Monday, November 18, 2019

ऋणानुबंध !!

***** ऋणानुबंध  ******

बऱ्याच मोठ्या कडकडीत दुष्काळानंतर ... अश्राप श्रावण सरींचा वर्षाव संपूर्ण धरती भिजवून टाकताना, ते दृष्य पाहून जसे मन भरून येते ....! ... तसेच आयुष्यात काही जुन्या ओळखीतली माणसे अगदीच अचानक भेटल्यावर वाटत राहते ..... !  कारण या साऱ्याच्या मध्ये प्रचंड काळ वाहून गेलेला असतो !
खरे म्हणजे इतक्या काळानंतर त्यांची व आपली ओळख आणि आठवण दवाने झाकलेल्या काचेसारखी धूसर झालेली असते ! आणि मग अचानक ही खुप जुनी माणसे चंद्रासारखी उगवतात आणि आठवणीतले आकाश पुन्हा एकदा लख्ख उजळून जाते !
जुने स्मृतींचे सांधे जुळायचा प्रयत्न करू लागतात ...! सरलेला काळ जिवंत होतो ! ...
..... सरत्या वयाचे भान येते ... गताची हुरहुर लागते ..आयुष्यावर एक उगाच क्षणाचा पीळ बसतो ...पायाखाली पुढे बघत चालणारी नजर अकस्मात मागे वळते आणि लांबवर मागे पसरलेले रस्ते आणि मिटून गेलेली काळापल्याडची जुनी क्षितिजे दिसतात !!

..... खुप जुने लोक भेटले की काळजाचा कुठलासा वेळेने बंद केलेला कप्पा अचानक उघडला जातो ! ... मग पुढे बरेच दिवस.. या जादूच्या कप्प्यातून स्मृतींचे आणि स्मृतींत दडलेल्या आपल्या त्या वेळच्या अस्तित्वाचे नवीन नवीन बोध मनावर स्वार होत राहतात ! ..

.... हा चमत्कार काही सामान्य नव्हे !!

--्---्---्--- हर्षल --्-*

Tuesday, October 29, 2019

"वाकले तिकले "!!

"तुला भरवू का ,सोहम ?"

" ना.."

"असे काय करावे ..बाळा ?"

"ना ..ना ..."

"अग ,त्याला लगावं दोन चार रट्टे ! ...लाड करून करून माजलाय !"

"अहो .. काय भाषा ही ...गोंडस पोराला असे बोलताय?  प्रोफेसर आहात ना ..बाहेर अगदी गोड ..आणि घरात स्वतःच्याच बाळाला असे  बोलताय ?"

"त्या आपल्या गोंडस कार्ट्याने माझ्या बॅगेतून मार्कर काढून माझ्या पांढऱ्या नवीन कुडत्यावर नक्षी काढलीये ,! धरून चोपणारे बघ मी !"

"" वाकल्या तिकल्या ...माल्ल्या ..मी लेघा ... बाबू च्या डेस वल !"

"थांब तुलाच वाकडा तिकडा करतो ! आईच्या लाडाने शेफारलाय !"

" अहो ,तुम्ही का चिडचिड करताय इतके ?..लहान आहे आपला मनुडा ...! बघा कसा हसतोय गुंडू ! ...ये .. ग ..ती माझी पप्पूडी ...माज्जा तो गोग्गोड सोन्या !!...बाबूला म्हणावं मला ओड्डू नका ...मी मश्ती कलनाल नाही तल कोन कलनाल ?..विचार बाबांना !""

" आम्ही असली मस्ती करत नसू .... विचार तुझ्या सासूला !"

" आईच परवा सांगत होत्या .... 2 कि 3 वर्षाचे असताना बाबांची टोपी जाळली होतीत फुलबाजीने आणि आईंच्या हाताला पण भाजले होते !"

" काय सांगतेस ...!! ..बर ..बर .!! ..हो ...आई म्हणाली होती एकदा ...! पण ते मुद्दाम नव्हते केले ! अगदीच पिंटुकला होतो मी.. i mean किती छोटा होतो ...त्यावेळी   !"

"मग हा अजून 3 होतोय पूर्ण .... मोठा झालाय का इतका ?बिचारा ...बघा कसा बघतोय तुमच्याकडे ? अजून ओरडा माझ्या पिल्लावर ! "

" अरेच्चा  ! कोण रुसलंय बाबावर "! बाबू चा डेस याक याक होता .....कोणीतरी छान छान लेघा माल्ल्यात ? त्याला बाबू गम्मत देणारे ! आमच्या पिल्लू ला कोण ते ओरडले !! आईला शांगा ....बाबू चूकून ओरडला आमच्या मनूडी ला !! ..ये इकले ....बाबाकडे "!!

"" वाकला तिकला ....बाबू चा डेस ....बाबू कले जायचा ""

----------------------- +*****-----------------

Saturday, May 25, 2019


**** महामंथन*****-

संदर्भ न देता भरून आलेले संध्यासमयीचे आभाळ बघत पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणाऱ्या माझ्या अविश्रांत नजरेतून एखादा काळाभोर मेघ चुकून
सुटका करून पसार होतो ...!!
मी जरासा वळून, तो दक्षिणपंथी कृष्णमेघ कुठे दिसतोय का ते पाहातोय ..... एवढ्यातच ...सूर्य बुडाल्याचा डंका पिटत अंधाराचा पहिला निळाशार सोनेरी मुलामा अवकाशात पसरतोच !! ....
एक प्रकाशावर्तन संपून सृष्टीचे रात्रमंथन सुरु झालेले असते !
पर्वतांच्या रांगा मस्तकावर सन्यस्त रंगांचे अनाकलनीय मुकुट
घालून बसतात ! समुद्रांच्या लाटा दूरदूरच्या अज्ञात प्रदेशांतून अंधार वाहून आणतात .... ! गंभीर नाद आणि हलणारा अंध:कार !! ... उधळलेल्या मृगांसारखा खुळावलेला वारा यांचा मदतनीस होतो !!
चंद्राचा पंथ उजळायला सुरुवात झालेली असते बहुदा !!
मी या दृष्यमान निसर्गचित्रात जखडून जातोय ....अलवार पणे !!
... संधीप्रकाश हीच संधी शोधत असतो ... ! काळजात झिरपायची ... !! आणि तो पाझरतोच ... !! मनाच्या मूक असंख्य फटींतून ... सांदीकोपऱ्यान्तून !! अनंत स्मृतींच्या अनिवार जंजाळांतून !! ... खोल दरींच्या तळाशी पहुडलेल्या सर्पाला काबीज करण्यासाठी अत्यंत वेगाने झेपावत जाणाऱ्या वैनतेयासारखा !!

अखेर .... !! गरुडाला सर्प गवसतोच !! मनाची कवाडे उघडतात ! काय अंतर्यामी  जाते ; काय उत्सर्जित होते ... त्याचा नक्की हिशेब मनाला देखील कळत नाही !
एक मात्र निश्चित .. की ,
बाहेर शांततेचे जयघोष असतीलही कदाचित ,
परंतु आत ... मनोमय महासागरात ,विस्तीर्ण मंथन सुरू झालेले असते !!
..... हा काही सामान्य चमत्कार नाहीच !!

--्---्---्---्- लेखन --्- हर्षल 

Wednesday, January 16, 2019

स्व-संवाद ...!!

अंधारावर प्रकाश अलगद जिंकत जातो ...सुखाचा दु:खावर अल्लड वेढा पडतो !
 चंद्रमंडलावर मेघांचा ,सरोवरांवर कारंडवांचा
,सागरनिळाईवर सांध्यछायांचा आणि
मनावर ...प्रच्छन्न समाधानाचा आणि आभासी वास्तवांचा .... असाच वेढा !!
सत्य शोधण्यासाठी सुर्याकडे पहात ;आत्मबलाने
पाय उचलून देवयान पंथावरून चालता चालता
 देहाच्या प्रत्येक शबल उर्मी ..संयमीत करीत ;
वेदद्रष्ट्या ऋषीसारखे स्वार्थापासून संपूर्ण निष्कासित होऊन असीम प्रज्ञेच्या निजानंदात राहायचे की ,
अमूर्त काळाला नमन करीत त्याच्या प्रवाहात विश्वाबरोबर वहात जायचे आणि असंख्यातील एक तसाच "नगण्य " जीव म्हणून अनावर आयुष्य आवरता आवरता सरून जायचे.... हा एकच प्रश्न आहे !!

याचे उत्तर मिळाले तरीही, तसा काही मोठा
 भेद बाह्य-विश्वात होईल असे नाही !! ...
पण खरे सांगायचे तर आपणच विश्वाचे द्रष्टे असतो !
त्यामुळे बदल आपल्या"आत"झाला ;
तर तसेही "बाहेरचे"सगळेच संदर्भ बदलतातच !!

--्---्-- हर्षल (जानेवारी २०१९ )

Saturday, December 2, 2017

अनिश्चय !!

जे चालते आहे ते कसे याचे भान नसावे आणि जे मिळते आहे तेही कसे याचे ज्ञान नसावे ही खरी शोकांतिका आहे असे वाटते !
 ईश्वरीय इच्छा कशी उत्पन्न होऊन कार्य करते हे मानवाला कळणे दुर्बोध होय ! कर्म केली जाताता , विकार वापरले जातात ... आनंद ..लोभ .. प्रेम या सगळ्या प्रकृती पसरल्या जातात ! बोध आणि अबोध या सर्वांतून एकमात्र प्रबळ निष्कर्ष काढून सत्य समजावे ते तर होणे नाही ! 
एकच म्हणणे उरते ....
"" नैतद जानामि कश्चित ! नापरम वा परम ! 
किमर्थम आत्मसुखम अत्र किमर्थम व्यामोहमत्र वा ?!"" 


Sunday, August 14, 2016



कधी कधी उत्तरे नसणारे प्रश्न पडतात ..
आणि कधी कधी सुटलेल्या 
प्रश्नांची उत्तरे हरवून जातात !
आयुष्यभर जे जपलेले असते ते कधी कधी 
एका क्षणात उध्वस्त होते ...
तर कधी कधी जे वाटले ही नव्हते 
तेच अचानक मिळते !

सध्या चांगल्या लोकांसाठी जगणे
तसे सोपे रहिलेले नाहिये हे मान्य  !
परंतु ह्या सगळ्या विचित्र परिस्थितीत 
एकच गोष्ट स्थिर असावी आणि ती म्हणजे
आपला चांगुलपणा आणि आपले चारित्र्य !!
माणसे बदलतील ....जीवलग लोक दूर जातील ...
जुनी नाती तुटतील.. नवी जुळतील !!
संकटे येतील अथवा सुख मिळेल ..!!
काहीही आघात झाले तरी आपण
आपला चांगला स्वभाव सोडू नये !
 परमेश्वरापुढें आपली किंमत आपण
केलेल्या त्यागावर अवलंबून असते !
स्वार्थावर नाही !!

Saturday, April 2, 2016

Aai !!

A poem on mother by her daughter !!

आई तुझे माझे सांग ;नाते सांगु कसे?..
तुझ्याविना जगामधे काय माझे असे ??

जपलेस उरापोटी किती ग मायेने !!
वाढवीले मला आई ;तुझ्याच प्रेमाने !!
तुला वाटे बरे ; येता माझ्या ओठी हसू!!
माझ्यासाठी विसरलीस डोळ्यातील आसू !!

तुझ्यासाठी होते ,मीच किरण आशेचा ..
माझ्यासाठी सोसलास त्रास तु जगाचा !!
कसे फेडू पांग आई तुझ्या या मायेचे?
जन्मले मी तुझ्यापोटी ; आभार देवाचे !!

आई तुझ्या कुशीमधे आभाळ प्रेमाचे !!
 आई तुझ्या दर्शनात ;दर्शन देवाचे !!
तुझ्या वाढदिवसाला एकचि मागणे !!
जन्मोजन्मी मला तुझ्या पोटी जन्म देणे !!

तुझे दु:ख व्हावे दूर ..वेदना सराव्या  !!
तुझ्या जीवनात सरी सुखाच्या ग याव्या !!

________ by harshal 

Wednesday, March 23, 2016

Ajunahee...!!

अजूनही दिलांचे ते धडकणे तसेच..
अजूनही फुलांचे अन उमलणे तसेच..!!

अजुनही उगाच शांत सांज पेटते कधी ..
अजुनही ढगांचे उंडारणे तसेच....!!

अजूनही ऋतू वसंत बहर ओततो..
अजूनही कळ्यांचे ते लाजणे तसेच...!!

अजूनही मनात स्वप्न रात्र फुलवते...
स्वप्नांचे त्यानंतर ...मोडणे तसेच...!!

-------------------===--------हर्षल ..!!

Dhyas !!

आता जुन्या स्मृतींचा  मिटवून वाद जाऊ...
आता पुन्हा स्वत:चा सजवून काळ घेऊ ..!

एकाच सोनपंखी स्वप्नास पाहणार्या ...
नयनांस स्वप्न दुसरे आता नवीन दावू....!!

कळ काळजात आहे..राहो तिथे सुखाने ..!
दु:खावरी सुखाचे लोटून भार देऊ !!.......

---------------------------हर्षल !!

Friday, February 26, 2016

जेंव्हा  प्रश्नांची उत्तरे नसतात 
तेंव्हा नवे पेच पडतात 
आणि पुन्हा एकदा काळजावर
नवे ताव चढतात …