Monday, November 18, 2019

ऋणानुबंध !!

***** ऋणानुबंध  ******

बऱ्याच मोठ्या कडकडीत दुष्काळानंतर ... अश्राप श्रावण सरींचा वर्षाव संपूर्ण धरती भिजवून टाकताना, ते दृष्य पाहून जसे मन भरून येते ....! ... तसेच आयुष्यात काही जुन्या ओळखीतली माणसे अगदीच अचानक भेटल्यावर वाटत राहते ..... !  कारण या साऱ्याच्या मध्ये प्रचंड काळ वाहून गेलेला असतो !
खरे म्हणजे इतक्या काळानंतर त्यांची व आपली ओळख आणि आठवण दवाने झाकलेल्या काचेसारखी धूसर झालेली असते ! आणि मग अचानक ही खुप जुनी माणसे चंद्रासारखी उगवतात आणि आठवणीतले आकाश पुन्हा एकदा लख्ख उजळून जाते !
जुने स्मृतींचे सांधे जुळायचा प्रयत्न करू लागतात ...! सरलेला काळ जिवंत होतो ! ...
..... सरत्या वयाचे भान येते ... गताची हुरहुर लागते ..आयुष्यावर एक उगाच क्षणाचा पीळ बसतो ...पायाखाली पुढे बघत चालणारी नजर अकस्मात मागे वळते आणि लांबवर मागे पसरलेले रस्ते आणि मिटून गेलेली काळापल्याडची जुनी क्षितिजे दिसतात !!

..... खुप जुने लोक भेटले की काळजाचा कुठलासा वेळेने बंद केलेला कप्पा अचानक उघडला जातो ! ... मग पुढे बरेच दिवस.. या जादूच्या कप्प्यातून स्मृतींचे आणि स्मृतींत दडलेल्या आपल्या त्या वेळच्या अस्तित्वाचे नवीन नवीन बोध मनावर स्वार होत राहतात ! ..

.... हा चमत्कार काही सामान्य नव्हे !!

--्---्---्--- हर्षल --्-*

No comments:

Post a Comment