"चौथ्या रांगेतली ती कोपऱ्यातली गोरीपान बुटकबैंगण गोडुली दिसतेय का?"
कोण आहे रे ती?...
"माझी होणारी बायको ! "..
स्वतःच्या होणाऱ्या बायकोची ओळख ज्याने (त्याच्या लग्नाच्या 1 वर्ष आधी,अनाहुतपणे माझी आणि त्याची सिनेमा थिएटरात इंटरवल मध्ये भेट झाल्यावर)अशा पद्धतीने करून दिली होती,त्या परमेश्वराच्या अप्रतिम निर्मितीचे (त्याच्या )आई वडिलांनी ठेवलेले नाव "शैलेश" असे असले तरी ते केवळ कागदोपत्री आहे....! त्याचे जनसमुदायातील सर्वमान्य नाव हे,एका तडकलेल्या वडापाववाल्याने चार चौघात आम्हा मित्र मंडळींसमोर त्याची वयाच्या 16व्या वर्षी लाज काढत "ऐ,टवक्या,रोजचे चार वडापाव उधारिवर खाऊन वर टेस्ट नाय म्हणून नावं ठेवतोस काय रे सुकड्या?"....या सुख- संवादानंतर "टवक्या" असे पडलेले आहे ते यावदचंद्रदिवाकरो असेच असेल !
टवक्या अत्यंत अभ्यासू होता व अजून आहे! आमच्या मित्रमंडळीत (किंवा जगातही) अशी व्यक्ती एकमेवाद्वितीयच आहे!माधुरी दीक्षित नुसतीच हसली तरिही जीवघेणी कशी दिसत होती त्यामागचे नक्की कारण काय ? किंवा रविना (तंदन) जुही आणि श्रीदेवी पेक्षा नक्की कोणत्या अंगभूत गुणांमुळे जास्त 'कातिल' दिसते?, तेंडुलकर ला फोर्थ डाउन किंवा डायरेक्ट लास्टलाच ब्याटिंग ला पाठवणे कसे हितकारक ठरेल?,गांगुली ला मी स्वतः (म्हणजे 'टवक्या') एकाच बॉल मध्ये कधीपण कसापण कसा आऊट करू शकतो? इत्यादी विषयावर तर त्याने ग्रंथ लिहिले पाहिजेत असे आमचे स्पष्ट मत आहे !
टवक्या अभ्यासात मध्यम दर्जाचा आहे.55 ते 65 % यामध्ये त्याने 8वी पासून 12वी पर्यंत सगळे वर्ग पसार केले आहेत.( नुसते पांडासारखे 85/90% मिळवून काय होणारे..अक्कल कुठे टक्क्यावर अवलंबून असते का?- इति टवक्या ( यातले पांडा हे त्याने मला दिलेले उपनाम आहे )!असो!)
टवक्या तीन गोष्टीत मास्टर आहे..
1.दुसऱ्याला विनाकारण अक्कल शिकवणे
2.आचरटासारखे वडापाव खाणे तसेच रस्त्याच्या कडेच्या स्नॅक्स च्या टपऱ्या हुंगत रमतगमत हिंडणे (व वाटेल तसे खात राहणे)
3.जगाबद्दल आणि विशेषतः सुंदर मुलींबद्दल भलत्याच कल्पना असणे व त्या इमाने इतबारे दुसऱ्याच्या गळी उतरवणे!
No comments:
Post a Comment