही माझ्यासाठी केलय त्याचे ऋण मी तरी फेडू शकत नाही …. हे सगळे स्पष्ट आहे सुर्यप्रकाशाइतके!!"

 

" दादा ,  मला माहित आहे सगळे !! पण आता जे झाले ते झाले …. असाच विचार करून नवीन जीवन जगतोयस तू ते ठाऊक आहे …. पण म्हणून आमची साथ का नकोय?… आम्ही तुला जुन्या गोष्टी का आठवून देतो ? तू स्वतंत्र जग …. पण तुझे दुख असे बघवत नाही …. शारीरिक आणि मानसिक दोन्ही !! म्हणून निदान संपर्कात  तरी रहा …!! तेवढेच समाधान ….!!मला आणि तिला !!! "

 " विक्रम,  समाधान हे आपले आणि आपल्या मनावर असते …. या विषयावर चर्चा नकोय . माझी  इतकीच इच्छा आहे कि तुम्ही एकमेकांना सांभाळून रहा …. प्रेम कधी मोडू नये …कुठल्याही परिस्थितीत !!"

" मग दादा , तू का सोडलस   "जयू दीदीला"  ?… तिचे भले करण्यासाठी…?? !! तिचे प्रेम नव्हते ? तुझे प्रेम नव्हते ?… राहिली असती कुठल्याही अवस्थेत तुझ्याबरोबर !! …. का उगाच एकमेकांना सोडलत?… तू जसा आधी होतास तसा राहिला नाहीस म्हणून तिने कधी तुला तक्रार केली होती ?
सैन्यात असे प्रकार होतात …. जीव संकटात असतोच  …. तुझ्या बाबतीत जास्तच हानी झाली हे खरय ….तुझा जुना आणि नवा फोटो एकत्र बघितला तर ओळखू येणार नाही इतका बदल झालाय …। तू जवळ जवळ मृत्यू मुखातून तून पुन्हा जिवंत झालास …हाल सोसलेस …. सगळे ठाऊक आहे रे …. पण तिला का सोडलस? आमच्यापेक्षा आज ती तुझा आधार झाली असती …. तिचे अश्रू  आणि असहाय चेहरा आज सुद्धा आठवत नाही तुला ?।!! खर सांग …!!… आज सुद्धा " आठवण " येत नाही तिची ?…क़ा लग्न करायला भाग पाडलस तिला दुसर्याबरोबर ?… का तिच्या मनाचा विचार नाही केलास ?… का समजलास असे कि ती तुझ्याबरोबर सुखी राहू शकणार नाही ??… नक्की त्याग कोणी केला? तू का जयुताइने ?
कि दोघांनी ?……… का वेगळे झालात ?…। बोल दादा …. बोल !! … तू म्हणतोस तितका सख्त नाहीयेस तू …. खर सांग तिची आठवण येत नाही तुला ??? व्याकुळ होत नाहीस तिच्यासाठी ??…. तुझे एकमेव प्रेम होती ती आणि तिचे सगळे काही तू होतास ….!! बोल आता …. असा शांतपणे बघू नकोस माझ्याकडे …सांग दादा !! उत्तर दे प्रश्नाला !! ""

 " …………………………. सगळीकडेच विक्रम , भयंकर दाटून आलय  आज ….सगळ्या दिशा कोंडून गेल्यायत नुसत्या …संसाराचे रंगच काळपट झालेत सगळ्या मित्रा , …. आभाळ खच्चुन भरलय रे  !!…जमिनीच्या विरहाने आणि सूर्यतापाने झालेला संताप छातीत कोंडून फुटेल इतके फुलून आलेय … !!…. आता एखादाच "विजेचा"  प्रश्न बाकी आहे …. मग असा पाउस कोसळेल कि सगळे सगळे वाहून जाइल बाबा …उगाच भरून आलेल्या आभाळावर विजांचे प्रश्न नको  रे ? !! आभाळाकडे असल्या लखलखीत विजांना  द्यायला उत्तरे नसतात !!…आणि मग ते आभाळ सबंध फुटून जाते …. पाणलोट येतात  आणि आलेल्या पुरात सगळी जमीन वाहून जाते ….काहीच उरत नाही …. आभाळ ,जमीन आणि वीज !!…, निघायला हवे विक्रम !!… आभाळ भरून आलय …!! ""


------------------------------------- ================== लेखन : हर्षल  { २००८ मध्ये लिहिलेला एक संवाद लेख  . तारीख आठवत नाही ।!!
======================================== (सुमारे २००८ ऑगस्ट)

No comments:

Post a Comment