ईश्वराचे ऐश्वर्य आणि सतचिदानंद सनातन स्वरूप व्यक्त करण्याची परा विद्या आणि वस्तुजातादी प्रपंचमूलक अपरा विद्या हे प्रधान स्वरूपाने व्यक्त करणारे वेद -श्रुतिसारमूलक उपनिषदे आणि तदनुषंगाने येणाऱ्या समस्त दर्शन /स्मृती /पुराणे आणि इतिहासादी या सर्व सनातन धर्माच्या शास्त्रजनीत अपौरुषेय आणि मनुर्भव अशा एकूण एक साहित्याचा परामर्ष कसा आणि कोणत्या उपाय वा भूमिकेने घ्यावा याचा विचार प्रथम वा प्रधान असेल!
वेदादि शास्त्र मंत्रबद्ध आहेत...! त्यांचे भाषांतर आणि भाष्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत!
भाषांतरा मध्ये : पद संबंध,संस्कृतजन्य वा छंद जन्य शब्दार्थ,पदावली,काळ कर्म आदी क्रियान्वय यांचा समावेश होतो!
भाष्यामध्ये : स्वरदर्शन / मंत्र पदार्थ / देवता /मंत्र विनियोग /शब्द वा वाक्य पदक्रम आणि मंत्राचा प्रस्फुरीत अर्थ आणि त्याचे सामर्थ्य आणि क्रिया किंवा मंत्रतथ्य-दर्शक परंपराप्राप्त सत्यानवेषक भौतिक वा अभौतिक ज्ञान यांचा समावेश होईल!
भाषांतर हे सामान्य पदान्वयाने आधी करावे लागते तदनंतर धातू -पद -छंद -देवता -योगिक अनुमान इत्यादी आधारावर भाष्य केले जाते.
वेदांची महती : निःसंशय वेद हे स्वयंप्रमाण आहेत . सनातन धर्म ज्यातून उद्गमित होतो त्या मंत्र-शब्दबद्ध -अनश्वर आनुपूर्वी घटीत -अपौरूषेय -ईश्वरी सहजसंभवनिश्वासवत- सूत्रबद्ध मूलज्ञान राशीला वेद असे म्हंटले जाते.
वेदांची उत्पत्ती वा नाश होत नाही . ते सनातन असतात. (अर्थातच सध्याच्या संशोधकांच्या वेदोत्पत्ती च्या कुठल्याही कालनिर्देशक तारखा निःसंशय अवैध आणि असत्य आहेत. वेदांची उत्पत्ती अमुक काळी अमुक ऋषींच्या वा माणसांच्या मुळे झाली असे कोणतेही विधान सनातन वेद /पुराणादी परंपरेत किंचित मात्र ही नाही ) सनातन भारतीय परंपरेतील एकूण एक दर्शने , ब्रह्मसूत्रे ,यच्चयावत स्मृतीग्रंथ ,व्याकरणादि वा रामायण महाभारतादि ग्रंथ आणि समस्त अपरा विद्यांचे ग्रंथ (आर्ष वा अनार्ष ) एकमुखाने वेदांचे प्रामाण्य आणि अधिकार हा सर्वोपरी आणि ईश्वरीयच मानतात.कुठल्याही भारतीय परंपरेच्या सनातन साहित्यात वेदांची अमुक काळात क्रमश: केलेली निर्मिती अथवा मनुष्यकृत वेदरचना असा एकही उल्लेख नाही आणि असणे संभव देखिल नाही.
वेदांचे दोहन वा सर्ग प्रारंभी प्रकटन कसे होते त्यावर स्पष्ट उल्लेख :
अग्नेर्वा ऋग्वेदो .. सूर्यात सामवेदो ... वायोर्यजुर्वेदो ! (अग्नीपासून ऋग ... सूर्यापासून साम ... वायूपासून यजु:)
मनुस्मृती :(अध्याय १)
१) अग्निवायुरविभ्यस्तु त्रयं ब्रह्म सनातनं !
दुदोह यज्ञ सिद्ध्यर्थं ऋग्यजुसामलक्षणं !
अर्थ: ब्रह्माने अग्नी ,वायू ,रवि यांपासून (तिघांपासून) सनातनअशा ऋग -यजु -साम लक्षण (छंदोबद्ध रचना ) यांचे दोहन केले. (त्यांतून प्राप्त केले = extraction )
२) तेने ब्रह्म हृदाय आदि कवये मुहयंती यत् सुरयः !-- श्रीमतभागवत (१:१)
अर्थ : त्याने (ईश्वराने )आदीकाळी मनीषी असलेल्यांच्या (ऋषींच्या वा कवींच्या ) हृदयात वेद रूप ब्रह्माची स्थापना केली
३) ऋषयो मंत्र दृष्टारः ! मंत्रान सम्प्रादू ! ( निरुक्त -यास्काचार्य )
(अर्थातच ऋषींना मंत्रद्रष्टा म्हंटले जाते ... मंत्रकर्ता नव्हे !)
वेद मंत्रांचा कर्ता कोणीही मानव नाही - हाच सनातन स्पष्ट सिद्धांत आहे )
* वानगीदाखल एवढीच उदाहरणे दिली आहेत ...विस्तार पूर्वक अनेक ग्रंथांतरीचे विवेचन मूळ ग्रंथात करण्यात येईलच
मंत्रभाष्यम -उदाहरण मंत्र :
ऋग्वेद मंडल 1 सूक्त 1 मंत्र 1 /
अष्टक -अध्याय-वर्ग -संहिता वर्गीकरण (१:१:०१:०१)
०१:००१:०१ (मंडल :अनुवाक :ऋ.संहीता )
वेद – ऋग्वेद
ऋषी – मधुच्छंदा- वैश्वामित्र ( हि गोत्रवर्ग नामे मंत्र कर्ता म्हणून नसून - मंत्रद्रष्टा म्हणून आहेत आणि हिरण्यगर्भ असा जो ब्रह्मदेव त्या ब्रह्माच्या पुढील मानवोत्पत्तीतील ऋषीकुळाची आहेत -- परंपरेने ती सनातन आहेत - अन्य काही ठिकाणी त्यांचे विलग योगिक अर्थ देखिल दर्शवले जातील )
देवता –अग्नि ---( मंत्राचे स्वरूप ज्या देवतेच्या नामाचा आणि स्वरूपाचा निर्देश करते त्यास "मंत्र देवता" म्हणतात . ( जसे : अग्नी- इंद्र आदी )
छंद – गायत्री (२४ वर्ण -प्रतिमंत्र ) {- वर्ण : ब्राह्मण - आद्य सृष्टी उत्पती छंद }
मंत्र :
अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विजं॑ ।
होता॑रं रत्न॒धात॑मं ॥
(दीर्घ / उदात्त आणि अनुदात्त /लघु /ऱ्हस्व स्वर दर्शन )
मंत्र पद : - (ओम् ) १. अग्निमीळे २. पुरोहितं ३. यज्ञस्य ४. देव ५. ऋत्विजं |
६. होतारं ७. रत्नधातमम् ||
पद पाठ : अ॒ग्निम्। ई॒ळे॒। पु॒रःऽहि॑तम्। य॒ज्ञस्य॑। दे॒वम्। ऋ॒त्विज॑म्। होता॑रम्। र॒त्न॒ऽधात॑मम् I
पदरचना : अग्निम इडे -पुरोहितम- यज्ञस्य-देवं -ऋत्विजम
होतारं -रत्नधातमम्!
अक्षरबोध/वैयकरणम : (तम) अग्निम (अहं =कर्ता भाव लुप्त) इडे, (यं) यज्ञस्य पुरोहितम् (च ) देवऋत्विजम (ऋत्विजम देवानाम)(च )हॊतारम (देवार्थे यज्ञस्य च )रत्न धातमम (इति )
भाषांतर पदअन्वय : य: देवानाम ऋत्विजो तथा च यज्ञस्य पुरोहित: तथाच हो्ता: (यज्ञस्य) च रत्नधातम: च ! स : अग्नि:! तम् अग्निम इडे!
शब्दार्थ भाष्यम :
-----**- हर्षल