Saturday, December 19, 2015

शब्द गीतातील माझ्या
नित्य येथे नांदतील  !!
शब्द ते माझेच तुजला 
सत्य माझे सांगतील  !!

दु:ख माझे ; सुख माझे 
वाहिले एकांत जे ,मी !
अंतरातील भाव अवघे    ;
शब्द माझे मांडतील !!

पंथ जे, मी चाललो ;
आयुष्य मी जे, पाहिले ,
 जन्म हा जगलो जसा मी ,
स्वप्न मी जे, पाहिले ….
तेच सारे शब्द झाले
गीत होऊन राहिले !!




Thursday, November 26, 2015

मुक्तचिंतन...!!

******* !मुक्तचिंतन …. "ईश्वर" !*******

अस्तित्वाच्या खोल गर्भात 
अनंत प्रश्नांच्या आत …
एक शांत उत्तर असावे 
परमेश्वर नावाचे !!

देहाच्या ज्वलंत विकारांतून ,
आणि अनिवार वाहत्या काळातून ,
सर्वत्र धडाडून उसळते अंध आवेश 
निराकार …. अनिर्व्याख्य !!
ह्यांचे आकार मोडून पडले कि 
मात्र  उरतात चिरंतन ज्योती !
हाच प्रकाश सनातन !!ईश्वरी !!

मोहांतून , भ्रमांतून , असहायतेतून ,
निर्माण झालेले वैश्विक महा मार्ग !
परस्परांमध्ये गुम्फलेले …. वर्तुळाकार !!
यांतून बाहेर अखंड उचलून नेणारे 
महान मोक्षदायक महात्मे !!
ईश्वरा तुझ्यापर्यंत नेणारे …. 
तुझेच अंश …!!
या जालीम कोलाहलात 
ईतके तरी आम्हाला दे !!
सन्मार्ग तरी चालायची बुद्धी दे !!

___________ हर्षल 

Saturday, November 14, 2015

किनारे असे  रंगती सांजकाली
 समुद्रातुनी वाहते सुर्य-लाली!
किती शुभ्र लाटा !उसळतात येथे !
शहारे सुखांचे उमलतात येथे !!

Sunday, November 8, 2015

या तुझ्या नेत्रांत सारा
प्राण माझा राहतो  !
मी तुझ्या नजरेतूनी ,
आता स्वत:ला पाहतो !!

वाच तू डोळ्यांत माझ्या
गीत माझ्या अंतरीचे !
आणि घे समजून जे
आहे मला सांगायचे !!

स्वप्न जे डोळ्यांत माझ्या
ते तुला समजेल का ?
ध्यास जे माझे ,तयांची
आस तुज लागेल का ?


--------'----'-हर्षल




Saturday, November 7, 2015

Ashich kavita !!

मी तमासम मग्न होता
चंद्र तू होऊन ये !
दु:ख माझे मुक्त करण्या
हास्य तू घेऊन ये !

प्राक्तनाच्या तप्त रानी
अडकता मी एकटा !
रोखण्या अश्रूंस माझ्या
साथ तू होऊन ये !!

सोडूनी जाता जगाने
मार्ग एकाकीच उरती !!
त्या पथांवर संग देण्या
प्रीत तू होऊन ये !!

Thursday, October 29, 2015

वेळूंचे अवखळ सूर ,गंध वायूंचे 
मोकळे निळे आकाश ; संग संध्येचे !
अदृश्य किनारे भवती 
सरितांचे चमचम करती !
क्षितिजांच्या माथ्यांवरती 
तार्यांची धूसर वस्ती  !!
मी उभा एकटा येथे 
एकांत दाटला भवती !
प्रेमाचे उंच मनोरे 
काळजातूनी डोकावती !!

Friday, October 23, 2015


भविष्य कोण जाणते
कुणास काय माहिती ?
उद्या असेन काय मी
सखे तुझ्याच संगती ?

कसाही वा कुठेही वा
जिथे असेन मी तिथे !
तुझेच गीत मुग्ध हे
उरांतुनी स्फुरेल ते !!





Sunday, October 18, 2015

उद्योग क्रांति !!

असंख्य मानवांचे मग्न विचार 
एखाद्या सुर्यज्वाले समान 
एकत्र झाले …. !
आणि महामंथनाची 
रांग लागली !! समाज समुद्रात !!
आणि जन्माला आली अवजड 
दीर्घ काटेकोर यंत्र क्रांती !!

लोहांचे रस तप्त भट्ट्या ओतू लागल्या !
आणि पोलादाचे टणत्कार घुमू लागले !
अजस्त्र पर्वतान्सारख्या बुलंद इमारती ;
घनघोर घुमणारी यंत्र पाती !!
आग ओकणारी धातुकार्ये …. 
धडाडू लागली …।!!
नवा मंत्र …नवे कार्य … 
नव्या प्रेरणा …नवे जोम !!

यंत्र यंत्र ।तन्त्र तंत्र …. 
असा कोलाहल आधी नव्हता !
अशी ओढ आधी नव्हती !!

नवा माणूस कारखान्यांत झिजत होता !!
रुंद लांब ओळींमध्ये चालत होता । 
प्रचंड यंत्र - यागात शिजत होता !!

माणसाने कात टाकली …। 
शरीर ,मन ,समाज 
सार्यांसह नवा अवतार …। 
तोफा …बन्दुकि …रणगाडे 
रस्ते …. घरे …. वस्तू … साधने !!
सगळेच आधुनिक … तेज तर्रार … घडत गेले !!


ही क्रांती !! 
जुने पाडत … नवे जोडत । 
माणसे मोडत … मने तोडत …
 सगळे खात … सारेच पचवत …. बेभान दौडत …
चालत राहील !!

माणसांचे काय …??. हा एक प्रश्नच आहे !!
अवाढव्य … !!

__________ लेखन -- हर्षल !! 

विसरुन जा !!

स्वर्ग तो वचनांतला विसरून जा !
ते शब्द आणिक प्रीत ती विसरून जा !!

मी तुझ्यास्तव आणलेल्या त्या कळ्या ,
आणि सुमने ती गुलाबी लाघवी !!
माळली केसांत जी वेणी तुझ्या ,
गंध सार्यांचाच त्या विसरून जा !!

हास्य तव खुलता; स्मिताची रेष ;जी ,
माझिया गाली खुले ; विसरून जा !
सोबतीने चाललो ज्या शांत वाटा ;
ती स्मृतींतील कानने विसरून जा !!

गीत  जे प्रेमार्त संध्येतून येई
आणि तार्यांचे उदय पूर्वेकडे ;
चंद्र तो; ते चांदणे ;हुरहूर ती ;
आकाश ते घनभारले ; विसरून जा !!

संचीतांचे चालती हे खेळ जे
प्राक्तनाचे भोग येती त्यातुनी !
वेगळाले मार्ग अपुले जाहले !
सत्य हे जाणून ; मज विसरून जा !!

--____--__-______ लेखन - हर्षल
( जुन्या कवितांच्या धर्तीवर लिहिलेले गीत )



Thursday, October 8, 2015

Maarg !!!

वेगळे आभास माझे
विश्व स्वप्नांपार  माझे!
सूर्य माझा वेगळा अन 
वेगळे अंधार माझे !!

 सांजकालीन पर्व उतरे 
दु:ख रात्रींतून धावे  !
शब्द होती कंठ तेंव्हा ;
प्राण कंठातून वाहे  !

मावळे त्या दूर रानी 
सुर्य एकाकी दिशेनी !
कोवळ्या मेघांत तेंव्हा 
अडकुनी नि:श्वास जाती !!

ती निळाई सागरांची ……
भोवती सजले किनारे !
वाहती लाटा निराळ्या
वेगळे त्यांचे इशारे !!

मी सुखांचे सोडले
आभाळ सारे !
वाहिले हे वेदनांचे
जाळ सारे !!

वादळांचे गुज ;
माझे गीत झाले !!
दुख जे हृदयात ;
ते संगीत झाले !
-------------@@____हर्षल



Sunday, October 4, 2015

Love letter of an Engineer !!!!!

Love letter OF AN ENGINEER !!

To
 The girl ,
(whom i consider dearmost ).

Subject :  A honest and an objective  oriented proposal of love  due to regular heartache that is being felt by me !

Dear ,
i am a civil engineer (mtech) specialized in structures ! I am writing this letter  due to an urgency. I observed you for the first time when i was on site working on posttensioned prestressed  deck slabs.
You were standing on the road nearly 12 m away from me along x direction from my station point  at an approximate angle of 25 degrees to vertical from my position ( i was wrking at a height of nearly 32 feet  from ground and you were on road )....i saw your hairs waving exactly like the molecules move in brownian motion..and your smile was like the perfect sagging moment of a simply supported beam under u.d.l....you have very parabolic facial curves and your eyes are like asymptotes curves !when i came down on road and helped you to get autorikshaw you thanked me and thumbed me up like the flemings left hand rule !you are approximately 1.4 m in height and your body is highly proportioned !your smile removes all types of stresses and deformations from my face ! I have come to know that you are yet unmarried !and so am i ! can we form a good covalent bond like carbon ? be assured that you wont have any burden after marriage more than your yield stress ! i always prefer limit state method everywhere ! Working stress will be very less on you as financially i am stable and can arrange servants for various domestic works !

since last 2 months i am unable to sleep at night due to constant peojection of your images in my dreams !these virtual images are acting like viscous dampers ;obstructing my natural vibrations of life !I am requesting you to consider my problematic position.
i assure you that i will support you like a built up I section column supports main beam !and this connection will be rigid !i will not allow our relation to stretch beyond any permissible deflection .i shall share and nullify all your troubles like the moment resisting frame !and apart from this in case any unusual load of problems comes to you ..i will convert my self from regular beam to a  beam-column condition ..to take any axial unwanted load ! My boiling point of anger is very high and generally i am as harmless and calm as water !
I think i can make you stable the way a stone column stabilises and improves weak sandy ground !my voice will never raise above 50 decible and so there will be no noice pollution inside our new life !

Please consider my request and weld my lonely life by your smiles and trust !
Reply me soon before the shear envelope of your memories create a plastic deformation in my brain !dear .remember !.there is no recovery to plastic deformation...!currently i am in elastic range ...but if you waste time the phase of elastoplastic strain may start !
Bcause load of your memories and beauty is constat and as time progress it may have effects alike  geometric non linearity which may result into eccentric behaviour !!

Thanking you
Yours by all means ,
Abc ( engineer)

आम्ही ...the Great !!

आमची मात्र कमाल आहे !!
सगळीच इथे धमाल आहे !!
मनावरचा संयम आमचा
खरच बेमिसाल आहे !!

जेंव्हा आम्ही आठवीत गेलो
तिथेच घोळ सुरु झाला !
स्टाईल लोक का मारतात
याचा सुरु अभ्यास झाला !!

पावसात नुसतेच उभे राहून
खेळण्याचा सरला काळ !
भर पावसात दिसू लागली
अजब वेगळीच संध्याकाळ !!

पुढे पुढे शाळा सुटली
कॉलेज मधले शिरले वारे !!
अंगावरती रोज नवीन
स्वप्नामधले गोड शहारे !

नजर झाली तिरकी थोडी
आणि मान शिकली वळणे !
दिसता कोणी गोंडस गोरी
आठवत असे  सॉलिड गाणे  !!

सायकल आवडेनाशी झाली
मोटर- बाइक वाटे भारी !
वाटे घालून जीन्स ;गॉगल 
मारु स्टाइल ; दिसता पोरी !!

गोड गुलाबी थंडीमध्ये
अभ्यास काही होत  नाही !!
हात नाजूक असता हाती
थंडी मुळीच वाजत नाही !!
असले नवे शोध सगळे
कॉलेजातच लागले !!
तरी सुद्धा आमचे हात
एकटेच सदा राहिले !!

"ति"ला बघून जरी झाले
रोज मनाचे हाल हाल !
किती जरी आवडत असले
नाजूक डोळे ;गोरे गाल !
आम्ही आपले  निमुटपणे
अभ्यास करत गेलो !!
पास झालो ;कॉलेज सोडून
दूर निघून गेलो !!

आमचे संयम इतरांसाठी
गोल्डन चान्स ठरले !!
सगळ्या सुंदर पोरींचे
बॉयफ्रेंड बुक झाले !!

एक मात्र नक्की खरे
आशिक होणे  जमले नाही !
तरीसुद्धा आमचे घोडे
कुठेदेखील अडले नाही !!

म्हणून म्हणतो कमाल आहे !!
सगळच बेमिसाल आहे !!
आयटम नसली कोणी तरी
लाईफ फुल टू धमाल आहे !!

---''''''""------लेखन - हर्षल ( २००६ कॉलेज अंक)


Saturday, October 3, 2015

माळरानी मोकळ्या त्या ;
वाकले आभाळ होते !
एकट्या वृक्षास उरल्या 
आज घेरून जाळ होते !!

पान फांदी खोड सारे 
जळत सारे शांत होते !
मूक होते सर्व वारे 
गवतंही आक्रांत होते !!

थोरल्या छायेत ज्याच्या 
जीव सारे शांत होती !
पाखरे संसार त्यांचा 
मांडुनी निर्धास्त होती !!


 

Friday, October 2, 2015

तु अशी इथे !!!

हे दुख उरात कशाचे 
एकटेच सजुनी बसते ?
त्या दूर भविष्यालाही 
अवघडसे कोडे पडते !

तू समोर येता माझ्या 
अश्रुंच्या  उठल्या लाटा !
 पसरल्या उजळूनी  येथे 
त्या काजळलेल्या  वाटा !!

डोळ्यांची धूसर वळणे 
दु:खांची ओंजळ भरते 
एकेक पापणीलाही 
विरहाचे स्वप्न उमगते !

हे स्पर्श सनातन उरले 
अंतरात एकांताने !
कोवळी जळूनी गेली 
प्रेमाची हळवी राने !!

अंधार सोबती झाला 
चंद्राचे रंग उलटले !
दिवसांच्या देहांमधुनी ,
रात्रींचे देह मिसळले !
''''''''

 



Sunday, September 27, 2015

निळ्या सांजवेळी !!---!!!!

इथे गाजती नाद ओल्या सुरांचे
इथे सांजवेळी पहारे सुखांचे !
इथे या तळ्यांच्या विहारामधुनी
सखे ,वाहती रंग या चांदण्यांचे !!

किनारे असे रंगती सांजकाली
मिसळतात डोहांमध्ये वृक्षवेली !
इथे सावल्यांचे उमलले पिसारे  !
मनाला मनाचेच कळती इशारे !!

उठे पाय माझा निळ्या वाळवंटी
तुझी वाहते आस माझ्या उरी !
तुटे वेध आता दिशांचा दहाही
बरसतील आता प्रीतीच्या सरी !!

नभांतून चंद्रार्क मिसळून गेले
असा मग्न अवकाश उतरे इथे !
जलांच्या वरी डोलती मंद वारे !
तुझी साद येता तीरांच्या इथे !

उभी तू किनारी; तुझे हास्य दिसता ,
वितळले तळ्यातून आयुष्य हे !
निळ्या सांजवेळी निळाई मधुनी
उतरले निळे प्रीत संगीत हे !!

-_--__-__ लेखन - हर्षल !!



Saturday, September 26, 2015

तुझ्यासाठी !!

स्वप्नांचे पंख लावून 
तुझे मन फिरत राहते !
मला समजते ते !
त्याला हवे असतात सुंदर प्रदेश 
तुझ्यासारखेच गोड आणि साधे सरळ !!

एखाद्या एकट्या सुंदरशा 
परीसारखी !!
तू एकटीच चालत राहतेस 
कोणीच सोबतीला नसल्यासारखी !!

तुझ्या गोड हसण्यामध्ये ,
मी विसरून  जातो माझे त्रास !!
पण तुझे दु:ख मात्र तू लपवून ठेवतेस खास!!

तुला पहिले म्हणून समजले 
कि देव खूप छान माणसे अजूनही बनवतो !!
तुला पहिले म्हणून समजले कि 
आयुष्य फार सुंदर आहे ! 
अगदी तुझ्यासारखेच … सुंदर !

तुला पहिले कि मला दिसतो 
सुंदर मोकळा  प्रकाश !!
तुझ्या अबोल डोळ्यांमधले 
प्रश्नांचे आकाश !!

माझ्या  वाटेवर अचानक  भेटलीस 
म्हणून  जगण्याला नवा स्पर्श झाला !!
तुझ्यामुळे आयुष्याला चांदण्याचा 
साज आला !!

आयुष्याच्या वाटेवरती जेंव्हा कधी 
उदास होशील !
खरच सांगतो तुझ्यासाठी 
डोळे माझे भरून  येतील !

एकटीच बसून उदास कधी 
शोधत असशील आधार जेंव्हा !!
तुला साथ  देण्यासाठी हात माझा
असेल तेंव्हा !!

--__--__लेखन - हर्षल !!



वेध....!!!!

असा वेध लागे तुझा कि ,मनांचे
किनारे,सखे ,या मनाला न मिळती !!
तुझे भास ,आकाश होऊन सजले  ;
सखे ,रंग सारे  तयातून झरती !!

अशी आस ओसंडूनी वाढते कि ,
उरातून लाटा उसळती किती !
तुझा मोह माझ्या समग्रास ग्रासे
दहाही दिशांना तुझी संगती  !!

कुठे दूरचे मेघ बरसून सरता,
विजांचे किती लोळ कल्लोळ  ते !
तसे अंतरी घोर विरहार्त माझ्या
तुझ्यावीण जगण्यात उरतात ते !!

स्मृतींच्या तीरी ,ते तुझे स्मित वाहे
तुझे गंध अद्याप रुळती इथे !!
जिथे आपुले वेगळे मार्ग झाले
उभा संगमी आजही मी तिथे !!

---___---___--- लेखन : हर्षल




Monday, September 21, 2015

तुझ्यासाठी !!

वळणांवर अवघड इथल्या 
हातात हात देतेस !
वठलेल्या वृक्षासाठी 
का मेघ उगा होतेस ?

हासून पाहसी जेंव्हा 
हि खंत खोल ओघळते !
जगण्याच्या विजनामधुनी 
कोमल ते  संगीत  झरते !!

एकांत मोडती माझे 
जगण्याचे आस बदलती !
दुखाच्या अवसेमधुनी 
चंद्राचे वेध उमलती !!

ह्या स्निग्ध तुझ्या  हळुवार 
नजरेतून स्वप्ने झरती  !!
सन्यस्त मनातून माझ्या 
आशेला येते भरती  !

तू नकोस भरुनी जाऊ 
स्नेहाच्या सुंदर सरिता !!
सोडून तुला जाताना 
कोसळून जाईन पुरता !!

-----------------लेखन -- हर्षल -----




Sunday, September 20, 2015

पंथ !!!

पंथ माझे मोकळे; मी 
एकट्याने चालतो !
भिंत नाही ;बांध नाही 
त्या प्रवाही वाहतो !!

तापलेले रूक्ष रस्ते 
थंड वा बर्फांपरी !
पावले माझी उमटती 
शांततेने त्यांवरी !!

शोक माझा लोटला 
आभाळ तो माझे असे !
त्यागला गतकाळ येता 
लावण्या मजला पिसे !!

मानवांतील थोर जे ;
त्यांचीच वळणे चालतो !
काळजावर स्वार होती ;
तीच नाती मानतो !!

धर्म जो परमेश्वराचा ;
अंतरातून सोबती !!
ईश्वरासम अन्य कोणी 
नाही मजला सारथी !!

---____----___लेखन _-हर्षल !!


Saturday, September 19, 2015

प्रात:काल !!!

ती पूर्वेची वनराई
हलकेच रंगूनी गेली !
आकाशसमुद्रामधुनी ही
 लाट उषेची आली !!

रंगांतून फुटले रंग ;
होता काळोख दुभंग !
मातीला जडले ओल्या 
कोवळ्या उन्हाचे संग !

वार्यांनी शुभ्र धुक्यांचे
पांघरले अलगद शेले !
स्वप्नील जगाच्या वरुनी
निद्रेचे राज्य निमाले !!

सृजनाच्या सोनसरी त्या
सृष्टीवर येतील आता !
त्या उंच डोंगरांपार
सूर्याचा पंथ उजळता !!

----_____-----""-----_ लेखन - हर्षल






सन्यस्त !!!

ओलांडून गेला वेस सोडूनी संग 
अंगावर ओढून सूर्य-केशरी रंग !!
आभाळ-तळाच्या निळ्या सागराखाली 
चालला आक्रमित धरा पावलांखाली !!

सरितांचे शांत किनारे 
वृक्षांचे थोर पसारे !
मेरुंचे उंच मनोरे 
जलधींचे दिव्य पिसारे !
डोळ्यांत उतरले त्याच्या 
नि:संग सत्य सामोरे !!

थांबणे कुठे ना त्याला 
विश्रांती क्षणभर नाही !!
सन्यास आतबाहेरी 
अनोन्य तयाच्या वाही !!

हा जोगी कुठला कोण 
कोणासी शोधत जाई !!
कुजबुजती लोक अनेक 
परी कुणास ठाऊक नाही !!
 
मंदिरात वा मार्गांत 
पर्वतांत वा नगरांत 
तेवतो मनातून त्याच्या 
अखंडसा एकांत !!

देहाचे भान निमाले 
मायेचे बंध गळाले !!
प्राणाच्या गर्भामधले 
आकाश प्रकाशून गेले !

स्वानंद पसरला भवती 
योगी उरला ना योगी !
अनंत जागृत होती 
अंतरी सनातन ज्योती !!

तो असाच विझुनी गेला 
त्याच्याच समाधीपार  !
कोणाला कळले नाही 
योग्याचे जीवनसार !!

--__--__--__  लेखन __- हर्षल !!





सायंकाल !!!

पावसात सायंकाळी 
कमळांचे रंग तळ्यात !
डोहांवर अंधाराची
चन्द्र लाघवी बरसात !

झाडांचे माथे बुडती
क्षितीजांचे केशर गोफ
  वायुंवर चढुनी फिरतो
 कातर वेळेचा कैफ !

कोठून आर्त विजनाची
अदृश्य विराणी झरते !
पाऊलांखालची वाट
पाउलांत मिसळून जाते !

मेघांवर कर्ज कुणाचे ?
अवघडून खाली  झुकती !
वाळूंचे दीर्घ किनारे
सागरास सजवत बसती !!

तो दूर उंच व्याधाचा
एकाकी तारा जळतो
नक्षत्रांच्या किरणांनी
रात्रीचा उत्सव फुलतो !!

चंद्रावर दाटून येती
आडोसे घनमाळांचे !
रात्रींतून वाहत जाती…
निश्वास संथ दु:खांचे !!

---------'-----___-----__--- लेखन -हर्षल !!


विजनपर्व !!!

कसा आस तोलून आकाश भरते 
ऋतुंच्या बदलती सुरंगी कमानी 
तुझी मूर्त माया तरीही न ढळते 
तुझे भास दाटून येती दिशांनी !

इथे स्वप्न मैफिल सजते सुखांची 
तुझा स्पर्श गंधार घुमतो तिथे !
उरातून वाहे अशी आस जळती 
तुझे हास्य स्मरणात जगते जिथे !!

असा काळ ओलांडतो देह माझा 
तरी वेड जालीम काही निघेना !!
उगा सांजवेळी अवेळी उमलतो 
पसारा स्मृतींचा कधीही सरेना !!

निराळेच एकांत येतात भवती 
मनाचे मनाला न कळती इशारे  !!
अशा उंच विरहार्त उद्दाम लाटा 
बुडाले सुखांचेच सारे किनारे !!

____-----'''''__________हर्षल 






Thursday, September 17, 2015

ईश्वरास.....!!

देवा तुझ्या  सुरांचा शालीन स्पर्श दैवी
मज ईश्वरा घडू दे सत्संग याची देही !
आभास काम रुपी ध्यानी मुळी न वाहो
 हृदयात सत्यरूपी सद्धर्म स्थिर राहो !!

आनंद शुद्ध लाभो निष्काम प्रेम यावे
मोहांमध्ये न देवा आयुष्य हे सरावे
येवो तुझ्या पदांचे मज प्रेम नित्य भावे
जगणे तुझ्याच साठी देवा सदा घडावे !!

पापांस अंत नाही अनिवार काळ फिरतो
सरताच मोह ;मागे दु:खांध बोध उरतो !
उरती उरात आता त्या वेदना गताच्या ;
बुडतो अखंड आम्ही या सागरी भवाच्या !!

आश्वस्त ईश्वरा हो .सौजन्य शांतता दे !!
सन्मार्ग पंथ लाभो आशिष एवढे दे !!









Wednesday, September 9, 2015

आषाढ रंग !....!

आषाढ रंगुनी गेला
मेघांचे डोह वितळले 
क्षितिजांवर इंद्रधनुच्या 
रंगांचे तोरण सजले !!

रानांत वृक्ष मोहरले  
पांघरून हिरवे शेले !
ते उंच उदासीन मेरु 
हिरव्या रंगांत बुडाले !!

मातीचे अत्तर फुटले 
वार्यांना यौवन रंग !
पृथ्वीवर मुक्त उधळले 
ओलेसे गंध तरंग !!

ते सरितांच्या भवताली 
पाण्यात किनारे बुडती 
आकाश सोडूनी पक्षी 
झाडा झाडांवर निजती !!

हा उत्सव जलरंगांचा
धरतीच्या अंगांगांचा !
धरणीवर पाणी सजते !
जगण्याला जीवन मिळते

--------लेखन -हर्षल !





Monday, September 7, 2015

पलाश फुलले गर्द पेटुनी जेथे
त्या धुसर वाटा अजून स्मरतो आहे !
प्राजक्त तुझ्या हास्याने उमलत जेथे
त्या वळणांवरती जीव अडकला आहे !!

श्वासांत धुंद गवतांचे गंध जुने ते
हिरव्या वेळूंचे हिरवे उंच पिसारे
मेघांवर तोरण दूर सात रंगांचे
वर्षेचा उत्सव मनात अजुनी आहे !!

मावळे रान .......!!

मावळे रान मग दूर ;डोंगरापार
 सन्यस्त सूर्य  संध्येच्या जाता पार !!
डोळ्यांत उभे ;दूरचे दिवे ;एकाकी !
अंधारावरती श्यामल-नील चकाकी !!

वाहते संथ ;मंथित नीर ;भवताली
ह्या सरीतेवरही सांज ओतते लाली !
कुजबुजत्या वेली ; वारा बांधून सजती !
क्षितिजांवर उतरे विहंग रेषा नक्षी !!

मार्गांत कुठे ;दु:खात चूर
चालला कुणीसा जोगी 
बोलतो आर्त-जड सूर ;
प्रश्न काहूर त्यात बैरागी  !!

पूर्वेतून सूर्यसरींची 
होईल सखे सुरुवात !
शुक्राची चांदणवेळ 
संपून सरे मधुरात !!

एकांत तमाचा सरतो 
आकाश बदलता रंग !
काळजास सोडत नाही…
तव आठवणींचा संग !!


दिशा दिशांतून जागे 
कोवळा मंद  हुंकार !
भवताली माझ्या नादे !
अजून तुझा गंधार !!
  










Tuesday, September 1, 2015

पावलांत पाउल अडे ;दूरवर तरी चालणे
 अबोध क्षितीजांकडे रोजचे नवे मागणे  !!

कुठे सुखांचे देहमदांचे  मत्त पारवे
मनात हिरवट कधी भयाचे गुज आरवे !!
वाटा वाटा मूक कधी वैराण कधी वा !
कधी मखमली वळणा वरती सौख्य ताटवे !!

आकाशांवर सुर्य नाचतो कधी पेटता
कधी माथ्यावर  बरसत जातो चंद्र फिरस्ता !!
अन्धारांची उजाड राने कधी उगवती
दिसे त्यातही कधी विरागी वृक्ष एकटा !!




Sunday, August 30, 2015

आवाहन ..!!

तू चाल सखे पाउलवाट
अंधार नभांना मिळता !!
घे धाव मुक्त आसक्त एक 
चंद्राचा मार्ग उजळता !! 

मी तोच तिथे ;थांबती जिथे 
पाउल वाटा  घनरानी !! 
पाहतो वाट ;डोळ्यांत उभे 
देऊळ तुझ्या प्रेमानी !

एकटीच ये ;एकांत वनी 
घेऊन बहर प्रीतीचा !!
होऊन विजेची ओळ
करी स्वीकार तुझ्या मेघाचा !!

----------'-'लेखन -हर्षल




Saturday, August 29, 2015

अंधारमाया !!


ही  शांत वाहती सरिता 
 सन्यस्त धुक्यांचे  काठ 
अंधार उगवता भवती 
चंद्राला गवसे वाट !

निद्रिस्त जलाचे भंग 
वर वायू करीत दुभंग 
सरितेच्या कुक्षी शिरते 
चंद्राचे मधुकर बिंब !

आकाश कुठे जरतारी 
कभिन्न काळे सजते 
मेघांच्या देहांवरती 
तार्यांचे गोंदण उठते !!

तो सूर्य बुडाला पार 
एकटाच जळूनी गेला !
क्षितिजावर दूर कुठेसा 
पांघरून भगवा शेला !!

वेगात उमटते वरती 
आकाशपटांवर नक्षी !!
निमिषांत निसटुनी जाती 
घर गाठायाला पक्षी !!

वृक्षांचे देह मिसळले 
रानांत रात्र ओघळता 
अंधार एकटा उरतो 
आधार चांदण्यांकरीता !!

---------'---''''''''------लेखन -हर्षल 






Friday, August 28, 2015

आमचे सद्गुरु !!

जयाचा जनी जन्म नामार्थ झाला 
जयाने सदा वास नामांत केला !
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती 
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती !!

भगवंताला आम्ही फसवतो का ??. नव्हे तर आपणच आपल्याला फसवीत असतो !!सत्कर्म करणे हेच आपले ध्येय असावे ।!! दुरिताचा शेष मनात असेल तोवर शांती  आणि प्रसन्नता वाटणारच नाही !
आपण चुका करतो ।पापे करतो …. परंतु त्याबद्दल आपणास जाणीव होऊन या दोषांचा परिहार करण्यासाठी आणि पुनरुक्ती टाळण्यासाठी ईश्वराला  
सरळ शरण जाणे आणि सत्कर्मांची शपथ घेणे …अतिशय महत्वाचे आहे !! दुष्कर्मे नरकासमान… नव्हे नव्हे तर प्रत्यक्ष नरकच असतात !!सत्य ,प्रेम;दया, सहिष्णुता आणि भगवंताचे प्रेम ;त्याच्या नामाचे प्रेम  आपल्या हृदयात म्हणूनच सदैव जागृत असायला हवे !! आपले आयुष्य ईश्वर  मय झाले कि त्या देवाची खरी कृपा आपल्याला समजते !!आपण  देवाला सांगावे कि तूच केवळ माझा तारणहार आहेस !!।तुझ्या नामाचे प्रेम  मला दे !! आणि माझ्या हातून सत्कर्मे घडतील अशी सुबुद्धी मला दे!!अज्ञानामुळे आणि मायेच्या प्राबल्यामुळे हातून अनुचित कार्य घडलेच तर त्यातून आमचे रक्षण कर आणि अशा दुरिताचा पुन्हा उद्भव होणार नाही असे  मार्गदर्शन हे ईश्वरा , तू आम्हाला कर !! 
आपले आयुष्य प्रकाशमान  आणि सुसंपन्न करण्यासाठी परमेश्वराचे खरे प्रेम आणि भक्ती मनात निर्माण व्हायला हवी !! संत हेच काम करतात !!
श्री स्वामी समर्थ ,श्री ब्रह्मचैतन्य महाराज , साईबाबा हे आणि असे अनेक परम साक्षात्कारी योगी ,साधू ,संत हे भगवंताचे प्रत्यक्ष दिव्य स्वरूप अनुभवलेले व तसेच परम थोर स्वतः झालेले असे प्रत्यक्ष ईश्वरपुरुष होत !!
ह्या अशा विभूती माणसाला त्याचा अगदी हात धरून  परमेश्वरापर्यंत घेऊन जातात … मोक्षाचे आणि कैवल्याचे अलौकिक धन मुक्तपणे वाटतात !  ह्या विभूतींवर मी काय बोलावे !! माझी ती पात्रताच नाही !!मी इतकेच जाणतो कि हे आमचे सद्गुरु आहेत !
त्यांची कृपा आणि आशीर्वाद ,  त्यांचे पवित्र नामरूप अस्तित्व आमच्या मनाला शुद्ध आणि सत्वशील बनवते!त्यांचा  किमान एक चांगला भक्त तरी मला होता यावे अशीच इच्छा आहे !! 
……अजून काय लिहू !! 
  सद्गुरु कारणे तरलो अजुनी ! 
   अन्यथा पतित काय जगे !!
अशीच वस्तुस्थिती आहे !!

शेवटी त्या परमेश्वरी शक्तीला एकच मागणे … 

मत्सम: पातकी नास्ति 
पापघ्नी त्वत्समा  नही !
एवं ज्ञात्वा महादेवी 
यथा योग्यं तथा कुरु !!
-------------'शंकराचार्य स्वामी
अर्थात---
 "  मज सारखा पापी अन्य कोणी नाही आणि हे जगदंबे तुझ्यासारखी पाप नाशक पुण्यवान शक्ती देखील अन्य कोणी नाही ….! हे जाणून ,हे महादेवते माते, जसे तुला योग्य वाटेल तसे कर !!"

------------- लेखन -हर्षल (२८/०८/२०१५)


Sunday, August 23, 2015

स्मरणयात्रा !!!

प्राजक्त बहराचा  गोडवा तू
 घेऊन येतेस !
आणि उमलतात माझ्या मनात 
स्वप्न पुष्पांच्या बागा !!

तुझे हास्य चांदण्यासारखे 
पसरून जातेस … 
माझ्या मनाच्या आभाळावर !!
आणि लक्षावधी  संकेत 
 तुझ्या अबोध प्रेमाचे …!!
उतरतात माझ्या एकाकी 
आयुष्यात !!

तू आकाशातल्या विजेसारखी 
तळपून जातेस ……. 
माझ्या अंधार्या विरक्त विश्वात .!!
आणि या सन्यस्त आयुष्याला 
ओढ लागते तुझ्या सहवासाची !!

तू चन्द्रकलेसारखी
अलवार  उगवतेस …!
माझ्या आठवणींच्या मेघांतून  …!
आणि माझी प्रत्येक सायंकाळ 
न्हाउन निघते त्या सौजन्याने !!

माझे नेत्र विसावा शोधतात 
 तुझ्या प्रेमळ नजरेमध्ये !. 
 आणि कधी अश्रुंचे अनिवार 
जलाशय उभे राहतात … 
तुझ्या विरहाच्या कल्पनेने !!

---------------लेखन -हर्षल ( माझ्या एका कवितेचा एक भाग !!  )स्मरणयात्रा 




Saturday, August 22, 2015

मुशाफिर ..!!!

मी एक मुशाफिर धुंद
आयुष्य उधळूनी फिरलो !!
तमघोर पथांवर ;माझा ,मी
सूर्य होऊनी जळलो !!

एकांत कुठे मायेने
पुण्यात्मे देऊन गेले !!
सावलीत त्या वृक्षांच्या
सावली होऊनी निजलो !!

माथ्यावर आग कितीदा
वा ;चरणतलावर जाळ
कडकडूनी  कितीदा फुटले
विद्रोही वर आभाळ !!

उन्माद पाहिले भवती ;
यातना संग अश्रुंचे !!
उद्दाम भोग शृंगार;
अनुराग देह मायेचे !!

देखिले तपस्वी त्यागी !
त्या अखंड जळत्या ज्योती !
ते थोर प्रकाश विरागी ;
परमेशाच्या प्रति-दीप्ती !

 हे सत्य सनातन अवघे
काळजात भरुनी उरले!!
शब्दांतून आठवणींचे
हे काव्य झरे पाझरले !!

---------------------लेखन - हर्षल ---





Sunday, August 16, 2015

प्रेयसी !!!!......

आयुष्य कृष्ण घन झाले
बरसले मुक्त अनिवार !!
तू धरा प्रेममय होता
प्रेमाचा लोट अपार !!

संध्येच्या एकांताला
सूर्याची केशर काया
हि तशी मनावर माझ्या
तव हास्याची मधुमाया !!


रात्रीला उजळत येते
तारका शुभ्र शुक्राची !!
तू तशीच माझ्यासाठी
चांदणी  दिव्य तेजाची !!


---------------------लेखन : हर्षल !!  प्रेयसी





Thursday, August 13, 2015

जखमा !!!!

काही जखमा फार खोल असतात …. सनातन ।
अश्वथाम्याच्या कपाळावर असलेल्या जखमेसारख्या!!

त्यातून  उमटलेले  व्रण तसेच … !!

खूप काही सांगून जाणारे आणि तितकाच द्रोह आणि संताप मनात जागे करणारे …. !!

आयुष्य अश्राप आणि  निरागस असताना जे जाणवत नाही , ते या अबोध  जखमा नंतर जाणवून देतात !!

जे आहे ते व्यक्त होत नाही । आणि जे नाही ते ओझे उचलून चालावे लागते असा गहजब होतो !!

अनेक प्रश्न निरुत्तर राहतात … अनेक संदर्भ अस्फुट राहतात
आणि अनेक भावना दग्ध होऊन लोपून जातात …. तरी हे महाचक्र थांबत नाही …!!

शेवटी एवढेच वाटते
 कि परमेश्वराला विचारावे, " हे ईश्वरा तू आम्हाला जगवतोस  कशासाठी आणि मारतोस कशासाठी ,?…. आणि त्या दोन बिंदुंमध्ये हे आभाळा एवढे दु:ख
ओततोस  तरी कशासाठी ?… सगळेच काही महामानव नसतात रे …. ! काही सहन करत जगतात … आणि काही जगता जगताच मरतात !!।"।
.----------------------------@-------- " मनस्वी "" या लेखातील एक भाग …। लेखन : हर्षल !!!








Tuesday, August 11, 2015

एकांत नभांतून  उरतो
 सागरात अंबर उतरे 
वेळूच्या बेटावरती एकटाच 
वारा घुमतो ……. !!

सूर्याच्या स्वर्ण शलाका
अंधार दडवतो पोटी 
अन रात्रीला जरतारी 
तो लाल मुखवटा चढतो !!



Friday, August 7, 2015

ग्रेस....!!!

भय इथले संपत नाही 
मज तुझी आठवण येते 
मी संध्याकाळी गातो 
तू मला शिकविली गीते !!

ते झरे चंद्र सजणाचे 
ती धरती भगवी माया 
झाडांशी निजलो आपण 
झाडांत पुन्हा उगवाया !!

देऊळ पलीकडे तरीही 
तुज ओंजळ फुटला खांब 
थरथरत्या बुबुळापाशी
 मी उरला सुरला थेंब !!

त्या वेळी नाजूक भोळ्या 
वार्याला फ़सवूनी पळती 
क्षितीजांचे तोरण घेऊन 
दारावर आली भरती !!

संध्येतील कमल फुलासम 
मी नटलो शृंगाराने 
देहाच्या भवती रिंगण 
घालती निळाइत राने !!

तो बोल मंद हळवासा 
आयुष्य स्पर्शुनी गेला 
सीतेच्या वनवासातील 
जणू अंगी राघव शेला !!

स्तोत्रांत इंद्रिये अवघी 
गुणगुणती दु:ख कुणाचे …। 
हे सरता संपत नाही 
चांदणे तुझ्या स्मरणाचे !!
________________________ ग्रेस ----------

Sunday, August 2, 2015

मेघ -धरेचे नाते


कुणी  मेघ उन्हाने जळतो 
वार्याने दूर उधळतो 
एकटा  एकटा  फिरतो !
अन दु:ख घेउनि जगतो !!

तो शुष्क मोकळा मेघ 
निर्जीव पांढरा  होतो 
कुणी जिवलग नाही त्याला 
एकटा मुशाफिर फिरतो !!

अन असाच फिरता फिरता 
महिन्यांवर महिने सरती 
अन हाक अचानक येते 
बोलावते त्याला धरती !!

स्नेहाने धरणी म्हणते 
मी तुझ्याच साठी जळते 
हे सागर माझे अश्रू 
मी तुझ्याच साठी रडते !!

त्या अश्रुंमधले जीवन 
मग मेघ उचलुनी घेतो
तो श्वेत विरागी मेघ 
अन कृष्ण -सावळा होतो !!

तो जलप्रेमाने भरतो 
धरणीवरी  बरसत जातो !!

या अशाच प्रेमामधुनी 
वर्षेचा ऋतू  बहरतो !!



तू धरेसारखी सुशीला !!
मी मेघासम वैरागी !!
तू सोज्वळ शालीन  माया 
मी  म्हणून तुझा अनुरागी !!
 
ही प्रीत अबोल अनामिक 
हे मेघ -धरेचे नाते !!
ही मैत्री अपुल्यामधली। ! 
अशीच  वाढत जाते !


---------------------------------- हर्षल 

 

Saturday, June 27, 2015

" एका कथेचा उत्तरार्ध"....!!


ती : तू काही बोलणारेस का ?

तो : …………. 

ती :  असे गप्प बसायचा अर्थ काय घेऊ मी ? …एक तर आधीच सध्या आम्ही काळजीत आहोत सगळे !…भारतात आलोय त्याचे कारण तरी माहितीये का तुला ?… अनिकेतच्या भावाचे म्हणजे सलीलचे kidney operation होते !!… भयानक कॉम्प्लेक्स  सगळे !!…. सलीलला पहिले असशील न तू !!…बिचारा  !! 
kidney प्रोब्लेम !! तो सुद्धा या वयात !!…किडनी  रिप्लेस केली !!… DONOR  मिळत नव्हता ! शेवटी अनिकेत ने जमवले काही बाही !!… MONEY  matters !! १६ जण  शोधले पण कोणाची kidney  match  होत नव्हती !!…शेवटी एक match  मिळाली !!………. असो !! आता सलिल ला घेऊन अमेरिकेला च जाणारे !!
पण तू असा मधूनच फोन केलास …. म्हणून आले !!…. अजूनही तसाच आहेस !। be  practical !!… बोल काय काम होते ??


तो:………………… !!


ती : काही बोलायला बोलावलेस ना !! आता वेळ नसतो मला …. ठाऊक नाही का तुला ? सगळे हिशेब नवीन झालेत आता !!…. सगळ्या गोष्टी निराळ्या आहेत आता !!…… सांग तरी काय झालय ??  प्लिज  be  fast !!

तो :  ……………………( एक सुस्कारा टाकतो आणि पुन्हा नजर अधांतरी करून पाहू लागतो )

ती :  तू जर असाच हट्टीपणा आणि विक्षिप्त पणा करणार असशील तर मी निघते ……. माणूस सुधारायला तयार नसेल तर कोण काय करणार !!!……रहा असाच अंधारात !! या अशाच स्वभावामुळे  तू सगळे गमावलेस …!!….अगदी ……………मला सुद्धा !!… एक वेळ येते जेंव्हा मुलीला व्यावहारिक विचार करावा लागतो …। मी तो केला …. आणि आता मी योग्यच होते ते मला समजलय !!  अगदी खरे सांगते पण…  कि ,…. अनिकेत सारखा नवरा शोधून सापडला नसता!!… doctorate तर आहेच , श्रीमंत आहेच , देखणा आहेच पण सर्वात महत्वाचे म्हणजे ,
मला काय आवडते ते सगळे समजते त्याला !!………… i am damn lucky to have him !!…….  just loving to be his wife !!…. तुझा निराळेपणा मला त्या वयात आवडून गेला …तुझी कला ,तुझे हसणे ,बोलणे आवडले होते !! पण नंतर माझे मलाच समजले कि मी चूक होते !!…तु चांगला असलास तरी यशस्वी होणारा नाहीस !!नुसते सद्गुण काय कामाचे ??…. life cant run on hypothesis and dreams !!..it needs strong base of practical approach !...and you have nothing except your plutonic concepts of love and knowledge !!
so i left you !!...मी ambitious मुलगी होते !!…तुझ्यावरच प्रेम हा माझा अडाणी पणा होता !!………अर्थात हे सगळे तुला ठाऊक आहेच !!आपले हे सगळे बोलून झालेय आधीच !!………मनात आले म्हणून सांगितले इतकेच  !!आणि तू सुद्धा …तू कशाला बोलावलेस हे अजूनही सांगत नाहीयेस !!??…मला निघायचय आता …. उशीर होतोय !!

तो : …  जास्त वेळ घेणार नाही !! ( हात पुढे करतो )  … हे घे !

ती : काय आहे ?… चेक ??  १० लाखाचा ???…. कोणाचा ??  

तो : वाच !!

ती : ( वाचून ) ( भांबावून जाते )….अनिकेतने तुला चेक दिला होता ???? परवाची तारीख आहे त्यावर !! कशाबद्दल !!?? …. दहा लाख ?? 
 वेट …… अनिकेत ने १० लाख चेक ने कुरिअर केले  होते त्या … माणसाला !!…अनिकेत म्हणाला होता मला । !! the kidney donor !!!...तू ??। तू ?? तू  kidney  दिलीस सलिल ला ??…

तो : बाजारात अण्णा  भेटले होते तुझे !!… त्यानी सगळे सांगितले !! तुम्ही दोघे परत आलायत आणि अनिकेत ला donor  मिळत नाहीये म्हणून त्रास किती होतोय ते सुद्धा !!… म्हणून सहज जाउन आलो त्या दिवशी !!…. तू नव्हतीस !! अनिकेत भेटला हॉस्पिटल  मध्ये ! म्हंटले त्याला जर माझी मदत झाली तर आनंदाने करेन !!… नशीबाने kidney  match  झाली !!… फक्त त्याला सांगितले होते कोणाला सांगू नकोस !
पण त्याने हा चेक पाठवला म्हणून तो परत करायला तुला बोलवावे लागले !
पैसे मी घेणार नाही आणि मी परत केले तर तुझा नवरा परत घेणार नाही हे मला ठाऊक आहे म्हणून तुला देतोय !!। नाइलाज होता म्हणून तुला बोलावले  !! हा घे आणि परत जा !!

ती : ( रडत)  का केलस तू  हे ? …। 

तो : ( हसून ) practical  असतो तर विचार केला असता !!… पण तसे जमत नाही पहिल्यापासूनच !!… बरोबर म्हणालीस आधी तू …. अजून सुधारलो नाहीये मी !!… याच स्वभावामुळे एकदा तू गेलीस आणि आता एक अवयव !…। असो … निघुयात !! बराच उशीर झालाय !!


-------------------------------------------" एका कथेचा उत्तरार्ध " .--लेखन  हर्षल ( २००७)



























Sunday, June 7, 2015

पाउस !!


नभांना  नवी जाग येईल आता 
धरेला नवा साज येईल आता
असा थंड वाहेल व्याकूळ वारा 
बरसतील मेघांतुनी दिव्य धारा !!

दहाही दिशांना सरी पावसाच्या 
उघडती कुप्या मातीच्या अत्तरांच्या 
रिती तप्त धरणी पहा होई शांत 
मनातून आनंद  वाहे  प्रशांत !!

तुझे स्पर्श माधुर्य स्मरणार तेंव्हा 
तुझे हास्य मेघांत दिसणार तेंव्हा 
पुन्हा अंतरातून उमलेल  प्रीती 
सरींतून दिसते  तुझी प्रेम मूर्ती  !!

-------------------------------लेखन -- हर्षल --------------


Tuesday, March 31, 2015

माणसांच्या मध्यरात्री
हिंडणारा सूर्य मी !!
माझिया साठी  न  माझा
पेटण्याचा सोहळा !!
रंगुनी रंगात सार्या रंग
माझा वेगळा !!
---------------कविवर्य सुरेश भट …….