Thursday, October 20, 2011

न समजलेली "ती"...!!

तू भेटत जातेस नेहेमी तरी तू मला कळत नाहीस..
तू दिसतेस रोज तरीही अजून मला उमगत नाहीस..
माझे मन धावत राहते तुझ्या मनाचा थांग शोधत;
आणि अगदी जवळ पोहोचते बर्याच प्रश्नांची रांग मोडत ;
आणि ,तेवढ्यात तू म्हणतेस"चल निघुयात;वेळ झाली";

तू हसलीस कि आकाश स्पष्ट झाल्यासारखं ;
मनाला वाटत शंकांचं वारूळ सरून गेल्यासारखं ;
वाटत आता आपले परत सूर जुळतील ;
नवे प्राण पुन्हा नात्यामध्ये शिरतील;
आणि तेवढ्यात तू म्हणतेस "काहीच कळत नाहीये रे.."
"काय सांगू तुला हेच ठरत नाहीये रे""...
आणि पुन्हा भरून जातेस माझ्या मनात प्रश्नांच्या पखाली..!!
कानात उरतात फक्त तुझे शब्द"चल; निघायची वेळ झाली"!! 


कधी उभी असतेस माझी प्रतीक्षा करत;चातकासारखी;
आणि म्हणतेस "तुझ्याशिवाय करमत नाही .उशीर करू नकोस रे असा""
मी सुखावतो मनात तुझ्या तळमळीने ;तुझ्या विनंतीने;
आणि तुला  म्हणतो सुद्धा  "तुला अंतर नाही देणार कधी"
पण तेवढ्यात तू म्हणतेस माझ्या डोळ्यांत बघत "खरच जमेल का रे आपलं?"
आणि खिन्नपणे उडून  जाते तुझ्या गालावरची लाली ..!
खालच्या मानेने म्हणतेस"जाऊ देत ;चल;निघायचीच वेळ झाली..!!"

तू फुलांसारखी फुलून येतेस ;आणि कळीसारखी कोमेजून जातेस;
पिसासारखी अलवार येतेस;अन दवासारखी उडूनही जातेस;
तुझ्या आनंदी हसण्यात मधेच असतो एक अशांत स्वर ;
जणू अमृताच्या कुंभामध्ये ;थेंबभर जालीम जहर !! ...
तुझे तुलाच कळत नसते ;पण डोळे तुझे बोलून जातात ;
अलगद माझी साथ सोडून ;पावले तुझी दूर जातात ;
भानावर येताच रडून म्हणतेस"मला काहीच कळत नाही"
;अजून तुला स्वीकारायला नीट मला जमत नाही "
शब्द तिथेच संपून जातात ;स्पर्श सारे विरून जातात ;
अश्रू मात्र न चुकता तिथेहि तुझी साथ देतात..
अशा वेळी मी तुला सांभाळायला जवळ येताच ;
हात माझा सोडून म्हणतेस:""जाऊ देत ;निघायची वेळ झाली"!!

बहुतेक वेळा माझ्यासोबत माझीच वाट चालत जातेस..
तरी वाटते कुठलातरी परका रस्ता न्याहाळत जातेस ..
तुझी पावले अडखळतात;स्वतःवरच रुसल्यासारखी  ;
जणू माझ्या चालण्यावरती मुळीच विश्वास नसल्यासारखी... 
तेंव्हा तू बोलत नाहीस ;खिन्नपणे हसतेस;
माझे मूक प्रश्न टाळून;निरुत्तर होऊन बसतेस !!"
उगाच वाटते आपले रस्ते वेगळे व्हायची वेळ आली..
मग त्यावेळी मीच म्हणतो"जाऊ देत ,चल, निघायची वेळ झाली"..!!
----------------------लेखन- हर्षल


 विशेष सूचना:-
 [सदरहू काव्य हे काल्पनिक असून ;हे काव्य रचणार्या कवीला "कोण रे ती मुलगी ?"..आम्हाला सांग ना!!प्लीज "..वगैरे प्रकारचे फालतू प्रश्न विचारू नयेत....कविवर्य हे जन्माने पुण्याचे आहेत हे लक्षात ठेऊन असल्या प्रश्नांना ते कशी उत्तरे देतील याचा सुज्ञ वाचकांनी विचार करावा....अन्यथा कर्माची फळे भोगण्यास सिद्ध राहावे...ही नम्र सूचना !!..................................
----------------------[कवीला ओळखणार्या तज्ञ व  
                       जाणकारांच्या  हुकुमावरून  
                       [व स्वानुभवावरून] ]  

1 comment:

  1. chhan aahe :) eka lagnalalelya/lagnecchu mulachi kavita vatatey hi :P

    ReplyDelete