Sunday, August 30, 2015

आवाहन ..!!

तू चाल सखे पाउलवाट
अंधार नभांना मिळता !!
घे धाव मुक्त आसक्त एक 
चंद्राचा मार्ग उजळता !! 

मी तोच तिथे ;थांबती जिथे 
पाउल वाटा  घनरानी !! 
पाहतो वाट ;डोळ्यांत उभे 
देऊळ तुझ्या प्रेमानी !

एकटीच ये ;एकांत वनी 
घेऊन बहर प्रीतीचा !!
होऊन विजेची ओळ
करी स्वीकार तुझ्या मेघाचा !!

----------'-'लेखन -हर्षल




Saturday, August 29, 2015

अंधारमाया !!


ही  शांत वाहती सरिता 
 सन्यस्त धुक्यांचे  काठ 
अंधार उगवता भवती 
चंद्राला गवसे वाट !

निद्रिस्त जलाचे भंग 
वर वायू करीत दुभंग 
सरितेच्या कुक्षी शिरते 
चंद्राचे मधुकर बिंब !

आकाश कुठे जरतारी 
कभिन्न काळे सजते 
मेघांच्या देहांवरती 
तार्यांचे गोंदण उठते !!

तो सूर्य बुडाला पार 
एकटाच जळूनी गेला !
क्षितिजावर दूर कुठेसा 
पांघरून भगवा शेला !!

वेगात उमटते वरती 
आकाशपटांवर नक्षी !!
निमिषांत निसटुनी जाती 
घर गाठायाला पक्षी !!

वृक्षांचे देह मिसळले 
रानांत रात्र ओघळता 
अंधार एकटा उरतो 
आधार चांदण्यांकरीता !!

---------'---''''''''------लेखन -हर्षल 






Friday, August 28, 2015

आमचे सद्गुरु !!

जयाचा जनी जन्म नामार्थ झाला 
जयाने सदा वास नामांत केला !
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती 
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती !!

भगवंताला आम्ही फसवतो का ??. नव्हे तर आपणच आपल्याला फसवीत असतो !!सत्कर्म करणे हेच आपले ध्येय असावे ।!! दुरिताचा शेष मनात असेल तोवर शांती  आणि प्रसन्नता वाटणारच नाही !
आपण चुका करतो ।पापे करतो …. परंतु त्याबद्दल आपणास जाणीव होऊन या दोषांचा परिहार करण्यासाठी आणि पुनरुक्ती टाळण्यासाठी ईश्वराला  
सरळ शरण जाणे आणि सत्कर्मांची शपथ घेणे …अतिशय महत्वाचे आहे !! दुष्कर्मे नरकासमान… नव्हे नव्हे तर प्रत्यक्ष नरकच असतात !!सत्य ,प्रेम;दया, सहिष्णुता आणि भगवंताचे प्रेम ;त्याच्या नामाचे प्रेम  आपल्या हृदयात म्हणूनच सदैव जागृत असायला हवे !! आपले आयुष्य ईश्वर  मय झाले कि त्या देवाची खरी कृपा आपल्याला समजते !!आपण  देवाला सांगावे कि तूच केवळ माझा तारणहार आहेस !!।तुझ्या नामाचे प्रेम  मला दे !! आणि माझ्या हातून सत्कर्मे घडतील अशी सुबुद्धी मला दे!!अज्ञानामुळे आणि मायेच्या प्राबल्यामुळे हातून अनुचित कार्य घडलेच तर त्यातून आमचे रक्षण कर आणि अशा दुरिताचा पुन्हा उद्भव होणार नाही असे  मार्गदर्शन हे ईश्वरा , तू आम्हाला कर !! 
आपले आयुष्य प्रकाशमान  आणि सुसंपन्न करण्यासाठी परमेश्वराचे खरे प्रेम आणि भक्ती मनात निर्माण व्हायला हवी !! संत हेच काम करतात !!
श्री स्वामी समर्थ ,श्री ब्रह्मचैतन्य महाराज , साईबाबा हे आणि असे अनेक परम साक्षात्कारी योगी ,साधू ,संत हे भगवंताचे प्रत्यक्ष दिव्य स्वरूप अनुभवलेले व तसेच परम थोर स्वतः झालेले असे प्रत्यक्ष ईश्वरपुरुष होत !!
ह्या अशा विभूती माणसाला त्याचा अगदी हात धरून  परमेश्वरापर्यंत घेऊन जातात … मोक्षाचे आणि कैवल्याचे अलौकिक धन मुक्तपणे वाटतात !  ह्या विभूतींवर मी काय बोलावे !! माझी ती पात्रताच नाही !!मी इतकेच जाणतो कि हे आमचे सद्गुरु आहेत !
त्यांची कृपा आणि आशीर्वाद ,  त्यांचे पवित्र नामरूप अस्तित्व आमच्या मनाला शुद्ध आणि सत्वशील बनवते!त्यांचा  किमान एक चांगला भक्त तरी मला होता यावे अशीच इच्छा आहे !! 
……अजून काय लिहू !! 
  सद्गुरु कारणे तरलो अजुनी ! 
   अन्यथा पतित काय जगे !!
अशीच वस्तुस्थिती आहे !!

शेवटी त्या परमेश्वरी शक्तीला एकच मागणे … 

मत्सम: पातकी नास्ति 
पापघ्नी त्वत्समा  नही !
एवं ज्ञात्वा महादेवी 
यथा योग्यं तथा कुरु !!
-------------'शंकराचार्य स्वामी
अर्थात---
 "  मज सारखा पापी अन्य कोणी नाही आणि हे जगदंबे तुझ्यासारखी पाप नाशक पुण्यवान शक्ती देखील अन्य कोणी नाही ….! हे जाणून ,हे महादेवते माते, जसे तुला योग्य वाटेल तसे कर !!"

------------- लेखन -हर्षल (२८/०८/२०१५)


Sunday, August 23, 2015

स्मरणयात्रा !!!

प्राजक्त बहराचा  गोडवा तू
 घेऊन येतेस !
आणि उमलतात माझ्या मनात 
स्वप्न पुष्पांच्या बागा !!

तुझे हास्य चांदण्यासारखे 
पसरून जातेस … 
माझ्या मनाच्या आभाळावर !!
आणि लक्षावधी  संकेत 
 तुझ्या अबोध प्रेमाचे …!!
उतरतात माझ्या एकाकी 
आयुष्यात !!

तू आकाशातल्या विजेसारखी 
तळपून जातेस ……. 
माझ्या अंधार्या विरक्त विश्वात .!!
आणि या सन्यस्त आयुष्याला 
ओढ लागते तुझ्या सहवासाची !!

तू चन्द्रकलेसारखी
अलवार  उगवतेस …!
माझ्या आठवणींच्या मेघांतून  …!
आणि माझी प्रत्येक सायंकाळ 
न्हाउन निघते त्या सौजन्याने !!

माझे नेत्र विसावा शोधतात 
 तुझ्या प्रेमळ नजरेमध्ये !. 
 आणि कधी अश्रुंचे अनिवार 
जलाशय उभे राहतात … 
तुझ्या विरहाच्या कल्पनेने !!

---------------लेखन -हर्षल ( माझ्या एका कवितेचा एक भाग !!  )स्मरणयात्रा 




Saturday, August 22, 2015

मुशाफिर ..!!!

मी एक मुशाफिर धुंद
आयुष्य उधळूनी फिरलो !!
तमघोर पथांवर ;माझा ,मी
सूर्य होऊनी जळलो !!

एकांत कुठे मायेने
पुण्यात्मे देऊन गेले !!
सावलीत त्या वृक्षांच्या
सावली होऊनी निजलो !!

माथ्यावर आग कितीदा
वा ;चरणतलावर जाळ
कडकडूनी  कितीदा फुटले
विद्रोही वर आभाळ !!

उन्माद पाहिले भवती ;
यातना संग अश्रुंचे !!
उद्दाम भोग शृंगार;
अनुराग देह मायेचे !!

देखिले तपस्वी त्यागी !
त्या अखंड जळत्या ज्योती !
ते थोर प्रकाश विरागी ;
परमेशाच्या प्रति-दीप्ती !

 हे सत्य सनातन अवघे
काळजात भरुनी उरले!!
शब्दांतून आठवणींचे
हे काव्य झरे पाझरले !!

---------------------लेखन - हर्षल ---





Sunday, August 16, 2015

प्रेयसी !!!!......

आयुष्य कृष्ण घन झाले
बरसले मुक्त अनिवार !!
तू धरा प्रेममय होता
प्रेमाचा लोट अपार !!

संध्येच्या एकांताला
सूर्याची केशर काया
हि तशी मनावर माझ्या
तव हास्याची मधुमाया !!


रात्रीला उजळत येते
तारका शुभ्र शुक्राची !!
तू तशीच माझ्यासाठी
चांदणी  दिव्य तेजाची !!


---------------------लेखन : हर्षल !!  प्रेयसी





Thursday, August 13, 2015

जखमा !!!!

काही जखमा फार खोल असतात …. सनातन ।
अश्वथाम्याच्या कपाळावर असलेल्या जखमेसारख्या!!

त्यातून  उमटलेले  व्रण तसेच … !!

खूप काही सांगून जाणारे आणि तितकाच द्रोह आणि संताप मनात जागे करणारे …. !!

आयुष्य अश्राप आणि  निरागस असताना जे जाणवत नाही , ते या अबोध  जखमा नंतर जाणवून देतात !!

जे आहे ते व्यक्त होत नाही । आणि जे नाही ते ओझे उचलून चालावे लागते असा गहजब होतो !!

अनेक प्रश्न निरुत्तर राहतात … अनेक संदर्भ अस्फुट राहतात
आणि अनेक भावना दग्ध होऊन लोपून जातात …. तरी हे महाचक्र थांबत नाही …!!

शेवटी एवढेच वाटते
 कि परमेश्वराला विचारावे, " हे ईश्वरा तू आम्हाला जगवतोस  कशासाठी आणि मारतोस कशासाठी ,?…. आणि त्या दोन बिंदुंमध्ये हे आभाळा एवढे दु:ख
ओततोस  तरी कशासाठी ?… सगळेच काही महामानव नसतात रे …. ! काही सहन करत जगतात … आणि काही जगता जगताच मरतात !!।"।
.----------------------------@-------- " मनस्वी "" या लेखातील एक भाग …। लेखन : हर्षल !!!








Tuesday, August 11, 2015

एकांत नभांतून  उरतो
 सागरात अंबर उतरे 
वेळूच्या बेटावरती एकटाच 
वारा घुमतो ……. !!

सूर्याच्या स्वर्ण शलाका
अंधार दडवतो पोटी 
अन रात्रीला जरतारी 
तो लाल मुखवटा चढतो !!



Friday, August 7, 2015

ग्रेस....!!!

भय इथले संपत नाही 
मज तुझी आठवण येते 
मी संध्याकाळी गातो 
तू मला शिकविली गीते !!

ते झरे चंद्र सजणाचे 
ती धरती भगवी माया 
झाडांशी निजलो आपण 
झाडांत पुन्हा उगवाया !!

देऊळ पलीकडे तरीही 
तुज ओंजळ फुटला खांब 
थरथरत्या बुबुळापाशी
 मी उरला सुरला थेंब !!

त्या वेळी नाजूक भोळ्या 
वार्याला फ़सवूनी पळती 
क्षितीजांचे तोरण घेऊन 
दारावर आली भरती !!

संध्येतील कमल फुलासम 
मी नटलो शृंगाराने 
देहाच्या भवती रिंगण 
घालती निळाइत राने !!

तो बोल मंद हळवासा 
आयुष्य स्पर्शुनी गेला 
सीतेच्या वनवासातील 
जणू अंगी राघव शेला !!

स्तोत्रांत इंद्रिये अवघी 
गुणगुणती दु:ख कुणाचे …। 
हे सरता संपत नाही 
चांदणे तुझ्या स्मरणाचे !!
________________________ ग्रेस ----------

Sunday, August 2, 2015

मेघ -धरेचे नाते


कुणी  मेघ उन्हाने जळतो 
वार्याने दूर उधळतो 
एकटा  एकटा  फिरतो !
अन दु:ख घेउनि जगतो !!

तो शुष्क मोकळा मेघ 
निर्जीव पांढरा  होतो 
कुणी जिवलग नाही त्याला 
एकटा मुशाफिर फिरतो !!

अन असाच फिरता फिरता 
महिन्यांवर महिने सरती 
अन हाक अचानक येते 
बोलावते त्याला धरती !!

स्नेहाने धरणी म्हणते 
मी तुझ्याच साठी जळते 
हे सागर माझे अश्रू 
मी तुझ्याच साठी रडते !!

त्या अश्रुंमधले जीवन 
मग मेघ उचलुनी घेतो
तो श्वेत विरागी मेघ 
अन कृष्ण -सावळा होतो !!

तो जलप्रेमाने भरतो 
धरणीवरी  बरसत जातो !!

या अशाच प्रेमामधुनी 
वर्षेचा ऋतू  बहरतो !!



तू धरेसारखी सुशीला !!
मी मेघासम वैरागी !!
तू सोज्वळ शालीन  माया 
मी  म्हणून तुझा अनुरागी !!
 
ही प्रीत अबोल अनामिक 
हे मेघ -धरेचे नाते !!
ही मैत्री अपुल्यामधली। ! 
अशीच  वाढत जाते !


---------------------------------- हर्षल