*** वाणीची शुद्धता ( वाक्शुद्धी ) *****
वाचा किंवा वाणी स्वतंत्र असते .मन ,बुद्धी आणि वाचा व्यक्त करणारी इंद्रिये (मुख,जीभ ,गळा ईत्यादी ) या सगळ्यांतून ती व्यक्त होते.निर्मित होत नाही !
" चत्वारी वाक् पदानि.." ,.." ऋचो अक्षरे परमे व्योमन"... (-- ऋग्वेद अस्यवामीय सुक्त ,पुरुषसुक्त आदी ) , वाक्यपदीयम आणि उपनिषद आदी वेदांताच्या सिद्धांतावरून वाणी चार प्रकारची आणि स्वतंत्र संचरण करणारी देवता आहे !
आपण बोलतो ती वैखरी ....
अंतर्मनात वाहते ती मध्यमा ...
इंद्रिय सुषुप्तीत वाहते ती पश्यंति ..
आणि अनाहत अतिंद्रिय असते ती "परा" !
वाक्देवता ...शारदा .... सरस्वती ही ह्याच चतुर्पदीय वाणीची नावे आहेत !
याच वाणीला वेदादी शास्त्रान्मधे सरस्वती.. गौ ..आदी नावानी स्वरूप दिलेले आहे !
वाणीच्या चार पदांपैकी केवळ वैखरी ( म्हणजे आपण बोलतो ती ) एवढीच मर्त्य लोकात प्रत्यक्ष असते.नाद,ध्वनी ,स्तुती ,गायन ,कलह ,आक्रोश,
हास्य , दु:ख, रुदन (रडणे) ईत्यादी सगळे च्या सगळे मानवी व्यवहार जीवाच्या बुद्धी आणि मन व इंद्रियादी गोष्टींचे संस्कार घेउन ही वैखरी करत असते ! म्हणून वैखरी ही आपणास अत्यंत महत्वाची होय !
ही वाणी व्यक्त होताना बुद्धीचे विचार वा विकार आणि इंद्रियांचे संस्कार घेऊन मुखातून बाहेर आणि आत गमन करते ! इंद्रियांचे विकार आणि बुद्धीचे व मनाचे विचार याचे वहन करताना वाणीवर काही दोष अथवा गुण लिप्त होतात ! मनुष्य जिवंत असेपर्यंत वाणी या गुण वा दोषाने लिप्त होऊन राहते व स्वत:ला व्यक्त करते !
वाणी दुषीत अथवा कुपित होते तेंव्हा कलह,विभ्रम ,भय ,जिव्हा-कंपन, दंभ आणि वागिंद्रिये अनावर करणे असे अनेक प्रभाव मनुष्यामधे उत्पन्न होतात !
साध्या भाषेत सांगायचे तर आपण म्हणतो ना
" एखाद्याचे तोंड अफाट आहे वा अमुक एकाच्या बोलण्यावर नियंत्रण नाही ईत्यादी.." वाणी दूषित वा कुपित झाल्याचे ते प्रभाव असतात !
अज्ञान, अहंकार ,मद ,मत्सर,दंभ,क्रौर्य,बुद्धीहीनता आणि लोभ या जीवातील बुद्धी व मनोजन्य विकारांच्यामुळे वाणी प्रथमतः दूषित व नंतर कुपित होते आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून ती मन आणि बुद्धीवर प्रतिघात करते ! विभ्रमीत,वाटेल ते बोलणारी ,अनावर ,बेधुंद आणि आचरट बडबडणारी माणसे हा त्याचा प्रत्यक्ष पुरावा होय !
मानसिक विकार आणि वाणी विकार असे दोन परस्पर पूरक विकार सनातन शास्त्रवर्णित आहेत !
मनाच्या असंस्काराने वाणी दूषित होते आणि कुपित (क्रोधीत/पीडीत ) वाणीमुळे मन कंपायमान वा विभ्रमीत होते ! ......अज्ञानामुळे माणसाला वाटते आपण जे बोलतो ते आपल्या शक्तीने ! यातले रहस्य असे आहे की वाणी माणसाची नसते तर फक्त व्यक्त झालेले विचार आणि व्यक्त करण्याची इंद्रिये त्याची असतात ! हा अक्षय ईश्वरी सिद्धांत आहे ! वेद वेदांत आणि स्मृती व पुराणांत याची अनेक प्रमाणे आख्यानरूपात आहेत .
म्हणूनच प्रत्येक मनुष्याने वाणीचा आदर करून संस्कारपूर्वक व संयमाने तिचे वहन केले पाहीजे !
वाणीचे दोष जाण्यासाठी ईश्वरीय संधान आणि जप व सत्संकार आदी गोष्टींची बुद्धीपूर्वक व धर्ममान्य विधीनुसार संगत करावी ! वाणीचा दोष अनेक महादोषांपैकी एक आहे ! तो लागला तरी कळत नाही इतका समजायला सूक्ष्म आहे ! आणि बहुतेक सर्वत्रच हा दोष आहेच ! अत्यंत सदाचारी व जितेंद्रिय महापुरुष सोडले तर बाकी मर्त्य मानवांचा या दोषामुळे लिप्त असा व्यवहार सर्वत्र पहायला मिळेल ! कलियुगात तर विचारायलाच नको !!
अर्थात या वाग्देवतेची योग्य उपासनेने कृपा प्राप्त करणे व वाणी शुद्धता राखणे याकडे आपण लक्ष देणे अत्यावश्यक !
वाणी अनुत्पन्न वा सनातन देवता आहे !ती कुपित होऊन आपले अकल्याण न करो अशीच प्रार्थना शास्त्रे मानवाला शिकवतात !
" महो अर्ण: सरस्वती .. प्रचेतयति केतुना !
धी: यो विश्वा विराजति ! ( ऋग्वेद १ मंडल )
(महान विस्तृत सरस्वती जी बुद्धीला चेतन करते;
ती समस्त विश्वात विराजत आहे तीचे ध्यान स्तुत्य आहे )
म्हणून समर्थ लिहितात
" नमू शारदा मूळ चत्वार वाचा "
ज्ञानेश्वर माऊली लिहितात
" ती अभिनव वाग्विलासिनी ..नवनवोन्मेषशालिनी ..नमिले मियां !!
( संदर्भ : ऋक यजु साम वेद , स्मृती व उपनिषदे )
--्---्-- अस्तु लेखनसीमा --्-
--्---्---्--- हर्षल !!!