Thursday, October 20, 2011

माझे आजोबा...........!!!!

माझे आजोबा आणि मी आणि सोबत छोटी बकरी
आजी आजोबा कद्धीच नातवांना मारत नसतात;ते  पहिल्यापासूनच  म्हातारे असतात ...आणि ते स्वत कधी मरत सुद्धा नसतात..अशा दोन-चार गोष्टी बालपणी पूर्ण सत्य मानणारे माझे मन अचानक मोट्ठे झाले...बोथट झाले म्हणूयात!!..आणि आजी आजोबा नातवांना मारत नाहीत हे सत्य तेवढं सोडले तर उरलेले एक आभासचित्र मात्र फाटून गेले.आणि नवे सत्य समजले ते म्हणजे आजी आजोबा अमर मुळीच नसतात तर ते एकदिवस अचानक मरून जातात..कायमचे सोडून जातात.माझ्या मनाने हे नवे वास्तव अवघडून का होईन पण स्वीकारले !!
.......गेले काही दिवस वयाच्या ७९ व्या वर्षी अशक्त होऊन आजारी पडलेले आजोबा त्याही दिवशी काही बोलत नव्हते ;अगदीच गलितगात्र होऊन निजले  होते..आई त्यांची शुश्रुषा करत होती;आजी पायाजवळ  बसली होती...वडील कामावर निघाले ;काका सुद्धा कामावर गेला होता..आणि मी परीक्षेला निघालो होतो....२५ मे २००५ ची सकाळ अशी माझ्या अजून स्मरणात आहे...आई म्हणाली त्यांना ..[आजोबांना सगळे "दादा"म्हणून बोलवायचे ..]."अहो दादा; हर्षल परीक्षेला चाललाय ;जाऊ देत का त्याला ;?"..आणि आजोबांनी डोळे थोडे मोट्ठे करून मानेनेच हो म्हंटले..माझ्याकडे वळून एकदाच पाहिले ..आणि पुन्हा नजरेनेच होकार दिला ..... माझा पाय बाहेर पडला...आणि शेवटचे जिवंत आजोबा माझ्या स्मृतीत कोरले गेले...
.....संध्याकाळी पेपर संपवून जरा अस्वस्थ पणेच घराजवळ पोहोचलो..आणि घराबाहेर परिचितांची गर्दी!!...एक ओळखीचे काका जवळ येऊन थांबवत म्हणाले "लालू दादा गेले;दुपारीच ;सांभाळ!!"
....घरात उद्ध्वस्त मनाने शिरलो ..मनावर काळी छाया सकाळपासून होती तिचा असा निकाल यायचा होता..माझे अंग उगाच तापले होते..आणि निष्कारण घोडचूक घडल्यावर वाटते तशी भयंकर तळमळ काळजात दाटून आली...बाहेरच्या खोलीत मधोमध आजोबा शांत झोपले होते..कायमचे..!!.कृश झालेले शरीर ;सरळ नाक ;खोल आत गेले गाल;आणि आता कायमचं शांत झालेले आयुष्य घेऊन ..!!...घरात नातेवाइकान्ची गर्दी...सगळ्यांचेच डोळे रडून सुकले ;सुजले होते....इतक्यात कुणीतरी म्हणाले"हर्षल आलाय.."
.......मी एकदम घुसमटून गेलो;ते शब्द ऐकून ."मी आजी आजोबांकडे नेहेमीच दुपारी जेवायच्या वेळी जायचो आणि दाराची कडी वाजवायचो तेंव्हा आजोबा असेच दार उघडताना आत आजीला मोठयाने म्हणायचे "अग;हर्षल आलाय..".आणि मग मला म्हणायचे "थांम्ब हां..आलोच "!!"..आज आजोबांना कळलेच नाही.."हर्षल आलाय.."!!
.....मी आतून विलक्षण जड झालो होतो..खांद्यावर दप्तर आणि पायात अजून न काढलेले बूट ..असा उभा होतो दारातच आणि पाहत होतो ..माझे आजोबा..शांत..पांढर्या चादरीत गुरफटून झोपलेले..मेलेले..!!..
........इतक्यात बाबा जवळ आले..खांद्यावर हात ठेऊन म्हणाले.."दुपारीच गेले..मी अर्ध्या रस्त्यातून परत आलो.!बऱ आता  ,शांत हो..जा आत जाऊन पाणी पी..!!..मी निर्जीव झालो होतो ..काय करावे कळत नव्हते..आत स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिऊ कि इथेच थांबू..??..आजोबा गेले म्हणजे ??..आणि हे काय चालू आहे..?.नाही.. आजोबा गेलेत..त्यांना बघत बसू?..कि इतरांसारखा रडू?...मी वेड्यासारखा दारात उभा राहून पुतळ्यासारखा निर्विकार झालो होतो..आणि अचानक मी दप्तर उतरवले..बूट काढले..हात पाय धुवायला मोरीत शिरलो..बाहेर येऊन बाटलीभर पाणी ढसाढसा घशात ओतले..आणि आतल्या खोलीत दिवाणावर सुन्नपणे बसून राहिलो..मला बघून सत्तरी पार केलेली माझी आजी धडपडत उभी राहिली ..आणि रडत रडत मला बिलगली ..आजीला मी काय सांत्वन देऊ.?.मीच बंद;बधीर झालो  होतो..आजी रडत होती आणि तिचे अश्रू माझ्या शर्टावर ओघळत होते..सत्तर वर्ष वयाच्या  आणि पन्नास वर्षे संसार केलेल्या माझ्या आजीला ..विशीतला मी एक आधार वाटत होतो ..तिचे सुरकुतलेले हात धरून तिला आधार देत दिवाणावर बसवले..पण ती शांत होत नव्हती ..दुखाचे आवेग तिला या वयात सहन होत नसावेत...!!ती पार कोसळून गेली होती!!
........मी आजूबाजूला पाहत होतो तर सगळे नातेवाईक एकेक जमा होत होते..पण मला काहीच भान नव्हते ..मी अस्वस्थपणे घरात फिरत होतो..मधेच आजोबांना बघून येत होतो..त्यांचे ते निश्चल शरीर डोक्यात घट्ट  साठवून घेत  होतो....
...वेळ कापरासारखा उडत गेला..आणि आई हळू आवाजात म्हणाली," सगळ्यांनी शेवटचे पाया पडून घ्या".....शेवटचे पाया पडून घ्या?..शेवटचे ??..माझ्या मनातल्या या प्रश्नानेच मी भानावर आलो..खरंच !!..माझे आजोबा...प्रत्यक्ष माझे आजोबा ..आज वारले होते..आता दहन विधी साठी बांधले जाणार होते..आणि मग परत कधी म्हणजे कधीही दिसणार नव्हते ...मी अक्षरश हादरून गेलो..हा मृत्यू इतका झपाट्याने घाव घालून गेला होता ,..कि आत्ता कुठे मी सावरलो इतक्या वेळाने..आणि काळजात विचित्र कळ उठली...!!
.......आपले आजोबा गेले??नुसते गेले नाहीत तर थेट मेले??!! !!..माझे ज्योतिषी आजोबा;माझे पेंशनर आजोबा;माझे रागीट आजोबा;माझे हुशार आजोबा;यंत्रांची आणि दुरुस्ती कामाचीआवड असणारे ;वेगवेगळ्या जुन्या वस्तूंचा संग्रह करून ठेवणारे ;लहान सहान गोष्टींवरून चिडणारे ;गणपतीला ;नवरात्राला सोवळे नेसून आरती करणारे ;सगळ्या घराला धाकात ठेवणारे;कौन बनेगा करोडपती, श्रीयुत गंगाधर टिपरे आणि शिवाय बातम्या न चुकता बघणारे,स्वतःचे अंगरखे स्वतः शिवणारे आणि कपड्यांवर विशेष खर्च न करणारे ;  म्हातारपणी सुद्धा रिक्षा न करणारे;असे माझे आजोबा....
......मी दुपारी घरी गेलो कि अल्फा टीव्ही मराठी बघत..खुर्चीवर बसून जेवताना दिसणारे आणि "बस रे जेवायला,झालं का कॉलेज?यंदा बारावी न रे?",इतकच बोलणारे आणि माझे पान स्वतः वाढून देणारे माझे आजोबा;मी इंजिनीयरिंगला गेलोय हे कळल्यावर "उगाच कशाला इतका खर्च?"असे माझ्या आईला म्हणणारे ;ठराविक वेळी नियमाने बाहेर जाणारे;वेळ काटेकोर पाळणारे ;एकच जुनी छत्री व्यवस्थित वर्षानुवर्षे वापरणारे ;दिवसभर भेटायला येणार्या वेगवेगळ्या लोकांना काहीना काही सांगत बसणारे;घरी आलेल्यांना चहा आणि खायला काहीतरी करायला लावणारे ;शेकडो लोकांना ज्योतिष सांगत असले तरी कुठलीही पाटी किंवा जाहिरात न करणारे ;वर्षानुवर्ष लोकांच्या घरी जाऊन नवीन वर्षाचे पंचांग स्वतः देऊन येणारे;ढवळे पंचांग चांगले कि दाते पंचांग चांगले यावर वाद घालणारे ;"देवबांध"च्या आदिवासी केंद्राला मदत पाठवणारे;दिवाळीत फटाक्यांचे कर्कश्य आवाज न आवडणारे;दारावर येणारे कुत्रे ;चिमण्या;मांजरी यांना पोळी खायला घालणारे;पंखा लावला कि चिडणारे ;कुणाची पत्रिका बघून सांगून झाली कि "देवाच्या पुढे ;काय ठेवायचे ते ठेवा"असे म्हणत कित्येक वेळा तर फुकटच पत्रिका सांगणारे.;इतरांच्या व फुकटच्या धनाचा काडीमात्र हव्यास वा लोभ न ठेवणारे ;स्वतःचे पेन्शनचे पैसे अगदी जपून वापरणारे;"इडली सांबार ;मिसळ आवडीने खाणारे;स्वच्छता ;व्यवस्थितपणा आणि जेवणाचे नियम अगदी  काटेकोर पाळणारे;कुठलेही व्यसन नसणारे ;कधीही आजारी न पडणारे ;बारीक काटक आणि मेहनती असणारे ...................
......................असे माझे आजोबा...त्यांच्यात बरेच गुण होते,काही दोष सुद्धा होते ,,अर्थात दोष कुणात नसतात? मी मात्र उत्तम गुण जे त्यांकडे भरपूर होते तेच शिकत आलोय..अजूनही शिकतोय !!म्हणून त्यांच्यात जर काही दोष असतील तरीही त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही.. त्रिवार नाही..!!.आणि शिवाय वडीलधार्यांच्या दोषांवर लहानांनी बोलू नये;निदान प्रकटपणे तर नाहीच!!अशा ठाम मताचा मी आहे...तर एकूण असे माझे आजोबा..!! आता ते कायमचेच निघून गेलेत.!! मला नीट समजले शेवटच्या पाया पडण्याच्या वेळी ..आणि उगाच भयंकर हुरहूर दाटली  कि; सकाळी परीक्षेला जाताना जिवंत आजोबांच्या पाया पडलो नाही;आणि आता असा प्रसंग?..असो..!!.उशीरा का होईना..पण पटले मनाला कि, वारलेत ते..!!! ते खूप म्हणजे खूपच दूर गेलेत हे कळले मला.!!मी हुंदका आवरला नाही...आवरलाही नसता माझ्याच्याने..अश्रू डोळ्यांतून वाहू दिले..त्यांच्या थंड पडलेल्या  वृद्ध पायांवर डोके ठेवले...दोन चार अश्रू पावलांवर ओघळू दिले....तसं म्हणायला गेलं तर मी काहीच देऊ शकलो नव्हतो त्यांना आजवर..हे अश्रू तरी किमान त्यांच्याबरोबर जाऊ देत.."कदाचित दुसर्या जगात ते जिथे जातील तिथे म्हणतील तरी कि ,"माझ्या नातवाने बाकी काही नसेल दिलं;पण प्रेमाचे ;आदराचे दोन अश्रू तरी दिलेत"..आठवण ठेवली त्याने.!!""..पितरांना अजून काय हवे असते वंशजांकडून ??
.........विनायक गोपाळ देशपांडे या नावापेक्षा "लालू दादा" ह्याच  नावाने '[ते लाल गोरे असे होते म्हणून] नाहीतर "देशपांडेकाका" ";किंवा नुसतेच "गुरुजी";किंवा क्वचित "आबा" अशीच त्यांची ओळख जास्त..!! !!..ते  गेलेत हे कळल्यावर आजोबांचे  कित्येक परिचित लोक शेकड्यांनी जमले..कित्येकांना तर आम्ही ओळखतसुद्धा नव्हतो..अंत्यसंस्काराला इतका समुदाय बघून कुणाला वाटावे कि कोणी फार मोठी व्यक्ती गेलीये .एका अर्थाने खरं होतं ते!! ..माझे आजोबा प्रसिद्ध होते पण कागदोपत्री नाही ..तर त्यांचा जनसंपर्क बराच होता..पण कुठल्याही सभा किंवा संस्थांमध्ये कुठलेही पद समाजात नसतानाही  फक्त त्यांच्या लोकांमध्ये मिसळण्याच्या वृत्तीमुळे झालेला..आणि तो किती होता त्याची झलक तेंव्हा दिसली..!!
......एकूणच ती विचित्र ,जड आणि अशांत संध्याकाळ हळू हळू सरली ..त्यांच्या पार्थीवाच दहन झालं..आणि आजोबा देहरुपाने सुद्धा उरले नाहीत ..!!.मनातल्या स्मृती आणि थोडेसे फोटो याशिवाय त्याचं दर्शन आता कुठेही आणि कधीही;कुणालाही होऊ शकणार नव्हत..जीवन आणि मृत्यू यांमध्ये एक भयंकर राकट आणि दुर्लंघ्य पडदा आहे..कुणालाही त्या पलीकडे बघता येत नाही!!..तिथे  माझे आजोबा पोहोचले होते...आम्हाला सोडून !!.माझ्या आजोबांच्या शरीराची राख झाली ..आत्मा देहमुक्त झाला..आजोबा गेले..!!आता त्यांच्या आठवणीन शिवाय काही म्हणजे काही उरलं नाही..!!..    
.........आज आजोबा नाहीत ..पाठोपाठ आजी सुद्धा गेली ...तिच्या आठवणी लिहायला तर वेळ पुरणार नाही..आणि म्हणून त्या आत्ता लिहित नाहीये !!आणि शेवटी सगळेच अनुभव शब्दांत बांधता येत नाहीत ..शिवाय ते बांधले तरी तसेच्या तसे इतरांना कळतीलच असे नाही ..पण मला त्यांच्या जाण्याचे दुख झाले तरी एक समाधान असेही आहे कि,माझ्या बालवयापासून आजतागायत वीस बावीस वर्षे मी माझ्या आजी आजोबांना प्रत्यक्ष पाहू शकलो,त्यांची माया अनुभवली ;ओरडासुद्धा क्वचित खाल्ला; त्यांना मदत केली;त्यांनी केलेले लाड अनुभवले;त्यांची थोडी फार सेवा केली आणि त्यांच्या अंत:काळी त्यांना समाधान दिले..त्यांचा मान जसा त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी राखला तसाच नातवांनी सुद्धा राखला   हे काय कमी आहे..??!!..हे माझे स्मृती धन अमुल्य आहे..हे माझे पुण्य आहे..माझे भाग्य आहे.!!
........सध्याच्या काळात म्हातार्या लोकांचे दोष कुणीही सांगतील;त्यांना वृद्धाश्रमात घालतील;स्वतः आनंदात मश्गुल होऊन त्यांचा अपमान करतील ;स्वतच्या देह्सुखासाठी त्या वृद्ध व्यक्तींना नरक यातना देतील ;आणि वर आपणच किती व्यवहारी आणि धोरणी आहोत हे तोंड वर करून बोलतील ;तेंव्हा अशा लोकांना मी ईतकच सांगतो कि ,जरा घमेंड कमी करा ;नाहीतर नियती असा माज उतरवेल तुमचा कि तोंड दाखवायला जागा उरणार नाही...शेवटी तुम्हालाही म्हातारं व्हायचंच आहे;मुले बाळे तुम्हालाही आहेत हे विसरू नका..!..आपले आई वडील काय किंवा सासू सासरे काय किंवा आजी आजोबा काय!हे सगळेच आपले ज्येष्ठ ;आपलेच वडीलधारे ..त्यांसाठी थोडा त्याग केला तर उन्नत व्हाल..प्रेमळ व्हाल !.त्यागात जेवढे समाधान आहे तेव्हढे भोगात अजिबात नाही..हे विसरू नका..परमेश्वरापाशी माणसाची किंमत त्याच्या त्यागावर आणि 
पुण्य् कर्मांवर होते ..त्याने केलेल्या उपभोगांच्या संख्येवरून नव्हे.!! !!.आपल्या वृद्ध पूर्वजांना आधार देणे;त्यांची सेवा करणे;त्यांवर प्रेम करणे यासारखे पुण्य दुसरे नाही..हे ध्यानात ठेवले पाहिजे.. !!  परमेश्वराने ते पुण्य आजतागायत माझ्या  आईवडीलांच्या आणि माझ्या हातून घडवले आणि म्हणून मी भाग्यवान आहे;इतके तरी समाधान मला आहे..!!..असो!!
...मी माझे लहानपण आजी आजोबांसोबत घालवले असल्याने त्याचे किस्से खूप आहेत ..उदाहरणार्थ : आजोबा कुणाला पत्रिका सांगायचे तर मी माझ्या त्या चिमुरड्या वयात त्यांच्या बाजूला बसायचो..आणि "हा मंगळ ;हा शनी"असे काहीतरी मोठ्य्याने बोलायचो वा वाचायचो,,!!..त्यांना चहा नेऊन द्यायचो;आजीला वाचनालयात घेऊन जायचो;येताना रिक्षाने आलो तर आजोबांना ते सांगायचो नाही ..कारण ते ओरडायचे रिक्षा केली तर!! मी अगदी लहान बहुदा पहिलीत असताना एकदा त्यांनी मला रिक्षात बसवून कुठेतरी लांब लग्नाला कि कशालातरी नेल्याचे आठवते..त्यांच्या सायकलवर बसून कितीवेळ मी हिंडलो असेन   ..!.......आणि अखेरीस मी आज मोठा झाल्यावर एक दिवस त्यांनाच त्यांच्या शेवटच्या आजारपणात लहान मुलासारखे उचलून रिक्षात माझ्याच हाताने चढवले आणि उतरवले...त्यांनी केलेली शेवटची रिक्षा!!..काळ कुणासाठीही थांबत नाही..आजी आजोबांसाठी नाही थांबला..आम्च्यासाठीसुद्धा थांबणार नाही..!! ..पण आठवण ह्या काळाला थांबवते..मनात जुना काळ उभा करते ..तात्पुरते त्या स्थिर न बदलणार्या स्मृतीचीत्रांमध्ये घेउन् जाते..!!..तिथे आपले पूर्वज  दिसतात ..माझ्या आजी आजोबांसारखे..आणि मन त्यांना नमस्कार करते ..मी यालाच श्राद्ध मानतो..खरेखुरे!!.. 
.
असे कितीतरी प्रसंग आहेत पण सगळे कसे लिहिणार ,मुळात मी इतके आज लिहिले हेच आश्चर्य वाटते ;त्याचे कारण वेगळे आहे...!!.तसं म्हंटल तर खूप लिहू शकलो असतो..लिहू शकेन सुद्धा  ..आजीबद्दल ;आजोबांबद्दल !!..पण खर सांगायचं तर मला मनमोकळ  असा लिहिताच येणार नाही ह्या विषयावर; कारण लिहिता लिहिता आपोआप डोळे झरू लागतात.जास्त शहाणे आहेत ते!या माझ्या डोळ्यांना आणि मनाला हे सांगावे लागत नाही कि,ही मर्मबंधातली ठेव आहे.अशा वेळी डोळे आपसूकच ओलेचिंब होतात..मन भरून येते आणि हात थरथरू लागतात .विचार स्वैर होतात ..आणि लिखाण करणं अवघड होऊन बसतं...अवघड म्हणजे अगदीच अवघड..पार अशक्य.!!खरंच सांगतोय  !! ..अगदी आत्ता हे सगळं लिहिताना भरून आलेल्या डोळ्यांची आणि मनाची शप्पथ!!
..................................लेखन:हर्षल !!

न समजलेली "ती"...!!

तू भेटत जातेस नेहेमी तरी तू मला कळत नाहीस..
तू दिसतेस रोज तरीही अजून मला उमगत नाहीस..
माझे मन धावत राहते तुझ्या मनाचा थांग शोधत;
आणि अगदी जवळ पोहोचते बर्याच प्रश्नांची रांग मोडत ;
आणि ,तेवढ्यात तू म्हणतेस"चल निघुयात;वेळ झाली";

तू हसलीस कि आकाश स्पष्ट झाल्यासारखं ;
मनाला वाटत शंकांचं वारूळ सरून गेल्यासारखं ;
वाटत आता आपले परत सूर जुळतील ;
नवे प्राण पुन्हा नात्यामध्ये शिरतील;
आणि तेवढ्यात तू म्हणतेस "काहीच कळत नाहीये रे.."
"काय सांगू तुला हेच ठरत नाहीये रे""...
आणि पुन्हा भरून जातेस माझ्या मनात प्रश्नांच्या पखाली..!!
कानात उरतात फक्त तुझे शब्द"चल; निघायची वेळ झाली"!! 


कधी उभी असतेस माझी प्रतीक्षा करत;चातकासारखी;
आणि म्हणतेस "तुझ्याशिवाय करमत नाही .उशीर करू नकोस रे असा""
मी सुखावतो मनात तुझ्या तळमळीने ;तुझ्या विनंतीने;
आणि तुला  म्हणतो सुद्धा  "तुला अंतर नाही देणार कधी"
पण तेवढ्यात तू म्हणतेस माझ्या डोळ्यांत बघत "खरच जमेल का रे आपलं?"
आणि खिन्नपणे उडून  जाते तुझ्या गालावरची लाली ..!
खालच्या मानेने म्हणतेस"जाऊ देत ;चल;निघायचीच वेळ झाली..!!"

तू फुलांसारखी फुलून येतेस ;आणि कळीसारखी कोमेजून जातेस;
पिसासारखी अलवार येतेस;अन दवासारखी उडूनही जातेस;
तुझ्या आनंदी हसण्यात मधेच असतो एक अशांत स्वर ;
जणू अमृताच्या कुंभामध्ये ;थेंबभर जालीम जहर !! ...
तुझे तुलाच कळत नसते ;पण डोळे तुझे बोलून जातात ;
अलगद माझी साथ सोडून ;पावले तुझी दूर जातात ;
भानावर येताच रडून म्हणतेस"मला काहीच कळत नाही"
;अजून तुला स्वीकारायला नीट मला जमत नाही "
शब्द तिथेच संपून जातात ;स्पर्श सारे विरून जातात ;
अश्रू मात्र न चुकता तिथेहि तुझी साथ देतात..
अशा वेळी मी तुला सांभाळायला जवळ येताच ;
हात माझा सोडून म्हणतेस:""जाऊ देत ;निघायची वेळ झाली"!!

बहुतेक वेळा माझ्यासोबत माझीच वाट चालत जातेस..
तरी वाटते कुठलातरी परका रस्ता न्याहाळत जातेस ..
तुझी पावले अडखळतात;स्वतःवरच रुसल्यासारखी  ;
जणू माझ्या चालण्यावरती मुळीच विश्वास नसल्यासारखी... 
तेंव्हा तू बोलत नाहीस ;खिन्नपणे हसतेस;
माझे मूक प्रश्न टाळून;निरुत्तर होऊन बसतेस !!"
उगाच वाटते आपले रस्ते वेगळे व्हायची वेळ आली..
मग त्यावेळी मीच म्हणतो"जाऊ देत ,चल, निघायची वेळ झाली"..!!
----------------------लेखन- हर्षल


 विशेष सूचना:-
 [सदरहू काव्य हे काल्पनिक असून ;हे काव्य रचणार्या कवीला "कोण रे ती मुलगी ?"..आम्हाला सांग ना!!प्लीज "..वगैरे प्रकारचे फालतू प्रश्न विचारू नयेत....कविवर्य हे जन्माने पुण्याचे आहेत हे लक्षात ठेऊन असल्या प्रश्नांना ते कशी उत्तरे देतील याचा सुज्ञ वाचकांनी विचार करावा....अन्यथा कर्माची फळे भोगण्यास सिद्ध राहावे...ही नम्र सूचना !!..................................
----------------------[कवीला ओळखणार्या तज्ञ व  
                       जाणकारांच्या  हुकुमावरून  
                       [व स्वानुभवावरून] ]  

निरुत्तरित प्रश्न.....!!!

असेच प्रश्न उठतात ;अस्वस्थ करणारे ;नकळत ;अचानक!!
आणि गोठून जाते काळीज;त्यांचे आकार पाहून;

ते प्रश्न असतात वेगवान ;प्रभंजनांसारखे ;
अथांग मनाच्या महासागरावर उठलेले; 

अकस्मात वेढून घेतात सगळा प्राण ;
आणि विमनस्क यातनांचे देतात दान..

रडू लागतात जेंव्हा भयंकर वेदनांनी आपले डोळे;
तेंव्हा पिशाच्चे होतात ह्या प्रश्नांची ;
आणि अधिकच भेसूर होतात त्यांचे उग्र आवेश..
द्खाश्रूंची नसते तमा त्यांना ;आणि नसते आक्रोशांचे मूल्य !!

त्यांना हवी असतात उत्तरे ..फक्त उत्तरे..
आणि तीच नसतात आपल्याजवळ...!!

हे प्रश्न जाळत जातात चिंतांचे अग्नी घालत ..
उन्मादांचे निर्भान विष ओतत ;प्रत्येक क्षणी ;मस्तकामध्ये ..!!
आणि उद्ध्वस्त करतात निर्व्याज जगण्याचे संकेत..
नष्ट करतात निर्मळ मनाचे लालित्य ;..फक्त उत्तरांसाठी .!!.
अशी उत्तरे ;जी बहुदा मिळतच नाहीत..,कधीही !!

प्रश्नांची पिशाच्चे तशीच उरतात ;खिदळत ;उधाणत.
आणि माणसे मात्र नाहक मरतात;ह्या निरुत्तरित प्रश्नांसाठी.... 
-------------------------------लेखन - हर्षल

Tuesday, October 18, 2011

my friend----- चमन...!!..

"उजवीकडून चौथी बघ"..
"बघितली."
"आता तिच्या डावीकडून दुसरी बघ"..
"एक मिनिट..हो बघितली "
"आता थोडासा मागे वळ आणि माझ्या मागे तिसर्या रांगेत बसलेली बी टेन नंबर खुर्चीत बसलेली बघ ..लाल ड्रेस वाली "
"तू ग्रेट आहेस रे,ढापण्या ,पुढच्या मुली दिसतायेत ते ठीक आहे , पण मागे बसलेल्या सुद्धा न वळता अचूक सांगतोस..?"
"अरे चमन ,ते तर आपलं स्कील आहे. यु नो खासियत ..हेहेहेहे !,तू फक्त बघायचा काम कर ,आपली खोपडी चांगल्या मूड मध्ये असताना उगाच फालतू चमनगिरी नकोय तुझी !..चायला ,ह्या गोंडस पोरी आपल्या कॉलेजात का नसतात रे?,अशा गोड मुली जर आपल्या वर्गात असत्या ना ,तर मी कशाला रे कॉलेज बुडवलं असतं?..आत्ता बुडवतोय तसं??.!! बाय द वे ती लाल ड्रेस वाली म्हणजे समीरा;१०३पहिला मजला,आशीर्वाद ;गोखले रोड ..लक्षात ठेव,रे चमन !!""..
  
    भर गर्दीच्या थेटरात आमची चौकडी चित्रपट बघायला नुकतीच स्थानापन्न झालेली होती ..आणि चमन माझ्या उजव्या बाजूला..डावीकडे विन्या आणि त्याच्या बाजूला निक ..पैकी विन्या आणि निक तसे शांतताप्रिय [कारण काही बोलण्या ईतके ज्ञान अजून  त्यांना प्राप्त झालेले नाही ..आणि ते गप्प असतात तरच छान असे सगळ्यांचे मत असल्याने त्यात विशेष काही नाही..] ..पण चमन हा जरा विचित्र प्रकार आहे..म्हणजे वर जो संवाद मी लिहिला तो संवाद आपल्या बारीक चष्मा चढवलेल्या आणि मुली बघताच गरागरा डोळे फिरवणार्या ज्या अवलियाच्या मुखातून निघाला त्या अफाट तोंडाचा मालक..चमन हे त्याला दिलेले सार्थ नाम आहे..कारण तो स्वतः सोडून सगळ्यांना चमन म्हणत असतो..एकदा तर तो स्वतच्या वडीलांना चुकून "कसले चमन आहात हो तुम्ही?" असे पटकन बोलून गेला आणि नंतर तीन दिवस अवघड जागेवर बसलेल्या लाथेच्या आठवणी आम्हाला गाढवासारखा खिदळत सांगत होता..असो..तर असेही त्याचे मूळ नाव सांगून फायदाही नाही..आमच्यासाठी तो  'चमन'च  आहे..!!
निमित्त काहीही असो..चमन हजर असलाच पाहिजे..तो मूर्ख नाही..अतिशहाणा आहे ,आणि हाच त्याचा प्रोब्लेम आहे..!!तो टारगट नाही पण अडेलतट्टू आहे..हट्टी आहे..आणि सगळ्यात म्हणजे आपण अत्यंत सूक्ष्म आणि मूलभूत विचार करतो असा काहीतरी भयंकर गैरसमज त्याला आहे..!पण तरीही तो असला म्हणजे मनातल्या एका आपल्याच उनाड प्रतिमेला आपण भेटतोय असा विलक्षण आनंद होतो..आणि नंतर कधीकधी त्याला बर्याच वेळा तुडवून काढावासा वाटला कि हाच आनंद मनात येऊन तो आमच्या हातून वाचतो...काहीही असले तरी एका बाबतीत मात्र चमन आकाशा एवढा थोर आहे..ऋषितुल्य आहे..योगी आहे..सर्वद्न्य आहे..ते म्हणजे त्याचे मुलीन्बद्दलचे अफाट ज्ञान..तरुण;सुंदर;कुरूप;बेढब .सुडौल;गर्विष्ठ;उन्मत्त;स्वार्थी;प्रेमळ ;खुशामती ;बेअक्कल ;हुशार ..कशाही मुली असू देत ..चमनला विचारा!..त्याची टेप सुरु होते..अनादी अनंत परमेश्वर जसा सर्वत्र आहे..आणि संतांना सगळीकडे त्याचाच भास होतो तसा चमन सुद्धा संतच..त्याला सर्वत्र स्त्रियांचे [तरुण आणि सुंदर ]भास होत असतात..प्रचंड गर्दीत ;जीव घुसमटून काढणार्या लोकलमध्ये ;कॅन्टीन मध्ये ;थेटरात ;रस्त्यांवर;सर्वत्र तो आपल्या ढापण-आच्छादित डोळ्यांनी ससाण्याच्या कोशल्याने मुली हुडकून काढतो..आणि याही पुढचा पराक्रम म्हणजे एकदा नीट पाहिलेली नार कधीही विसरत नाही,,,अशी अप्रतीम स्मरणशक्ती अभ्यास सोडून याच बाबतीत देवाने त्याला का दिलीये ह्याचं उत्तर त्याने मला दिलेले त्याच्या शब्दात असं आहे.."अरे चमन [म्हणजे मी ],देवाला पण माहितीये रे,कुठल्या गोष्टीला किती महत्व आहे,मला सांग येड्या [म्हणजे परत मीच],न्यूटन चे ते तीन चार फडतूस नियम महत्वाचे कि टी.वाय.ची ती नुपूर.???..माहितीये ना?..काल तर सफरचंद दिसत होती यार !..आता असले सफरचंद सोडून न्युटनची टुकार सफरचंदे काय म्हणून गोळा करू मी?..देवाने म्हणून आपली खोपडी लेडीज टेलर सारखी मस्त बनवलीये .उगीच का म्हणून देवाला नाराज करायचे?".......to be continued....

Monday, October 17, 2011

नर आणि नारी ..!!!

"ती पोरगी पाहिलीस/?..काय माल आहे?"..अशा माझ्या मित्राच्या उद्गाराला मी फक्त "ती माल नाही, मुलगी आहे..तिला कळत नाहीये कसे कपडे घालावेत म्हणून शरीर उठून दिसतंय,..उगाच सुंदर दिसण्याच्या नादात आजकाल हे नवीन खूळ आलंय ..लहान कपडयांच!!.. स्त्रियांचे सौंदर्य सत्विकतेमध्ये आहे..हे त्यांना समजले कि अशा चुका होत नाहीत..जाऊ देत..चालायचंच ! "..असे प्रत्त्युत्तर दिले..आणि त्याने सुरुवात केली"..बास..चुकलो महाशय ;तुम्हाला बोललो हीच चूक !..तू रामायण काळात जन्मायला हवा होतास..ते ऋषी मुनी जायचे ना अरण्यात ?..तसा.."......हा डोंबिवली स्थानकावरचा सत्य प्रसंग आणि संभाषण मनात ठेवून मी लोकल पकडली ..मित्राचा निरोप घेतला..दुपारची वेळ असल्याने गर्दी कमीच ..म्हणून शांतपणे माझा मोबाईल घेऊन हेडफोन वर माझे काही निवडक संगीत ऐकत बसलो..खिडकीतून उष्ण वारा वाहत होता अंगावर..आणि कानात समर्थांचे सुंदर शब्द..एकेक शब्द भक्तीने आणि ज्ञानाने सिद्ध झालेला..."मनाची शते ऐकता दोष जाती...
हे श्लोक मनाचे!.आत्म्याचे !!ते मी कित्येक वेळा ऐकले असतील..पण प्रत्येक वेळी एक नवे साधन मला देतात..आपण अद्याप काय शिकलो आणि किती कमी ज्ञान घेतले असा विचार देतात..अतीव स्खलनशील माणसाला सुद्धा सहज विरक्तीचा अनुभव देण्याचे सामर्थ्य समर्थांच्या वाड्मयात आहे..धर्म हृदयात जागृत करण्याचे .असंबद्ध मनाला संशयहीन करून भक्ती-परायण करण्याचे आणि राजहंसा सारखे शुद्ध नीरक्षीर विवेक देण्याचे ..असे सारे सामर्थ्य मला सार्याच संतांच्या आणि विशेषतः रामदास स्वामींच्या रचनांमध्ये दिसते..अर्थात मी त्या उपदेशांना  सदैव जवळ बाळगतो..अगदी प्राणापेक्षा..जवळ!!..असो..तर मी ऐकत बसलो ..छान समाधी लागली होती..आणि मघाशी घडलेला प्रसंग मनात आला..आणि मनाच्या बहुआयामी पटावर..कानांतून येणाऱ्या संगीताच्या पार्श्वभूमीवर स्मृतींचे आवर्तन सुरु झाले...
...माझ्या मित्राला काय किंवा कोणाला काय मी सहसा पूर्वी असे उपदेश देत नसे..पण आजकाल सहज निघून जातात ..आणि मग वाटते अजून त्यांना शिकायचे आहे..मी सुद्धा असाच राहिलो असतो ..स्त्री -पुरुष आणि त्यांच्या परस्पर सह्संबंधान्बद्दल...कदाचित मला फारच लवकर समजले आणि अजून समजणे सुरूच आहे..त्यांना समजेल वा न समजेल...पण आपण उपदेश करण्यात अर्थ नाही..ज्ञान कुणालाही भरवता येत नाही..जेंव्हा तुमची बुद्धी ते समजते तेंव्हाच खरे..तोवर प्रमाद घडतच राहतात..!!..मला सुद्धा जेंव्हा अंतरात्म्यातून समजले तेंव्हाच मी प्रबोधीत झालो...बाहेरचे गुरु मार्ग दाखवतात..पण शेवटी जोवर आपले मस्तक ते मार्ग समजून घेत  नाही..मान्य करत नाही.तोवर सर्व व्यर्थ असते!...
स्त्री आणि पुरुष ;नर आणि नारी ..हे विषय विनोदाने  ;आनंदाने  ;अश्लील्तेने ..असे विविध अंगांनी आपल्याला भेट असतात रोजचेच..!पैकी विनोद कधी पायरी सोडतो आणि आनंद कधी उन्माद होऊन जातो ते कळत नाही..एकंदर स्त्री आणि पुरुष हा विषय मुक्तपणे चर्चेत नसला तरी प्रत्येक ठिकाणी ;प्रत्येक दिवशी हा विषय सार्यांपुढे येतोच..स्त्री आणि पुरुषांमधले नैसर्गिक बंध कसे असतात किंबहुना स्त्री आणि पुरुषाची मानसिकता कशी असावी ह्याबद्दल माझे मन परत एका वेगळ्या वाटेवर मला घेऊन गेले..देहात सहा विकार आणि एकुलता एक विवेक आहे..अर्थात सहा पुष्ट जनावरांना नियंत्रणात ठेवणारा एकच नियंत्रक...ज्यांच्या [बहुतेकांच्या]मनात हे सहा पुष्ट प्राणी अगदीच शेफार्लेले असतात त्यांना विवेक रहात नाही..तो चेंगरून गेलेला असतो..आतल्याआत..आणि मग माणसांच्या वेगवेगळ्या पापकर्मांना अलगद सुरुवात होते..स्त्री काय किंवा पुरुष काय ..तसे म्हंटले तर एकाच ईश्वराची दोन रूपे..दोघांमध्ये काही साम्य आणि काही भेद उत्पन्न केले आहेत निसर्गतः !!..   to be continued..[when i will be in mood..!!] 

देवास........!!!

कसे देवराया..कसे सावरावे ?
कसे दीर्घ मायेस या आवरावे?........
कुठे घात होतो मुळी आकळेना.. 
कसा शोक येतो मनाला कळेना.
कसे अंतराला तुझे नाम द्यावे..!!.१  

किती भोग भोगून सरता सरेना ..
असे योग; हा देह सोडू शकेना 
कसे विषयाला स्वताच्या प्रतापे..
मनाच्या तळी पार गाडून द्यावे?.....२

उभा जन्म येथे असा शाप वाहे...
किती वंचना व्यर्थ घेउनी पाहे..
तरी दृढ माया तयाची सुटेना.
कसे त्यास देवा तुझे भान यावे?..३

समोरी सुखांचे..पसरले पसारे
तिथे चित्त अस्वस्थ होते विकारे..
किती हीन आम्ही तमोबद्ध सारे ..
तुझे सत्य आम्हास कैसे कळावे??
 
असा आर्त होतो कधी जीव सारा 
उरी क्रोध येतो स्वताचाच न्यारा.
परी वृत्ती विरक्त होऊ पहाता ;
पुन्हा जागतो षडरीपुंचा पहारा 
विवेकी सदाचार जातो बुडोनी ;
कसे ईश्वरा चक्र हे पालटावे???.
तुझ्यावीण रे व्यर्थ कैसे  जगावे?..४

तुझी थोर माया कृपाळू कराने..
आम्हा दान द्यावी अनादी कृपेने ..
तुझे नाम घेता सुखे जन्म जावो.
सदा त्वत्पदी चित्त अमुचे विसावो..!!
तुझे ध्यान ते दान आम्हास द्यावे.........!!५  .........हर्षल

Saturday, October 15, 2011

प्रज्ञारूप-प्रेयसीला ..!!...

कधी तोच चंद्र बदलतो जसा ...नजरेसमोरून...एकेक कलेने..अलवार..!! 
तशीच तू ..संदर्भांचे नवीन प्रश्न..टाकून कितीदा बदलत जातेस...?..हळुवार..!!

ते तुझे लाघव ;स्तिमित करते माझ्या आवृत्त मनाला...प्रेमाचे नवे दान देत..
ते तुझे मार्दव;मोहित करते माझ्या जगण्याला ;विश्वासाचे अपार भान देत...

ती तुझीच जाणीव प्रत्येक क्षणाला, सौजन्य शिकवते माझ्या मनाला...
आणि दूर ठेवते ..शबल, उन्मत्त ,जनावरी वासनांपासून ..माझ्या हृदयाला..!!

तू नसतीस तर कदाचित वाहत गेलो असतो मी सुद्धा क्षुद्र देहाच्या भोगान्मागे...
आणि पिशाच्चा प्रमाणे तोडले असते पावित्र्याचे मंगल धागे...!!

तू नेहेमीच वाटतेस मला आकाशातील अरुन्धतीसार्खी....
जिने दिशा दिलीये सप्तर्षींना ..!!
आणि पृथ्वीवर चालणार्या माझ्यासारख्या पांथस्थांना ..
जे शोधत होते प्रचंड अंधारात सगळ्या दिशांना!!

आणि सदैव दिसतेस पौर्णिमेच्या चंद्र्मूर्तीसारखी...
जिच्या एका हास्याने उसळतात महासागरांचे प्राण..,,,,,,,
मी सुद्धा असाच एक लहान जलाशय ..धरेवरचा  .
तुझ्या प्रतिबिंबाला काळजावर धरू पाहणारा....
आणि तुझ्या केवळ नावानेच उचंबळून येणारा..........!!
.............................................लेखन ---हर्षल

Wednesday, October 12, 2011

.!!.................जेंव्हा मित्र नसतात ..........!!

अनुभवांचे ज्ञान किती पक्के असते,किती खरे असते,हे मी हळू हळू शिकलो,.
काही नाती इतकी तकलादू निघतील असे वाटले नव्हते ;पण ती नाती मोडून पडली डोळ्यांसमोर..आणि मी पाहत राहिलो..वाटले ,ती पुन्हा सांधतील आपोआप..!!पण अर्थात तसे घडत नाही ...मन मूर्ख असले कि अशा कल्पना त्याला सुचतात,स्वप्न रंजन हाच मनाचा स्थायीभाव असतो,पण ते सत्य नव्हे.!!
मी नेहेमीच क्षमाशील राहिलो आहे...कुणालाही आणि कितीही अवघड प्रसंग असेल तर मी स्वतःहून तेथे पोहोचलो आहे..मदतीसाठी..!..माझे मित्र फारसे माझ्या संपर्कात नाहीत,आणि घनिष्ठ तर एखाद-दोनच असतील..हा एक निष्पाप मैत्रीचा सुरेख धागा मला अजून विणता आला नाही..अगदी लहानपणापासुनच ..आजतागायत..!मी कधी कधी विचार करतो कि माझ्यासारखाच एखादा मनुष्य जर मला मित्र म्हणून भेटला असता तर किती जपली असती मी मैत्री.!!..अगदी लहान बाळाला जपावी तशी..त्यावर संस्कार करावेत इतकी हळुवार..!!..कारण माझ्यात काय गुण आहेत हे मी जाणतो..ज्यांना मी मित्र मानले त्यांना मी अंतर दिले नाही कधी..पण का कोण जाणे.?.त्यांचे माझ्याशी अंतरीचे बंध म्हणतात न ते कधीच दृढ झाले नाहीत..!!..मैत्री ही मैत्री न राहता केवळ परिचय उरला...आणि मी एकटा पडलो..!
        मी यावर आत्मपरीक्षण केले..कि आपलीच काही चूक असेल म्हणून "मैत्र जीवाचे"लाभत नसतील..मग मी चुका शोधायला लागलो...पण चुका घडतील इतके सुद्धा मी त्यांच्या जवळ कधी नव्हतो..कधी वेळ नव्हती तर कधी अजून काही...पण मैत्री जुळली नाही..!!काही मित्रांना चांगले सांगायला गेलो तर त्यांनी मला त्यांच्या मनातून नकळत "डीलीट" केले असावे...एकाला सांगितले दारू पीउ नकोस..तर तो म्हणाला तू नको येउस ना..आम्ही काय करायचा ते आम्हाला ठरवू दे यार....एक बंध तुटला..!!.....एका "मित्राने"एका चांगल्या मुलीला फसवायचा प्रयत्न केला.अगदीच भयंकर प्रकार घडू नयेत .म्हणून .त्याला आणि तिला दोघांना वेगवेगळे समजावले.. ती समजली पण तो मनात राग धरून बसला..अजून एक बंध तुटला..!!..तिच्या आणि त्याच्या घरच्यांन्नी धन्यवाद दिले मला ..पण तो आता मित्र मानत नाही मला.."".कर भला हो बुरा..""...!!असो..काही वेळा तर मी अति उत्साहाने काही नाती ,नुकतीच उमलू पाहणारी नष्ट केलीत कि काय अशी शंका येते...आणि विनाकारण मनात सल दाटतो..!!..एका मित्राला मी बर्याच काळानंतर भेटलो..म्हणून आस्थेने अधिक चौकशी केली..निदान मैत्री वाढवायचा हाच एक मार्ग मला ठाऊक आहे...अर्थात माझा मार्ग चुकीचा असेल तर त्याने तसे एकदा सांगितले असते तरी मी तो बदलला असता...पण कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक?..नो contacts !!..परत फोन  नाही..कि ओळख नाही..!!..रस्त्यावर भेटला तरी ओळख दाखवेल का अशी शंका येते आता..!काय झालंय?..माहित नाही!!...एक दोन वेळा तर असेही घडलेय कि माझ्याच कोणी "हितचिंतक"मित्राने परस्पर माझ्या एखाद्या मित्र व मैत्रिणीला माझ्याबद्दल काही पढवून म्हणा किंवा काहीतरी सांगून म्हणा आमच्यातील नाते मोडण्याचे पुण्यकर्म आनंदाने केलेय..!!..यात गम्मत अशी कि मला हे कळल्यावर सुद्धा मी त्यांबद्दल वाईट विचार करू शकत नाहीत..!! ..
अर्थात हे कळल्यावर सुद्धा ते तसेच वागत राहतात..ह्याचे वाईट वाटते ...आपल्याला जी माहिती हवी ती त्या त्या व्यक्तीकडून प्रथम मिळवावी ..नंतर अगदीच शंका असल्यास इतरांना विचारावे..असा साधा नियम बरेच जण विसरतात आणि नकळत दूर होतात ;ऐकीव माहितीवर..!! प्रथम ओळख ..मग परिचय .मग मैत्री अशा पायऱ्या असतात..पण काही मला जवळचे वाटणारे लोक पहिल्या पायरीवरच मला धुडकावून निघून जातात..संबंध तोडून मोकळे होतात तेंव्हा त्यांना विचारावेसे वाटते"कि;बाबांनो ;तुमच्या अपेक्षा तरी सांगा!!..त्या गोष्टीतल्या शिबी राजा सारखे स्वताचे मांस काढून द्यायचे असेल तरी मी तयार आहे...पण काहीतरी का होईना पण "कारण" सांगून तरी goodbye  म्हणा.!!..विनाकारण माझ्या आपुलकीची अशी लक्तरे करण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला?,मी चुकलो असेन तर तसे सांगा,माझे बोलणे पटत नसेल तर तसे सांगा ,पण सांगून निघून जा."!!..............पण हे सार्यांनाच कळते असे नाही...आणि ज्यांना कळावे असे आपल्याला वाटते त्यांनीच असे वागले तर धक्का बसतो..विनाकारण मैत्रीची अवहेलना ही एका व्यक्तीची अवहेलना असते हे त्यांना उमगत नाही का?..कि आपल्याच धुंदीत हे सगळ्या जगाला मोजत असतात?..मी कधीही अशांचा राग धरला नाही,,तो माझा स्वभाव नाही..आणि राग करावा यासाठी किमान त्यांनी  काही मैत्री तोडण्याचे कारण तरी द्यायला हवे..ते सुद्धा नसते...मग मी काय समजायचे?..आजही मी त्यांना मित्र मानतो..फक्त गरज आहे त्यांचा एक हात पुढे येण्याची...माझा मैत्रीचा हात कधीच मागे नव्हता.आजही नाही..!!..
...माझे मित्र किंवा सुहृद कमी असले तरी ओळखी चिकार आहेत...अगदी सगळ्या जाती- जमाती ;सगळ्या वयांच्या लोकांमध्ये ..माझे कित्येक विद्यार्थी तर हवे तेंव्हा घरी येतात;फोन करतात ;त्यांच्या व्यथा त्यांचे आनंद सांगतात...मी त्यांना आधार देतो ;समजून घेतो..!!..त्यांना मी मित्र मानतोच..पण तरीही ते नाते गुरु-शिष्य असे अधिक असते...मित्र म्हणून कमीच..!


मी बहुश्रुत आहे;म्हणून वाचनसुद्धा अधिक घडले असेल;एकांतात राहून सहज प्राप्त झालेले ज्योतिष ज्ञान  ;धर्म;आणि ईतर विषयांचे विचार आणि विज्ञान यांचा जो काही संगम झाला असेल त्यानुसार मी अनेकांना यथामती सहकार्य देत असतो..! काही तत्वे अशी असतात कि ती आपल्यासाठी फलदायी नसतात पण आपल्यामुळे इतरांना मात्र तशी ठरतात ..मैत्री हे असेच एक तत्व मला लागू पडते..माझ्यामुळे काही लोक [जे पूर्वी शत्रूदेखील होते ते] उत्तम मित्र झाले..!! पण मला स्वतःला मात्र माझाच सल्ला निरुपयोगी ठरला असावा....[एकादशे शानिश्चरो मित्रहीनो सदैवच !!- ईति ज्योतिष- म्हणजे अकराव्या स्थानातील शनी पत्रिकेत असता मित्रहीन असा जातक असतो ]........असो..

हे सगळे मी लिहिले कारण शेवटी बोलायला कोणी नसलं कि माणूस लिहितो..हे कोणी वाचेल कि नाही ठाऊक नाही मला..पण अशीच  कोणी माझ्यापासून दुरावलेली मित्रव्यक्ती  अचानक हे वाचेल तर एव्हढेच विचारतो "दुराव्याचे कारण नक्की समजू शकेल का?.आणि तेही न सांगता परत आल्यास तरीही माझ्यातर्फे स्वागतच आहे..मनात उगाच काही ठेउ नये...माझ्या मनात राग किंवा किंतु नाहीच ..पण तुमच्या मनात सुद्धा तसे काही आणू   नका.."मानव्य"किंवा "मानवता" प्रेम देण्यात आहे..अकारण दुरावा निर्माण करण्यात नाही..

'पोथी पढ पढ जग मुअ पंडीत भया न कोय...
 ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडीत होय.""
सो लेट्स बी फ्रेंड्स !!""........
------------------------------------------------- लेखन-हर्षल

Tuesday, October 11, 2011

पन्नास लेखनांचा परामर्श आणि त्यातला मी..........!!

चाललो मी एकटा वाटेवरी अन गीत माझे एकट्याने गायले..!! 
काल ब्लॉगवर [प्रचारपत्रावर]पाहता पाहता सहज उजवीकडे लक्ष गेले..आणि एकदम कळले कि ब्लॉगच्या लेखमालांची पन्नाशी उलट्लीये...amazing ना!!..[असे इंग्रजी शब्द वापरून फुकटचा modern टच दिला कि बर असत .]...असो..पन्नास लेख आणि कविता..!ओहो..!!..बरेच झाले त्यामानाने !!
हे माझे लिखाण त्यातले "काही" असेच .."काही" मनापासूनचे .."काही" सहज लिहिलेले ...तर काही असे कि ते लिहिताना मनात खोलवर साठलेले आठवणींचे ऋण पुन्हा जिवंत करणारे!!'मी अगदी हाडाचा  साहित्यिक आहे..',असे दाखवायला..किंवा भाषेचे कलात्मक आविष्कार सहज कसे निर्माण करू शकतो हे दर्शवण्यासाठी हा "ब्लॉग-प्रपंच"नाहीये!!....माझे काही खरोखरच  उत्तम लेख किंवा कविता यात नाहीत...थोडेफार असतील ते वाचकांना सुखवतही असतील किंवा नसतीलही ...मला याची कल्पना आहे...!!..पण खर म्हणजे हे सगळे लिखाण मी मला माझ्यापुढेच  व्यक्त करण्यासाठी जास्त आनंदाने लिहिले आहे... .अगदी चंद्रशेखर गोख्ल्यांसार्खा "मी माझा"..असा मी नसलो...तरी माझ्यातला "मी"..मला ओळखायचा असला कि मीच लिहिलेले काही बाही मी वाचत असतो...!!..
कधी कधी आपण क्षुल्लक चुका करतो..आणि समोरच्याच्या मनात आपली वेगळीच प्रतिमा निर्माण होते..आणि बरेच मूल्यवान संबंध तुटून जातात ..काळजाला घरे पडतात...मनात निष्कारण कटुता वा अवघडलेपण उत्पन्न होते.....आणि असे होऊ नये म्हणून मी दक्ष असतो..अर्थात त्यासाठी स्वतःला लांबून इतरांसारखे न्याहाळावे लागणे मी शिकून घेतलंय...आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आपलेच लेखन इतरांच्या दृष्टीने वाचणे.."आपुले आपण व्हावे गुरुजन..!!.जाणा हे लक्षण उद्धाराचे!!"..अशी एक ओळ मीच बनवून सतत स्मरणात ठेवली आहे..!!
        माझ लिखाणाबाब्तीत लोकमान्यांशी [टिळक]थोडेसे साम्य आहे...त्यांना लेखन प्रत्यक्ष करायला कंटाळा येई असा त्यांचा स्वभाव होता .[संदर्भ:"दुर्दम्य"-गंगाधर गाडगीळ ]...[..पण त्याच   महामानवाला शरीर पोखरणार्या मधुमेहासह;आणि देह जाळणार्या उष्णतेत मंडालेच्या कारावासात गीतारहस्य पेन्सिलीने एकेक शब्दनशब्द  लिहायची वेळ आली...दैवाचे खेळ!..म्हणूनच मी सदैव नतमस्तक असतो अशांसमोर..असो..]...आणि महामहोपाध्याय द.वा.पोतदार यांच्याशी सुद्धा..[एकटाकी बसून लिहायला ते अवघडून जात - ईति.बाबासाहेब पुरंदरे..संदर्भ:"ग्रेट भेट" मुलाखत ]
........एका जागी बसून अखंड लेखन करणे यालाच "आसन विजय" असेही म्हणतात ..तो माझ्याकडे कमीच...म्हणजे तासंतास बसायला हरकत नाही...परंतु माझे विचार मी फक्त विचार करत असताना लयबद्ध आणि सजग असतात ..तसे लिहिण्याची जोड मिळाल्यावर राहत नाहीत..अडेलतट्टू वासरासारखे ते मधेच धावतात मधेच थांबतात..मग लेखणी थांबवली कि परत सलज्ज  युवतीसारखे मस्तकात परततात..पुन्हा लिहायला बसलो कि परत उनाडक्या सुरु त्यांच्या.....!!थोडक्यात काय लिखाण आणी विचार एकत्र नांदत नाहीत ..म्हणजे ते तयारच नाहीत..!!.म्हणून घडत काय कि बर्याचदा लिहून झाल्यावर असे वाटत कि "अरेच्चा ;अजून पुष्कळच वेगळे शब्द मनात होते..विविध भावना होत्या ..त्या का नाही आठवल्या तेंव्हा..??"...उत्तर एकच-लिहिताना त्या गायब झालेल्या होत्या..[समुद्रातल्या द्वारकेसारख्या].!!.लेखन संपले आणि त्या परत आल्या..!!माझे ..आता काय बोलणार यावर.??...म्हणून मी नेहेमी म्हणतो.."व्यासांना नव्हती ईतकी लेखनिकाची आवश्यकता मज पामरास आहे..seriously .."!!....म्हणजे मी नुसता बोलतोय [ शांत विचार मनात सरसरत येतायत ]..आणि कोणीतरी ते लिहून घेतोय..असे जर कधी घडले तर मी उत्तम साहित्य निर्माण करून जाईन..अगदी खरच !!...[ तेवढ्यासाठी मी चक्क आरामखुर्ची घेतली होती..त्यावर बसून मी बोलणार ;विचार करणार ..पण !!..फक्त लेखक मिळाला नाही..!!]
    *आता हे सगळे पुराण सांगून काय उपयोग ?असे कोणास  वाटेल म्हणून म्हणतो कि त्याचा या ब्लॉगशी संबंध आहे..अर्थात कागदापेक्षा संगणक लिहिण्यासाठी किंचित बरा असे मला वाटले ..लेखणी पेक्षा कीबोर्ड जरा जास्त मानवला..!!...बरेच सुसंगत लिखाण होऊ शकले....!!
      *माझे लिखाण हे माझ्या आयुष्याचे प्रतिरूप नाही...पण माझ्या अव्यक्त आशा आणि विचार यांच ते लहानसं प्रतिबिंब नक्कीच आहे..!.मी प्रेरित होताना ;कर्तव्य-मूढ होताना ;आत्ममग्न होताना ;निश्चल होताना माझ्या मनाचे जे उद्गार उमटले असतील ..जी अनाम संवेदना उत्पन्न झाली असेल त्या स्पन्दन्नांतून हे "हर्षायन"..[.अर्थात हर्षपूर्णतेचे असे माझे अयन[=प्रवास] ]  जन्माला आले असावे...जसे रामायण ..कृष्णायन.. तसेच "हर्षायन"!!.....
         * आज मी लिहायला बसलो तेंव्हा विचार केला कि, आपण हे पन्नास काव्य-लेखमय साहित्य ब्लॉगवर टाकले...म्हणून आपण किती बदललो ?..आणि त्याचे उत्तर असे कि मनाला एक मुक्तता मिळाली...अनंत विचारांचे ;अनंत मनोरे अगदी अल्प प्रमाणात कागदावर उमटले ..प्रसारित झाले..आणि कदाचित काहींनी आवडीने वा उत्सुकतेने ते वाचले.!.पण खर सांगू.?..हा ब्लॉग इतरांपेक्षा मीच कित्येक वेळा वाचला असेल...एक उदाहरण आठवते कि ;माणसाच्या बाजूने त्रैलोक्य-सुंदरी आणि आरसा ह्या दोन्ही एकत्र गेल्या तर माणूस आधी आरशात पाहिल,इतके माणसाचे स्वतावर प्रेम असते..किंवा आत्मभान असते असे म्हणूयात..[ या उदाहरणावर आमच्या एका सत्शील आणि "युवा-कन्या-निरीक्षण विशारद" अशा मित्राचे म्हणणे असे कि, मी तिला आरशातून पाहीन..मग आरशात स्वताला पाहीन आणि नन्तर तिच्या मागावर सुप्तपणे जाऊन तिला प्रत्यक्ष पाहीन..."..असो..] ..सांगायचा मुद्दा असा कि अशी आत्ममग्नता ;सतत स्वताला परीक्षित राहण्याची संधी हा ब्लॉग मला देतो..!!..माझे लिखाण मीच वाचत असतो..[ तुझे लिखाण तुलाच वाचायचय रे..जरा कमी लिही..नाहीतरी कोण बसलंय वाचायला?
..- ईति "तोच" मित्र.] ..माझे लिखाण मला सुधारते आणि शिवाय मला उमेदसुद्धा देते..आनंद तर आहेच. !!
           * मला व्यसन नाही ...दारू ;सिगारेटी;गुटखे असे प्रकार मला आकर्षित करू शकत नाहीत..त्यांना मी आवडत नसावा..आणि मला ते..!!...पब-डिस्को-बार-ह्यांचे वातावरण मला अजिबात आनंद देऊ शकत नाही..आणि तसा क्षुद्र आनंद घेण्याची आवड सुद्धा नाही..ईश्वराने कमरेवरती दिलेले हृदय आणि त्याहीवरती विराजमान असलेले मस्तक ..ह्यांवर भक्ती जास्त असल्याने .."कमरेखालचे" "विनोदी"वाटणारे साहित्य पाहणे अथवा वाचणे यातही मी रमू शकत नाही....ज्ञान असले कि विकार कमी होतात..अन त्यामुळे इतरांना अवघड वाटणार्या गोष्टी मला सहज वाटतात..आणि त्यांना जे सोपे वाटते ते मला कधी कधी अशक्य आणि भयंकर सुद्धा वाटते...बहुतेकदा पाप सुद्धा ...!!..सांगायचा मुद्दा असा कि..समाजात जी रूढ व्यसने आहेत ती मला आपलीशी वाटत  नसल्याने..आपोआपच एक व्यसन मला जडले ,,निरीक्षण आणि आत्मसंधानाचे! यातले आत्मसंधान अजून कमी आहे..पण निरीक्षणामुळे चांगल्या-वाईट गोष्टी समजून गेल्या अगदी त्यातल्या बारकाव्यांसहित..त्यामध्ये फारसे न फसता..!!.म्हणतात ना,"गुंतुनी गुंत्यात सार्या ,पाय माझा मोकळा",तसेच.!!.आणि त्यातून जी समज निर्माण झाली..तेच माझे लेखन..!!..हे हर्षायन!
      * हे हर्षायन कधीही थांबणार नाही....ते क्वचित वाट चुकेल किंवा सर्वोत्तम मार्गांवर प्रतिष्ठेने चालेल ,पण चालत राहील..स्वताला सुधारत!निपचित आणि स्वस्थ  कधीच राहणार नाही..कारण ते निर्माण झाले आहे ते,वाहण्याच्या ,सतत धर्म-क्रमण करण्याच्या विजीगिषु  उमेदीतून..!!..जगण्यामधून ..प्रेमामधून..!!...
             प्रतिभेची एक गम्मत असते ..ती सांगून येत नाही..आणि आल्यावर दान दिल्याशिवाय आणि दक्षिणा घेतल्याशिवाय सोडत नाही.!! आठवा बरं,त्या ओळी..""ती येते आणिक जाते ..येताना कळ्या आणिते..जाताना फुले मागते."!..येथे,"ती" म्हणजे उन्मेष-शायी प्रतिभा..!!ती अशी येते तेंव्हाच त्यातून जन्माला येतात संवेदनांच्या अर्थांनी संपृक्त झालेले;प्रतिभेच्या दानावर पोसलेले आणि आपल्या साक्षीने परिपूर्ण झालेले लेखनाविष्कार !!असो..लिहिण्यासारखे खूप आहे..पण आज इतकेच पुरे..!!
     **..आता वाचकांबद्दल.,.मला ज्ञात वा अज्ञात जे जे वाचक असतील ;ज्यांनी यातले एकतरी पान वा काव्य वाचून मला प्रकट किंवा अप्रत्यक्ष दाद दिली असेल वा आवड /नावड/समीक्षा अगदी काहीही केले असेल...त्या सगळ्यांना मी त्यांच्या आयुष्यातले काही क्षण तरी अल्पसा आनंद किंवा माझे शब्द देऊ शकलो असेन तर ..हेच मजसाठी फार थोर समाधान आहे!..हे माझे आपुलकीचे ;प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे चार ओळींचे अर्पण पत्र त्याची  कृतज्ञता म्हणून मी वाचकांसाठी देत आहे..आपण प्रत्यक्ष भेटू तर शकत नाही.किंवा मला आपण माहित असाल वा नसालही..आपण माझ्या  वयाचे असाल;ज्येष्ठ असाल ;स्त्री /पुरुष कोणीही असाल,.आपणास मी आवडत असेन वा नसेनही...काहीही असो.!!..पण हे माझे कृतज्ञतेचे शब्दांचे ;सौहार्दाचे ;स्वानंदाचे प्रेम  मी आपल्याला आपल्यातील प्रत्येकाला व्यक्तिश: अर्पण करीत आहे,..मी आजवर कोणावरही केवळ औपचारिक किंवा कृत्रिम प्रेम केले नाही..मला ते जमत नाही..प्रेम हा विश्वास आहे..तो धर्म आहे..पावित्र्य आणि सृजनाचा !!..आपण मला परिचयाचे असाल वा नसाल ..माझ्याबद्दल आपली मते चांगली असतील वा वाईट..तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल 
कसलाही किंतु कधीही नसेल ..हे लेखन वाचताना आपण असे समजू शकता कि मी आपल्याजवळच माझ्या शब्दरूपाने आहे..!जितके माझे लेखन माझे स्वताचे मनापासूनचे आहे..तितकेच तुम्हाला अर्पण केलेले हे अभिवादन आणि निष्कलंक निरासक्त प्रेम माझेच आहे!काही नाती शब्दांत बांधता येत नाहीत..आणि सगळ्यांनाच शब्दहीन नाती उमजतात असेही नाही,,म्हणून शब्दांतून ती व्यक्त करावी लागतात...एका पुस्तकात मी वाचलेले आठवते..एक प्रियकर आपल्या गैरसमज करून घेतलेल्या आणि कायमचे सोडून गेलेल्या प्रेयसीला ;त्याच्या मृत्युसमयी लिहून ठेवतो "प्रिये;आजवर तुझ्या स्मृतींवर जगलो..प्रतारणा केली नाही ..तरीही तुला समजलेच नाही..हे शब्द तरी  वाचून कळतील कि नाही ते ठाऊक नाही..पण शेवटी ईश्वर अधिक दयाळू निघाला त्याने या जीवघेण्या हालांतून सुटका केली.!वाईट ईतकेच वाटते कि त्याला शब्दांशिवाय सारे कळले आणि तुला माझ्या दीर्घ प्रार्थनाही समजू नयेत?."!!...तर एकंदर असे असते.म्हणून शब्दांमधला अर्थ काळजात घ्यावा नुसते व्याकरण नाही..माझ्या वाचकांवर माझे असेच शब्दातीत प्रेम सदैव  राहील.....अजून काय लिहू ?.कळावे ...लोभ असावा ही विनंती,,.!!
   शेवटी........हा ब्लॉग अजून चालू आहे तसेच माझे आयुष्य सुद्धा..आणि त्या महामाता परमेश्वरी जगदेश्वरीस इतकेच सांगतो..कि;
""*****..मत्सम:पातकी नास्ती,
         पापघ्नी त्वत्समा न ही..
         एवं ज्ञात्वा महादेवी, यथा योग्यं तथा कुरु..!!...
..............................लेखनसीमा......हर्षल!!

Monday, October 10, 2011

उगाच ..........!!!

उगाच जाते वाहत सारे जगणे येथे.....
उगाच फिरते मानव्याचे संगीत येथे..
या पृथ्वीचा व्यास कितीही असू दे  मोठा.
अडकून सरते एकाजागी जगणे येथे..!!

शब्दांचे मग उरती मागे रंगीत धागे..
आठवणींचे शुष्क उघडता जुनेच तागे..
अर्थ कशाचा कुणा न कळतो काही तरीही ..
जन्मा येऊन झुंजत जाती मानव येथे..!!

जगण्यासाठी इथे लागल्या अफाट जत्रा ..
सुख भोगण्या करिती सारे दुखद यात्रा..
गर्व-भारिला देह पोसुनी .अखेर शिणती...
ज्ञान मिळेना सौख्य मिळेना तसेच मरती ..!!

स्वतः निर्मिल्या विवंचनांतून स्वत: चालती ..
नियतीला अन सदैव अपुल्या दोषी धरती..
खेळ ईश्वरी मुळी न कळले कोणा येथे...
देव सोडूनी सर्व शोधती ;सारे येथे...!!.............लेखन - हर्षल

Sunday, October 9, 2011

.स्वप्नविश्व.......!!

स्वप्नांचे  पाश  मनाला  ....!!!
अलगद  ओढत  नेती .....!!
हृदयाच्या कमलावर्ती ....!!!.
आकांक्षेंचे  दव -मोती ....!!!............1

अलवार  पापण्या  खुलता .....!!
तो  दिसे  समोरी  तारा .....!!!
विस्तीर्ण  सुखांच्या  देश .....!!
जो  नित्य  दर्शवि  न्यारा .....!!

प्रेमाचे  भरुनी  जाती .....!!

रत्नाकर ; हृदयानमधले  ....!!
ओठांवर  उतरून  येई ....!!
मग  गाणे  स्वप्नामधले ....!!!

स्पर्श  नव्या  तेजाचा .....!!
तेजाळून  आत्मा  जाई ....!!
शुद्ध  प्रेममय  विश्वा .....!!!
मग  मानव  उमजून  पाही ..........!!
***************************************harshal***************

Saturday, October 8, 2011

मी -एक खवय्या ..!!

रसमलाई!!
"जास्त खाल्लस ना तर नरकात जाशील ;रेड्या.."..माझा मित्र मला म्हणत होता...पण त्याकडे दुर्लक्ष करून मी दहावा रसगुल्ला मक्ख्खपणे तोंडात सारला..!!..आणि वर "आईस्क्रीम ;कुठे दिसतंय का बघ रे"अशी एक सहज उपसूचना करून अकराव्या रस्गुल्ल्याकडे मोर्चा वळवला ...!!..एका मित्राच्या लग्नातली हे सत्यकथा..!!
        जास्त खाल्ल्याने माणसे नरकात जातात का ह्यावर मौलिक विचार करून मी अशा निष्कर्षाला पोहोचलो कि कदाचित नरकात खूप विविध पदार्थांन्ची रेलचेल असेल आणि यम व त्याचा रेडा आणि इतर सेवक वगैरे यांना ते अन्न संपवायला खादाड आणि बुभुक्षित [काही जण मला ह्याच नावानी बोलवत असतात]. माणसांची गरज असेल..म्हणून त्यांना खास बोलावून घेत असावेत....!!..काहीही असो..सध्या जिवंत असेपर्यंत असल्या मरणोत्तर गोष्टींत उगाच नाक खुपसल्याने काही फायदा नसतो..त्यापेक्षा तेच नाक उत्तमोत्तम पदार्थांचा सुवास घेण्यात कामी येते...!!
..मी रूढ अर्थाने खादाड नाही...[काही लोक वाट्टेल ते वाट्टेल तसे खात असतात...आमी तसे नाय!!]
परंतु "जे जे उत्तम ते ते हादडावे ;नंतर खावे चूर्ण वगैरे !!"..असा माझा निखळ दृष्टीकोन आहे..!!
इतके असून मी पूर्ण शाकाहारी आहे...अगदी कट्टर...!!..मुळात चव हि मसाल्यांस असते मासांस नव्हे...मग उगाच प्राणी का मारा?..असे मला वाटते ..!!..असो..आणि शाकाहारात काही कमी वैविध्य आहे का?...
एकट्या पोळीचेच कितीतरी प्रकार मीच चापले आहेत...साधी पोळी ;खव्याची पोळी;तेल पोळी;पुरण पोळी;शिर्याची पोळी;रोट्या;फुलके;नान;पराठे...अनेक!!...भाकरी हे आद्य रूप..त्यात ज्वारीची;बाजरीची ;नाचणीची;तांदुळाची ;कळणीची..असे कितीतरी सशक्त प्रकार..!!..पुन्हा थालीपीठे आहेतच..म्हणजे भाजणीची;ज्वारी आणि भाजणी घालून केलेली;वेगवेगळी पीठे एकत्र करून कांदा घालून  अथवा न घालता केलेली;कणिक आणि भाजणी;किंवा नुसत्या कणिक अन ज्वारीची.....!!...यावर भरीस भर म्हणून पोळी किंवा भाकरीचे एक चुलत घराणे आहे...ते म्हणजे डोसे किंवा घावनाचे..आम्बोल्या वेगळ्या ;डोसे वेगळे;..त्यात परत पिठान्प्रमाणे आणि मसाल्यांप्रमाणे अनेक प्रकार ...असे नाना तर्हेचे जिन्नस बनवले का गेलेत ??..खाण्यासाठी !!
..पण इथे एक गोष्ट नमूद केलीच  पाहिजे.. कि खाणारा माणूस चोखंदळ असायला हवा..उगाच "मी पाच किलो  भेंडीची भाजी खाल्ली ;चहाबरोबर टोप भर भात खाल्ला किंवा कालचा भात सकाळी फोडणीचा करून संपवला "वगैरे फालतू गोष्टी ह्या खाणे ह्या सदराखाली मोडत नाहीत...त्याला पाहिजे तर उदरभरण म्हणता येईल..!!
...मी खूप खातो असा आरोप करणारे लोक जेंव्हा माझ्या आसपास असतात तेंव्हा तर मी जास्तच आचरटासारखा हादडत असतो...व त्यांची जिरवतो..[व नंतर त्याचे परिणाम निधड्या छातीने भोगतो]...तिखट आणि गोड असा भेदभाव मी करत नाही...फक्त ते योग्य मौसम बघून खातो..!!
आईला आपली  सगळी मुले सारखीच तसे मला गोड आणि तिखट सारखेच..!!पण म्हणून ते वाट्टेल तेंव्हा नाही..!!...गणपतीच्या पहिल्या दिवशी सुग्रास मोदक [न मोजता][उकडीचे]..[साजूक तुपाचे थरच्या थर घालून ]...दसर्याला पुरणपोळी [पुन्हा प्रचंड प्रमाणात साजूक तूप ओतून]..किंवा आम्रखंड किंवा श्रीखंड ;होळीला पुन्हा पुरणपोळी;नारळी पौर्णिमेला सुग्रास केशर घातलेला साखर भात [तूपाचे डाव वर ओतून]...दिवाळीत रव्याचे किंवा बेसनाचे गरगरीत लाडू;अनारसे;शंकरपाळ्या ;लग्नसमारंभात गुलाबजाम्बू[काही मूर्ख लोक याला गुलाबजाम असे म्हणतात..पण त्यात मजा नाही];रसमलाई;रसगुल्ले;अंगूर मलई;विविध मिठाई;काजू कतल्या ईत्यादी...हे सगळे त्या त्या वेळीच शोभा देते...!!..आणि मी त्यावर त्या त्या वेळी तुफान ताव मारत असताना विविध लोकांनी पाहिलेले सुद्द्धा आहे..!!...
   तिखट खाण्याचे प्रकार अनेक आहेत...अगदी वांग्याच्या झणझणीत रस्श्यापासून ते नाशिकच्या मसालेदार चीव्ड्यापर्यंत...जिभेला सुरसुरी आणणार्या चटकदार भेळेपासून ते अगदी ठाण्याच्या मामलेदाराच्या लालभडक मिसळी पर्यंत ....पुन्हा त्यात काही घरगुती प्रकार येतात..म्हणजे नुसते मोड आलेल्या मटकी किंवा मूगामध्ये तिखट ;मीठ टाका मस्त डिश तयार...किंवा कच्च्या पातळ पोह्यामध्ये तेल [कच्चे];तिखट ;मीठ ;गरम मसाला आणि किंचित साखर व दाण्याचा कूट टाका ..फुल टाईमपास तयार..!!....परत चटकदार कांदाभजी ;मिर्चीभजी;बटाटाभजी...मिर्च्यांसोबत आहेतच..!!..वडे आहेत;सामोसे आहेत ;रगडा-पाव असतो;वडाउसळ असते...सगळे आहे!!..पण खाणार्याला अक्कल पाहिजे कि कुठे आणि कसे खावे....उदाहरण देतो  :..थंड निस्तेज वडे आणि उगाच कोणी खात नाहीये म्हणून मरगळून पडलेले पाव मी खात नाही...वडा मसालेदार ;गरम आणि कुर्कुर्रीत असावा..[हीच अट साध्या डोश्यालाही लागू पडते ]..पाव नरम ताजा हवा..शिवाय योग्य पद्धतीने तळलेल्या तरीही हिरव्या दिसणार्या मिरच्या ;लाल तिखट चटणी ;ठेचा ;आंबट गोड चटणी हे सगळे अनलिमिटेड व उत्तम प्रकारे उपलब्ध असावे....मग वडापाव खायला मजा येते..ती खरी...!!..तर असे विविध तिखट पदार्थ आधी परीक्शावेत आणि मग वाट्टेल तसे खावेत..!!
तिखटामध्ये जसे अनेक नियम आहेत..तसेच ते गोडालाही आहेत...!!
जसे पुरणपोळी दुधाबरोबर चांगली लागते ..पण एकवेळ दूध नसेल तर क्षम्य आहे..पण साजूक तूप नसेल तर त्या पोळीला शून्य किंमत आहे....साजूक तुपाशिवाय पुरणपोळी म्हणजे आईबापाशिवाय मुलगा..किंवा
ढगांशिवाय पाउस..!!..साजूक तूप ईज मस्ट..!!..आणि यातही एक सूचना अशी कि साजूक तूप नुसते आहे असे भासायला नको...तर अक्ख्खी पुरणपोळी त्यात मस्त भिजून गेली पाहिजे..उगीच चमचाभर तूप टाकणार्या अर्धवट माणसांनी जेवायला बोलावले तर खुशाल जाऊ नये..!!पुरणपोळ्यानबरोबर मी तुपाचा डब्बा फस्त केल्याचा इतिहास आहे..उगीच पुराव्यांशिवाय आपण बोलत नसतो!!
तीच गत गुलाब्जांबू किंवा रसगुल्ले किंवा मिल्क शेक किंवा मिठायांची.....असले अमोल पदार्थ खाताना [पहिल्यांदा दर्जा चेक करून]..मी इकडे तिकडे पाहत सुद्धा नाही...उगाच दृष्ट लागायची!!..लग्नात सोन्यासारखे महागडे गोड व मलईदार पदार्थ असताना ..काकड्या नाहीतर पापड किंवा नुसताच पुरी भाजी आणि भात खाणार्या मानावान्बद्दल मला अपार करुणा आहे...असे दिव्य गोड व उत्तम पदार्थ असताना मी बाकीचे सगळे वजा करून फक्त मिठाया आणि रसमलाई वगैरे तगड्या पदार्थांना पानात ठेवतो आणि पुरी ;भात;चटण्या ;पापड वगैरे फालतू सुकड्या मंडळींना एका फटक्यात [पोटात]हद्दपार करतो...!!..
..खूप लिहिता येईल...पण जागा आणि वेळ कमी आहे...!!..जास्त वेळ लिहिण्यात दवडण्यापेक्षा खाण्यात सत्कारणी लावला तर जास्त कल्याण होते ..असे माझे ठाम मत आहे..!!.असो .कळावे ...लोभ असावा...व छान जेवण केलेले असल्यास अवश्य बोलवावे..नुसता मेसेज पाठवलात तरी केंव्हाही जेवायला हजर होईन..पण मी भरपूर [आचरटासारखे] जेवल्यानंतर कृपा करून पैसे मागू नयेत..[मी अन्न फुकट खाण्यात PhD केलीये .सो बी अवेअर!!..असो कळावे व ईतके उर्मट बोलणे ऐकून सुद्धा लोभ असावा !! .]..आपला खादाड हितचिंतक ...!!
---------------------------------------------------------------- लेखन -हर्षल...!!