Sunday, August 23, 2015

स्मरणयात्रा !!!

प्राजक्त बहराचा  गोडवा तू
 घेऊन येतेस !
आणि उमलतात माझ्या मनात 
स्वप्न पुष्पांच्या बागा !!

तुझे हास्य चांदण्यासारखे 
पसरून जातेस … 
माझ्या मनाच्या आभाळावर !!
आणि लक्षावधी  संकेत 
 तुझ्या अबोध प्रेमाचे …!!
उतरतात माझ्या एकाकी 
आयुष्यात !!

तू आकाशातल्या विजेसारखी 
तळपून जातेस ……. 
माझ्या अंधार्या विरक्त विश्वात .!!
आणि या सन्यस्त आयुष्याला 
ओढ लागते तुझ्या सहवासाची !!

तू चन्द्रकलेसारखी
अलवार  उगवतेस …!
माझ्या आठवणींच्या मेघांतून  …!
आणि माझी प्रत्येक सायंकाळ 
न्हाउन निघते त्या सौजन्याने !!

माझे नेत्र विसावा शोधतात 
 तुझ्या प्रेमळ नजरेमध्ये !. 
 आणि कधी अश्रुंचे अनिवार 
जलाशय उभे राहतात … 
तुझ्या विरहाच्या कल्पनेने !!

---------------लेखन -हर्षल ( माझ्या एका कवितेचा एक भाग !!  )स्मरणयात्रा 




Saturday, August 22, 2015

मुशाफिर ..!!!

मी एक मुशाफिर धुंद
आयुष्य उधळूनी फिरलो !!
तमघोर पथांवर ;माझा ,मी
सूर्य होऊनी जळलो !!

एकांत कुठे मायेने
पुण्यात्मे देऊन गेले !!
सावलीत त्या वृक्षांच्या
सावली होऊनी निजलो !!

माथ्यावर आग कितीदा
वा ;चरणतलावर जाळ
कडकडूनी  कितीदा फुटले
विद्रोही वर आभाळ !!

उन्माद पाहिले भवती ;
यातना संग अश्रुंचे !!
उद्दाम भोग शृंगार;
अनुराग देह मायेचे !!

देखिले तपस्वी त्यागी !
त्या अखंड जळत्या ज्योती !
ते थोर प्रकाश विरागी ;
परमेशाच्या प्रति-दीप्ती !

 हे सत्य सनातन अवघे
काळजात भरुनी उरले!!
शब्दांतून आठवणींचे
हे काव्य झरे पाझरले !!

---------------------लेखन - हर्षल ---





Sunday, August 16, 2015

प्रेयसी !!!!......

आयुष्य कृष्ण घन झाले
बरसले मुक्त अनिवार !!
तू धरा प्रेममय होता
प्रेमाचा लोट अपार !!

संध्येच्या एकांताला
सूर्याची केशर काया
हि तशी मनावर माझ्या
तव हास्याची मधुमाया !!


रात्रीला उजळत येते
तारका शुभ्र शुक्राची !!
तू तशीच माझ्यासाठी
चांदणी  दिव्य तेजाची !!


---------------------लेखन : हर्षल !!  प्रेयसी





Thursday, August 13, 2015

जखमा !!!!

काही जखमा फार खोल असतात …. सनातन ।
अश्वथाम्याच्या कपाळावर असलेल्या जखमेसारख्या!!

त्यातून  उमटलेले  व्रण तसेच … !!

खूप काही सांगून जाणारे आणि तितकाच द्रोह आणि संताप मनात जागे करणारे …. !!

आयुष्य अश्राप आणि  निरागस असताना जे जाणवत नाही , ते या अबोध  जखमा नंतर जाणवून देतात !!

जे आहे ते व्यक्त होत नाही । आणि जे नाही ते ओझे उचलून चालावे लागते असा गहजब होतो !!

अनेक प्रश्न निरुत्तर राहतात … अनेक संदर्भ अस्फुट राहतात
आणि अनेक भावना दग्ध होऊन लोपून जातात …. तरी हे महाचक्र थांबत नाही …!!

शेवटी एवढेच वाटते
 कि परमेश्वराला विचारावे, " हे ईश्वरा तू आम्हाला जगवतोस  कशासाठी आणि मारतोस कशासाठी ,?…. आणि त्या दोन बिंदुंमध्ये हे आभाळा एवढे दु:ख
ओततोस  तरी कशासाठी ?… सगळेच काही महामानव नसतात रे …. ! काही सहन करत जगतात … आणि काही जगता जगताच मरतात !!।"।
.----------------------------@-------- " मनस्वी "" या लेखातील एक भाग …। लेखन : हर्षल !!!








Tuesday, August 11, 2015

एकांत नभांतून  उरतो
 सागरात अंबर उतरे 
वेळूच्या बेटावरती एकटाच 
वारा घुमतो ……. !!

सूर्याच्या स्वर्ण शलाका
अंधार दडवतो पोटी 
अन रात्रीला जरतारी 
तो लाल मुखवटा चढतो !!



Friday, August 7, 2015

ग्रेस....!!!

भय इथले संपत नाही 
मज तुझी आठवण येते 
मी संध्याकाळी गातो 
तू मला शिकविली गीते !!

ते झरे चंद्र सजणाचे 
ती धरती भगवी माया 
झाडांशी निजलो आपण 
झाडांत पुन्हा उगवाया !!

देऊळ पलीकडे तरीही 
तुज ओंजळ फुटला खांब 
थरथरत्या बुबुळापाशी
 मी उरला सुरला थेंब !!

त्या वेळी नाजूक भोळ्या 
वार्याला फ़सवूनी पळती 
क्षितीजांचे तोरण घेऊन 
दारावर आली भरती !!

संध्येतील कमल फुलासम 
मी नटलो शृंगाराने 
देहाच्या भवती रिंगण 
घालती निळाइत राने !!

तो बोल मंद हळवासा 
आयुष्य स्पर्शुनी गेला 
सीतेच्या वनवासातील 
जणू अंगी राघव शेला !!

स्तोत्रांत इंद्रिये अवघी 
गुणगुणती दु:ख कुणाचे …। 
हे सरता संपत नाही 
चांदणे तुझ्या स्मरणाचे !!
________________________ ग्रेस ----------

Sunday, August 2, 2015

मेघ -धरेचे नाते


कुणी  मेघ उन्हाने जळतो 
वार्याने दूर उधळतो 
एकटा  एकटा  फिरतो !
अन दु:ख घेउनि जगतो !!

तो शुष्क मोकळा मेघ 
निर्जीव पांढरा  होतो 
कुणी जिवलग नाही त्याला 
एकटा मुशाफिर फिरतो !!

अन असाच फिरता फिरता 
महिन्यांवर महिने सरती 
अन हाक अचानक येते 
बोलावते त्याला धरती !!

स्नेहाने धरणी म्हणते 
मी तुझ्याच साठी जळते 
हे सागर माझे अश्रू 
मी तुझ्याच साठी रडते !!

त्या अश्रुंमधले जीवन 
मग मेघ उचलुनी घेतो
तो श्वेत विरागी मेघ 
अन कृष्ण -सावळा होतो !!

तो जलप्रेमाने भरतो 
धरणीवरी  बरसत जातो !!

या अशाच प्रेमामधुनी 
वर्षेचा ऋतू  बहरतो !!



तू धरेसारखी सुशीला !!
मी मेघासम वैरागी !!
तू सोज्वळ शालीन  माया 
मी  म्हणून तुझा अनुरागी !!
 
ही प्रीत अबोल अनामिक 
हे मेघ -धरेचे नाते !!
ही मैत्री अपुल्यामधली। ! 
अशीच  वाढत जाते !


---------------------------------- हर्षल 

 

Saturday, June 27, 2015

" एका कथेचा उत्तरार्ध"....!!


ती : तू काही बोलणारेस का ?

तो : …………. 

ती :  असे गप्प बसायचा अर्थ काय घेऊ मी ? …एक तर आधीच सध्या आम्ही काळजीत आहोत सगळे !…भारतात आलोय त्याचे कारण तरी माहितीये का तुला ?… अनिकेतच्या भावाचे म्हणजे सलीलचे kidney operation होते !!… भयानक कॉम्प्लेक्स  सगळे !!…. सलीलला पहिले असशील न तू !!…बिचारा  !! 
kidney प्रोब्लेम !! तो सुद्धा या वयात !!…किडनी  रिप्लेस केली !!… DONOR  मिळत नव्हता ! शेवटी अनिकेत ने जमवले काही बाही !!… MONEY  matters !! १६ जण  शोधले पण कोणाची kidney  match  होत नव्हती !!…शेवटी एक match  मिळाली !!………. असो !! आता सलिल ला घेऊन अमेरिकेला च जाणारे !!
पण तू असा मधूनच फोन केलास …. म्हणून आले !!…. अजूनही तसाच आहेस !। be  practical !!… बोल काय काम होते ??


तो:………………… !!


ती : काही बोलायला बोलावलेस ना !! आता वेळ नसतो मला …. ठाऊक नाही का तुला ? सगळे हिशेब नवीन झालेत आता !!…. सगळ्या गोष्टी निराळ्या आहेत आता !!…… सांग तरी काय झालय ??  प्लिज  be  fast !!

तो :  ……………………( एक सुस्कारा टाकतो आणि पुन्हा नजर अधांतरी करून पाहू लागतो )

ती :  तू जर असाच हट्टीपणा आणि विक्षिप्त पणा करणार असशील तर मी निघते ……. माणूस सुधारायला तयार नसेल तर कोण काय करणार !!!……रहा असाच अंधारात !! या अशाच स्वभावामुळे  तू सगळे गमावलेस …!!….अगदी ……………मला सुद्धा !!… एक वेळ येते जेंव्हा मुलीला व्यावहारिक विचार करावा लागतो …। मी तो केला …. आणि आता मी योग्यच होते ते मला समजलय !!  अगदी खरे सांगते पण…  कि ,…. अनिकेत सारखा नवरा शोधून सापडला नसता!!… doctorate तर आहेच , श्रीमंत आहेच , देखणा आहेच पण सर्वात महत्वाचे म्हणजे ,
मला काय आवडते ते सगळे समजते त्याला !!………… i am damn lucky to have him !!…….  just loving to be his wife !!…. तुझा निराळेपणा मला त्या वयात आवडून गेला …तुझी कला ,तुझे हसणे ,बोलणे आवडले होते !! पण नंतर माझे मलाच समजले कि मी चूक होते !!…तु चांगला असलास तरी यशस्वी होणारा नाहीस !!नुसते सद्गुण काय कामाचे ??…. life cant run on hypothesis and dreams !!..it needs strong base of practical approach !...and you have nothing except your plutonic concepts of love and knowledge !!
so i left you !!...मी ambitious मुलगी होते !!…तुझ्यावरच प्रेम हा माझा अडाणी पणा होता !!………अर्थात हे सगळे तुला ठाऊक आहेच !!आपले हे सगळे बोलून झालेय आधीच !!………मनात आले म्हणून सांगितले इतकेच  !!आणि तू सुद्धा …तू कशाला बोलावलेस हे अजूनही सांगत नाहीयेस !!??…मला निघायचय आता …. उशीर होतोय !!

तो : …  जास्त वेळ घेणार नाही !! ( हात पुढे करतो )  … हे घे !

ती : काय आहे ?… चेक ??  १० लाखाचा ???…. कोणाचा ??  

तो : वाच !!

ती : ( वाचून ) ( भांबावून जाते )….अनिकेतने तुला चेक दिला होता ???? परवाची तारीख आहे त्यावर !! कशाबद्दल !!?? …. दहा लाख ?? 
 वेट …… अनिकेत ने १० लाख चेक ने कुरिअर केले  होते त्या … माणसाला !!…अनिकेत म्हणाला होता मला । !! the kidney donor !!!...तू ??। तू ?? तू  kidney  दिलीस सलिल ला ??…

तो : बाजारात अण्णा  भेटले होते तुझे !!… त्यानी सगळे सांगितले !! तुम्ही दोघे परत आलायत आणि अनिकेत ला donor  मिळत नाहीये म्हणून त्रास किती होतोय ते सुद्धा !!… म्हणून सहज जाउन आलो त्या दिवशी !!…. तू नव्हतीस !! अनिकेत भेटला हॉस्पिटल  मध्ये ! म्हंटले त्याला जर माझी मदत झाली तर आनंदाने करेन !!… नशीबाने kidney  match  झाली !!… फक्त त्याला सांगितले होते कोणाला सांगू नकोस !
पण त्याने हा चेक पाठवला म्हणून तो परत करायला तुला बोलवावे लागले !
पैसे मी घेणार नाही आणि मी परत केले तर तुझा नवरा परत घेणार नाही हे मला ठाऊक आहे म्हणून तुला देतोय !!। नाइलाज होता म्हणून तुला बोलावले  !! हा घे आणि परत जा !!

ती : ( रडत)  का केलस तू  हे ? …। 

तो : ( हसून ) practical  असतो तर विचार केला असता !!… पण तसे जमत नाही पहिल्यापासूनच !!… बरोबर म्हणालीस आधी तू …. अजून सुधारलो नाहीये मी !!… याच स्वभावामुळे एकदा तू गेलीस आणि आता एक अवयव !…। असो … निघुयात !! बराच उशीर झालाय !!


-------------------------------------------" एका कथेचा उत्तरार्ध " .--लेखन  हर्षल ( २००७)



























Sunday, June 7, 2015

पाउस !!


नभांना  नवी जाग येईल आता 
धरेला नवा साज येईल आता
असा थंड वाहेल व्याकूळ वारा 
बरसतील मेघांतुनी दिव्य धारा !!

दहाही दिशांना सरी पावसाच्या 
उघडती कुप्या मातीच्या अत्तरांच्या 
रिती तप्त धरणी पहा होई शांत 
मनातून आनंद  वाहे  प्रशांत !!

तुझे स्पर्श माधुर्य स्मरणार तेंव्हा 
तुझे हास्य मेघांत दिसणार तेंव्हा 
पुन्हा अंतरातून उमलेल  प्रीती 
सरींतून दिसते  तुझी प्रेम मूर्ती  !!

-------------------------------लेखन -- हर्षल --------------


Tuesday, March 31, 2015

माणसांच्या मध्यरात्री
हिंडणारा सूर्य मी !!
माझिया साठी  न  माझा
पेटण्याचा सोहळा !!
रंगुनी रंगात सार्या रंग
माझा वेगळा !!
---------------कविवर्य सुरेश भट ……. 

Sunday, December 28, 2014

व्याकूळ तमांच्या छाया.......!!


व्याकूळ तमांच्या छाया  
पाहता जीव पाझरतो … 
अंधार नभांतून अवघा 
काळजावरी ओघळतो …!!

हे दु:ख चिरंतन माझे 
श्वासांत निरंतर वाहे ,
प्रत्येक  सुखाच्या अंती,
त्याचाच गहिवर आहे … !!

आधार उभ्या मेघांचे 
आकाश घेउनि जगते …. 
सूर्याला  ठाउक नाही,
 ते चन्द्र नभाचे नाते …. !!

अस्पर्श सुखांचे भवती 
एकटेच फुलते रान …. 
पाहता सुखांचे वणवे ,
रात्र  होई बेभान … !!

आसक्त कोवळ्या वेली 
वृक्षांच्या वक्षावरती …। 
 नाचती वायुवेगाने ,
त्या तिथेच सुकुनी सरती…!!

एकांतांचे भय गीत 
कानांतून जहर उतरते…। 
हा शाप निराश्रित उरतो ,
अश्रुंचे काहूर उठते …। 

सागरात उतरे तुटुनी 
तो दूर अकस्मिक तारा …. 
अस्मानी उरती वरती,
मग प्रवास रेषा धारा !!… 


मी जगतो खेळ जगाचा 
पाहतो व्यथांच्या गाथा … 
उलगडून हातांवरती ,
सुख विहीन  उरला माथा ।!!

------------------------------------लेखन ----- हर्षल ----------------------------------------
 






Sunday, October 26, 2014

gazal 1

ये रोशनियाँ दिवाली की। .
ये रंग भरे रंगोली के।
बस दिल की कलियाँ
बंद यहां ;इन्हे देखकर भी न खुले।

खामोश हैं मन.… खामोश नजर.... .
खामोश हैं सपनोंके मंजर
बस बात कोई हैं सीने में।
क्या गम है छुपा हमको न ख़बर।

हम खुश थे पहले जीने में।
फिर आज ये  क्यों अफ़सोस यहाँ ?
शायद पहले जो सुकूँ  मिला। .
अब ये उसके हर्जाने हैं।

दिल खाली हैं;सुनसान पड़ा।
क्यों हैं ऐसी मँझधार कड़ी !
शायद दिल अब ये जान गया।
के नहीं जिंदगी  ;प्यार भरी।

__________€€ hd €€___________