Saturday, October 8, 2011

मी -एक खवय्या ..!!

रसमलाई!!
"जास्त खाल्लस ना तर नरकात जाशील ;रेड्या.."..माझा मित्र मला म्हणत होता...पण त्याकडे दुर्लक्ष करून मी दहावा रसगुल्ला मक्ख्खपणे तोंडात सारला..!!..आणि वर "आईस्क्रीम ;कुठे दिसतंय का बघ रे"अशी एक सहज उपसूचना करून अकराव्या रस्गुल्ल्याकडे मोर्चा वळवला ...!!..एका मित्राच्या लग्नातली हे सत्यकथा..!!
        जास्त खाल्ल्याने माणसे नरकात जातात का ह्यावर मौलिक विचार करून मी अशा निष्कर्षाला पोहोचलो कि कदाचित नरकात खूप विविध पदार्थांन्ची रेलचेल असेल आणि यम व त्याचा रेडा आणि इतर सेवक वगैरे यांना ते अन्न संपवायला खादाड आणि बुभुक्षित [काही जण मला ह्याच नावानी बोलवत असतात]. माणसांची गरज असेल..म्हणून त्यांना खास बोलावून घेत असावेत....!!..काहीही असो..सध्या जिवंत असेपर्यंत असल्या मरणोत्तर गोष्टींत उगाच नाक खुपसल्याने काही फायदा नसतो..त्यापेक्षा तेच नाक उत्तमोत्तम पदार्थांचा सुवास घेण्यात कामी येते...!!
..मी रूढ अर्थाने खादाड नाही...[काही लोक वाट्टेल ते वाट्टेल तसे खात असतात...आमी तसे नाय!!]
परंतु "जे जे उत्तम ते ते हादडावे ;नंतर खावे चूर्ण वगैरे !!"..असा माझा निखळ दृष्टीकोन आहे..!!
इतके असून मी पूर्ण शाकाहारी आहे...अगदी कट्टर...!!..मुळात चव हि मसाल्यांस असते मासांस नव्हे...मग उगाच प्राणी का मारा?..असे मला वाटते ..!!..असो..आणि शाकाहारात काही कमी वैविध्य आहे का?...
एकट्या पोळीचेच कितीतरी प्रकार मीच चापले आहेत...साधी पोळी ;खव्याची पोळी;तेल पोळी;पुरण पोळी;शिर्याची पोळी;रोट्या;फुलके;नान;पराठे...अनेक!!...भाकरी हे आद्य रूप..त्यात ज्वारीची;बाजरीची ;नाचणीची;तांदुळाची ;कळणीची..असे कितीतरी सशक्त प्रकार..!!..पुन्हा थालीपीठे आहेतच..म्हणजे भाजणीची;ज्वारी आणि भाजणी घालून केलेली;वेगवेगळी पीठे एकत्र करून कांदा घालून  अथवा न घालता केलेली;कणिक आणि भाजणी;किंवा नुसत्या कणिक अन ज्वारीची.....!!...यावर भरीस भर म्हणून पोळी किंवा भाकरीचे एक चुलत घराणे आहे...ते म्हणजे डोसे किंवा घावनाचे..आम्बोल्या वेगळ्या ;डोसे वेगळे;..त्यात परत पिठान्प्रमाणे आणि मसाल्यांप्रमाणे अनेक प्रकार ...असे नाना तर्हेचे जिन्नस बनवले का गेलेत ??..खाण्यासाठी !!
..पण इथे एक गोष्ट नमूद केलीच  पाहिजे.. कि खाणारा माणूस चोखंदळ असायला हवा..उगाच "मी पाच किलो  भेंडीची भाजी खाल्ली ;चहाबरोबर टोप भर भात खाल्ला किंवा कालचा भात सकाळी फोडणीचा करून संपवला "वगैरे फालतू गोष्टी ह्या खाणे ह्या सदराखाली मोडत नाहीत...त्याला पाहिजे तर उदरभरण म्हणता येईल..!!
...मी खूप खातो असा आरोप करणारे लोक जेंव्हा माझ्या आसपास असतात तेंव्हा तर मी जास्तच आचरटासारखा हादडत असतो...व त्यांची जिरवतो..[व नंतर त्याचे परिणाम निधड्या छातीने भोगतो]...तिखट आणि गोड असा भेदभाव मी करत नाही...फक्त ते योग्य मौसम बघून खातो..!!
आईला आपली  सगळी मुले सारखीच तसे मला गोड आणि तिखट सारखेच..!!पण म्हणून ते वाट्टेल तेंव्हा नाही..!!...गणपतीच्या पहिल्या दिवशी सुग्रास मोदक [न मोजता][उकडीचे]..[साजूक तुपाचे थरच्या थर घालून ]...दसर्याला पुरणपोळी [पुन्हा प्रचंड प्रमाणात साजूक तूप ओतून]..किंवा आम्रखंड किंवा श्रीखंड ;होळीला पुन्हा पुरणपोळी;नारळी पौर्णिमेला सुग्रास केशर घातलेला साखर भात [तूपाचे डाव वर ओतून]...दिवाळीत रव्याचे किंवा बेसनाचे गरगरीत लाडू;अनारसे;शंकरपाळ्या ;लग्नसमारंभात गुलाबजाम्बू[काही मूर्ख लोक याला गुलाबजाम असे म्हणतात..पण त्यात मजा नाही];रसमलाई;रसगुल्ले;अंगूर मलई;विविध मिठाई;काजू कतल्या ईत्यादी...हे सगळे त्या त्या वेळीच शोभा देते...!!..आणि मी त्यावर त्या त्या वेळी तुफान ताव मारत असताना विविध लोकांनी पाहिलेले सुद्द्धा आहे..!!...
   तिखट खाण्याचे प्रकार अनेक आहेत...अगदी वांग्याच्या झणझणीत रस्श्यापासून ते नाशिकच्या मसालेदार चीव्ड्यापर्यंत...जिभेला सुरसुरी आणणार्या चटकदार भेळेपासून ते अगदी ठाण्याच्या मामलेदाराच्या लालभडक मिसळी पर्यंत ....पुन्हा त्यात काही घरगुती प्रकार येतात..म्हणजे नुसते मोड आलेल्या मटकी किंवा मूगामध्ये तिखट ;मीठ टाका मस्त डिश तयार...किंवा कच्च्या पातळ पोह्यामध्ये तेल [कच्चे];तिखट ;मीठ ;गरम मसाला आणि किंचित साखर व दाण्याचा कूट टाका ..फुल टाईमपास तयार..!!....परत चटकदार कांदाभजी ;मिर्चीभजी;बटाटाभजी...मिर्च्यांसोबत आहेतच..!!..वडे आहेत;सामोसे आहेत ;रगडा-पाव असतो;वडाउसळ असते...सगळे आहे!!..पण खाणार्याला अक्कल पाहिजे कि कुठे आणि कसे खावे....उदाहरण देतो  :..थंड निस्तेज वडे आणि उगाच कोणी खात नाहीये म्हणून मरगळून पडलेले पाव मी खात नाही...वडा मसालेदार ;गरम आणि कुर्कुर्रीत असावा..[हीच अट साध्या डोश्यालाही लागू पडते ]..पाव नरम ताजा हवा..शिवाय योग्य पद्धतीने तळलेल्या तरीही हिरव्या दिसणार्या मिरच्या ;लाल तिखट चटणी ;ठेचा ;आंबट गोड चटणी हे सगळे अनलिमिटेड व उत्तम प्रकारे उपलब्ध असावे....मग वडापाव खायला मजा येते..ती खरी...!!..तर असे विविध तिखट पदार्थ आधी परीक्शावेत आणि मग वाट्टेल तसे खावेत..!!
तिखटामध्ये जसे अनेक नियम आहेत..तसेच ते गोडालाही आहेत...!!
जसे पुरणपोळी दुधाबरोबर चांगली लागते ..पण एकवेळ दूध नसेल तर क्षम्य आहे..पण साजूक तूप नसेल तर त्या पोळीला शून्य किंमत आहे....साजूक तुपाशिवाय पुरणपोळी म्हणजे आईबापाशिवाय मुलगा..किंवा
ढगांशिवाय पाउस..!!..साजूक तूप ईज मस्ट..!!..आणि यातही एक सूचना अशी कि साजूक तूप नुसते आहे असे भासायला नको...तर अक्ख्खी पुरणपोळी त्यात मस्त भिजून गेली पाहिजे..उगीच चमचाभर तूप टाकणार्या अर्धवट माणसांनी जेवायला बोलावले तर खुशाल जाऊ नये..!!पुरणपोळ्यानबरोबर मी तुपाचा डब्बा फस्त केल्याचा इतिहास आहे..उगीच पुराव्यांशिवाय आपण बोलत नसतो!!
तीच गत गुलाब्जांबू किंवा रसगुल्ले किंवा मिल्क शेक किंवा मिठायांची.....असले अमोल पदार्थ खाताना [पहिल्यांदा दर्जा चेक करून]..मी इकडे तिकडे पाहत सुद्धा नाही...उगाच दृष्ट लागायची!!..लग्नात सोन्यासारखे महागडे गोड व मलईदार पदार्थ असताना ..काकड्या नाहीतर पापड किंवा नुसताच पुरी भाजी आणि भात खाणार्या मानावान्बद्दल मला अपार करुणा आहे...असे दिव्य गोड व उत्तम पदार्थ असताना मी बाकीचे सगळे वजा करून फक्त मिठाया आणि रसमलाई वगैरे तगड्या पदार्थांना पानात ठेवतो आणि पुरी ;भात;चटण्या ;पापड वगैरे फालतू सुकड्या मंडळींना एका फटक्यात [पोटात]हद्दपार करतो...!!..
..खूप लिहिता येईल...पण जागा आणि वेळ कमी आहे...!!..जास्त वेळ लिहिण्यात दवडण्यापेक्षा खाण्यात सत्कारणी लावला तर जास्त कल्याण होते ..असे माझे ठाम मत आहे..!!.असो .कळावे ...लोभ असावा...व छान जेवण केलेले असल्यास अवश्य बोलवावे..नुसता मेसेज पाठवलात तरी केंव्हाही जेवायला हजर होईन..पण मी भरपूर [आचरटासारखे] जेवल्यानंतर कृपा करून पैसे मागू नयेत..[मी अन्न फुकट खाण्यात PhD केलीये .सो बी अवेअर!!..असो कळावे व ईतके उर्मट बोलणे ऐकून सुद्धा लोभ असावा !! .]..आपला खादाड हितचिंतक ...!!
---------------------------------------------------------------- लेखन -हर्षल...!!

मानवंदना ...!!

जिथे शौर्य उन्मत्त उन्माद करते;
जिथे उद्यमी धैर्य धर्मार्थ जळते ;
तिथे नांदते काव्यप्रतिभा जयाची,...
असो वंदना त्या "कुसुमाग्रजान्सी"!!...कुसुमाग्रजांस --------


भरतखंड-मंडीत नभाचा सतेज निश्चल तारा..
तुम्हा प्रयत्ने पुन्हा वाहिला स्वातंत्र्याचा वारा ..
ही वेदांची;धर्मवीरांची;ज्ञानीजनांची जननी ...
कृतार्थ झाली विनायका ही तव माता बनुनी..!!........स्वातंत्र्यवीर सावरकरांस -------

महान्मंगला भूमातेला स्वप्न सुमंगल पडले;
दिव्य तेज लेवूनी ;धर्मकृत शिल्प वास्तवी घडले;
उत्थानाची प्रदीर्घ होता करीत भारत ईच्छा;
तुज्या शौर्यमय भावस्वरांनी ज्वलंत दिधली दीक्षा..!
कितीदा तव प्रांजळ स्मरणाने विनम्र लवते मान..
स्वराज्यस्थापक छत्रपतीश्री तुम्हास नम्र प्रणाम..!! ....छत्रपती श्री शिवाजी महाराजांस -------

तो एकटा कडेचा पाहून वृक्ष मोठा ..अन भोवती तयाच्या झाडे सुमार सारी  !!
कळली मला क्षणी त्या..तुमच्यातली खुमारी !!.........कविवर्य सुरेश भटांस......!!

शब्द ज्यांना शारदा शिकवून गेली..
त्या प्रभावी वंशजांचे गोत्र आपुले ....
धन्य झालो पाहता काव्यावली ..
वाहतो म्हणुनी स्तुतींची ही फुले,,!!....भाषाप्रभू --गदिमांस..!!
......................written by:;harshal g.deshpande

Thursday, October 6, 2011

विशेष मनाचे श्लोक ...!!

अनाथा दिनाकारणे जन्मताहे .....
कलंकी पुढे देव होणार आहे..!!
तया वर्णिता शीणली वेदवाणी ..
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी !!

मना वासना वासुदेवी वसो दे .
मना कामना कामसंगी नसो दे ..
मना कल्पना वाउगी ते नसो दे..
मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे !!

विचारोनी बोले;विवंचोनी चाले;
तयाचेनि संतप्त ;तेही निवाले..
बरे शोधल्यावीण बोलो नको हो;
जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो..!!

मना सांग बा रावणा काय जाले;
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले;
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी;
बळे लागला; काळ हा पाठीलागी;!!

भजा राम विश्राम योगेश्वराचा;
जपू नेमिला नेम गौरीहराचा;
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी ;
तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी..!!

तया  द्रौपदीकारणे लागवेगे .!!
त्वरे धावतो सांडूनी सर्व मागे..!!
कळीलागी झाला असे बौद्ध मौनी ..!!
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ..!!  


मनाची शते ऐकता दोष जाती..
मतीमंद ते साधनायोग्य होती..
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ;
म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी!!

विधीकारणे जाहला मत्स्य वेगी  
धरी कूर्मरूपे ;धरा पृष्ठभागी;
जना रक्षणाकारणे नीच योनी;
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी..!!.......सद्गुरू श्री समर्थ रामदास  ..............................................स्वामी !!

निरर्थक काव्य.....!!

आयुष्यावर बोलत बसलो ...राहून गेले जगायचे..
ओंठान्वर्ती उरले गाणे अर्थ हीन आभासांचे..


रानानमधले राकट जगणे ;शब्दामधूनी लिहिले..
जंगल सारे खरे कधी ना पायांखालून गेले..!!

हाती उरले शब्दच केवळ ;अर्थ निसटूनी गेले..
नंतर कळले सरतेशेवट..हात रिकामे उरले..
खेळ मनाचा भावनेतला असाच खेळत बसता..
कितीतरी प्रसवून ठेवल्या ;मोठ्या मोठ्या कविता ..!!........लेखन -हर्षल

मी हिंदी बोलतो ..!! ..

फेसबुक वर "तुम्हाला माहित असलेल्या भाषा" या ठिकाणी मी मराठी ;संस्कृत ;ईंग्रजी आणि हिंदी असे लिहून ठेवले होते...मराठी मी बोलतो म्हणून येते असा ;इंग्लिश येत नसली तरी कळते असा ;आणि संस्कृत कोणालाच नीट येत नाही  म्हणून आपल्याला येते असा..असे माझे स्वताबद्दल गोड गैरसमज असल्याने मी त्या भाषांची नावे ठोकून देतो..."मला येणार्या भाषा म्हणून ...!!.
         पण हिंदी..??..मला येते?..खर म्हणजे हिंदी येत नाही असा मराठी माणूस विरळाच !!!..पण याचा अर्थ असा घ्यायचा कि जो मराठीलाच बदलून हिंदी करून बोलत असतो तो हिंदी बोलणारा मराठी माणूस..!!..मी खूप छान हिंदी बोलतो असा माझा गैरसमज बराच काल असल्याने मी हिंदी येते असे लिहून ठेवतो..पण वास्तव जरा विचित्र आहे..!!
.       हिंदी म्हणजे संस्कृत निष्ठ हिंदी...उर्दूमिश्रित नाही...हे माझे ठाम मत आहे..अर्थात मी स्वत उर्दूमध्ये विद्वान नाही म्हणून त्यावर न बोललेले चांगले..पण हिंदीमध्ये मी बोलत [वाट्टेल तसे]असतो..व म्हणून मी असे समजतो कि मला हिंदी येते...काही किस्से बघुयात..
प्रसंग १ :
मी रिक्षात बसतो ..स्थळ :ठाणे स्थानकाबाहेर::

मी:गडकरी रंगायतन चलो

रिक्षावाला: वो बहुत नजदीक है ,..उतरो !!

मी:कायको ??

तो:साब,,गाडी खाली नाही ...पेट्रोल भरना है..!!

मी:झूट मत बोलो ..मेरेकू मालूम तुम जवळ नहीं जाता है !!

तो:मतलब??

मी:अरे हिंदी में बोला तो समझा नहीं क्या रे??

तो:जवळ क्या है?..

मी:नजदीक 


तो:नहीं साब ..प्लीज उतरो ..ऐसा कुछ नहीं..

मी:अरे नाटक जाएगा..आज आयुष्यावर बोलू काही का पाचसोवा प्रयोग है !!

तो:ये क्या है??

मी:संदीप खरे और सलिल कुलकर्णी का गाने का कार्यक्रम है रे..जल्दी चलो..

तो:तो साब उनके साथ ही जाने का ना??

मी:तेरा डोका जागे पे है क्या ??वो प्रोग्राम करनेवाले स्टार लोग है..मैं साधा प्रेक्षक हूँ..मैं कैसे साथ जाऊ??

तो:ऐसा क्या?..लेकिन उतरो साब..रिक्शा नहीं जाएगा..

मी:अरे चल ना ..आलरेडी लेट हुआ है..अभी आठ बज गया ..सादे आठ को चालू होयेगा..!!
तो:अरे साब इतना पढा लिखा दिख रहा है..तो इतना लेट क्यू जानेका? .थोडा जल्दी निक्ल्नेका ना ..!!एकदम टाईम पे जाते ना..

मी:अरे मेरी शाळा ले रहा है क्या...और हमारा ऐसा हि है...मै बाहर निकल हि रहा था के मेरे आई ने शिरा बनानेको रखा;और मेरेको बोली के खाकर हि जानेका .. बाहेर पैसा उडाके वाट्टेल ते नाही खानेका ..और दळण का डब्बा भी लानेका था..हमारे घर मे ऐसे काम आयत्या वेळीच होते है..!!अब जादा चौकशी मत करो ..दस रुपया जादा ले लेना..!!..

तो:ठीक है साब ..पच्चीस रुपया होयगा ..चलेगा ??

मी:चलेगा...पहले रिक्शा चलाओ ..आणि फटाफट न थांबता चलो..सव्वा आठ तक गडकरी में पहुंचना है..!!..
..अशा रितीने हिंदीचा आधार घेत मी पोहोचतो..!![२५ रुपये घालवून!!]

प्रसंग २:
स्थळ..कल्याण स्थानक ..वेळ:रात्री ९ ची ..मी ट्रेनची वाट पाहतोय..एक बिहारी माझ्या कड़े येतो..

तो[बिहारी]:..इहाँ से पटना का ट्रेन कबहु है..

मी:मालूम नहीं..कबहु मतलब?

तो:कब?

मी:अच्छा ..वो तो पता नहीं भाईसाब ..!!

तो: ई पिलाट्फार्म नंबर पाच ही है ना..

मी:हो..ये पाच ही है..पण आपका गाडी किधर आनेवाला है?

तो:ईधरही तो बोल रहा था टीसी..

मी:एवढा सामान लेके कैसे घुसेगा??..इतना क्या लाये है??

तो:सब लोगोंके लिए कुछ न कुछ है साबजी..

मी:हैरान हो जाओगे गर्दी में..इधर मुंबई में लोक वाट्टेल तैसा वागता है..बायका मुली भी नहीं देखता है..सरळ धक्काबुक्की करके अन्दर जाता है..मेरा तो टाळ्का ऐसा सटकता है नां कि ऐसा वाटता है कि;एकेक को कान्फाडून निकालू ..परवा मेरा पायपे एकने ऐसा पाय रखा कि ज्याचे नाव ते..!!मेरेको हिल्ने को भी नाही हो रहा था..और वो निर्लज्ज आदमी माजलेल्या रेडा के जैसे मेरा पाय पे पाय रखके खडा था...माणुसकी उरा हि नाही अभी इधर..!!सुबह तो ऐसा गर्दी कि पार जीव घुसमटून निकलता है..उपर ट्रेन लेट रहेगा तो दुष्काळ मे तेरावा महिना..!!..और तुम लोगोंका ट्रेन भी मैने  देखा..लोक लोंबकळके  लोंबकळके जाते है ....सगळीकडे साला दिमाग का दही हो रहा है...!!..वेस्टर्न का वैसा हाल और सेन्ट्रल का ऐसा हाल...कूच विचारनेकी सोय नही .!!..अरे जेन्ट्स का छोडो लेडीज भी सुसाट भागते  हुये ट्रेन पकडती है..लटक के जाती है..परवा एक लडकी ऐसे भागी और डायरेक्ट उडी मारके चालती ट्रेन पकडी उसने..मेरा जीव तब भांडे मे गिरा जब उसको अंदर कि औरतोने पकड लिया..ये कैसा जीना है?..कूच धरबंधच नही है...सब लोग उर्मट और स्वार्थी हो गये है..ट्रेन मे कूच ग्रुप तो ऐसे है ना..कि लगता है कि उनको मस्त तुडवके हाकलून देना चाहिये..!!.[भानावर येत]....अरे आप क्या विचार रहे थे??

तो;नाही मै समझा..!! ..अच्छा साबजी..मैं दुसरे को पूछता है..[चेहर्यावर गोंधळलेले भाव घेऊन पलायन करतो]
...........................लेखन --हर्षल ....

Wednesday, October 5, 2011

"माझ्याबद्दल .."थोडेसे..सहज !! .

माझा ब्लॉग [त्याला मी प्रचारपत्र असे मराठी नाव शोधले आहे. ]..सध्या माझा श्वास झालेला आहे..
आपण विचार करतो आणि मनाशीच अनेकदा बोलतो..पण त्याने मनाचे समाधान होत नाही..मनाचे सूक्ष्म आणि रम्य आकांक्षा-तन्तू ज्याला दिसले आणि समजले असतील त्यांना हे कळेल..मनाची अपेक्षा व्यक्त होण्याची असते..सतत..निरंतर .उद्यमशील राहण्याची असते...म्हणून म्हंटले हा ब्लॉग मला खूप शांत ठेवतो..समाधान देतो....हा ब्लॉग जे कुणी वाचत असतील..[वाचक फारच थोडे आहेत..!!]..त्यांना मी माझ्यापरीने काहीतरी देतोय..असे माझे समाधान मी करून घेतो...माझी अपेक्षा माझे हृदय व्यक्त करण्याची जितकी आहे ,,..कदाचित तितकी प्रसिद्धी मिळवण्याची नाहीये.....
.......माझ्यातला हा जन्मजात विरक्त स्वभाव माझ्या अभिव्यक्त होण्याच्या स्वभावाविरुद्ध आहे..आतून मी फार शांत आणि विचाराधीन असतो..परंतु बाहेर तसे राहणे शक्य नाही..कारण आपली शांतता एखाद्याला दुख वाटेल .....आणि विनाकारण स्पष्टीकरणे द्यावी लागतील...समाजात निरनिराळे विचार प्रवाह सतत वाहत असतात..मी एक शिक्षक झालो ..मला अगदी अनपेक्षित असताना..आणि तेंव्हा मी हे मानवी स्वभावाचे कंगोरे फार अनुभवले..आजही पाहतो आहे...माझे ज्ञान ;माझे अल्पस्वल्प कौशल्य मी तिथे पणाला लावत असतो...हजाराहून अधिक विद्यार्थी मी शिकवले असतील..पण मी स्वताला गुरु म्हणून पाहिले नाही..पण वर्तणूक गुरुसारखी ठेवायचा यत्न केला..व तो जमून गेला..आज जी शुद्धता मला बाहेर दिसत नाही;वासनांचे जे थयथयाट सर्वत्र दिसतात त्यांतून माझे प्रबोधन अधिक झाले..व स्वताला अधिकाधिक पवित्र ठेवण्याचे माझे संकल्प अधिकाधिक दृढ झाले ...माणूस स्वताचा गुरु स्वताच होणे हे फार भाग्याचे लक्षण आहे..मला तितके भाग्य परमेश्वराने दिले ह्यात एक असीम समाधान आहे.. अजूनही मी अचूक किंवा सर्वथा निष्कलंक असेन असे नाही..पण "योग:कर्मसु कौशलम! ",,हे मी माझ्या मनात सतत स्मरतो..व कर्मे अधिकाधिक उज्ज्वल करण्याचा निश्चय बाळगतो...माझे मन किमान शुद्धतेचा व पावित्र्याचा ध्यास घेते व त्यासाठी मला शासन आणि प्रेम दोन्ही देते ..हे काय कमी आहे!!?.
     आणि म्हणून माझा मोठा लाभ असा झाला कि लहान सहान स्वार्थ ;धनाचा वा मोहाचा हव्यास ;क्रोध;काम आदि विकारांवर अंकुश ठेवणारा विवेक मला प्राप्त झाला ...तो प्राप्त झाला तरी त्याला अजून सक्षम व्हायचे आहे...अजून धर्म समजायचा आहे..अजून देव जाणायचा शेष आहे...अजून कितीतरी ज्ञान अनुभवायचे आहे...मी दोषविरहीत नसेनही ..मनुष्य जन्माला येणारा कोणीच नसतो..पण माझे दोष दूर व्हावेत आणि तेथे सद्गुण ध्रुव तार्यासारखे सुप्रतीष्ठीत व्हावेत इतकी  इच्छा करणारे मानस तरी मी निर्माण करू शकलो ..हेही नसे थोडके.!! अपराधांचे क्षमापन आणि ज्ञानाचे संजीवन एक ईश्वराखेरीज कोणाकडे मागावे..??..असो..म्हणून मी आस्तिक आहे ..आणि त्या अस्तिकतेचे वेगवेगळे स्तर पाहताना मीच आश्चर्यमग्न होत असतो..विज्ञान आणि धर्म जेथे एकत्र एकजीव होतात ते स्थान शोधण्याचा विचार आणि तत्त्वपृच्छा कधी उत्पन्न झाली ते ठावूक नाही..पण ईश्वराने घोर आणि अघोर असे दोन्ही रंग जीवनाला देऊन हे तत्त्वज्ञान मनात जिरवले असावे...!!..
    असो...अजून पुष्कळ लिहिता येईल..पण मी जास्त लिहायला गेलो तर शब्द सुनियंत्रित राहत नाहीत..तर असे माझे सारे जीवन..आणि त्यातला मी...जे जे पाहतो आणि अनुभवतो..त्याला व्यक्त करायला हा ब्लॉग थोड्या का प्रमाणात पण चांगला आहे...ईश्वराने दुखापेक्षा सुख जास्त दिले..आणि म्हणून त्या सुखी आणि तरीही अपूर्णतेचा आधार मिळालेल्या जगण्याचा अनुभव थोडा का होईना मी लिहून ब्याक्त करतो...आणि खरं सांगू..??..मनाला अतिशय आनंद होतो...समाधानाचा आणि समाज-संधानाचा ...!!
............अधिक लिहित नाही..लेखनसीमा..!!...............
................................................लेखन - हर्षल


परदेश ..!!.......For all INDIANS who are outside india ..and miss their country!!

आयुष्य कितीदा धरे हात हातांत ..
अन अलगद नेते ;दूर दूर देशांत..
 



ती विदेश-भूमी अतीव सुंदर ललना..  
ती सुखभोगान्ची आल्हादक मधुवदना....!!  
तीज हाती सजल्या मोह-मदान्च्या ज्योती..  
हे जाण; नसे ;त्यामधे निरामय शांती ..!!१


तुज भवती तेथे सागर देह-सुखांचे 
कित्येक भेटतील रस्ते मोह-मदांचे..!!.
या अशाच वेळी भान जागू दे ; काही..  
अन आठव ;अपुली सोज्वळ मंगल आई ...!!
जरी पाहसी अखंड;विश्व; विराट..
तुज परतायाची ;मायभूमीची वाट..!!२
.
 

नसोत येथे भुवने भव्य महान..
नसोत अथवा दीमाख ते निर्भान..
होशील आतुर तरी परतण्यासाठी ......

त्या मातेच्या आसुसल्या डोळ्यांसाठी ........!!३ 

----------------------[सप्रेम अर्पण]..लेखन --- हर्षल ....

अरे पावसा...सांग..सांग....सांग.....!!!!

अरे पावसा सांग सांग सांग!!
कुठली घेउन येतोस भांग!!??


मधेच येउन ;जगाला भिजवून !!
हळूच मारून जातोस टांग!!!.
.......अरे पावसा सांग सांग सांग....!!!
बरय रे तुला;कटकट नाही!!
पडल्यावर तुला लागत नाही!!


ढगान्च्या मागे;हळूच लपून!!
वीजांचे चाबुक ;हातात धरून!!


हसतोस मोठयाने;आम्हाला बघून!!
फेकतोस पाणी ;जोराने वरुन!!
 

हां कसला खेळ?,मला कळतच नाही!!!
लाज तुला कश्शाची वाटतच नाही?
........आता तरी कारण सांग ..सांग ...सांग..!!!...

अरे पावसा.....!!! १)
 


शाळेत मी जातो;तेंव्हाच का येतोस??
ओलेचीम्ब करून;रोज पळून जातोस!!
 

नवे नवे कपडे ;नव्या कोरया वह्या!!
नवी नवी पुस्तके ;जातात ना रे वाया!!
 

ओला होउन तू ज़रा ;वर्गात बसून बघ!!
उतरेल रे माज तुझा;जाईल सगळी रग!!.

ओला होऊन बघ लावून बस साठी रांग.....!!.
.अरे   पावसा...सांग..सांग...
..........................लेखन  ---हर्षल  ............................................

****अरे अरे पावसा***.एका मुलाचे मनोगत!!**..part one



ये रे ये रे पावसा!!
तुला देतो ठोसा!!
ठोसा दीला मोठा!!
पाउस झाला छोटा!!

ये ग ये ग सरी!!
माझ्या दारावरी!!
सर आली धावून !!
दार घेतल लावून!!
..................लेखन.हर्षल

*रुद्र-आवाहन *.........!!


हे शंकरा ;अभयन्करा.. दे आग ती;दे राग तो..!!
घन गाजती;नभ नाचती;जेणे; तुझा दे नाद तो..!!
हालाहला प्राशूनी का;बसलास ऐसा शांत तू..??
ओत जळते उग्र अग्नी;कंठ-भयरव काढ तो..........१)..

मातले हे दैत्य सारे क्रुद्ध या विश्वावरी 
शोषिले सौंदर्य सारे ;जाळूनी वणव्यापरी....
मारीती तव लेकरान्सी ;फोडीती तख्तासने..!
जाळीती शुभ-धर्म सारा ;ध्वंसती अमुची मने!..........2
 
कैक मेले ;रक्त त्यांचे अजुन नाही वाळले .
द्वेष्मय अग्नीत अवघे;सृजन सुंदर जाळले .
पेटल्या;निष्प्राण राशी;आजही तुज हाक देती.!
झरूनी थकले नेत्र ;रुद्रा ;आजही तव शोध घेती.......3.!!

संगरान्च्या तप्त-केंद्री..हो; शुभंकर वीर तू..!
दुखीतान्च्या वेदनांना ;हो; स्वयम्भू धीर तू..!
उघड ते अंगार-गर्भी..नयन;हो; वीक्राळ तू!!
आसुरान्च्या तामसावर;हो;भयंकर जाळ; तू........4!
दर्शवी संताप तो;जो गरजला त्रीपुरावरी.!
प्रगट हो ;अस्वस्थ रुपे;पर्वती लाव्ह्यापरी..!!
 

ऐकतो देवा तुझी; आभाळ-सम आश्वस्त माया.!
ऐकतो देवा तुझी;सन्यस्त;श्यामल;रुद्र-काया.!
हे मयस्कर ;दीव्यशंकर;क्रोध घे..अवतार घे..!!
द्रोह घे;उद्रेक घे;ये ;आमुचा कैवार घे................५.

.
...लेखन ---- हर्षल [29\11\2008]..

Tuesday, October 4, 2011

दीवस असे की ....................

 संदीप खरे यांची एक गंभीर कविता आहे ..."दिवस असे कि .."..त्याचे हे विडंबन ....!!  


दीवस असे की कोणी माझा नाही !!!
दीवस असे की कशात मज्जा नाही !!!
दीव्स असे की टीवी सोडवत नाही !!
केबलचे ते बील परवडत नाही !!


दीवस असे की गोड छोकरी आता!!
रस्त्यावरती दीसत एकही नाही !!
दीवस असे हे दीवस असे ओसाड !!
ते झाड़ एक प्रेमाचे उगवत नाही !!


दीवस असे की मधेच चप्पल तुटते !!
दीवस असे की उगाच उचकी येते !!
दीवस असे की उगाच ढेकुण छळती !!
दीवस असे की मीळतच नाही सुट्टी !!


दीवस असे की झोप दुपारी नाही !!
दीवस असे की जाग रात्रभर राही !!
दीवस असे की घरात बसवत नाही !!
दीवस असे की फीरणे झेपत नाही !!


दीवस असे की मधेच सर्दी होते!!
दीवस असे की शींक सटासट येते !!
ताप भयंकर मधेच चढ्तो रात्री !!
अन अवचीत येते थंडी दाटून गात्री !!


दीवस असे की दाढी वाढत जाते !!
ती कापायाला वेळच लाभत नाही !!
दीवस असे की केस पांढरे  होती !!
दात जाहले पिवळे पिवळे मोती !!


दीवस असे की दीवस नव्हें आव्हान !!
रोज नव्याने मोडून पड़ते मान !!
दीवस असे की कसातरी मी जगतो !!
प्रत्येक दीवस मज एकसारखा दीसतो !!!!
                                    .......by harshal......!!

माझा आवडता प्राणी...!!..दुसरीतल्या मुलाचा निबंध !!

                                           माझा आवडता प्राणी -  बैल . 

मी सकाळी शाळेत आलो तर गुरुजी बोलले कि आज निबंध तपासणार  आहे..पण मी तर नाही लिहिला म्हणून गुरुजींनी मला अंगठे धरून उभे केल व बोलले कि 'काय रे गाढवा ;लगावू का दोन लाफा"..असे ते बोलले व मला लाफा लगावल्या व अंगठे धरून उभे केले.
नंतर मला निबंध लिहायला सांगितला व म्हणून मी आता लिहित आहे.निबंदाचे नाव आहे माझा आवडता प्राणी.पण मला एकच प्राणी नाही आवडत खूप आवडतात पण मी गुरुजीना तसे बोललो तर ते बोलले "जास्त अक्कल चालवू नकोस एकाच प्राण्यावर लिही'नाहीतर तुडवीन ".म्हणून मी घाबरलो व एकाच  प्राण्यावर लिहित आहे..
मला खूप प्राणी आवडतात म्हणजे सिंव ;वाघ ;कुत्रा ;गेंडा ;हत्ती ;म्हैस [आमच्यकडे ३ म्हशी आहेत व त्या खूप काळ्या आहेत .]गाय ;उंट;मुंगी ;घोडा [मी सर्कशीत घोड्यावर बसलेला विदुषक बघितला होता]..आणि मला पक्शीपण आवडतात ..पण विनूने बैलावर निबंद लिहिला व गुर्जी बोलले कि त्याचा निबंध छान आहे म्हणून मी पण बैलावर निबंध लिहित आहे.
  खरं म्हणजे मला बैल जास्त आवडत नाही ..पण निबंधापुर्ता तोच माझा आवडता प्राणी आहे.
आमच्या गावात खूप बैल आहेत ..आमच्या घरी २ बैल ,३ गायी व ३ म्हशी आहेत...बैल शेतावर काम करतात .व शेतात काम झाल्यावर झोप काढतात..तसेच बैल इकडे तिकडे  खूप चरतात व बैलांना आम्ही वैरण घालतो ते पण खातात .आमचे बैल काळू व साळू अशा नावाचे आहेत .ते दोघे पण खूप माजलेत असे आमची आक्का म्हणते.आमचे बैल शिंगवाले आहेत.व पोळ्याच्या दिवशी त्यांना आम्ही खूप खायला देतो व सजवतो.व ते पण त्या दिवशी खूप खातात व अजिबात काम करत नाहीत.
 बैल हा खूप उंच असतो व रागीट  पण असतो.आमचा बैल काळू कधी कधी शिंग पण मारतो .गावातल्या वाण्याच्या बागेत आमच्या बैलाने घुसून बागेची दैना उडवली होती.मला काळू आवडतो.पण जास्त नाही.
शेतकर्याचा मित्र म्हणजे बैल असतो असे गुरुजी म्हणतात म्हणून आमच्या वडिलांचे दोस्त घरी आलेले असताना तुमी पण बैल आहे का ?असे मी त्यांना विचारले ..व मला घरात जाम रट्टे पडले .पण आमचे बाबा शेतकरी आहेत म्हणजे त्यांचे मित्र बैल असणार ..हो कि नाही??..आमची शेजारची  भीमाबाई  तिच्या नवर्याला सारखी बैल म्हणते व बोलते कि "पडून रहावा बैलावानी ;निस्त खायचा नि पियाच ..अन कामाचा तर नाव न्हायी "..
मी बैल हाकायला काकासंगे रानात जातो तेंव्हा काका गावच्या पोरींना हाका मारत मारत बैल हाकत नेतो..मी त्याला विचारले तर बोलतो "तुला नाही कळणार तू लई लहान आहेस मी पोरींना लाईन देत असतो..बैल हाकायचे नुसते निमित्त. "..पोरींना लाईन देतात म्हणजे काय हे माला माहित नाही..पण त्याचा बैलाशी कायतरी  संबंध असेल का ?
आमची आय बोलते कि "तुझा काका लय वांड हाय,न लगीन ,न धंदा ,निस्ता उंडारतोय  गावभर ,त्याच्या नादी  लागू
नगस."..ती पण कधी कधी काकाला तो जेवायला आल्यावर "आला बैल गाव हुंदडून;भाकर्या खायाला "..असे बोलते.
   पण बैल हा चार पायाचा प्राणी असतो व माणसाला दोन पाय असतात ..म्हणून माझा काका बैल नाही.तसेच बैल गोठ्यात राहतो.व त्याला वेसन लावतात.व बैल गाडी ओढतो .पण काही बैल जाम मरतुकडे असतात .आमच्या शिर्प्याचा बैल तर जाम काटकुळा आहे..पण बैल इमानदार असतो.पण गावातील कुत्रे रात्री बैलांवर भुंकतात .
           बैल हा खूप मोठा असतो म्हणून लहान मुलांनी बैलाशी मस्ती करू नये कारण त्याला शिंगे पण असतात.एकदा गण्याने आमच्या बैलाला चिडवले होते व बैल त्याच्या घरापर्यंत पाठलाग करत गेला होता.व गण्या लपून बसला म्हणून वाचला.गण्या जाम चालू पोरगा आहे..तो पाचवीत आहे अन स्वताला जादा शाना समजतो.आमच्या बैलाने त्याला जाम टरकावले म्हणून आमचा बैल मला थोडा तरी आवडतो.गाय दूध देते पण बैल देत नाही व म्हणून त्याला शेतावर कामाला पाठवतात ..नाहीतर त्याला फुकट खायला कोण घालणार.आमचे गुरुजी मला खूप वेगवेगळ्या नावाने हाक मारतात ,कधी कधी बैल नायतर वळू पण बोलतात.आमचे गुरुजी खूप म्हणजे खूपच हुशार आहेत व ते महान पण आहेत असे ते स्वताच आम्हाला नेहेमी सांगत असतात...पण "तुमचे गुरुजी पक्के डांबरट;आतल्या गाठीचे ;बेरकी आणि वाह्यात आहेत"असे मराठीच्या पुष्पा बाई बोलत होत्या ."पुष्पा बाई आल्या का रे शाळेत ?"असे आमचे गुरुजी रोज आम्हाला विचारतात व बाई दिसल्या कि भांग वगैरे पाडून त्यांच्याशी गप्पा मारायला जातात. 
"तुमच्या बायकोच्या  मागे एक बैल लागलाय पण त्याला आम्ही वठणीवर आणू तुम्ही काळजी करू नका "असे आमचे  हेडमास्तर पुष्पा बाईंच्या रागावलेल्या नवर्याला बोलत होते .  व या सर्व कारणांमुळे बैल हा माझा आवडता प्राणी आहे. 
....................लेखन  === हर्षल