Saturday, September 19, 2015

सायंकाल !!!

पावसात सायंकाळी 
कमळांचे रंग तळ्यात !
डोहांवर अंधाराची
चन्द्र लाघवी बरसात !

झाडांचे माथे बुडती
क्षितीजांचे केशर गोफ
  वायुंवर चढुनी फिरतो
 कातर वेळेचा कैफ !

कोठून आर्त विजनाची
अदृश्य विराणी झरते !
पाऊलांखालची वाट
पाउलांत मिसळून जाते !

मेघांवर कर्ज कुणाचे ?
अवघडून खाली  झुकती !
वाळूंचे दीर्घ किनारे
सागरास सजवत बसती !!

तो दूर उंच व्याधाचा
एकाकी तारा जळतो
नक्षत्रांच्या किरणांनी
रात्रीचा उत्सव फुलतो !!

चंद्रावर दाटून येती
आडोसे घनमाळांचे !
रात्रींतून वाहत जाती…
निश्वास संथ दु:खांचे !!

---------'-----___-----__--- लेखन -हर्षल !!


No comments:

Post a Comment