Sunday, December 28, 2014

व्याकूळ तमांच्या छाया.......!!


व्याकूळ तमांच्या छाया  
पाहता जीव पाझरतो … 
अंधार नभांतून अवघा 
काळजावरी ओघळतो …!!

हे दु:ख चिरंतन माझे 
श्वासांत निरंतर वाहे ,
प्रत्येक  सुखाच्या अंती,
त्याचाच गहिवर आहे … !!

आधार उभ्या मेघांचे 
आकाश घेउनि जगते …. 
सूर्याला  ठाउक नाही,
 ते चन्द्र नभाचे नाते …. !!

अस्पर्श सुखांचे भवती 
एकटेच फुलते रान …. 
पाहता सुखांचे वणवे ,
रात्र  होई बेभान … !!

आसक्त कोवळ्या वेली 
वृक्षांच्या वक्षावरती …। 
 नाचती वायुवेगाने ,
त्या तिथेच सुकुनी सरती…!!

एकांतांचे भय गीत 
कानांतून जहर उतरते…। 
हा शाप निराश्रित उरतो ,
अश्रुंचे काहूर उठते …। 

सागरात उतरे तुटुनी 
तो दूर अकस्मिक तारा …. 
अस्मानी उरती वरती,
मग प्रवास रेषा धारा !!… 


मी जगतो खेळ जगाचा 
पाहतो व्यथांच्या गाथा … 
उलगडून हातांवरती ,
सुख विहीन  उरला माथा ।!!

------------------------------------लेखन ----- हर्षल ----------------------------------------
 






Sunday, October 26, 2014

gazal 1

ये रोशनियाँ दिवाली की। .
ये रंग भरे रंगोली के।
बस दिल की कलियाँ
बंद यहां ;इन्हे देखकर भी न खुले।

खामोश हैं मन.… खामोश नजर.... .
खामोश हैं सपनोंके मंजर
बस बात कोई हैं सीने में।
क्या गम है छुपा हमको न ख़बर।

हम खुश थे पहले जीने में।
फिर आज ये  क्यों अफ़सोस यहाँ ?
शायद पहले जो सुकूँ  मिला। .
अब ये उसके हर्जाने हैं।

दिल खाली हैं;सुनसान पड़ा।
क्यों हैं ऐसी मँझधार कड़ी !
शायद दिल अब ये जान गया।
के नहीं जिंदगी  ;प्यार भरी।

__________€€ hd €€___________




Wednesday, October 22, 2014

katarwel.......


अजुनी मनांत जळती त्या एकट्या मशाली ।
ते ताप अजून त्यांचे अन राख साचलेली …
ओसंडत्या धुक्याचे उरले उदास शेष ….
अश्रुंमधून ढळती ते हरवले निमेष …।

काही उरात उरते निर्भान वेदनांचे ….
अजुनी खुशाल घुमते भयगान यातनांचे …
एकेक पाकळीला वेचून वादळाने …
नेले उजाड झाली संताप दग्ध राने . !

हरवून  वाट गेली ओल्या सुखी नद्यांची
उरली तीरांवरुनी रेती जुन्या जलांची ….
आरक्त अभ्र वरती झुलते उगाच वेडे …
त्याच्या दहा दिशांना अंधार घाली वेढे …!!

______€€€€€€€____________ हर्षल

Monday, September 8, 2014

!!! ..अजूनही...!!!



वाहतात अजून वात चंद्र नभी जागता
अजून धुंद होय धरा पौर्णिमेस पाहता ।
वासंतिक गान अजून आम्रवनी गुंजते
अजुन हि नभामधून इंद्रधनू रंगते

आजही फुलाफुलांत तोच जुना गोडवा
आजही सुरासुरांत तोच जुना ताजवा
अजूनही धरेवरी सृजन नित्य जन्मते
अजुनही मनामनांत प्रेम शांत तेवते ….

ईश्वरास अजूनही मान तोच लाभतो
मानवार्थ  आजही देव जन्म धारतो
जोवरी जगामध्ये सत्यमेव विजयते
तोवरी असेच सुख नित्य येथ नांदते !!

====================  लेखन हर्षल ===================

Wednesday, July 30, 2014

चालतो तरीही अजुनी !!!!!

चालतो तरीही अजुनी
जरी विझले दीप सुखांचे
आकांक्षांच्या भवताली
दाटले डोह दु:खांचे !!

गर्दीत तमाच्या बुडला
तार्यांचा थोर प्रकाश
एकाकी अजुनी रडते 
अवघडलेले आकाश !!

प्राक्तनात प्राजक्ताच्या
ढळण्याची अवचित वेळ
उन्माद लेवूनी खुलतो
नियतीचा अनवट खेळ !!

संजीवक जलदांवरती
आसूड विजांचे जळते 
सद्धर्म भोगतो दंड
अनृत सुखाने फुलते !!

या विराट विश्वामधूनी
तरी एक असे आधार
परमेश्वर शाश्वत  आहे
सानंद शुद्ध अविकार !!
---------------------------------------------------- हर्षल--

Sunday, March 30, 2014

आठवणी

************* आठवणी **********************************************

आठवणी अशाच असतात ………… 

एका बस मध्ये बसून एक दुसरीतला मुलगा सकाळचा सहा वाजताचा  अस्पष्ट चंद्र पाहत जातो …। तोच मुलगा आठवतो आपल्या आईला आणि वडिलांना शाळेत गेल्यावर …।आणि शाळेत दिसतात त्याला अनेक मुले त्याच्यासारखीच …। दिसतात "बाई" ज्या सांभाळतात आणि शिकवतात …ओरडतात सुद्धा ……क़धि कधी !!
अशीच आठवते त्याला शाळा …. ते पावसाळी दिवस ।एक अस्वस्थता ….वह्या ,नवीन पुस्तके सांभाळत ओलेचिंब होत वर्गात जाणे ……. आणि अभ्यास …खेळ … सगळे आठवते ।!!
पाचवीनंतर दहावीपर्यंत …. क्रमाक्रमाने फरक पडत जातो …मनात आणि शरीरात देखील !!…. बुद्धी आणि विचार मुक्त होऊ लागतात … नात्यांचे नवीन अर्थ समजू लागतात ……. नवीन झपाटलेपण …. आणि नवीन अस्वस्थता ……… !!… 
हाच मुलगा … वाचत जातो …. पहात जातो ……… आयुष्य एका नवीन विचारांनी उधाणलेले असते …. काही जाणीवेत तर काही नेणीवेत ……!!
मित्र मैत्रिणी … शाळा ,अभ्यास , क्लास………. खेळ …. सांस्कृतिक कार्यक्रम …… अनेक नवीन पुस्तके आणि धर्म …आसपास चा समाज … तिथली दु:खे … ताण तणाव …. भय … लज्जा … प्रेम … आनंद ……!! ह्या सगळ्या आठवणी …. जुन्या परंतु अबाधित !!!

पुढे महाविद्यालये पार पडतात …. शिक्षण संपते … आणि नवीन उच्च शिक्षणाचा ध्यास …. सुरूच राहतो !!… या काळात सुद्धा आठवणी आहेतच … पण त्या फारशा बोलक्या नाहीत …. कारण तोवर मनावर बरेच संस्कार होऊन गेलेले असतात …अहेतुकपणे वा सहेतुकपणे !!…. मनाला अर्धवट आकार आलेला असतो … पूर्वीसारखे टीपकागदासारखे मन राहिलेले नसते …. म्हणून बरेच संकेत स्मृतीरूपात नोंदले जातात नाहीत…. कदाचित मनच त्यांना आतपर्यंत पोहोचू देत नसावे …। आणि काही क्षण उगीच आठवणींत शिरतात …. असेच सहज त्यांचे फार मुल्य असते असेही नाही !!…………. 

असा काळाचा प्रवाह …. सदैव सुरूच राहतो ……… आठवणी वाढवत ………!! नवीन स्मृती देत …। नवीन आश्वासने देत ……… !!
अथांग आयुष्याचा प्रवाह असाच चालतो ………। चालत राहील …………. त्या मुलासाठी जसा तसाच सगळ्यांसाठी !!

शेवटी आठवणी अनेक असतात … सगळ्या रंगांच्या …त्यातून पुनरावलोकनासाठी कुठल्या निवडायच्या हे आपल्याच हातात असते …!!
समुद्राच्या तळाशी मोती सुद्धा असतात आणि खचलेल्या जहाजांचे अवशेष देखिल ……!!…………. मोती आनंदाने उचलायचे …आणि जुन्या यातनांचे अवशेष ,त्यांना फक्त एक मानवंदना देऊन , तसेच मागे ठेवायचे  ,हे आपले कौशल्य असते …!!

--------------------------------------------------------------------------------------------------- हर्षल -----------------------------------------------------