Saturday, September 19, 2015

सन्यस्त !!!

ओलांडून गेला वेस सोडूनी संग 
अंगावर ओढून सूर्य-केशरी रंग !!
आभाळ-तळाच्या निळ्या सागराखाली 
चालला आक्रमित धरा पावलांखाली !!

सरितांचे शांत किनारे 
वृक्षांचे थोर पसारे !
मेरुंचे उंच मनोरे 
जलधींचे दिव्य पिसारे !
डोळ्यांत उतरले त्याच्या 
नि:संग सत्य सामोरे !!

थांबणे कुठे ना त्याला 
विश्रांती क्षणभर नाही !!
सन्यास आतबाहेरी 
अनोन्य तयाच्या वाही !!

हा जोगी कुठला कोण 
कोणासी शोधत जाई !!
कुजबुजती लोक अनेक 
परी कुणास ठाऊक नाही !!
 
मंदिरात वा मार्गांत 
पर्वतांत वा नगरांत 
तेवतो मनातून त्याच्या 
अखंडसा एकांत !!

देहाचे भान निमाले 
मायेचे बंध गळाले !!
प्राणाच्या गर्भामधले 
आकाश प्रकाशून गेले !

स्वानंद पसरला भवती 
योगी उरला ना योगी !
अनंत जागृत होती 
अंतरी सनातन ज्योती !!

तो असाच विझुनी गेला 
त्याच्याच समाधीपार  !
कोणाला कळले नाही 
योग्याचे जीवनसार !!

--__--__--__  लेखन __- हर्षल !!





No comments:

Post a Comment