Saturday, May 25, 2019


**** महामंथन*****-

संदर्भ न देता भरून आलेले संध्यासमयीचे आभाळ बघत पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणाऱ्या माझ्या अविश्रांत नजरेतून एखादा काळाभोर मेघ चुकून
सुटका करून पसार होतो ...!!
मी जरासा वळून, तो दक्षिणपंथी कृष्णमेघ कुठे दिसतोय का ते पाहातोय ..... एवढ्यातच ...सूर्य बुडाल्याचा डंका पिटत अंधाराचा पहिला निळाशार सोनेरी मुलामा अवकाशात पसरतोच !! ....
एक प्रकाशावर्तन संपून सृष्टीचे रात्रमंथन सुरु झालेले असते !
पर्वतांच्या रांगा मस्तकावर सन्यस्त रंगांचे अनाकलनीय मुकुट
घालून बसतात ! समुद्रांच्या लाटा दूरदूरच्या अज्ञात प्रदेशांतून अंधार वाहून आणतात .... ! गंभीर नाद आणि हलणारा अंध:कार !! ... उधळलेल्या मृगांसारखा खुळावलेला वारा यांचा मदतनीस होतो !!
चंद्राचा पंथ उजळायला सुरुवात झालेली असते बहुदा !!
मी या दृष्यमान निसर्गचित्रात जखडून जातोय ....अलवार पणे !!
... संधीप्रकाश हीच संधी शोधत असतो ... ! काळजात झिरपायची ... !! आणि तो पाझरतोच ... !! मनाच्या मूक असंख्य फटींतून ... सांदीकोपऱ्यान्तून !! अनंत स्मृतींच्या अनिवार जंजाळांतून !! ... खोल दरींच्या तळाशी पहुडलेल्या सर्पाला काबीज करण्यासाठी अत्यंत वेगाने झेपावत जाणाऱ्या वैनतेयासारखा !!

अखेर .... !! गरुडाला सर्प गवसतोच !! मनाची कवाडे उघडतात ! काय अंतर्यामी  जाते ; काय उत्सर्जित होते ... त्याचा नक्की हिशेब मनाला देखील कळत नाही !
एक मात्र निश्चित .. की ,
बाहेर शांततेचे जयघोष असतीलही कदाचित ,
परंतु आत ... मनोमय महासागरात ,विस्तीर्ण मंथन सुरू झालेले असते !!
..... हा काही सामान्य चमत्कार नाहीच !!

--्---्---्---्- लेखन --्- हर्षल