Sunday, September 27, 2015

निळ्या सांजवेळी !!---!!!!

इथे गाजती नाद ओल्या सुरांचे
इथे सांजवेळी पहारे सुखांचे !
इथे या तळ्यांच्या विहारामधुनी
सखे ,वाहती रंग या चांदण्यांचे !!

किनारे असे रंगती सांजकाली
मिसळतात डोहांमध्ये वृक्षवेली !
इथे सावल्यांचे उमलले पिसारे  !
मनाला मनाचेच कळती इशारे !!

उठे पाय माझा निळ्या वाळवंटी
तुझी वाहते आस माझ्या उरी !
तुटे वेध आता दिशांचा दहाही
बरसतील आता प्रीतीच्या सरी !!

नभांतून चंद्रार्क मिसळून गेले
असा मग्न अवकाश उतरे इथे !
जलांच्या वरी डोलती मंद वारे !
तुझी साद येता तीरांच्या इथे !

उभी तू किनारी; तुझे हास्य दिसता ,
वितळले तळ्यातून आयुष्य हे !
निळ्या सांजवेळी निळाई मधुनी
उतरले निळे प्रीत संगीत हे !!

-_--__-__ लेखन - हर्षल !!



Saturday, September 26, 2015

तुझ्यासाठी !!

स्वप्नांचे पंख लावून 
तुझे मन फिरत राहते !
मला समजते ते !
त्याला हवे असतात सुंदर प्रदेश 
तुझ्यासारखेच गोड आणि साधे सरळ !!

एखाद्या एकट्या सुंदरशा 
परीसारखी !!
तू एकटीच चालत राहतेस 
कोणीच सोबतीला नसल्यासारखी !!

तुझ्या गोड हसण्यामध्ये ,
मी विसरून  जातो माझे त्रास !!
पण तुझे दु:ख मात्र तू लपवून ठेवतेस खास!!

तुला पहिले म्हणून समजले 
कि देव खूप छान माणसे अजूनही बनवतो !!
तुला पहिले म्हणून समजले कि 
आयुष्य फार सुंदर आहे ! 
अगदी तुझ्यासारखेच … सुंदर !

तुला पहिले कि मला दिसतो 
सुंदर मोकळा  प्रकाश !!
तुझ्या अबोल डोळ्यांमधले 
प्रश्नांचे आकाश !!

माझ्या  वाटेवर अचानक  भेटलीस 
म्हणून  जगण्याला नवा स्पर्श झाला !!
तुझ्यामुळे आयुष्याला चांदण्याचा 
साज आला !!

आयुष्याच्या वाटेवरती जेंव्हा कधी 
उदास होशील !
खरच सांगतो तुझ्यासाठी 
डोळे माझे भरून  येतील !

एकटीच बसून उदास कधी 
शोधत असशील आधार जेंव्हा !!
तुला साथ  देण्यासाठी हात माझा
असेल तेंव्हा !!

--__--__लेखन - हर्षल !!



वेध....!!!!

असा वेध लागे तुझा कि ,मनांचे
किनारे,सखे ,या मनाला न मिळती !!
तुझे भास ,आकाश होऊन सजले  ;
सखे ,रंग सारे  तयातून झरती !!

अशी आस ओसंडूनी वाढते कि ,
उरातून लाटा उसळती किती !
तुझा मोह माझ्या समग्रास ग्रासे
दहाही दिशांना तुझी संगती  !!

कुठे दूरचे मेघ बरसून सरता,
विजांचे किती लोळ कल्लोळ  ते !
तसे अंतरी घोर विरहार्त माझ्या
तुझ्यावीण जगण्यात उरतात ते !!

स्मृतींच्या तीरी ,ते तुझे स्मित वाहे
तुझे गंध अद्याप रुळती इथे !!
जिथे आपुले वेगळे मार्ग झाले
उभा संगमी आजही मी तिथे !!

---___---___--- लेखन : हर्षल




Monday, September 21, 2015

तुझ्यासाठी !!

वळणांवर अवघड इथल्या 
हातात हात देतेस !
वठलेल्या वृक्षासाठी 
का मेघ उगा होतेस ?

हासून पाहसी जेंव्हा 
हि खंत खोल ओघळते !
जगण्याच्या विजनामधुनी 
कोमल ते  संगीत  झरते !!

एकांत मोडती माझे 
जगण्याचे आस बदलती !
दुखाच्या अवसेमधुनी 
चंद्राचे वेध उमलती !!

ह्या स्निग्ध तुझ्या  हळुवार 
नजरेतून स्वप्ने झरती  !!
सन्यस्त मनातून माझ्या 
आशेला येते भरती  !

तू नकोस भरुनी जाऊ 
स्नेहाच्या सुंदर सरिता !!
सोडून तुला जाताना 
कोसळून जाईन पुरता !!

-----------------लेखन -- हर्षल -----




Sunday, September 20, 2015

पंथ !!!

पंथ माझे मोकळे; मी 
एकट्याने चालतो !
भिंत नाही ;बांध नाही 
त्या प्रवाही वाहतो !!

तापलेले रूक्ष रस्ते 
थंड वा बर्फांपरी !
पावले माझी उमटती 
शांततेने त्यांवरी !!

शोक माझा लोटला 
आभाळ तो माझे असे !
त्यागला गतकाळ येता 
लावण्या मजला पिसे !!

मानवांतील थोर जे ;
त्यांचीच वळणे चालतो !
काळजावर स्वार होती ;
तीच नाती मानतो !!

धर्म जो परमेश्वराचा ;
अंतरातून सोबती !!
ईश्वरासम अन्य कोणी 
नाही मजला सारथी !!

---____----___लेखन _-हर्षल !!


Saturday, September 19, 2015

प्रात:काल !!!

ती पूर्वेची वनराई
हलकेच रंगूनी गेली !
आकाशसमुद्रामधुनी ही
 लाट उषेची आली !!

रंगांतून फुटले रंग ;
होता काळोख दुभंग !
मातीला जडले ओल्या 
कोवळ्या उन्हाचे संग !

वार्यांनी शुभ्र धुक्यांचे
पांघरले अलगद शेले !
स्वप्नील जगाच्या वरुनी
निद्रेचे राज्य निमाले !!

सृजनाच्या सोनसरी त्या
सृष्टीवर येतील आता !
त्या उंच डोंगरांपार
सूर्याचा पंथ उजळता !!

----_____-----""-----_ लेखन - हर्षल






सन्यस्त !!!

ओलांडून गेला वेस सोडूनी संग 
अंगावर ओढून सूर्य-केशरी रंग !!
आभाळ-तळाच्या निळ्या सागराखाली 
चालला आक्रमित धरा पावलांखाली !!

सरितांचे शांत किनारे 
वृक्षांचे थोर पसारे !
मेरुंचे उंच मनोरे 
जलधींचे दिव्य पिसारे !
डोळ्यांत उतरले त्याच्या 
नि:संग सत्य सामोरे !!

थांबणे कुठे ना त्याला 
विश्रांती क्षणभर नाही !!
सन्यास आतबाहेरी 
अनोन्य तयाच्या वाही !!

हा जोगी कुठला कोण 
कोणासी शोधत जाई !!
कुजबुजती लोक अनेक 
परी कुणास ठाऊक नाही !!
 
मंदिरात वा मार्गांत 
पर्वतांत वा नगरांत 
तेवतो मनातून त्याच्या 
अखंडसा एकांत !!

देहाचे भान निमाले 
मायेचे बंध गळाले !!
प्राणाच्या गर्भामधले 
आकाश प्रकाशून गेले !

स्वानंद पसरला भवती 
योगी उरला ना योगी !
अनंत जागृत होती 
अंतरी सनातन ज्योती !!

तो असाच विझुनी गेला 
त्याच्याच समाधीपार  !
कोणाला कळले नाही 
योग्याचे जीवनसार !!

--__--__--__  लेखन __- हर्षल !!





सायंकाल !!!

पावसात सायंकाळी 
कमळांचे रंग तळ्यात !
डोहांवर अंधाराची
चन्द्र लाघवी बरसात !

झाडांचे माथे बुडती
क्षितीजांचे केशर गोफ
  वायुंवर चढुनी फिरतो
 कातर वेळेचा कैफ !

कोठून आर्त विजनाची
अदृश्य विराणी झरते !
पाऊलांखालची वाट
पाउलांत मिसळून जाते !

मेघांवर कर्ज कुणाचे ?
अवघडून खाली  झुकती !
वाळूंचे दीर्घ किनारे
सागरास सजवत बसती !!

तो दूर उंच व्याधाचा
एकाकी तारा जळतो
नक्षत्रांच्या किरणांनी
रात्रीचा उत्सव फुलतो !!

चंद्रावर दाटून येती
आडोसे घनमाळांचे !
रात्रींतून वाहत जाती…
निश्वास संथ दु:खांचे !!

---------'-----___-----__--- लेखन -हर्षल !!


विजनपर्व !!!

कसा आस तोलून आकाश भरते 
ऋतुंच्या बदलती सुरंगी कमानी 
तुझी मूर्त माया तरीही न ढळते 
तुझे भास दाटून येती दिशांनी !

इथे स्वप्न मैफिल सजते सुखांची 
तुझा स्पर्श गंधार घुमतो तिथे !
उरातून वाहे अशी आस जळती 
तुझे हास्य स्मरणात जगते जिथे !!

असा काळ ओलांडतो देह माझा 
तरी वेड जालीम काही निघेना !!
उगा सांजवेळी अवेळी उमलतो 
पसारा स्मृतींचा कधीही सरेना !!

निराळेच एकांत येतात भवती 
मनाचे मनाला न कळती इशारे  !!
अशा उंच विरहार्त उद्दाम लाटा 
बुडाले सुखांचेच सारे किनारे !!

____-----'''''__________हर्षल 






Thursday, September 17, 2015

ईश्वरास.....!!

देवा तुझ्या  सुरांचा शालीन स्पर्श दैवी
मज ईश्वरा घडू दे सत्संग याची देही !
आभास काम रुपी ध्यानी मुळी न वाहो
 हृदयात सत्यरूपी सद्धर्म स्थिर राहो !!

आनंद शुद्ध लाभो निष्काम प्रेम यावे
मोहांमध्ये न देवा आयुष्य हे सरावे
येवो तुझ्या पदांचे मज प्रेम नित्य भावे
जगणे तुझ्याच साठी देवा सदा घडावे !!

पापांस अंत नाही अनिवार काळ फिरतो
सरताच मोह ;मागे दु:खांध बोध उरतो !
उरती उरात आता त्या वेदना गताच्या ;
बुडतो अखंड आम्ही या सागरी भवाच्या !!

आश्वस्त ईश्वरा हो .सौजन्य शांतता दे !!
सन्मार्ग पंथ लाभो आशिष एवढे दे !!









Wednesday, September 9, 2015

आषाढ रंग !....!

आषाढ रंगुनी गेला
मेघांचे डोह वितळले 
क्षितिजांवर इंद्रधनुच्या 
रंगांचे तोरण सजले !!

रानांत वृक्ष मोहरले  
पांघरून हिरवे शेले !
ते उंच उदासीन मेरु 
हिरव्या रंगांत बुडाले !!

मातीचे अत्तर फुटले 
वार्यांना यौवन रंग !
पृथ्वीवर मुक्त उधळले 
ओलेसे गंध तरंग !!

ते सरितांच्या भवताली 
पाण्यात किनारे बुडती 
आकाश सोडूनी पक्षी 
झाडा झाडांवर निजती !!

हा उत्सव जलरंगांचा
धरतीच्या अंगांगांचा !
धरणीवर पाणी सजते !
जगण्याला जीवन मिळते

--------लेखन -हर्षल !





Monday, September 7, 2015

पलाश फुलले गर्द पेटुनी जेथे
त्या धुसर वाटा अजून स्मरतो आहे !
प्राजक्त तुझ्या हास्याने उमलत जेथे
त्या वळणांवरती जीव अडकला आहे !!

श्वासांत धुंद गवतांचे गंध जुने ते
हिरव्या वेळूंचे हिरवे उंच पिसारे
मेघांवर तोरण दूर सात रंगांचे
वर्षेचा उत्सव मनात अजुनी आहे !!

मावळे रान .......!!

मावळे रान मग दूर ;डोंगरापार
 सन्यस्त सूर्य  संध्येच्या जाता पार !!
डोळ्यांत उभे ;दूरचे दिवे ;एकाकी !
अंधारावरती श्यामल-नील चकाकी !!

वाहते संथ ;मंथित नीर ;भवताली
ह्या सरीतेवरही सांज ओतते लाली !
कुजबुजत्या वेली ; वारा बांधून सजती !
क्षितिजांवर उतरे विहंग रेषा नक्षी !!

मार्गांत कुठे ;दु:खात चूर
चालला कुणीसा जोगी 
बोलतो आर्त-जड सूर ;
प्रश्न काहूर त्यात बैरागी  !!

पूर्वेतून सूर्यसरींची 
होईल सखे सुरुवात !
शुक्राची चांदणवेळ 
संपून सरे मधुरात !!

एकांत तमाचा सरतो 
आकाश बदलता रंग !
काळजास सोडत नाही…
तव आठवणींचा संग !!


दिशा दिशांतून जागे 
कोवळा मंद  हुंकार !
भवताली माझ्या नादे !
अजून तुझा गंधार !!
  










Tuesday, September 1, 2015

पावलांत पाउल अडे ;दूरवर तरी चालणे
 अबोध क्षितीजांकडे रोजचे नवे मागणे  !!

कुठे सुखांचे देहमदांचे  मत्त पारवे
मनात हिरवट कधी भयाचे गुज आरवे !!
वाटा वाटा मूक कधी वैराण कधी वा !
कधी मखमली वळणा वरती सौख्य ताटवे !!

आकाशांवर सुर्य नाचतो कधी पेटता
कधी माथ्यावर  बरसत जातो चंद्र फिरस्ता !!
अन्धारांची उजाड राने कधी उगवती
दिसे त्यातही कधी विरागी वृक्ष एकटा !!