"मंगल देशा पवित्र देशा " असे ज्या महाराष्ट्र भूमीचे वर्णन केले जाते , त्या या छत्रपतींच्या भूमीत १४ विद्या आणि ६४ कलांची उपासना फार प्राचीन कालापासून होत आलेली आहे। इथे महाराष्ट्रात संस्कृती धर्मा मधून बहरत गेली आणि माणसे संस्कृतीतून घडत गेली ।!
अशा या बहुरंगी संस्कृतीमध्येच अनेक मर्दानी खेळ आणि सुंदर लोककला निर्माण झाल्या …. लेझीम हा त्यातलाच एक मनोहर आविष्कार !!
खेळ आणि संगीत …ताल आणि ठेका …। नृत्य आणि कवायत …य़ा सगळ्याचा सुरेख संगम आपण लेझीम खेळताना पाहू शकतो ।!!
लेझीम साधारणपणे ५०० वर्षांपूर्वी सुरु झाली असावी असे काही पुरावे दाखवतात …एका काठीला जोडलेले
घुंगरू किंवा धातूच्या झान्झा असे मूळ रूप असावे !
आज मात्र आपण जी लेझीम पाहतो हे त्याचे रूप सुमारे १०० ते १५० वर्षापासून चे आहे ! लेझीम हा एकट्याने करण्याचा खेळ प्रकार नाही …. तर सांघिक आहे आणि सर्वानी मिळून एकत्र खेळण्यातच खरी मजाही आहे !!
लेझीम च्या खेळासाठी लागते ती फक्त एक पातळ लाकडी काठी आणि त्याला लावलेल्या ,मंजुळ आवाज करणार्या झान्झेसारख्या पातळ धातूच्या छोट्या गोल तबकड्या!!…इतक्या साध्या आणि लहान उपकरणामध्ये अफाट ताकद आहे …। ताल आहे … लय आहे …. पाहणार्याला आणि खेळणार्याला मंत्रमुग्ध करून टाकण्याची शक्ती आहे ……. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या खेळाला स्त्री पुरुष असा भेद नाही …. कोणीही , कितीही वयाचा व्यक्ती स्त्री वा पुरुष लेझीम खेळू शकतो !!
तर असा हा बहुरंगी लेझीमचा खेळ !…. या खेळात नाट्य , नृत्य , आनंद ,पराक्रम , कसरत , संघ भावना सारे काही आहे ……. आणि अगदी सोपे सांगायचे तर … या खेळात "मराठी संस्कृती " आहे …। "महाराष्ट्र "आहे … आणि म्हणून लेझीम प्रत्येक मराठी माणसाच्या " मनात " आहे ….! आणि कायमच राहील !!
----------------'------लेखन - हर्षल देशपांडे