Thursday, November 26, 2015

मुक्तचिंतन...!!

******* !मुक्तचिंतन …. "ईश्वर" !*******

अस्तित्वाच्या खोल गर्भात 
अनंत प्रश्नांच्या आत …
एक शांत उत्तर असावे 
परमेश्वर नावाचे !!

देहाच्या ज्वलंत विकारांतून ,
आणि अनिवार वाहत्या काळातून ,
सर्वत्र धडाडून उसळते अंध आवेश 
निराकार …. अनिर्व्याख्य !!
ह्यांचे आकार मोडून पडले कि 
मात्र  उरतात चिरंतन ज्योती !
हाच प्रकाश सनातन !!ईश्वरी !!

मोहांतून , भ्रमांतून , असहायतेतून ,
निर्माण झालेले वैश्विक महा मार्ग !
परस्परांमध्ये गुम्फलेले …. वर्तुळाकार !!
यांतून बाहेर अखंड उचलून नेणारे 
महान मोक्षदायक महात्मे !!
ईश्वरा तुझ्यापर्यंत नेणारे …. 
तुझेच अंश …!!
या जालीम कोलाहलात 
ईतके तरी आम्हाला दे !!
सन्मार्ग तरी चालायची बुद्धी दे !!

___________ हर्षल 

Saturday, November 14, 2015

किनारे असे  रंगती सांजकाली
 समुद्रातुनी वाहते सुर्य-लाली!
किती शुभ्र लाटा !उसळतात येथे !
शहारे सुखांचे उमलतात येथे !!

Sunday, November 8, 2015

या तुझ्या नेत्रांत सारा
प्राण माझा राहतो  !
मी तुझ्या नजरेतूनी ,
आता स्वत:ला पाहतो !!

वाच तू डोळ्यांत माझ्या
गीत माझ्या अंतरीचे !
आणि घे समजून जे
आहे मला सांगायचे !!

स्वप्न जे डोळ्यांत माझ्या
ते तुला समजेल का ?
ध्यास जे माझे ,तयांची
आस तुज लागेल का ?


--------'----'-हर्षल




Saturday, November 7, 2015

Ashich kavita !!

मी तमासम मग्न होता
चंद्र तू होऊन ये !
दु:ख माझे मुक्त करण्या
हास्य तू घेऊन ये !

प्राक्तनाच्या तप्त रानी
अडकता मी एकटा !
रोखण्या अश्रूंस माझ्या
साथ तू होऊन ये !!

सोडूनी जाता जगाने
मार्ग एकाकीच उरती !!
त्या पथांवर संग देण्या
प्रीत तू होऊन ये !!