Friday, February 26, 2016

Lezim !!

"मंगल देशा पवित्र देशा " असे ज्या महाराष्ट्र भूमीचे वर्णन केले जाते , त्या या छत्रपतींच्या भूमीत १४ विद्या आणि ६४ कलांची उपासना फार प्राचीन कालापासून होत आलेली आहे। इथे महाराष्ट्रात संस्कृती धर्मा मधून बहरत गेली आणि माणसे संस्कृतीतून घडत गेली ।!
अशा या बहुरंगी संस्कृतीमध्येच अनेक मर्दानी खेळ आणि सुंदर लोककला निर्माण झाल्या …. लेझीम हा त्यातलाच एक मनोहर आविष्कार !!
खेळ आणि संगीत …ताल आणि ठेका …। नृत्य आणि कवायत …य़ा सगळ्याचा सुरेख संगम आपण लेझीम खेळताना पाहू शकतो ।!!
लेझीम साधारणपणे ५०० वर्षांपूर्वी सुरु झाली असावी असे काही पुरावे दाखवतात …एका काठीला जोडलेले
घुंगरू किंवा धातूच्या झान्झा असे मूळ रूप असावे !
आज मात्र आपण जी लेझीम पाहतो हे त्याचे रूप सुमारे १०० ते  १५० वर्षापासून चे आहे ! लेझीम हा एकट्याने करण्याचा खेळ प्रकार नाही …. तर सांघिक आहे  आणि सर्वानी मिळून एकत्र खेळण्यातच खरी मजाही आहे !!

लेझीम च्या खेळासाठी लागते ती फक्त एक पातळ लाकडी काठी आणि त्याला लावलेल्या ,मंजुळ आवाज करणार्या झान्झेसारख्या पातळ धातूच्या छोट्या गोल तबकड्या!!…इतक्या साध्या आणि लहान उपकरणामध्ये अफाट ताकद आहे …। ताल आहे … लय आहे …. पाहणार्याला आणि खेळणार्याला मंत्रमुग्ध करून टाकण्याची शक्ती आहे ……. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या खेळाला स्त्री पुरुष असा भेद नाही …. कोणीही , कितीही वयाचा व्यक्ती स्त्री वा  पुरुष लेझीम खेळू शकतो !!

तर असा हा बहुरंगी  लेझीमचा  खेळ !…. या खेळात नाट्य , नृत्य , आनंद ,पराक्रम , कसरत , संघ भावना सारे काही आहे ……. आणि अगदी सोपे सांगायचे तर … या    खेळात  "मराठी  संस्कृती " आहे …।   "महाराष्ट्र "आहे … आणि म्हणून लेझीम प्रत्येक मराठी माणसाच्या " मनात " आहे ….! आणि कायमच राहील !!

----------------'------लेखन - हर्षल देशपांडे













Wednesday, February 24, 2016

वेदांचे शुभ मंत्र घोष घडता "व्रतबंध" समयावरी …. 
होती ब्राह्मण बालके "द्विज "खरी याची मुहुर्तावरी !
मंगल या सत्कारणे सिद्ध हा "वेदान्त "झाला स्वतः !
प्रेमाने व्रतबंध करण्या तया शुभकाळ आला आता !

यावे श्रीगणनायका शिवसुता कार्यास या सत्वरी । 
यावे श्री कुलदेवते भगवती श्री सप्त श्रुङ्गेश्वरी !
यावे मंगल वेद मंत्रांसवे विप्रादिकांनी स्वये । 
यावे आशिष द्यावया स्वजनहो सद्धर्म कार्यान्वये !!


charolya....four line poems

असा कसा मनास हा 
तुझाच ध्यास राहतो ?
तुझाच भास आजही 
सभोवताली राहतो ? …  १

तो तिथे होता कडेला 
वाळलेला वृक्ष मोठा 
आयुष्य सरलेले तरीही 
सावली पसरून होता !! 







Saturday, February 13, 2016

valentines day !!

पाहाल तेथे आता येईल
रंग उमलुनी लालच लाल
हसतील डोळे , होतील आणि
हळूच गुलाबी गोरे गाल !!

हातांमध्ये हात गुंफतील …
नजरेलाही नजरा मिळतील !
पाहाल तेथे रंग प्रीतीचे …
सर्व दिशांना गुलाब लाल !!

प्रेमाचा हा दिवस असा कि
सुर्याहुनही होईल लाल !
जागोजागी प्रेम पताका
मना मनांतून गुलाब लाल !!

हसतील कोणी खुश होऊनी
करता त्यांचा कुणी स्वीकार !!
कुणी एकटे उदास होईल
मिळता त्याला थंड नकार !!

कुठे कुणाला मिळेल सोबत
मिळेल सुंदर प्रेमळ संगत !
आणि कुणाचे प्रेम भंगता 
होतील त्याचे अवघड हाल !!

प्रेम दिवस हा विचित्र मोठा
तरीही याची भूल पडे !
प्रेमासाठी आसुसलेले
सारे  फिरतील आज खुशाल !!
------- हृदयामधुनी  गुलाब लाल …!!

-----------------लेखन - हर्षल  (१३/०२/२०१६ )










Thursday, February 4, 2016

Suresh bhat ...!!

अवघ्या वीजा मी झेलल्या … सगळी उन्हे मी सोसली !
मज सांग आयुष्या ,आता अजुनीही काही राहिले ?

अजुनी कसा हा तेवतो ,मग मंद आशेचा दिवा?
आता मला फसवायला ,कुठले निमंत्रण राहिले ??

होता न साधा एवढा ,जो शब्द मी तुजला दिला … 

एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले !!

ओसाड माझे घर तसे नाही पहाण्यासारखे !
हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले !!
                    ------------- सुरेश भट -- ( स्वैर बदल )

Monday, February 1, 2016

Aadhar !!

सारे जुने नव्याने 
भेटून रोज जाते 
एकांत अंतरीचा 
ढवळून दूर होते !!

कोठे कसातरी मी 
वेचून सुख थोडे 
हसता जरा कुठेसे 
नियतीस दु:ख होते !!

सल आतले उराचे 
कोणासमोर न्यावे  !
दुनियेत "आपलेसे" 
कोणास या म्हणावे ?





Thursday, January 14, 2016

Makar sankrant !!!!

तिळाला मिळे गोडवा हा गुळाचा
तसा राहू दे गोडवा हा प्रीतीचा !!

जसे वाटते गोड तिळगुळ खाता
तसे वाटू दे गोड आयुष्य आता !!

मनातील चिंता तुझ्या सर्व जावो !
तुला प्रेम, सौजन्य,आनंद  लाभो !

मनातील इच्छा तुझ्या पूर्ण होवो ।
तुझे हासणे गोड नेहेमीच राहो !!

संक्रांत येता मने ही जुळावी !!
जुनी  प्रीत आपुली नव्याने कळावी !!

--------मकर संक्रांत प्रेमळ शुभेच्छा …--
-----'--------लेखन - हर्षल -------

Saturday, December 19, 2015

शब्द गीतातील माझ्या
नित्य येथे नांदतील  !!
शब्द ते माझेच तुजला 
सत्य माझे सांगतील  !!

दु:ख माझे ; सुख माझे 
वाहिले एकांत जे ,मी !
अंतरातील भाव अवघे    ;
शब्द माझे मांडतील !!

पंथ जे, मी चाललो ;
आयुष्य मी जे, पाहिले ,
 जन्म हा जगलो जसा मी ,
स्वप्न मी जे, पाहिले ….
तेच सारे शब्द झाले
गीत होऊन राहिले !!




Thursday, November 26, 2015

मुक्तचिंतन...!!

******* !मुक्तचिंतन …. "ईश्वर" !*******

अस्तित्वाच्या खोल गर्भात 
अनंत प्रश्नांच्या आत …
एक शांत उत्तर असावे 
परमेश्वर नावाचे !!

देहाच्या ज्वलंत विकारांतून ,
आणि अनिवार वाहत्या काळातून ,
सर्वत्र धडाडून उसळते अंध आवेश 
निराकार …. अनिर्व्याख्य !!
ह्यांचे आकार मोडून पडले कि 
मात्र  उरतात चिरंतन ज्योती !
हाच प्रकाश सनातन !!ईश्वरी !!

मोहांतून , भ्रमांतून , असहायतेतून ,
निर्माण झालेले वैश्विक महा मार्ग !
परस्परांमध्ये गुम्फलेले …. वर्तुळाकार !!
यांतून बाहेर अखंड उचलून नेणारे 
महान मोक्षदायक महात्मे !!
ईश्वरा तुझ्यापर्यंत नेणारे …. 
तुझेच अंश …!!
या जालीम कोलाहलात 
ईतके तरी आम्हाला दे !!
सन्मार्ग तरी चालायची बुद्धी दे !!

___________ हर्षल 

Saturday, November 14, 2015

किनारे असे  रंगती सांजकाली
 समुद्रातुनी वाहते सुर्य-लाली!
किती शुभ्र लाटा !उसळतात येथे !
शहारे सुखांचे उमलतात येथे !!

Sunday, November 8, 2015

या तुझ्या नेत्रांत सारा
प्राण माझा राहतो  !
मी तुझ्या नजरेतूनी ,
आता स्वत:ला पाहतो !!

वाच तू डोळ्यांत माझ्या
गीत माझ्या अंतरीचे !
आणि घे समजून जे
आहे मला सांगायचे !!

स्वप्न जे डोळ्यांत माझ्या
ते तुला समजेल का ?
ध्यास जे माझे ,तयांची
आस तुज लागेल का ?


--------'----'-हर्षल




Saturday, November 7, 2015

Ashich kavita !!

मी तमासम मग्न होता
चंद्र तू होऊन ये !
दु:ख माझे मुक्त करण्या
हास्य तू घेऊन ये !

प्राक्तनाच्या तप्त रानी
अडकता मी एकटा !
रोखण्या अश्रूंस माझ्या
साथ तू होऊन ये !!

सोडूनी जाता जगाने
मार्ग एकाकीच उरती !!
त्या पथांवर संग देण्या
प्रीत तू होऊन ये !!