Monday, July 20, 2020

मुंबई आणि मी

खरे सांगायचे तर हे असे शीर्षक देण्यासाठी मी अमेरिकेत जाऊन आलेला कोणी NRI नाहीये !
!...आम्ही डोंबिवलीकर ! अमेरिका सोडाच proper मुंबई ला सुद्धा आढेवेढे घेत जाणारे आम्ही !
काही गोष्टींशी बंध जुळत नाहीत म्हणतात ना !तसेच !
ठाण्याच्या पुढे क्वचित आणि दादरच्या पुढे तर हाताच्या (ते सुद्धा एकाच ) मोजता येईल एवढ्या वेळा जाणारे आम्ही ! आमच्या चरणांचा स्पर्श CST ला मोजून मापूनच झालाय ! (मुंबईचे भाग्य चांगलेय बहुदा ) .
2015 साली आमच्या काही गणेशभक्त प्रोफेसर सहाध्यायी juniors ने लालबागच्या राजाला जायचा प्लॅन केला होता ! मी तिथे आजवर एकदाही गेलो नाहीये हे त्यांना कळल्यावर मी किती अजाण आणि पापी आहे या विचाराने त्या माझ्याकडे पाहत होत्या ... निदान तसे दाखवत तरी होत्या ! "हर्षल sir ,तुम्ही नक्की अजून गेला नाहीयेत लालबागला ? आम्ही दर वर्षी एक एक दिवस लाईन लावून का होईना पण जातोच जातोच ! " यासारखी टकळी चालवत मला लालबागला घेऊन जाताना ...देवाने या मनुष्याला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना ही त्या बायांनी केली असावी ! असो अर्थात तिथला बाप्पा फारच मनोरम असला तरी एकंदर गर्दी आणि घामाघूम अवस्था अनुभवल्यावर ती पहिली आणि शेवटची वारी असेच मी ठरवले !

     मुंबई मला का कोण जाणे नेहमीच दुरून चांगली वाटत आलेली आहे ! एखाद्या क्षितिजापल्याडच्या अप्राप्य  सुंदरीने लांबून सस्मित वदनाने पहावे तशी मुंबई मला लांबून पाहत हसत असते ! का कोण जाणे पण तिच्या आत फिरताना कुठलेतरी वेगळेच स्वर आणि काळ आतून उभे राहतात ! ब्रिटिशांची देखणी बांधकामे ..
पारशांची हॉटेले ,मराठी जुन्या खानावळी आणि वेगळेच architecture .... स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा सगळा गोतावळा आणि हजारो रंग या मुंबईने अंगावर बसवले आहेत ! श्रीमंतीची मिजास आणि गरिबीतली भीषणता एकत्र हिंडते इथे ! त्यात बोरीबंदर वेगळे ...पार्ले वेगळे ...वांद्रे (सॉरी bandra) वेगळे ...nariman वेगळे ,चर्चगेट वेगळे ,झावबाची वाडी वेगळी आणि 7 बंगला वेगळे ...किती काय आणि किती काय ! पण शेवटी ती मुंबईच !!
माटुंग्याला मुंबई चालू होते रे  असे प्रॉपर मुंबईकर म्हणतात ....पण यात सुद्धा विभागवार यादी आहे ! मुलुंड पासून बृहन्मुंबई सुरु असे BMC म्हणते !
"Lower परळ गेला की म्हमई स्टार्ट "  असे गुज्जू भाऊ म्हणतात ! 'गोरेगाव पासून अंधेरी ला मुंबईच समजतात बरं का '.... असे तिथले प्रेमळ लोक बोलताना मी ऐकलेत !
मुंबई मुंबई काय  रे ...कर्जत संपले कि पुढे तुमची मुंबई, असे पुणेकर म्हणतात !
"खरी मुंबई शिवाजी पार्क ते नरिमन आणि दुसरीकडे हिंदू कॉलनी पासून गेट वे " एवढीच असे एका चहा टपरीवर एका विद्वानांचे ऐकलेले विधान !!
 
  अर्थात मी सेंट्रल रेल्वे च्या नकाशाला प्रमाण मानून दादर च्या पुढे अस्सल मुंबई लागते एवढे काय ते ज्ञानामृत प्राशन करून मोकळा झालेलो आहे !
VJTI मुळे माटुंगा पाहिले आणि तेवढ्यासाठीच माटुंगा slow ट्रेन ने बरे कि फास्ट या अभ्यासापायी दादर वगैरे वाऱ्या केल्या तेवढ्याच !
IIT मुळे पवई दर्शन झाले आणि कांजूरमार्ग नामक वरून वरून अतिसामान्य वाटणाऱ्या station ला पण IIT मुळे glamour आलय ते मान्य करावे लागले !

कुर्ला.. सायन ...यांच्या फक्त पाट्या बाहेरून बघितल्या ! आत काय असेल ते बघायचा योग आला नाहीये ! सॅण्डहर्स्ट रोड नामक station ही राहण्याची किंवा उतरण्याची जागा असेल असे अद्याप नक्की खात्रीने सांगता येत नाही !
मस्जिद, भायखळा बाजारासाठी आणि आता CSMT येणार या खुणेसाठी माहितीयेत !
मुंबई बद्दल भरभरून बोलणारे लोक मला आवडतात !
विशेषतः सफाईदार पणे जेंव्हा ते मुंबईतले पत्ते आणि रस्ते मला सांगत असतात तेंव्हा " अजि म्यां ब्रह्म पाहिले " अशी माझी अवस्था होते !
    " ऎक ना , DN road वरून चालत पोचशील रे "
"Xaviers वरून तीन सिग्नल सोडले कि आलेच आपले destination "
"माऊंट mary ला  जायचा सोपा रस्ता सांगू ?"
" fountain आले कि उतर आणि मग सरळ चालत जा "
"Dockyard road आणि highway junction ला गेलास तर जवळ पडेल "
"क्रॉफर्ड ला पोचलास कि कॉल कर "
"बेस्ट पकड आणि nehru science ला उतर "
" BKC ला भेटणार का ?"

असे अनेक प्रश्न विचारणारे मला भेटतात ! तेंव्हा काहीही कळत नसले तरी माझा उर भरून येतो !
....मुंबईच्या दोन गोष्टी तरी मला आवडल्यात ...तिथली माणसे ! आणि कीर्ती कॉलेजवाला आणि "आराम"चा
वडापाव !!

अस्तु लेखनसीमा !!


------------ लेखन -- हर्षल !!