स्थळ :-ज्योतिषी अभ्यंकरांचे घर ; पुणे
वेळ:-सकाळी ११ चा सुमार ..
"आलास का रे ?..देशपांडे न तू?"
"होय ..पाया पडतो !!"
"शुभमस्तु !!..बैस !!.. हा तुझा मित्र शैलेंद्र म्हणजे नातू हो माझा!! त्याचा काल फोन आला होता ;म्हणत होता देशपांडे म्हणून मित्र आहे त्याला भेटायचं तुम्हाला ..!!..हर्षल नाव ना तुझे ??..छान ..पत्रिकेतील हर्षल ग्रहासारखाच अकस्मात आलास ..असो..काय करतोस सध्या??"
"मी डोंबिवलीस असतो....आताच तृतीय वर्षात गेलो आहे अभियांत्रिकीच्या! civil engineering
शैलेन्द्र आणि मी दोन वर्षापूर्वी iit च्या क्लास मध्ये भेटलो होतो..तो वर्गमित्र नसला तरी स्वभावाने चांगला असल्याने फोनवरून ओळख अद्याप राहिलीये आमची..आता सहा महिन्यांपूर्वी भेटला तो मला अचानक रेल्वे मध्ये ..आणि बोलता बोलता तुमच्याबद्दल सांगितले..ते ऐकून आपल्याला भेटायला यावेसे वाटले..काल मामाकडे येणार होतोच पुण्याला म्हणून शैलेन्द्र ला विचारून पत्ता घेतला ..१० दिवस मुक्काम आहे पुण्यात ..तुम्हाला थोडा त्रास दिला या वयात म्हणून क्षमा करा परंतु तुमच्यासारखे ज्ञानी आता भेटणार नाहीत आणि माझ्यासारख्याला बर्याच गोष्टी तुमच्यासारख्यानशिवाय समजावणारे तपोवृद्ध लाभणार नाहीत म्हणूनच वेळ न दवडता आलोय...अशा आशेने कि आपण काही ज्ञान देऊ शकाल मला ..!!"
"[हसून]..अगदी मोठ्या माणसांसारखा बोलतोस रे..!!.जेवण झालंय का?..नाहीतर जेवूनच जा ..आणि कसलं ज्ञान हवंय तुला ?..ज्योतीषाच??..कि अजून काही ??"
"नाही गुरुजी ; एकंदरच ब्राह्मण ईतिहास आणि संपूर्ण हिंदू समाजाचा आणि मानवी समाजाचा ईतिहास यावर मी काही स्वतंत्र आणि मूलभूत विश्लेषण केलंय..पुराव्यांसहीत ..परंतु प्रचलीत ईतिहास फार उथळ ;खोटारडा आणि सवंग वाटतो त्यापुढे ..वेद ,पुराणे आणि अनेक मूलभूत ग्रंथ वाचल्यावर मी भारतीय प्रचलीत ईतिहास पाहतो तेंव्हा आपल्याच माणसांची कीव येते..त्यासंबंधी बोलायचय आपल्याशी ..शिवाय ज्योतिषाचे काही नियम आणि योग यांवर सुद्धा..!!"
"अरे तू इंजिनियर होणारेस का प्राच्य-विद्या -पंडीत ?..आणि तू म्हणतोस तितका सोपा विषय नाहीये ईतिहास !..आणि ज्योतीषाच म्हणशील तर हा एक अथांग सागर आहे बाळा..!!शिवाय तुझे ज्ञान किती आहे हे अजून तपासावे लागेल !!"
"परीक्षा घ्या माझी ;त्याचसाठी आलोय इथे .!!.आणि विद्यालयीन अभ्यास म्हणाल तर त्यापेक्षा जास्त आनंद आणि समाधान मला ह्या क्षेत्रात मिळेल असे वाटते..!!नुसता इंजिनिअर होऊन कोरडा माणूस बनण्यापेक्षा काही अधिक उत्तम करावे आणि अधिक धर्म जाणावा असे वाटते..तुम्ही सांगाल मला माझ्या प्रश्नाची उत्तरे?..अर्थात तुम्हाला माझ्या पात्रतेबद्दल खात्री झाल्यावरच..!"
"सांगेन बाळा !!..ठीक आहे..एक मिनिट हां!!..हं ही घे एक पत्रिका ;आणि सांग काय सांगशील यावर ??.."
[अर्ध्या तासाने ]
"मी लिहिले आहे गुरुजी ;माझे या पत्रीकेबद्दल्चे परीक्षण ..बघा !!
[ते वाचतात आणि वाचून झाल्यावर ]
"इतक्या लहान वयात कुठे शिकलास रे बाळा??.उत्तम . .पण राहूचा कुयोग नक्की होईल असे वाटते?
पुढे काय लिहिलयस ?..हो बरोबर.. कारण चंद्र नवमेश आहे आणि सूर्य पराक्रम स्थानात ...छान !!अंश योग येतात वाटत ??..असा विद्यार्थी फार पूर्वी एक होता ..तुझ्यासारखा ४० वर्षांने दुसरा बघतोय ..!..अजून बरंच शिकशील ..उपासना करतोस ना ??..छान ..!!"
"मग सांगाल मला ..माझी उत्तरे ..??"
"अवश्य !..काय हवंय विचार..!!..ईकडे बघ ती ट्रंक दिसतीये ना? ती काढ त्यात जुनी पुस्तके आहेत ..आता दुर्मिळ आहेत ती ..पण झेरोक्स मारून घे हवे ते पुस्तक..बरीच उत्तरे त्यात मिळतील "
"आणि गुरुजी अजून एक ;सध्या काही कोकणस्थ ब्राह्मणांकडे एक सीडी असते ;मी पाहिलीये ती! !..त्यात ईतिहास आहे त्यांचा असे ते म्हणतात ...पण तो पर्शुरामापासून चालू झालेला दाखवलाय शिवाय गोत्रांचे ;प्रवरांचे आणी आपल्या वेदांशी साम्य दाखवणारे उल्लेख अत्यल्प आहेत त्यात...केवळ ३५०० वर्षाचा ईतिहास आपला आहे असे अत्यंत धादांत खोटे प्रचार सुरु आहेत ..आणि अज्ञानामुळे बरेच लोक ते खरे मानतायेत..!!..आपल ईतिहास किती जगड्व्याळ आहे हे कसे समजेल यांना ?..भेदांच्या भिंती कशा कोसळतील ब्राह्मण समाजातल्या ??..हा भारतीय समाज कसा स्वताचा एक धर्म आणि एक तत्त्व समजेल ?..आणि कधी?.""
"आपला ईतिहास फार प्राचीन आहे,देशस्थ ;कोकणस्थ आणि तत्सम भेद अर्वाचीन आहेत..समस्त भारतीय ब्राह्मण ;क्षत्रिय आदी केवळ चार वर्णांतच विभागले होते..कालांतराने आणि कलियुगाच्या आगमनाने चार वर्णांच्या चार सहस्त्र जाती झाल्या..आणि जातीच स्वताला मूलभूत समजू लागल्या..भेद झाले;धर्म लयास गेला;ब्राह्मण भ्रष्ट झाले;समाज अज्ञानमय झाला..यंत्र प्रगती विवेक देऊ शकत नाही.तुला हेच म्हणायचेय ना??....".खूप बोलता येईल ..पण उद्या ये !!..आणि आत्ता जेवूनच जा हो.!!.कोकणस्थ आडनाव असले तरी खरा ब्राह्मण आहे [हसतात ]..आमच्या पुण्यातील काही ईतर नुसत्याच नामधारी चित्पावन ब्राह्मणांसारखा नाहीये हो मी ..!!.
"[उतावीळपणे] अगदी हेच गुरुजी हेच .! आणि अजून बरेच काही !!.आणि [हसून ]तुम्हाला आजच्या रूढ व्याख्येप्रमाणे कोकणस्थ कोण म्हणेल ?..हो पण सत्त्वशील ब्राह्मणाचे उदार हृदय नक्की आहे इतके मात्र खरे...!!
"अरे देशस्थ आणि कोकणस्थ काय किंवा ईतर पोटजाती काय ,आंधळे झालेत सगळे,बहुतेक तर नुसते गोत्राने आणि आडनावाने ब्राह्मण उरलेत,अनाचार आणि स्वार्थ हे ब्राह्मणाचे दोन शत्रू असतात..त्यांना शरण गेले कि अशी भयंकर स्थिती उत्पन्न होणारच..आणि अजून कलियुगाचा बराच शेष आहे,अजून बरेच दुर्धर प्रसंग येणारेत समाजांवर..मानवतेवर ..!!.अनेक देशस्थ काय किंवा चित्पावन काय किंवा अन्य कोणी ब्राह्मण काय सगळेच आत्मविद्येपासून दूर होत गेलेत..आणि सदाचारापासून फारकत घेतायेत !!..आजकाल तर कुणाला ब्राह्मण म्हणावे असा प्रश्न पडेल !!..ब्राह्मणांनी धर्म काळाच्या ओघात फक्त पोथ्यांद्वारे ;पाठांतराद्वारे जिवंत ठेवला ईतकेच पुण्यकर्म घडले त्यांचे हातून..सुदैवाने..!!..पण काल-पुरुषाचा प्रभाव त्यांवरही पडलाय आणि म्हणूनच ,तेही फक्त जाती ;पोटजाती आणि ईतर संकोच केलेल्या रूढी यांचे भक्ष्य ठरलेत !..उदाहरण म्हणजे,कोकणस्थ कंजूस;धोरणी;आणि हुशार किंवा चलाख बुद्धीचे असा एक समज आहे ;त्यात सत्य ईतकेच कि कालमानाने त्यांच्या पिढ्या विशिष्ठ संस्कार आणि विचार यांच्या चक्रात राहिल्या ;परंतु सुज्ञ ब्राह्मणाने असा विचार करावा कि परंपरा ;रूढी कालमानाने उत्पन्न होतात आणि धर्म सनातन असतो..!! ज्ञानी 'ब्राह्मण' म्हणून श्रेष्ठ होणे महत्वाचे कि लहान सहान गुण-अवगुण यांवरच स्वताचे विशिष्ठ ब्राह्मण्य मिरवायचे हे ज्याला समजेल तोच ब्राह्मण अशा पोट भेदांच्या पार जाऊ शकेल !!आपल्या विविध ब्राह्मण पोट-जातीमध्ये जो भेद आहे तो 'ब्राह्मणत्वाचा'नाहीच ..भेद असलाच तर तो केवळ प्रादेशिक वैशिष्ट्यांचा आणि तत्सम काही लहान सहन परंपरांचा ..आणि सध्या लोक "ह्या" वैशीष्ट्यालाच ब्राह्मणत्व समजू लागलेत ..हेच अत्यंत घोर दुर्दैव आहे !हा अखंड ब्राह्मण समाज आता केवळ पूर्वपुण्याईवर ;आनुवंशिक गुणांवर सध्या तरी टिकून आहे..पण ही पुण्याई ;हे भाषावैभव ;हे उच्चारज्ञान;ही वाणी शुद्धता;गोत्र-प्रवरादी ज्ञान हे सुयोग्य विवेकाशीवाय आणि शुद्ध कर्मांशीवाय टिकून देखील राहणार नाही..पुढच्या पिढ्या तर कसलाच अर्थ समजू शकणार नाहीत ..!!..लक्षात ठेव..जो मनुष्य ज्ञान ;सत्कर्मे आणि निस्वार्थ बुद्धीने आयुष्याचा निर्वाह करतो ;ज्याचे आचरण पवित्र्याच्या ध्यासातून सतत अधिकाधिक उन्नत होत जाते असाच मनुष्य म्हणजे खरा ब्राह्मण होय.!!.नाहीतर बाकीचे सगळे म्हणजे समर्थ रामदासांनी सांगीतलय न तसे .."जन्मा येऊन; जननी वायाची कष्टविली"..नुसते नावाचे ब्राह्मण !!..'ब्राह्मणत्व' हे आकलन व्हायला हवे !!स्वजातीचा वृथा अभिमान संकुचित करतो;उन्नत नाही!!..आजकाल हेच ब्राह्मणांना सांगायची वेळ आलीये ह्याहून दुर्दैव कोणते??.....असो!!
..फार जुने 'जाणते' आणि 'नेणते' लोक पाहिलेत मी बाळ;आता ८५ वय चाललंय सध्या..शरीर साथ देत नाहीये..पण तुझ्यासारखे तरुण बघितले कि अजून माझेच सिद्धांत मनात पुन्हा दृढ होतात;आशा वाटते;निद्रिस्त स्वप्ने आणि शुद्ध सद्गुण अजूनही मेलेले नाहीत यावर पुनःश्च विश्वास बसतो..!!थोडा उशीरा भेटलास पण ठीकाय, हरकत नाही..कदाचित ह्या आठवड्यानंतर परत भेटणारही नाहीस. नियती जरा खेळ करतच असते.ईश्वराशिवाय दुसरा त्राता वाटू नये म्हणजे ही नियती सुसह्य होते..असो..चला भोजन करून घेऊ..भरपूर खा हो बाळ,संकोच ठेवू नकोस,..आमच्या हिने पाने मांडली असतील ..चला.!! "
[जेवण करून अभ्यंकर श्री आणि सौं च्या वृद्ध पायावर डोके ठेवून पुस्तके घेऊन निघतो...पुढचे चार दिवस अखंड चालणारे ज्ञान सत्र डोळ्यासमोर नाचत असते..मनात प्रकाश भरून जातो..आपण एकटे नाही आणि आपले विचार ज्ञानी मनुष्ये मान्य करतात हा विश्वास आणि दिलासा मनात भरून मी देवाचे आणि अशी ऋषीतुल्य माणसे मिळवून देणार्या माझ्या नशीबाचे आभार मानतो.!!..पुढचे चार सोनेरी दिवस स्वप्नासारखे डोळ्यात तरळत ..मी अभ्यंकर गुरुजीच्या जुन्या वाड्याच्या बाहेर येतो...प्रसन्न मनाने !!]
...मी त्या आठवड्यात चार वेळा त्यांकडे गेलो....त्यांचे ज्ञान पहिले;निस्वार्थी वृत्ती पहिली!अनेक विषयांवर मनसोक्त चर्चा केली ;गोड-धोडाचे भरपूर जेवण केले ;अत्यंत क्लिष्ट विषय हाताळले ; उर फुटेपर्यंत शिकलो असे म्हंटले तरी अतिशयोक्ती होणार नाही .. ..तृप्त आणि भरलेल्या मनाने त्यांना अनेकवार नमस्कार केला..!!हे ऋण अनिर्वाच्य आहे..असे भाग्य क्वचित लाभते !!
..शेवटच्या दिवशी त्यांची सर्व पुस्तके परत केली..त्यातले एक दुर्मिळ पुस्तक मला त्यांनी भेट दिले.....
.......आणि, मी त्यांच्या पाया पडून निघत असतानाच,आपला कंप पावणारा उजवा हात त्यांनी माझ्या तळहातावर ठेवला ..आणि दुसरा हात आधारासाठी माझ्या खांद्यावर ठेवला!!..आपल्या कापत असलेल्या उजव्या हाताने माझा उजवा हात धरून ठेवत मला म्हणाले "निघालास ना;आता भेट बहुदा नाही ..वर्षभर तरी पुण्यात येणार नाहीयेस तू..त्यानंतर येऊन उपयोगही नाहीये..!!"मंद हास्य करीत ते शांतपणे म्हणाले .........आणि माझ्या डोक्यात लख्खकन वीज चमकून गेली !!...मला धक्का बसला ;मी विसरलो होतो ;ते एक महान ज्योतिषी सुद्धा होते..आणि महान ज्योतिषी यमाचे संकेत चांगलेच जाणतात..स्वतःबद्दलचे देखील!..व्यवस्थित समजले मला!!
कापर्या आवाजात मी म्हणालो "कधी साधारण ?"....
ते म्हणाले "लवकरच रे बाळा!!तिथी विचारू नकोस !!ती मात्र सांगणार नाही; तसेही तुला सांगणार नव्हतो ;आमच्या "ही"ला नाही माहित ;मुलाला;सुनेला आणि नातवाला देखील नाही माहीत..पण तुला सांगावेसे वाटले म्हणून सांगितले..हे ज्ञान तुझ्याजवळच ठेव..!!अभ्यास उत्तम कर..आणि चिंता करू नकोस..सत्य स्वीकारायला अवघड असले तरी ते स्वीकारल्यानंतरच ज्ञान प्राप्त होते..तुला समजेल म्हणून सांगितेले.!!"...
" अहो पण ,असे अचानक ?तुमची पत्रिका बघीतलीये मी; ईतका लगेच योग आहे वियोगाचा ते नाही समजले हो !!खरंच"..मी जड मनाने ,अस्वस्थ होत विचारले..
"अजून बरंच शिकायचंय बाळा तुला ज्योतिष !!..वेळ आहे ते सगळ समजायला ! आणि योग्य वेळी समजेल सुद्धा तुला..मी सांगतोय ते सत्य आहे इतके खरे ..एक गोष्ट ध्यानात ठेव,स्वार्थ हा खरा मृत्यू ;खरा नाश.. देहाचा अंत क्षणिक असतो,नियतीचा साधा नियम आहे तो ,त्याला घाबरून जाऊ नये.."..ते अगदी प्रेमळपणे म्हणाले .
"मी खरंच सांगतो ;काय बोलावे मला समजत नाहीये..पण मला अजिबात आवडलेले नाहीये हे तुमचे सत्य "...माझा कंठ भरून आला होता हे वाक्य बोलताना !!...शब्द सुचत नव्हते!!
माझा तळहात त्यांनी घट्ट धरला..माझ्या खांद्यावर थोपटले..आणि माझ्या खिन्न आणि विभ्रमीत झालेल्या मुद्रेकडे पाहून हलकेच हसले..त्या हसण्यात एक गांभीर्य होते;हळवेपणा होता...त्यांचे डोळे भरून आले होते...प्रेमाने आणि मायेने ..अगदी एखाद्या प्रेमळ आजोबांसारखे!!...मी न बोलता त्यांचा निरोप घेतला..!!
सहा महिन्यांनी त्यांचे निधन झाले..मला जावेसे वाटत असून मी गेलो नाही..पाय वळले नाहीत तिकडे !!..शैलेंद्र ने मध्यंतरी पुण्याच्या चित्पावन सभेचा अंक मला दाखवला..त्यात आजोबांची बातमी बघ
म्हणून सांगितले .मी वाचू लागलो ..
"चित्पावन ब्राह्मण समाजातील एक विद्वान ज्योतिषी श्री.अभ्यंकर यांचे आज निधन झाले..ते सुपरिचित आणि विद्वान ज्योतिषी होते..परंतु प्रसिद्धीची कास धरली नाही...".ईत्यादी..आणि शेवटी वाक्य होते "...ब्राह्मणांमध्ये भूषणावह असलेल्या चित्पावन समाजात असे विद्वान निर्माण झाले हे या समाजाचे सुदैव ,..त्यांच्या मृत्यूने चित्पावन समाजाची मोठीच हानी झालेली आहे.." ..
मी शेवटच्या ओळीकडे विखारी नजरेने थंडपणे निरखून पहिले "... त्यांच्या मृत्यूने चित्पावन समाजाची मोठीच हानी झालेली आहे.."...हे वाक्य म्हणजे ह्या देवतुल्य माणसाची उंची शून्यवत करणारे वाक्य होते...!!..लोकांना थोर पुरुष समजत नाहीतच लवकर !!.मी पुन्हा वाक्य वाचले; माझा कप्पा उघडून मला हवी ती वस्तू मिळवली एक जाड स्केच पेन !!
.............क्षणाचाही विचार न करता मी ,त्या वाक्यातल्या 'चित्पावन' शब्दावर जाड स्केच पेनाने काळी गडद मोठ्ठी फुली मारली ...आणि तिथेच त्याऐवजी "समस्त ब्राह्मण"असे दोन शब्द घालून तेच वाक्य पुन्हा वाचले ... "" त्यांच्या मृत्यूने 'समस्त ब्राह्मण 'समाजाची मोठीच हानी झालेली आहे.." आणी ,या वाक्यापुढे मनातच स्वताचे एक वाक्य टाकले ...."ही हानी किती भयंकर आहे हे;सध्याच्या विस्कळीत ;विभ्रमीत आणि स्वजातींचा अहंकार आणि उन्माद चढल्याने अज्ञानी झालेल्या संपूर्ण ब्राह्मण समाजाला इतक्या लवकर समजेल असेही वाटत नाही...!!"
........खरच सांगतो .....
"" असे "शुद्ध" आणि "खरे" ब्राह्मण अगदीच दुर्मिळ असतात;अगदी प्रत्यक्ष देवाच्या दर्शनाइतकेच .दुर्लभ!.. आणि मी त्यातल्या एकाचे अपरोक्ष दर्शन घेतले हेच पुष्कळ आहे ..!!"" ...
.................................................लेखन:--- हर्षल