कुणी मेघ उन्हाने जळतो
वार्याने दूर उधळतो
एकटा एकटा फिरतो !
अन दु:ख घेउनि जगतो !!
तो शुष्क मोकळा मेघ
निर्जीव पांढरा होतो
कुणी जिवलग नाही त्याला
एकटा मुशाफिर फिरतो !!
अन असाच फिरता फिरता
महिन्यांवर महिने सरती
अन हाक अचानक येते
बोलावते त्याला धरती !!
स्नेहाने धरणी म्हणते
मी तुझ्याच साठी जळते
हे सागर माझे अश्रू
मी तुझ्याच साठी रडते !!
त्या अश्रुंमधले जीवन
मग मेघ उचलुनी घेतो
तो श्वेत विरागी मेघ
अन कृष्ण -सावळा होतो !!
तो जलप्रेमाने भरतो
धरणीवरी बरसत जातो !!
या अशाच प्रेमामधुनी
वर्षेचा ऋतू बहरतो !!
तू धरेसारखी सुशीला !!
मी मेघासम वैरागी !!
तू सोज्वळ शालीन माया
मी म्हणून तुझा अनुरागी !!
ही प्रीत अबोल अनामिक
हे मेघ -धरेचे नाते !!
ही मैत्री अपुल्यामधली। !
अशीच वाढत जाते !
---------------------------------- हर्षल
No comments:
Post a Comment