व्याकूळ तमांच्या छाया
पाहता जीव पाझरतो …
अंधार नभांतून अवघा
काळजावरी ओघळतो …!!
हे दु:ख चिरंतन माझे
श्वासांत निरंतर वाहे ,
प्रत्येक सुखाच्या अंती,
त्याचाच गहिवर आहे … !!
आधार उभ्या मेघांचे
आकाश घेउनि जगते ….
सूर्याला ठाउक नाही,
ते चन्द्र नभाचे नाते …. !!
अस्पर्श सुखांचे भवती
एकटेच फुलते रान ….
पाहता सुखांचे वणवे ,
रात्र होई बेभान … !!
आसक्त कोवळ्या वेली
वृक्षांच्या वक्षावरती …।
नाचती वायुवेगाने ,
त्या तिथेच सुकुनी सरती…!!
एकांतांचे भय गीत
कानांतून जहर उतरते…।
हा शाप निराश्रित उरतो ,
अश्रुंचे काहूर उठते …।
सागरात उतरे तुटुनी
तो दूर अकस्मिक तारा ….
अस्मानी उरती वरती,
मग प्रवास रेषा धारा !!…
मी जगतो खेळ जगाचा
पाहतो व्यथांच्या गाथा …
उलगडून हातांवरती ,
सुख विहीन उरला माथा ।!!
------------------------------------लेखन ----- हर्षल ----------------------------------------
No comments:
Post a Comment